मंगळवार, १७ जानेवारी, २०१७

. हे नक्की काय असतं ... ( माझे ठाणे )
.
.
. . काही म्हणजे काय , बऱ्याच वर्षा पूर्वीची गोष्ट आहे .आमच्या पाचपाखाडी विभागात फुटपाथवर , जागोजागी सिमेंटचे छान , आरामशीर बाक टाकले गेले . मला ही कल्पना खूप आवडली . त्या बाकांचा चांगला उपयोग केला जायचा . बऱ्याचवेळा , चालण्यावर मर्यादा आलेले , घरात बसून बसून कंटाळलेले वृध्द तिथे निवांत बसायचे . एक आहे म्हणून दुसरा पण यायचा , त्यांचा छान वेळ जायचा . माणसात आल्यासारखं त्यांना वाटायचं . एका बाकाच्या जवळच शाळेच्या बस चा थांबा होता . शाळेच्या वेळेला तो बाक दप्तरांनी भरून जायचा . मुलांच्या आणि त्यांच्या पालकांच्या घोळक्याने वेढून जायचा .
.
. . जेमतेम महिना पण झाला असेल , नसेल ; सकाळी फिरायला बाहेर पडले , पाहते तर काय हे सगळे बाक फोडून टाकलेले .आदल्या रात्री तर त्यावर छोटूला गाड्या दाखवायला घेऊन बसले होते मी आणि सकाळी तो मोडून पडलेला !! अगदी छिन्नविछिन्न करून टाकलेला ; त्याचे पाय पण फोडले होते . म्हणजे कोणीही क्षणभर त्यावर टेकू पण शकत नव्हतं . खूप हळहळले ! अगदी आमच्या झोपायच्या खोली समोर रस्त्यावर येणारा तो बाक , .. जी अवस्था झाली होती त्यावरून अवजारांनी , हत्यारांनी , त्याची वासलात लावली होती ; पण आम्हांला कोणाला पत्ता पण लागला नव्हता ! जाग आली नव्हती !बरेच दिवस ते तसेच तिथेच पडलेले होते ; उद्वस्त ! नंतर काही काळाने तिथे त्याहून सुंदर लाकडी बाकडी ठेवली गेली . हिरव्यागार रंगाने रंगवलेली ! लोक त्यांचा उपयोग करताहेत ;अजून तरी ती आहेत ; पण मधल्या काळात माझी नातवंड मोठी झाली . ; गाड्या आणि रिक्षा , डोळे विस्फारून बघायच्या पलीकडे गेली . स्वतःच्या सायकली चालवायला लागली . ह्या नव्या बाकांवर बसायचा योग मला आला नाही .
.
. . माझा लाडका कचराळी तलाव ! खरं म्हणजे हे उदकाचे तळे , एखाद्या कहाणीत शोभावे असे रत्नजडीत आहे . कोणत्याही मोसमात हा तलाव तिलोत्तम असतो .तळ्याच्या भोवती बांध आहे . तलावाची मर्यादा आखण्यासाठी बाहेरूनही रुंद कठडा करून लोखंडी कांबीचं कुंपण घातलं आहे . हे लोखंडी कुंपण जमेल तेवढं आणि तिथे तोडलेलं , वाकवलेलं असतं . बसण्याच्या हेतूने केलेल्या बांधावरच्या फरशा फोडलेल्या असतात . खरं म्हणजे हे बांधच फोडून टाकलेले असतात . तळ्यात प्लास्टिकच्या पिशव्यांसहीत निर्माल्य टाकलेलं असतं ! तरी देखील हा तलाव कमालीचा देखणा दिसतो ! जातीच्या सुंदरा सारखा ! महापालिकेने त्याचे सुशोभीकरण केलं . आखीव रेखीव जागा करून नवीन झाडं लावली . मुलांसाठी भरपूर वाळू आणि खेळाची साधनं असणारा , खास त्यांचा सुरक्षित हिस्सा केला . त्याच्या सभोवती बुटका बांध टाकला . त्यावर पालकांना , मुलांकडे लक्ष देण्यासाठी बसता येतं .चालायच्या रस्त्यावरचे पेव्हर ब्लॉक्स तुटले होते . लक्ष नसलं तर अडकून पडायला व्हायचं. तिथे छान कॉन्क्रीटचा रस्ता केला . व्यायामासाठी जागृत असणाऱ्या लोकांनी हा रस्ता सकाळ संध्याकाळ फुललेला असतो !
.
. . हे काम हळूहळू बरीच वर्षे चाललं आहे . झाडं आता मोठी झाली आहेत . मध्यंतरी शेलाट्या पाम वृक्षांना कलात्मकरित्या रंगविण्यात आलं . इतकी गोड दिसत होती ती ! रंगीबेरंगी वस्त्रं परिधान केलेल्या उदबत्ती सारखी . जी झाडं तोडली होती त्यांनाही रंगांनी सजवलं होतं .विध्वंस क्षणात करून टाकता येतो , पण काही घडवायचं असेल तर त्याला खूप काळ , मेहनत आणि कल्पकता लागते . हे पाम रंगवायचं कामही महिनाभर तरी चाललं होतं . संपूर्ण तळ्याभोवतीचे पाम रंगवून झाले . संध्याकाळी फिरायला गेलेली मी , दिवेलागणी झाल्यावरही तिथेच बसून राहिले . तो शांत तलाव ,; त्यातील रंगीबेरंगी प्रकाशाची उधळण करणारं कारंज , दुर्गा विहारच्या जांभळ्या दिव्यांच्या रोषणाईची आणि आजूबाजूच्या उंच इमारतींची त्यात पडलेली प्रतिबिंब .आणि घेराव घालून असणारे समारंभासाठी सजून धजून असणारे ते पाम ! जे वेड मजला लागले .. ते वेड तुज लागेल का !! असच वाटत होतं , तिथून पाय निघत नव्हता .
.
. . दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये वाचलं , पर्यावरणवाद्यांनी हरकत घेतली होती . झाडांच्या आरोग्याच्या दृष्टीने ते रंग म्हणे हानिकारक होते . ते म्हणताहेत म्हणजे असणारच ! अरे ; पण मग इतके दिवस तुम्ही काय करत होता . शेवटच झाड रंगवून होई पर्यंत का थांबला होता ? जे झाड प्रथम रंगवलं , ज्याने इतके दिवस तो रासायनिक रंग अंगावर वागवला , त्याचं काय ! त्याच्या आरोग्याचं काय ! ज्यांना झाडांच्या आरोग्याची काळजी आहे त्यांनी इतके दिवस थांबावं ? आपल्या दिरंगाईमुळे त्या पहिल्या झाडांचा बळी द्यावा ? आता ते रंग उतरवले जाताहेत ! अरे , त्यासाठी पण रसायनेच वापरणार ना ??
.
. . काल वर्तमानपत्रात वाचलं , चार मुलांनी पहाटे बागेत घुसून मोडतोड केली .वस्तूंची वासलात लावली . सौंदर्याची बरबादी केली . आज टीवीवर दाखवलेलं सीसी टीवी फुटेज पाहिलं . ती विध्वंस करणारी मुलं अगदी आरामात फिरत होती , मोड तोड करत होती . गोड हसत होती . क्रौर्य , , दुष्टपणा निदान त्यांच्या चेहऱ्यावर तरी दिसत नव्हता . .कोणतंही हत्यार न वापरता लाथा मारून वस्तू तोडत होती .एवढी शक्ती .. एवढी उर्जा होती त्यांच्यात ? मग त्याचा सकारात्मक उपयोग करावासा त्यांना का वाटत नव्हतं ? किरकोळ शरीरयष्टीची , सर्वसामान्य दिसणारी , अगदी रोज आपल्याला भेटणार्या , आपल्याला स्माईल देणाऱ्या , ओळखीच्या किशोरवयीन मुलांसारखी दिसणारी ही विध्वंसक मुलं होती .कुठून , कशी येते ही विकृती त्यांच्यात ? सौंदर्याला कुरूप बनवणं , नायनाट करणं , हा एखाद्याचा खेळ होऊ शकतो ? सगळंच अचंबित करणारं !
.
. . जर काही चांगल्या , सुशोभिकरणाच्या , उपयुक्त गोष्टी केल्या तर त्या निदान आहेत तशा टिकवणं आपलंच काम नाहीये का ?सगळं सरकारने केलं पाहिजे ! पण जे आपल्याला जमण्यासारखं आहे तेवढंही आपण नाही करणार का ? म्हणजे आहे ते सांभाळणं ...??#सुरेखा_१६ /१ /१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा