शनिवार, १४ जानेवारी, २०१७

,कमलदलांचा पाश . ( १ )
.
. झोप पुरी होते की नाही , माहित नाही ! पण घड्याळाच्या गजराप्रमाणे उठायचं ! चुरचुरणाऱ्या डोळ्यांवर गार पाण्याचे हबके मारून , वाघ मागे लागल्यासारखं कामाला जुंपून घ्यायचं ! नाश्ता , डबे करून ; मुलांची तयारी करून , त्यांना शाळेत सोडून यायचं . घरी आल्या बरोबर दुपारचं जेवण बनवून ; स्वतःची तयारी करून ऑफिसात जायचं . हो ; 'त्याच्या ' ऑफिसात . तिचं होतंच काय ? घर , मुलं ,-बाळ , पैसा -अडका , वाहन ,ऑफिस , सगळं काही ' त्याचं ' होतं . तिच्या नवर्याचं ! राजीवचं ! मुलांची शाळा सुटून ,ती दोघं घरी यायच्या आत धावत पळत घर गाठायचं ! मुलं आल्याबरोबर त्यांच्या तैनातीला लागायचं . त्यांचं धुणं - पुसणं ; जेवण , अभ्यास , त्यांचं पोहणं , खेळ , आणखीन काय काय ! जेव्हां कधी बिछ्यान्याला पाठ टेकून , डोळे मिटतील तेव्हां ' रात्र झाली ' म्हणायचं आणि गजर झाल्यावर ' दिवस उजाडला ! ' ह्या सर्व शर्यतीत आजूबाजूला बघायला वेळ कुठे होता ?
.
. तरीपण एक दिवस , अचानक तिच्या लक्षात आलं ; ऑफिसमधून घरी परत येताना , रस्त्याच्या वळणावर , दिव्याच्या खांबाला टेकून , पायाची अढई घालून , एकजण उभा असतो , तिच्याकडे बघत ! आधीतर तिचा विश्वासच बसला नव्हता . तिच्या सारख्या पस्तिशीच्या बाईकडे कोण कशाला बघत राहणार आहे ? पण रोज त्या कोपऱ्यावर आल्यावर , तिची नजर तिकडे वळायचीच आणि ' तो ' तिथेच उभा असायचा , पायाला तिढा देऊन . बुटका , काळा , निब्बर , जाड ओठ , आत गेलेली हनुवटी . डोक्यावर गच्च बसलेले , काळेभोर कुरळे केस . तोंडात पानाचा तोबरा . त्याच्या चेहऱ्यावर माज . प्यांटच्या बाहेर उतू जाणारी ढेरी . बिअर बेली ..
.
. . एक दिवस त्याने बरोब्बर तिची नजर पकडली . उभ्या जागीच , पानाची पिचकारी मारून , लगबगीने तो पुढे आला . गुर्मीतच म्हणाला , " ओळखलंत का म्याडम ? " ती उभी शहारली ! #सुरेखामोंडकर २८/१२/१६
.
क्रमशः

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा