शनिवार, १४ जानेवारी, २०१७

कमलदलांचा पाश ( ३)
. . त्या नंतर पुन्हा तो तिला तिथे दिसला नाही . सुरवातीला काही दिवस तिला चुकल्या सारखं वाटलं , तिने सुटकेचा निश्वास टाकला . सुंठी वाचून खोकला गेला . हळूहळू ती लहूला विसरून गेली . .
. . हल्ली तिला घरी जायची एक वेगळीच ओढ वाटायची . समोरच्या बिल्डिंगमध्ये एक तरुण राहायला आला होता . सध्यातरी एकटाच होता .सत्तावीस अठ्ठावीस चा असेल . लग्नाची पूर्वतयारी म्हणून फ्ल्याट घेतला असणार . दणकट शरीराचा , रांगडा ; बहुतेक स्पोर्टस् मन असणार . कधी कधी खांद्यावर भलीमोठी कीट लटकावून , येता जाता दिसायचा . तिला आवडायचा तो . त्याचं तारुण्य ,जोश ,उत्साह ,लोभस धांदरटपणा , मर्दानगी , चालण्यातला डौल -- सर्वच तिला खूप आकर्षक वाटायचं .तिच्या बाल्कनीचं दार ती नेहमी उघडं ठेवायची . घरात वावरताना , त्याच्या घराकडे नजर टाकायची .तो दिसला की नवथर तारुण्यातली अजब सळसळ तिच्या देहभर पसरायची .
. . थकल्या भागल्या ,हताश , हरलेल्या , प्रौढ शरीरात ह्या मोरपंखी भावना येतात कुठून ? त्या देखील , कुणातरी अनोळखी , परपुरुषा बद्दल ? तिचा प्रेमविवाह होता . सुरुवातीच्या एका हळूवार क्षणाला , तिने राजीवला विचारलं होतं , " काय आवडलं तुला माझ्यात ? '
. त्याने तिचे केस मोकळे करत म्हटलं होतं , " तुझे हे लांबसडक घनदाट केस ! तुला माहिती आहे ? तुझे केस पिंगे आहेत ; आणि डोळे पण तसेच पिंगे आहेत . पिंगट ... तपकिरी . तुझ्या केसांचं प्रतिबिंब तुझ्या डोळ्यात पडलं आहे ! "
. . आपल्या चेहऱ्यावर तिचे रेशमी केस पसरवत , त्याने तिला घट्ट जवळ घेतली होती . तिच्या शरीराच्या कणाकणातून विजेच्या असंख्य ठिणग्या उडाल्या होत्या .पण त्याने तिला कधीच विचारलं नव्हतं , " तुला काय आवडलं माझ्यात ? " त्याने गृहीतच धरलं होतं का ; की स्त्रीला आवडणारं सर्व काही त्याच्यात आहे . नावडण्या सारखं काही नाहीच .
. .तिला कळत नव्हतं ; हे प्रेम म्हणजे नक्की काय असतं ? कुठे असतं ? कसं असतं ? कसं दिसतं ? रूप , रंग कसा असतो त्याचा ? राजीवच तिच्यावर प्रेम होतं ? शाळा कॉलेजात त्याला मिळालेली अनेक मेडल्स , सर्टिफिकेटस , व्यवसायातील मान सन्मान , अवार्डस ; हे सर्व जसं त्याचं समाजातील स्थान उंचावर , अधिक उंचावर नेत होतं ; तसच तिचं पण त्याच्या आयुष्यातील स्थान होतं का ? देखणी , उच्य शिक्षित , उठावदार व्यक्तिमत्वाची एक स्त्री ! कुठेही बरोबर नेण्यासारखी , मिरवण्यासारखी ! पण तिचं तरी त्याच्यावर प्रेम होत का ? की तिने पण त्याला हो म्हणताना सुरक्षितता पाहिली होती ? आर्थिक , सामाजिक , वैयक्तिक !
. . राजीवने हर प्रयत्नाने तिला मिळवलं होतं . दोन वर्ष तो तिची प्रणयाराधना करत होता .तेव्हां कधीही , कुठेही , सहज आल्यासारखा भेटायचा . शब्दातून , डोळ्यातून , स्पर्शातून , आसक्ती व्यक्त करायचा . ती त्याला मिळणारच , ह्याची त्याला खात्री होती . आज पर्यंत त्यानं हवं ते मिळवलंचं होतं . मनात येईल ते मिळवणारा एक यशस्वी पुरुष ! #सुरेखामोंडकर ३०/१२/२०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा