शनिवार, १४ जानेवारी, २०१७

कमलदलांचा पाश (९)
. . आयुष्याच्या संध्याकाळी , आज अचानक त्याची आठवण आली . ह्या आठवणी पण अजब असतात .एवढ्याश्या मेंदूत , कानाकोपऱ्यात कुठेतरी अंग चोरून निपचित पडलेल्या असतात . कुठचातरी निमित्ताचा दगड लागतो आणि मोहोळ उठते . आठवणी घोंघावत येतात . रोज संध्याकाळी बंगल्यासमोरच्या पार्कमध्ये ती येऊन बसते . लहान मुलांना खेळायला राखून ठेवलेल्या भागाच्या समोर . त्या छोट्यांना खेळताना बघून तिचा सगळा शीण नाहीसा होतो .त्या मुलांमध्येच होता एक छोटू .सावळा , बुटुक , फुगीर गालात चेपलेलं नाक आणि डोक्यावर भरगच्च , काळे कुरळे केस .
. तिला लहूची आठवण आली . कोण असेल हे पिल्लू ? लहूचा मुलगा ? छे, काहीतरीच काय ! तिची दोन्ही मुलं , मिळालेल्या पाहिल्या संधीला परदेशी निघून गेली होती . इकडच्या सर्व ऐश्वर्याकडे पाठ फिरवून . धाकटी लेक एका फ्रेंच मुलाबरोबर लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये होती ." आई , तुला काय मिळालं , लग्न करून ? " तिने एकदा विचारलं होतं . मोठ्याला तर लग्नच करायचं नव्हतं .तिला वाटत होतं , परदेशात कां होईना , आपला वंश चालावा .पण मुलगा आपल्या घनदाट पिंग्या केसांची झुलपं उडवत म्हणायचा , " त्या साठी लग्न नाही करावं लागत , मुल अडोप्ट करता येतं ! " दोघांनी वेळच्यावेळी लग्न केलं असतं तर आज आपल्याला नातवंड झाली असती . त्यातील एखादं ह्या छोट्या एवढं असतं . मग हा छोटू लहूचा नातू असेल ?
. इतक्यात तिच्या जवळ येऊन पडलेला आपला बॉल घ्यायला तो छोटू आला . त्याला बॉल देता देता तिने विचारलं , " नाव काय बेटा तुझं ? "मुलगा लाजत , हसत उभा राहिला . त्याच्या बरोवर आलेली त्याची आई म्हणाली , " मराटी नय समजता ! " म्हणजे हा मुलगा अमराठी होता .
. . कुठे असेल लहू ? कसा असेल ? दारूत बुडून जीवनयात्रा संपवली असेल की बायको बरोबर नव्या आयुष्याची सुरुवात केली असेल ?" लहू , कां तू असा आगंतुकासारखा माझ्या आयुष्यात घुसलास ?कां तू तुझ्या लग्नाच्या रात्री मला फोन केलास ? का अपराधीपणाची भावना मला दिलीस ? विनापरवाना अशी कोणाच्या आठवणीतील जागा व्यापून टाकणं बरोबर आहे काय रे ? '
. . अंधार पडायला लागला होता . आज घरी त्यांचे आर्थिक सल्लागार येणार होते . परदेशातून मुलं इकडे येणार नव्हती . तिथलं नागरिकत्व त्यांनी घेतलं होतं . अंगात शक्ती आहे , बुद्धी चालतेय , तो पर्यंत इथल्या सगळ्या प्रोपरटीची कायदेशीर व्यवस्था करायला हवी . त्या बरोबरच ह्या आठवणींचा पण काहीतरी पक्का बंदोबस्त करायला हवा . राजीव घरी होता ; पार्किन्सनने आजारी ! एकटा ! त्याचे ते रोज संध्याकाळी बरोब्बर हजर होणारे मित्र आता कुठे होते कोण जाणे ? त्याला मदतनिसावर सोपवून रोज काही वेळ ती पार्क मधल्या उत्साहाने सळसळत्या जगात शिरून बसायची . हा वेळ खास तिचा होता . तिच्यासाठी प्यारोलचा मिळालेला काळ ! पण प्यारोल कधीतरी संपणारच !
. . तो छोटू दंगा करत होता , त्याला घरी जायचं नव्हतं . अंधार दाटत होता . आता मात्र तिला घरी परतायला हवं होतं . सुस्कारा सोडून ती हळूहळू उठली . घराकडे वळली . कुरळ्या केसांच्या त्या छोटुकडे पूर्णपणे पाठ फिरवून ! आठवणीची कवाड घट्ट बंद करून ! #सुरेखामोंडकर २/१/२०१६
.........समाप्त !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा