<<<<<<<<<<<<<<<<
शर्यत दोन पिढ्यांची
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
.
. .फटफटी कशीबशी उभी करून , अंगणातूनच हाका
देत , सर्जेराव घरात घुसला . "" आबा sssssओ आ ssबा "" ओटीवर ,
कणग्याच्या खोलीत , सगळी कडे तो फणफणत फिरत होता . त्याचा आवाज
ऐकून आतल्या घरातून मालती लगबगीने पाण्याचा तांब्या आणि फुलपात्र
घेऊन आली .
. सर्जेराव घामाने थबथबला होता . शर्ट अंगाला
चिकटला होता . डोक्यावरचे केस ओले गच्च होऊन कपाळाला चीपकले
होते . घाम पुसायचं ही त्याला भान नव्हतं .रागाने लाल पिवळा झाला
होता . सापासारखे फुस्कारे सोडत होता . काहीतरी त्रांगड झालंय हे
मालतीच्या लक्षात आल .अशावेळी नवऱ्या पासून कासराभर दूरच राहायचं
एवढ ती अत्तापोतूर शिकली होती . तांब्या भांड तिथेच टेबलावर ठेवून
, शिवल्या ओठाने ती आत गेली .
, तिची सासू मान उंचावून चाहूल घेतच होती .
"" काय झालं ग सर्ज्याच ? "" तिने विचारलं . "" काय की ? ""
मालतीने खांदे उडवले . सासू पदराने घाम पुसतच चुली समोरून उठली
. मालतीने तिची जागा घेतली . तिचे हात चालू होते आणि कान बाहेरच्या
संभाषणाकडे लागले होते .
. .सर्जेरावाच्या हाका चालूच होत्या . "" आर , गप गप ! काय आग लागलीय का गावाला ? ""
"" आग माझ्या कलेजाला लागलीय . आबान तो ओढ्या
पल्याडला बागायातीचा तुकडा कवडीमोलान फुकून टाकलान ग ! आणि सर्वे
पैशे घेऊन आज बाजाराला गेलाय ! "" सर्जेराव वेडापिसा झाला होता .
. "" आर , माझ्या कर्मा ! कुटून ही अवदसा आठवली
? कली शिरलाय रं माझ्या सौन्सारात ! हा सैतान आता सगळ्याची
बरबादी करूनच शांत होणार रं बाबा !! "" आईन बसकण मारली . तिचे
डोळे पाझरायला लागले होते . सर्जेराव पण हातापायातली शक्ती
गेल्या सारखा , झोपाळ्यावर कोलमडला . तिकडे चुलीतला धूर डोळ्यात
गेल्याचं निमित्त करून मालती पण वाहणारे डोळे पुसत होती .
सर्जेरावाच्या डोक्यात विचारांची मळणी चालली होती .
आबा आधी असे नव्हते . आजोबा आजी गेले ; सर्व
सत्ता त्यांच्या हातात आली आणि आबांना बैलगाडा शर्यतीचा नाद लागला
. शर्यती साठी लागणारे बैल अस्सल खिलारी , सुलक्षणी असतात .
त्यांची अंगकांती , वेलांटी सारख कमानदार वशिंड , टोकदार , कंस करणारी
एकसारखी देखणी शिंगं , भक्कम सडसडीत पाय , भेदक तेज डोळे ; असा
बत्तीस लक्षणी बैल शोधून शोधून मिळवावा लागतो . अशा बैलाची
किंमत पण लाखात असते . आबांना बैलाची पारख उत्तम होती . सिझनला
सात आठ शर्यती तरी आबा जिंकायचे .
ह्या बैलांचा राजेशाही थाट असतो . खूप निगुतीन
, डोळ्यात तेल घालून त्यांची बडदास्त ठेवावी लागते .खास खुराक
द्यावा लागतो . काटक ,चपळ झाले पाहिजेत पण स्थूल , जाडे होता कामा
नयेत. आबा सगळं जातीने करायचे .. तरुण असताना ते स्वतः धुऱ्यावर
उभे राहून रिंगी पळवायचे . त्या साठी ते स्वतःची पण काळजी घ्यायचे
. खाण्यापिण्याची बंधनं , व्यायाम ह्या बाबतीत त्यांनी कधी हयगय
केली नाही . धुरकरी पण कमी वजनाचा , काटक , बलवान हवा . उधळलेले
बैल आवरायची ताकद त्याच्या मनगटात हवी .
शर्यतीच्या वेळी सुद्धा वीस पंचवीस माणसांची गरज
पडायची .ही माणस सांभाळून ठेवावी लागायची . बैलांना टेम्पोत
चढवायचं , उतरवायचं. त्यांना उन्माद चढावा ; धुंदी चढावी म्हणून
वाजंत्री वाले लागायचे . फुरफुरणाऱ्या बैलांना आवरण्यासाठी धडधाकड
आठ दहा माणस लागायची . आणि जर शर्यत जिंकली तर शेमले फडकावत ,
गुलाल , भंडारा उडवत , "" यळकोट यळकोट जय मल्हार " करत ; विजय
ध्वज नाचवत मिरवणूक काढायला माणसांचा ताफा लागायचा . त्यांच्यावर
उधळायला नोटांची थप्पी लागायची .
सर्जेराव मोठा व्हायला लागला तेव्हां एक गोष्ट
त्याच्या लक्षात आली . मोसमात सात आठ बक्षिसं मिळाली तरी बैलांचा
खर्च भरून यायचा नाही . शर्यतीच्या आधी बैलांना दारू पाजायचे .ते
सावध व्हावेत , संतापाने वेडेपिसे व्हावेत , असह्य यातना व्हाव्यात
म्हणून त्यांना काठीने , चाबकाने बेदम मारले जायचे .पराणी मारणे ,
कानाजवळ खिळ्यांची पिंजरी बसवण , इलेक्ट्रिक शॉक देणं हे तर सर्रास
चालायचं .सर्जेरावाला हा क्रूरपणा सहन होत नव्हता . पण आबांच्या
समोर तो बोलू पण शकत नव्हता . अमानुष अत्याचार होतात म्हणून नंतर
कोर्टानेच बंदी आणली , पण विनाकाठी , विनालाठी शर्यतीला परवानगी
मिळाली . मग तर काय पोलीस , खबरे , फुकट फौजदार , प्रमाणपत्र देणारे
सगळ्यांनाच कुरण मोकळं झालं .
मधली काही वर्षं शेतकी शिक्षणा साठी तो दुसऱ्या
शहरातच होता . पदवी घेऊन , डोळ्यात अनेक स्वप्नं घेऊन तो गावी
परत आला . पण ती काळी माय , जिच्यावर तो प्रयोग करणार होता , ती
कुठे होती ? आबांनी ह्या शर्यतीच्या नादापायी एकेक तुकडा करीत
भलीमोठी जमीन विकून टाकली होती .. बापाच्या नादी लागायचं नाही .
उरलं आहे ते सांभाळायचं असं सर्जेरावान मनोमनी पक्कं केलं होतं .
गेल्या वर्षी जेव्हां छोट्या अक्षयला कळलं की
त्याचे लाडके चिकू आणि गोरा शर्यतीत धावणार आहेत ; तेव्हां त्याने
शर्यत बघायचा हट्ट धरला . शर्यतीच्या वेळेला होणारा गोंधळ , उन्माद ,
कल्लोळ सर्जेरावाला माहित होता . बैलच नाहीत प्रेक्षक पण पुरे
ढोसून आलेले असतात . म्हणून सर्जेराव स्वतः अक्षुला घेऊन गेला .
माळरानावर शर्यतीची आखणी केली होती . शर्यतीसाठी
मोकळ्या ठेवलेल्या भागाच्या दुतर्फा लोकांनी शर्यत बघायला गर्दी
केली होती . चिकू , गोरा मार खाऊन बेचैन झाले होते . पाजलेल्या
दारूने बेभान झाले होते .त्यांच्या नजरेत ओळख नव्हती . जाडीत
अडकवताना पण ते उसळ्या मारत होते . कसे बसे त्यांना जुपले . धुरकरी
हातात कासरा धरून ठाम उभा राहिला . बैलांना धरून उभे असलेले
क्षणात चपळाईने , सुरक्षित जागी पळाले . डोळ्याचं पात लवत न लवत
तोच बंदुकीच्या गोळी सारखा बैलगाडा सुटला . बैल उधळले , वाऱ्याच्या
वेगाने त्यांनी निशाण गाठलं . आबा शर्यत जिंकले .
पण कसा कोण जाणे , अंतिम क्षणाला धुरकर्याच्या हातून
कासरा निसटला . बेधुंद असणारे , अफाट वेगात असणारे , वेदनांनी
तळमळणारे बैल स्वतःला सावरू शकले नाहीत . गाड्या सहित ते बाजूच्या
गर्दीत घुसले .एकच हलकल्लोळ माजला . माणस जीव वाचवायला सैरावैरा
धावत सुटली . कुणी तुडवली गेली . चेंगराचेंगरी झाली . खाली पडलेल्या
धुरकर्याने धाव घेऊन कासरा पकडला . आणखीनही काही लोक मदतीला आले ,
त्यामुळे अनर्थ टळला.
तेव्हां अक्षुला नीट दिसावं म्हणून सर्जेरावान त्याला
खांद्यावर घेतलं होतं . आंधळ्या पळापळीत अक्षु खाली पडला . आपल्या
शरीराचं पांघरूण त्याच्यावर घालून जीवाच्या कराराने सर्जेरावाने
त्याला वाचवलं . पण अक्षयचा पाय फ्र्याकचर झाला . मोठ्या नशिबाने
तो वाचला . सर्जेरावाला वाटलं होतं ; लाडक्या नातवाच्या जीवावर बेतल
होतं म्हणून तरी आबा आता शर्यत बंद करतील . पण कसलं काय ; जित्याची
खोड मेल्याशिवाय जात नाही .
रात्री सगळी नीजानीज झाली . सर्जेरावाला झोप येत नव्हती .
रात्री दीड दोन ला दिंडी दार वाजल्याचा आवाज आला . एक टेम्पो आत
आला . त्यातून पांढराशुभ्र , दर्जेदार बैल खाली उतरवला गेला .
रस्त्यावरच्या दिव्यांच्या उजेडात त्याचा बादशाही रुबाब डोळ्यात भरत
होता . सहज दोन लाखांचा असेल . सर्जेराव डोक्यावर बुक्या मारून घेत
होता . त्याच्या डोक्यात घण पडत होते . बैलांची व्यवस्था लावून ,
पैसे घेऊन माणस निघून गेली . ओटीवरच झोपलेल्या गणप्याने आबांना दार
उघडून घरात घेतलं . सगळ काही चुपचाप चालल होतं .
पहाट व्हायला आली होती .घरात सामसूम होती .आबा गाढ
झोपले होते .सर्जेराव बेचैन मनाने बाहेर आला . अस्वस्थपणे अंगणात
फेऱ्या मारू लागला .मघाशी दिंडी दरवाजा उघडा राहिला होता . तो
गोठ्याकडे गेला . दार सताड उघडलन . त्याला बघून चिकू , गोरा ,आणि
आजचा नवीन पाहुणा , तिघेही खडबडून उभे राहिले . सर्जेरावाने एकदा
त्यांच्या पाठीवरून हात फिरवला आणि दाव सोडलं . तो कोपऱ्यात सरकला
. त्या उमद्या , तरण्याबांड , उत्साहाने मुसमुसलेल्या बैलांनी एक
उसळी मारली आणि तिघेही गोठ्यातून बाहेर पडले .उघड्या दिंडी
दारातून सुसाट वाऱ्यावर स्वार होऊन भन्नाट धावत सुटले .
ते दिसेनासे होई पर्यंत सर्जेराव त्यांच्या कडे बघत
होता . मग एकाएकी शक्तीपात झाल्या सारखा तो तिथेच वैरणीच्या
ढिगार्यावर बसला . गुढग्यात तोंड खुपसून त्यानं हंबरडा फोडला .
हमसाहमशी रडू लागला कोणीतरी मेल्यावर रडावं तसा !त्याचा टाहो
ऐकायला कोणीही जाग नव्हतं !!!!
सुरेखा मोंडकर
२७/०१/२०१७