अधांतर ( भाग ४ )
.
. . चार दिवस सतत पाऊस पडत होता . रुक्मी घरातच अडकली होती .गाडग्या मडक्यातलं काहीतरी खाऊन आला दिवस ढकलत होती .कचऱ्याचा धंदा बंद होता . पाऊस ओसरत नव्हता .तिच्या घराच्या पत्र्यावर त्याचा ताडताड आवाज येत होता .एका किर्र रात्री , तिच्या घराचा दरवाजा कोणीतरी धटिंगणा सारखा ठोकत होतं . बत्ती लावून तिनं दबकत दबकत दार उघडलं . बाहेरचा माणूस धाडकन दार ढकलून आत आला .भितीने ती किंचाळली .त्या आडदांड माणसाने तिच्या तोंडावर गच्च हात धरला , आणि तो म्हणाला , " गप , गप , एकदम चूप ! "
. . ती डोळे फाडून बघत होती . तिचा आवाज घशातून बाहेर पडत नव्हता . तो धर्मा होता . उभा आडवा वाढला होता .त्याने पायानेच दार लोटलं . तिच्या तोंडावरचा हात न काढता , दुसऱ्या मोकळ्या हाताने कडी लावलीन आणि खेकसला , " भायेर , कुनाला कलता कामा नए . समजलं ! " ओल्या कपड्यानेच तो बाजेखाली शिरला . तिथल्या अंधारात घुसला . तिला आठवलं , वस्तीतल्या बाया बोलत होत्या , " रिमांड होम मधून पांच पोरं पळालीत . पोलीस त्यांना शोधताहेत ! "तिला माहित होतं ; थोड्याच वेळात पोलीस माग काढत तिथे पोचतील .
. . पहाटे पहिल्या कोंबड्यालाच ती उठली .धर्मासाठी चार भाकऱ्या बडवून ठेवल्या . दोन स्वतःसाठी बांधून घेतल्या .कचरा भरायची गोण तिने झटकली , उलटी केली .तिची चिरगुट , उरलीसुरली चार भांडी त्यात भरली . गोणीच तोंड करकचून बांधलं. धर्मा अजून बाजेखालीच झोपला होता . त्याच्या अंगावर तिने गोधडी टाकली . पाऊस जरा ओसरला होता .गोण घेऊन ती बाहेर पडली .नेहमीच्या सावकाराकडे आली . अंगावर फुटका मणी देखील नव्हता . पण कानात बुगड्या होत्या , तिच्या आक्काच्या ; जीवापलीकडे तिने त्या जपल्या होत्या . पण आता निरुपाय होता . जवळ दिडकी नव्हती .तिला ह्या माया नगरीतून , ह्या कमनशिबी शहरा मधून कायमचं निघून जायचं होतं .तिच्या मायेच्या गावाला .तिथं तिचे बाबा आणि आक्का होती . विठू , वहिनी आणि त्यांची गोजिरवाणी पोरं होती .मनाचा दगड करून , डाव्या कानातली एक बुगडी काढून तिने ती सावकाराला विकली .दिलेन ते पैसे घेऊन मुख्य रस्त्यावर आली . गावाकडे जाणाऱ्या एस्टीत बसली . एकदा माहेरी पोचली की तिला कसली भ्रांत नव्हती .
.मागे जाणारं शहर ती बघत होती . ह्या शहराने तिला खूप काही दिलं होतं; आणि मग हावरटा सारखं ते सगळं तिच्या कडून हिरावून घेतलं होतं . तिचे डोळे डबडबले होते .धर्माच्या ममतेची नाळ तोडून , सरकार देणार असणाऱ्या पैशाचा मोह सोडून , अतीव ओढीनं ती तिच्या आका कडे चालली होती .कोणीतरी तिला हाक मारत होतं .आतुर होऊन बोलावत होतं . मायच होती ती !
. तिच्या गालावरून सारखे अश्रू वाहात होते . बांध फुटला होता . मामांच्या मृत्यू नंतर संसाराचे झालेले धिंडवडे डोळ्यासमोर उभे राहिले होते .सोसलेल सर्व दुखः , व्याकूळ करणाऱ्या यातना , डोळ्यातून वाहात होत्या . सह प्रवाशांना कळू नये म्हणून फाटक्या पदराने तिने तोंड झाकून घेतलं होतं .कधी एकदा आकाच्या कुशीत शिरते आणि तिच्या मांडीवर श्रांत डोकं , थकला भागला देह टेकवते , असं तिला झालं होतं. #सुरेखामोंडकर
क्रमशः

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा