मंगळवार, १७ जानेवारी, २०१७

. .वावटळ ( भाग ४ )
.
.
. . नेमक्या त्याचं वेळी कुसुमला एका मराठी सिनेमातल्या दुय्यम भूमिकेसाठी विचारणा झाली . सिनेमा नाटकात काम करणं बिलकुल नामंजूर असणाऱ्या बाळासाहेबाने बायकोच्या कळवळ्याने ; केवळ तिचं मन प्रफुल्लित राहावं , तिच्या आवडीच्या कलाविष्कारात तिने गुंतून राहावं , या हेतूने तिला सिनेमात काम करायला संमती दिली .
.
. . बाळासाहेब आपल्या हॉटेल व्यवसायात व्यग्र झाला . बंधमुक्त झालेल्या कुसुमचा अबलख वारू सुसाट सुटला . दुःखाने पोळलेला बाळासाहेब व्यवसायात स्वतःला अधिकाधिक गुंतवून घेत होता . दुःख विसरायचा हा त्याचा उपाय होता . कुसुमच्या हातात आणखीन एक दोन सिनेमा आले . भूमिका यथातथाच होत्या , पण तिच्या मनोवृत्तीला मानवणारी ही जिंदगी होती .
.
. . हळूहळू बाळासाहेबाच्या कानावर कुसुमच्या एकएक करामती , रंगढंग पोचू लागले . तो घरात नसताना , त्याच्या घरासमोर , मालदार , वतनदारांच्या ; नवश्रीमंतांच्या पोरांच्या , वैभवशाली परदेशी गाड्या तासनतास उभ्या राहू लागल्या . कुसुमचं जडजवाहीर वृद्धिंगत होऊ लागलं . ती बाळासाहेबाला जुमानिशी झाली . आधीच चंचल , ऐयाशी वृत्ती , त्यात तारुण्याचं उधाण ! रोजची भांडण , कलह , हमरीतुमरी , दोषारोप ! बाळासाहेब बेजार झाला होता . एकदिवस वैतागून त्याने बंगल्याला कुलूप ठोकलं आणि सर्व बाडबिस्तरा त्रिनेत्र मधल्या एका आलिशान रूम मध्ये हलवला .
.
. . आता कुसुम सदैव त्याच्या डोळ्यासमोर राहात होती . आपलं उथळ आयुष्य क्षणभंगुर आहे , हे तिला कळत होतं , तरी देखील , स्वैर आयुष्याच्या आठवणी , अनुभव तिला रोमांचित करीत होते . दिल है की मानता नहीं ; अशी तिची अवस्था झाली होती . हे असं बंदिस्त आयुष्य तिला पसंत नव्हतं . इथे ती सतत बाळासाहेबाच्या देखरेखीखाली , पहार्याखाली होती . जवळ जवळ नजर कैदच होती ती ! खूप नाराज होती ती ! तिची मुळची बंडखोर वृत्ती उफाळून आली होती .पहिलं बाळ देवाघरी जाऊन तीन वर्षे होऊन गेली होती . बाळासाहेबाने पुन्हा बाळाची संधी घेण्यासाठी कुसुमची मनधरणी करायला सुरुवात केली होती . आशिकी , फुलपंखी आयुष्याला चटावलेल्या कुसुमला आता आपल्या तारुण्यातली सुंदर वर्षं , गरोदरपण , बाळंतपण , बालसंगोपन ह्यात वाया घालवायची नव्हती . बाळासाहेबाने तिला तिच्या भूतकालासह स्वीकारलं होतं . लग्न झाल्यावर ती सर्वस्वी त्याची , फक्त त्याचीच राहावी अशी त्याची अपेक्षा होती . भूतकाळाच्या भानामातीतून ती कधी बाहेरच येणार नाही ह्याची त्याला कल्पना नव्हती . त्याने तिच्या साठी उच्च , रसिल्या राहणीमानाची कवाडे उघडली होती , स्थैर्य , प्रतिष्ठा , सामाजिक दर्जा दिला होता , पण कोंबडीला माणिक सापडावं तसं झालं होतं . #सुरेखामोंडकर १५/१/२०१७
क्रमशः.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा