. . अधांतर (भाग १ )
. . मुंबई ! खाडीच्या पलीकडील मोठ्ठं शहर ! रात्री खाडी काठी उभं राहिल्यावर , मुंबईचे दिवे लांबवर टिमटिम करताना दिसायचे ; भुरळ घालायचे . रात्री जेवणं आटोपली की रुक्मीचे बाबा ओटीच्या पायऱ्यांवर येऊन बसायचे . ज्ञानोबारायांचे , तुकोबांचे अभंग तल्लीन होऊन म्हणायचे . त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून , रुक्मी अभंगाच्या तालाशी एकरूप होऊन , आकाशातील अप्राप्य असणारे तारे आणि दूरवर दिसणारे मुंबईचे चमकदार हिरे ; अनिमिष नेत्रांनी बघत राहायची .त्या तालासुरात , लखलखत्या रोषणाईत , कधीतरी बाबांच्या मांडीवरच तिला झोप लागायची . बाबा तिला अलगद आणून घरात , अंथरुणात ठेवायचे .
. .रुक्मीवर सर्वांचाच जीव होता . लग्न होऊन खूप वर्षं झाली तरी घरी पाळणा हालला नव्हता . आकाला , सोयर्या धायर्यांनी ; शेजार्या पाजार्यांनी वांझ म्हणून नको जीव करून टाकलं होतं . बाबांची पंढरीची वारी कधी चुकली नाही . हजारों , लाखों वारकर्यांच्या बरोबर एक ठिपका होऊन ते पण चालत राहिले होते .वर्षोनुवर्षे ! आधी त्यांच्या वडिलांबरोबर आणि ते पांडुरंगाच्या चरणीं विलीन झाल्यावर , एकट्याने ! पण नेम कधी चुकला नाही .लाखों जीव मनीं काहींना काही आस धरून , ते सावळे ,सुंदर , रूप मनोहर बघायला धाव घेत होते . किती जणांच्या किती इछ्या पूर्ण झाल्या , माहिती नाही . पण बाबांच्या पदरी मात्र विठुरायाचा प्रसाद पडला .आकाची कूस उजवली .त्याचा आशीर्वाद म्हणून पोरीचं नाव ठेवलं , रुक्मिणी ! ती पण नशीबवान ठरली . तिच्या पाठीला पाठ लावून स्वतः विठूच आला . रुक्मीचा भाऊ बनून !
. .रुक्मी मोठी होत होती . दरवर्षी वारीला जाऊन एकमेकांच्या ओळखी होतात . काही गाठी घट्ट बसतात . मामांची ओळख अशीच दाट होत गेली होती . एकमेकांचा स्वभाव कळला होता ; विश्वास बसला होता . बाबांनी मोठ्या निश्चिंत मनाने , रुक्मीच्या शेल्याची गाठ मामांच्या दिगुच्या उपरण्याला बांधली . रुक्मीच्या नशिबाने लग्न झाल्यावर , खाडी ओलांडून ती त्या चमचमत्या मोहमयी शहरात आली . डोळ्यांत खूप स्वप्नं घेऊन . छोटसच सिमेंटच घर होतं . पत्र्याचं छप्पर होतं . दारी तुळशी वृंदावन होतं .चार नारळीची , आंब्याची झाडं होती .तिथेच वाफे करून , समुद्र मेथी आणि चार पांच भाज्या निघत होत्या .ताज्या , टवटवीत भाज्या . रुक्मी चौकातल्या कोपऱ्यावर जाऊन बसली की तासाभरात टोपली रिकामी व्हायची .
. . मामा माळकरी होते ; तिच्या बाबां सारखेच . त्यांचा दरारा होता .मासे विक्रीचा व्यवसाय असुनही घरात मास , मच्छी शिजत नव्हती . घरात रात्री बायकांच्या चुली पेटल्या की तिकडे बाप्ये आंटीच्या नाहीतर चाच्याच्या गुत्यावर झुलायचे . अख्खी वस्ती लडखडत्या पायांनी बेभान व्हायची .पण मामांच्या घरावर कधी दारूचा थेंब उडाला नाही . जेव्हां पांढरपेशी दुनिया चोरीच्या भितीने अंगावर सोनेरी रंगाचं कथील घालत होती , तेव्हां रुक्मीच्या हाता -गळ्यात ; नाका -कानात , किलोभर झळाळत सोनं होतं .कुणाची माय व्याली होती , तिच्या गळ्यातल्या लक्ष्मी हाराला हात लावायची ! मोरी , सुरमयी , खचाखच कापायची धारदार कोयती , तेजाळ सुरा रुक्मीच्या हातात होता आणि पाठीशी उभा होता , पहाडासारखा बलदंड दिगू ! तिचा घरधनी ! #सुरेखामोंडकर ०४/०१/२०१७
क्रमशः
पूर्व प्रसिद्धी -- जनशांती , दिवाळी विशेषांक २०१५
सुरेखा

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा