सोमवार, ९ जानेवारी, २०१७

अधांतर ( भाग ५ )
. . पाऊस पूर्ण थांबला होता . कधीतरी गचका घेऊन एसटी थांबली . पायाखालची , भरलेली गोण घेऊन ती खाली उतरली ; आणि पहातच उभी राहिली . सगळीकडे चिखलच चिखल होता . तिचं घर , तिची शाळा , ते छोटसं देऊळ , डेरेदार वृक्ष , त्याच्या खालचा पार , तिच्या लहानपणी सुरपारंब्या खेळायचा तो जख्ख म्हातारा वड ; काही काही तिथं नव्हतं . गावावर पाखर घालणारी ती टेकडी नव्हती . त्यावर बागडणाऱ्या शेळ्या मेंढ्या ; गायी वासरं , काही काही नव्हतं . भुताटकी झाल्या सारखं , सगळं नाहीसं झालं होतं .
. . ती बेभान होऊन पुन्हा एसटी कडे वळली . " ओ भाऊ , हे माजं गाव न्हाई . कुटं आणून टाकलंत ओ मना ? अओ , हे नाय माजं गाव . पूड असल पगा ! "
चालक , वाहक , एसटीतले सगळे लोक अचंबित होऊन बघत होते .कुणाचा डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. कुणाच्या तोंडून शब्द निघत नव्हता .नेहमीच्या हसत्या , खेळत्या , जिवंत गावाचा राडा झाला होता . होत्याचं नव्हतं झालं होतं . काल झालेल्या ढगफुटीने अख्खी टेकडी रेटली होती . तिने सबंध गाव गिळंकृत केलं होतं. गावात आलेली ती नेहमीची पहिली एसटी होती .जगाला ह्या कराल प्रहाराची माहिती देणारा पहिला साक्षीदार . वाहक आधी भानावर आला . एसटीतून दोन तीन बाया बाप्ये खाली उतरले . वेड्यापिशा झालेल्या रुक्मीला त्यांनी सावरलं . वाहकाने तिची गोण उचलली . त्याला जबाबदारीची जाणीव झाली . म्हणाला , " ताई , बसा गाडीत . जवळच्या पोलीस ठाण्याला खबर द्यायला हवी . इथं कुठं थांबणार तुम्ही ? या , आत या !बसा ! चला पोलीस स्टेशनला जाऊ या ! "
. . तिने सगळ्यांचे हात हिसडले .त्या चिखलात पडत , धडपडत ती धावत सुटली . " ओ , चला काय चला ? इत माजी माय हाए , बाबा हाएत , माजी सोन्यासारखी भाचरं हाएत हो ! त्यांना सोडून कुटं येऊ ? "
. . रुक्मी चिखलातून सैरावैरा धावत होती . हाताने चिखल उकरत होती . " आका ग ssssssss ! बाबा sssss ! बिटूराया sssssssss आरं कुटं आहात तुमी समदे ? मी आलुय ! तुमची रुक्मी ! तुमाला भेटायला . आरं या रे , या ssss , लवकर या ! "
. . वाहक थोडावेळ हताशपण तिच्याकडे बघत उभा राहिला . त्यालाही जास्त वेळ थांबणं शक्य नव्हतं . चौकीवर वर्दी द्यायला हवी होती .राक्षसी . निसर्गानं गिळलेल एक गाव , कळीकाळानं हात फिरवलेल , लबेदा झालेलं , चिखलमय गाव ! लवकर मदत मिळवायला हवी होती . एक करूण नजर तिच्याकडं टाकून तो एसटीत चढला . एसटी निघून गेली .
. त्या चिखलाच्या दलदलीत , सैरभैर झालेली रुक्मी ,ओक्सा बोक्सी रडत होती . छाती पिटत होती . डोकं बडवत होती . चिखल रापत होती . राडा चिवडत होती . हंबरडा फोडून तिनं त्या चिखलातच लोळण घेतली . ह्या असह्य वेदनेत तिला तिच्या आकाचा हात हवा होता . अतीव दुःखाच्या वेळी जायचा तसा , नेहमी प्रमाणे तिचा हात उजव्या कानावर गेला . ती चरकली ! त्या बेभान अवस्थेतही तिला जाणवलं ; तिच्या उजव्या कानात उरलेली , एकुलती एक बुगडी पण कुठेतरी पडली होती . हरवली होती .
. . आका गेली होती . कायमची गेली होती . तिची शेवटची वस्तू ; रुक्मीला आधार देणारी , बळ देणारी , आज पर्यंत सर्व दुःख्खात उभं राहायची शक्ती देणारी ती बुगडी ; ती पण गेली होती .आज रुक्मी पूर्णपणे निराधार झाली होती . कंगाल झाली होती .
. रुक्मीने बसकण मारली , हतबल होऊन गुढगे टेकले . दोन्ही हात फैलावून आकाशाकडे बघत तिने टाहो फोडला ; " आका sss ग sssss ! " तिची हाक दशदिशा चिरत , आकाश फाडत गेली . पण तिच्या हाकेला ओ द्यायला तिथं चिटपाखरूही नव्हतं ! #सुरेखामोंडकर
.
समाप्त

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा