सोमवार, ९ जानेवारी, २०१७

. . अधांतर ( भाग २ )
. .पण मामा काही अमरपट्टा घेऊन आले नव्हते . मामीच्या पाठोपाठच ते गेले . नातवाचं तोंड बघून तृप्त मनाने ते दोघेही गेले . जणू वरदहस्तच गेले . लगाम सैल पडला . नको नको ती माणसं आधी अंगणात ; मग ओटी वरून घरात येऊ लागली . त्यांच्या बरोबर नवे विचार , नवे आचार , घरात आणि दिगूच्या डोक्यात शिरले . रात्री कंदिलाच्या , चिमणीच्या , चुलीच्या प्रकाशात बेताल होणाऱ्या पायांमध्ये आणखीन दोन पायांची भर पडली . दिगूच्या लडखडत्या पायांची !
. रुक्मीला हे सगळं झेपेनासं झालं . खंबीर असणारा वटवृक्ष उन्मळून पडला होता .; आणि त्याची जागा ज्याने घ्यायला हवी होती , तो स्वतः वारा येईल त्या दिशेने हेलपाटत , झेलपाटत जात होता . वारीचं व्रत बंद पडलं होतं .मामांची तुळशीची माळ खुंटीला लटकली होती . हळूहळू रुक्मीच्या अंगावरच्या एकेका डागाने बाजाराची वाट धरली . हातात काचेच्या चार विटक्या बांगड्या आणि गळ्यात काळी पोत ; एवढंच राहिलं . सौभाग्यचिन्ह म्हणे ! बिन कामाचं , बिन मोलाचं ! पण ते बाळगलं पाहिजे .आणि हो तिच्या बुगड्या ! तिच्या आक्काची उरलेली एकुलतिएक आठवण ! कानावरून चप्प केस घेऊन , गच्च अंबाडा बांधायच्या तिच्या सवयीमुळे त्या बुगड्या कधी दिगूच्या नजरेला पडल्या नाहीत . रुक्मीला त्यांचाच आधार वाटायचा . रात्री झोपल्यावर जेव्हां तिच्या गालावरून अश्रू वाहायचे , तेव्हां , उजव्या कानावर ती हात ठेवायची . हाताला बुगडीचा स्पर्श झाला की , आक्काचा मायेचा हात मस्तकी थोपटतोय , असं तिला वाटायचं . हळूहळू घरातील तांब्या पितळेची भांडी पण विकली गेली .रुक्मीने माहेरी काही सांगितलं नव्हतं . आक्का , आबांचं पण वय झालं होतं . तिचा भाऊ विठू , त्याच्या संसारात गुंतला होता . कुठे आपलं दुखः त्यांना सांगून , त्यांच्या जीवाला फुकाचा घोर लावायचा !
#सुरेखामोंडकर ०५/०१/२०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा