बुधवार, ९ ऑगस्ट, २०२३

 #भेट

तीन वर्षांनी लेक आणि नात भेटली.
Video call मुळे रोजच्या रोज दर्शन होत होतं .पण स्पर्श ? तो अजूनही on line पोचवता येत नाही .
लेकीचा घरभर प्रसन्न तरुण ताजा वावर .
नातीचा लडिवाळ नाजुक दंगा .
घर नुसतं गजबजून गेलं होतं .
पंधरा दिवस कसे भुर्रकन उडून गेले कळलं पण नाही.
ती नेहमी म्हणायची," कशाला गं ते पंधरा दिवस तरी ! समाधान नाही होत .त्यातले चार दिवस सासू सासर्यांना भेटायला जातात . त्यांनाही तुमचा धड सहवास मिळत नसणार. किती ती धावपळ! किती दगदग!"
पण सुट्टी मिळण्याची अडचण इतर घरगुती गरजा सगळेच जाणून होते .
आज घर अगदी रिकामं रिकामं झालं .
Zurich ला landing झाल्यावर तिचा waआलाच.निळी खूण गे‌ल्या बरोब्बर लगेच तिने फोन पण केला .
चिमणी ने पण थोडा चिवचिवाट केला .
अजून अर्धा प्रवास राहिलाच होता.
आत्ता कशाला बोलायचं असं वाटत असतानाही गेलंच तिच्या तोंडून," अगं , काय हे ! आवडतं आवडतं म्हणून माझं ब्रेसलेट हातात घातलंस आणि इथेच विसरून गेलीस की !"
" सापडलं तुला ? जेवल्यानंतर हात धुताना बेसिन वरच विसरले बघ ! आता पुन्हा येईन तेव्हां घेऊन जाईन."
तीन वर्षांपूर्वी कोरोनाच्या आधी आली होती तेव्हां तिचा शिवून घेतलेला भरतनाट्यमचा पोशाख विसरून गेली होती . जपून ठेवला होता तिने .तो ह्या वेळी घेऊन गेली आणि ब्रेसलेट विसरून गेली .
हे सगळे बहाणे तर ती ओळखून होती .
आल्यानंतर ...परत जाताना लेकीची न बोलता होणारी घालमेल तिला समजत होती.
हात धुताना ब्रेसलेट काढून ठेवायची काही गरजच नसते.
प्रत्येक वेळी परत जाताना लेकीची उलघाल होत असणार .
पुढच्या वेळी परत येईन तेव्हां असेल ना ही वृद्ध कुडी ?
भेटेल ना आपल्याला पुन्हा ?
हीच भेट शेवटची नाही ना ठरणार ?
नको नको ते विचार तिच्या मनात येत असणार .
ती वस्तू विसरत नाही .
एखादी मौल्यवान वस्तू विसरल्याचा आव आणून मुद्दामच ठेवून जाते .
ती सांभाळून ठेवण्याची ,पुन्हा जिची तिला सुपूर्द करण्याची जोखीम आईवर सोपवून निश्चिंत मनाने ती दूर देशी निघून जाते पुन्हा येण्यासाठी .
तिच्या निरागस मनाला खात्री असते, सोपवलेली जबाबदारी आई पार पाडणारच ! ती पार पाडण्यासाठी पुन्हा भेटणारच!
प्रत्येक वेळी लेकी नातीला भेटताना तिच्या मनातही अशाच व्यामिश्र भावना असतात ना !
मनगटावर पुन्हा घातलेल्या ब्रेसलेट वरुन तिने हलकेच हात फिरवला. डोळ्यातला एक थेंब टपकलाच त्यावर !
पुढच्या वेळी लेक येईल तेव्हां हे तिचं आवडतं ब्रेसलेट तिच्या स्वाधीन करायचं होतं आणि ती पुन्हा जी वस्तू विसरेल ती नव्याने सांभाळायची होती.तिचा पण लेकीशी झालेला हा अबोल करार होता .#सुरेखामोंडकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा