शनिवार, १४ जानेवारी, २०१७

कमलदलांचा पाश ( ७ )
. दहाच्या सुमारास त्याचा पुन्हा फोन आला . आवाज रडवेला होता ." या ना म्याडम ; मी वाट पाहतोय तुमची . उशीर झालाय . मी स्टेशनवर तुम्हांला आणायला कोणालातरी पाठवतो . घरी पोचवायला पण माणूस देईन . सगळा हॉल रिकामा होत आलाय .पण भरलेला होता , तेव्हां पण माझं इथे कोणीच नव्हतं हो ! शांता , कुश शिकले . माझ्यासाठी सगळ्यांनी खूप प्रयत्न केले . पण नाही शिकलो मी . बाबांनी आपल्या ओळखीचा वापर करून नोकऱ्या मिळवून दिल्या . पण कुठेही टिकलो नाही .मला शेवटची संधी म्हणून , सर्वांनी मिळून वर्कशोप टाकून दिलं . पण तिथेही यश नाही आलं , म्याडम ,, मी त्या दिवशी तुम्हांला जेवायला बोलावलं , तेव्हां सगळं सांगणार होतो . तो माझा तिथला शेवटचा दिवस होता . वर्कशोप विकलं .कशीबशी सर्व देणी फेडली . घरच्यांनी लग्न लावून दिलंय .मी आता गावीं जायचंय आणि तिथलं घर , शेती सांभाळायचीय .तिथेच राहायचंय . पुन्हा कधी इकडे यायला मिळेल की नाही ..... माहित नाही !....... तुम्हीं पुन्हा भेटाल की नाही .... माहित नाही ! या ना म्याडम ...... मी सगळ्यांना सांगितलंय; तुम्ही माझ्यासाठी नक्की येणार ! .....सगळ्यांचे , सगळे नातेवाईक येऊन गेले . माझ्या सारख्या हरलेल्या माणसाचे कोण मित्र असणार आणि कोण नातेवाईक असणार ! मी जसा होतो तसा , माझे लाड करणाऱ्या , तुम्ही एकट्याच होता . मला वर्गात तुम्ही किती सांभाळून घ्यायच्या , हे मी विसरलेलो नाही . तुमच्या घरी आलो होतो , तेव्हांही तुम्ही मला किती मान दिलात ! तुमची मुलं , ' मामा .. मामा ' म्हणून माझ्या भोवती नाचत होती . या ना म्याडम ...... माझ्यासाठी या ! '
. . ती सुन्न झाली होती . डोळ्यातून अश्रू वाहात होते .एक अपयशी --- अयशस्वी मुलगा .... भावनिक आधार शोधत होता . त्याला वाटणारा .. त्याचा एकुलता एक आधार ; जीवापलीकडे पकडून ठेवायला बघत होता . शाळेत कधी तिने त्याचा अपमान केला नव्हता . त्याची कुवत जाणून , त्याच्यावर कधी अधिक अपेक्षा लादल्या नव्हत्या . काही गोष्टी त्याच्या समजशक्तीच्या पलीकडच्या आहेत हे लक्षात ठेवून, कधी थोडं फार मार्गदर्शन केलं होतं ; कधी दुर्लक्ष केलं होतं .पण हे एकट्या लहूच्या बाबतीत नव्हतं .त्याच्या सारख्या अनेक सर्वसामान्य बुद्धीमत्ता असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत तिने असंच धोरण ठेवलं होतं .बिचारे आधीच घरी दारी लज्जित होत असतात , त्यांना आणखीन काय खिजवायचं ! कदाचित भविष्यात , त्यांना झेपणारा एखादा मार्ग सापडेलही ------ मग त्यांचं आयुष्य सुंदर होईल . निदान आपला एक तास तरी त्यांना तणावरहित मिळूदे . वर्ग शिक्षिका असल्याने , पाहिला तास तिचा असायचा . त्यांची दिवसाची सुरुवात छान , अपमान विरहित व्हावी , इतकाच तिचा उद्देश असायचा .
. . पण न कळत पणे दिलेल्या वागणुकीच श्रेय लहूने तिला दिलं होतं . तिचं ऋण मानलं होतं . आपल्या आयुष्यात तिला मानाचं स्थान दिलं होतं .त्याचा माज , बेफिकीरपणा , ओढूनताणून आणलेलं उसनं अवसान होतं .आपण कोणीतरी आहोत ; आपल्याला पण एक दर्जा आहे , हे दाखवण्याचा तो केविलवाणा प्रयत्न होता .#सुरेखामोंडकर ०१/०१/२०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा