पण पाकीट पोस्टाने आलं होतं.
लग्न झाल्यावर त्याच गावात त्याच परिसरात राहात होती ती. माहेरच्या घराच्या शेजारीच झालेल्या नवीन इमारतीत. आता इमारत पण जुनी झाली आहे. लग्नालाच झाली चाळीस वर्षं. आणि इथे राहायला येऊन झाली सत्तावीस वर्षं. इथे तिथे भाड्याच्या जागा बदलत बदलत सत्तावीस वर्षांपूर्वी झाले एकदाचे ह्या घरात स्थीर. आता जवळजवळ हेच कायमचं घर झालंय.
लग्नात नाव नाही बदललं पण आडनाव तर बदललं. आणि त्या
वेळी .. तिला नव्हती बाई इतकी अक्कल की माहेरचं मूळ आडनाव ...जे आपली मूळ ओळख आहे ते पण कायम ठेवून नवं आडनाव त्याला जोडावं. म्हणजे कोणाला शोधायचं असेल तर सोपं जाईल.
नव्या आडनावावर नव्या पत्त्यावर ते पाकीट आलं होतं. पोस्ट खात्याची पण कम्माल आहे. आधी माहेरच्याच पत्त्यावर आलं होतं जिथे आता कोणी नाही. रिकामं घर बंद आहे.नंतर redirect करून तिच्या घरी आलं होतं.
पाकिटात होतं वहीच्या पानावर पेन्सिल ने काढलेलं एक चित्र. पान वहीतून फाडलेलं होतं. बहुतेक शेवटचं पान असावं. निळ्या आडव्या रेघा आणि उभा लाल समास असणारं. चित्रात होती एक नाजूकशी लहान चणीची मुलगी. बेंचवर बसलेली. फुलाफुलांचा स्कर्ट आणि पोलो काॅलरचा ब्लाऊज. सरळ नाक. टप्पोरे डोळे लांब दाट पापण्या आणि ...आणि घनदाट केसांचे दोन शेपटे! वर्ग चालू असताना मागच्या बाकावर बसून केलेला हा उद्योग होता.
तो तिचा आवडता स्कर्ट ब्लाऊज तर तिला आठवलाच आणि लांब केसांची मुलगी म्हणून प्रसिद्धी देणार्या केसांच्या त्या जाड वेण्या पण आठवल्या.काॅलेजमध्ये असतानाचं ते चित्र होतं.
चित्रावर पाकिटावर कुठेही पाठवणार्याचं नाव नव्हतं. पाकीटावरील पोस्टल स्टॅम्प वरुन गावाचं नाव पण कळत नव्हतं.
मन कासाविस झालं होतं. कोणी पाठवलं असेल? कोणी काढलं असेल? इतके वर्षं जपून का ठेवलं असेल? आत्ताच इतक्या वर्षांनंतर का पाठवलं असेल ? अनेक प्रश्न मनात घोळवत तिने चित्र असलेलं ते पाकीट वाचत असलेल्या पुस्तकात खूण म्हणून ठेवलं. पुस्तक बंद केलं.
पण सारखं वाटत होतं... तिचं चित्र काढणारा इतके दिवस जपून ठेवून पाठवणारा ...तो तर नसेल? वर्गात फिजिक्स च्या पिरियड ला शेवटच्या बाकावर बसणारा .. तपकिरी डोळे वाला सावळा सडसडीत उंच अजय अगरवाल! तोच असावा! मन पुन्हा पुन्हा ग्वाही देत होतं... तोच असुदे! ज्याला तिने पण अजुन इतकी वर्षं मनात जपून ठेवला होता. #सुरेखामोंडकर.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा