शनिवार, १४ जानेवारी, २०१७

कमलदलांचा पाश (८)
. . तिने फोन ठेवून दिला .हुंदक्यांनी ती गदगदत होती . नेहमी प्रमाणे मुलं झोपली होती. राजीव अजून घरी आला नव्हता . " लहू , अपयशाचा कोणी वाली नसतो . तू अपयशी म्हणून एकटा , एकाकी ! दिसायला मी यशस्वी ! शिक्षण , बहरलेला संसार , संपत्ती -- सगळं आहे . पण मी देखील एकाकीच रे ! तू माझ्यामध्ये आधार , आपुलकी शोधतो आहेस . मी पण असाच कुठे कुठे आधार , जिव्हाळा शोधत होते रे . माझा पण विश्वासघात झाला . प्रत्येकाचे हेतू वेगळे असतात लहू . मी वेळेवर सावरले . नाहीतर कपाळमोक्षच झाला असता . तू पण सावर स्वतःला . आधार , बळ दुसरे कोणी नाही आपल्याला देऊ शकत ; आपला आपल्याला मिळवावा लागतो , द्यावा लागतो .एकाकीपणा आणि एकटेपणा ह्यातला फरक समजून घेण्याचा मी प्रयत्न करतेय . सगळ्या माणसांत असतानाही कां असा एकटेपणा आपल्याला ग्रासून टाकतो ; भरल्या संसारी का असे एकटे असतो आपण -- शोधतेय मी ! तू ही शोध ! हा शोध न संपणारा आहे ; पण त्या वाटेवर चालायला सुरुवात करणं महत्वाचं आहे . मी तुझा आधार नाही होऊ शकत . स्वतः स्वतःचा आधार बन ! '
. अकरा वाजून गेले होते . पुन्हा फोन ठणठणायला लागला . ती एकटक फोनकडे बघत बसली . तिने फोन उचलला नाही .वाजला वाजला आणि मग आपसूकच थांबला . पुन्हा नाही वाजला . तिला खूप वाईट वाटलं . लहूची एकुलती एक आशेची दोरीही तुटली होती . त्याच्या शब्दाला मान देऊन , खास त्याच्यासाठी ; फक्त त्याच्यासाठी आलेल्या त्याच्या म्याडम ; त्याच्या आनंदी , स्वच्छंदी आयुष्याशी जोडणारा -- त्या काळाचा साक्षीदार असणारा एकमात्र दुआ , त्याच्या म्याडम ! त्याचा आत्मसन्मान ,मान , प्रतिष्ठा , सर्व काही लग्नाला असणाऱ्या तिच्या उपस्थितीवर अवलंबून होतं .
.रिसीवर खाली काढून ठेवावा असं तिला कधीपासून वाटत होतं. पण एवढं निष्ठुर होणं तिला जमत नव्हतं . फोन पुन्हा वाजला नाही . बुडत्याने जीवाच्या आकांताने शेवटची धडपड करावी तशी ती त्याची शेवटची धडपड होती .#सुरेखामोंडकर ०२/०१/२०१६
क्रमशः

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा