मंगळवार, १७ जानेवारी, २०१७

. वावटळ ( भाग २ )
. . सडसडीत , सुकुमार बांधा . हवी तिथे गच्च भरलेली . अटकर कंबर , बन न घालता होणारा नारळा एवढा अंबाडा . आणि दृष्टी खिळेल असं लावण्य ! तमाशाच्या फडाबरोबर ती गावोगावी फिरत होती . तमाशा नृत्यांगनांना तेव्हां सुगीचे दिवस आले होते . अलौकिक सौंदर्य , बेफाम नृत्य , जुजबी अभिनय , कच्या तारुण्यातले स्वैर वर्तन ! कुसुमचं नाव सगळीकडे गाजत होतं . तिचं गावच मुळी मराठी सिनेमाची पंढरी . एका सिनेमात तिला काम मिळालं . एका मराठी नाटकात तिला प्रमुख भूमिका मिळाली . सिनेमा फारसा चालला नाही . नाटक मात्र धोधो चाललं .मी पाहिलं होतं ते नाटक . इतकं जुनं नाटक ! मला तर आता नाटकाचं नाव पण नाही आठवत . पण ती आठवतेय ! स्त्री असून मी तिच्या देखणेपणावर भाळले होते ,एखादी स्त्री इतकी विलोभनीय असू शकते ! शहारले होते !, तर पुरुषाची काय स्थिती होत असेल ! तिची कीर्ती मुंबई , पुण्या सारख्या शहरातून पसरली . त्याच बरोबर कुसुम म्हणजे गुलबकावलीच फुल नाही ; योग्य किंमत मोजल्यावर सहज मिळू शकते , ही बातमी देखील कर्णोकर्णी झाली .
. . तिच्याच गावातला बाळासाहेब तिच्या प्रेमात पडला होता . हा पेहलवान गडी तिच्यासाठी वेडा झाला होता . तिचा एकही कार्यक्रम तो चुकवत नव्हता . जिथे तिचा कार्यक्रम असेल , त्या त्या गावी सर्व खेळांना तो हजेरी लावायचा . लालमातीतली मेहनत , काम धंदा सर्व त्याने सोडून दिलं होतं . मोठं तालेवार घराणं होतं त्याचं . गावात त्यांना मोठी प्रतिष्ठा होती .शाहूपुरीत टोलेजंग तीनमजली घर , औरसचौरस जमीन , उसाचे मळे , अनेक एकर शेती , शेत घरं , हिरवेगार भाजीचे मळे , साखर कारखाना ; ओघाने असणारी मद्य निर्मिती ! खूप मोठा बारदाना होता त्यांचा . मोठा भाऊ दादासाहेब ! त्यांची बायको राजघराण्यातली होती . डोक्यावरचा भरजरी पदर कधी ढळला नाही तिचा . दागदागिन्यांनी लहडलेल्या त्या मोठ्या सुनेचं नखही कुणाला दिसणं अशक्य होतं . आबासाहेब खमकेपणाने अजून सर्व व्यवहार बघत होते . घरातल्या मुली देखील नावाजलेल्या , संपन्न घरात सुखाने नांदत होत्या . आबासाहेबांच्या आज्ञे बाहेर जायची कुणाची शामत नव्हती . पण बाळासाहेबांच्या ह्या नसत्या थेरांनी त्यांची मान गावात खाली गेली होती . नाक कापल गेलं होतं . पत राहिली नव्हती .
.
. . बाळासाहेब कुणाला जुमानणारा नव्हता . एक दिवस त्या गलिच्छ वस्तीतल्या , शेणामुताचा वास दरवळणाऱ्या , हौसाबाईच्या झोपडीत तो स्वतः गेला आणि त्याने कुसुमला मागणी घातली . हौसाबाई हादरली . त्या प्रतिष्ठित घराण्याशी सोयरिक जुळवायची म्हणजे , आकाशातील तारे तोडण्यासारख होतं ; सुळावरची पोळी होती , हे अनुभवी हौसा जाणून होती . पण बाळासाहेब ठाम होता . हौसालाही हे प्रलोभन टाळण्या पलीकडचं होतं . तिचे हात प्रत्यक्ष स्वर्गाला पोचले होते .कुसुमला मात्र हे लग्न पसंत नव्हतं . अवघी पंधरा वर्षांची होती ती ! तमाशातील , नाटकासिनेमातील , मुक्त आयुष्य तिला मोह घालत होतं . भोवती रुंजी घालणारे पुरुष , तिची थुंकी झेलणारे मजनू , तिच्यावर होणारी पैशांची उधळण , कौतुकाचा वर्षाव , तिच्या सौंदर्याची आतषबाजी ! ह्या सर्वांचा तिला ध्यास होता . बेधुंद आयुष्याची तिला भुरळ पडली होती .
.
. . हौसाने दुनिया अनुभवली होती . नाचणारणीचं आयुष्य , लवकर उतरणीला लागतं हे ती जाणून होती . तिची उर्जितावस्था , तिचा थाटमाट आणि आमदनी ; एकदा तिचं तारुण्य ढळलं की संपणार ! स्थैर्य , इज्जत , मान मरातब , स्वतःच्या पायाने चालत तिच्या झोपडीच्या दारात आला होता . साक्षात कुबेराशी सोयरिक जुळत होती . भीती होती फक्त आबासाहेब आणि दादासाहेबांची ! पण घरातल्या या राजबिंडया पोरावर सगळ्यांचा जीव होता . त्याच्या समोर सगळे नांगी टाकून गपगार होते . बाळासाहेबाची एकच अट होती , ' कुसुमनं बारीत नाचायचं नाही , सिनेमा नाटकात काम करायचं नाही . ' एकदा ती त्याची झाल्यावर तिच्या भूतकाळाची सावलीही त्याला तिच्यावर नको होती #सुरेखामोंडकर . १४/०१/२०१७
.
.क्रमशः

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा