लहान होते तेव्हां आजोळी जाणं म्हणजे काही सोपी गोष्ट नव्हती . मातीचे कच्चे खराब रस्ते . एसटी चा प्रवास . रातराणी असायची. रात्री बसायचं गाडीत ते दुसऱ्या दिवशी रात्री पोहोचायचो मालवणला .
चोवीस तासाचा प्रवास नेहमीच तीस बत्तीस तासांचा झालेला असायचा .
आजी आजोबा गेले तो पर्यंत माझं लग्न झालं होतं . मुलं झाली होती . माझी नोकरी . धावपळ . ताण तणाव . आई माझ्या मुलांत जास्त गुंतत गेली .
तिचा स्वभावच तसा . लळा जिव्हाळ्याचा !
कोणाना कोणात किंवा प्रत्येकात तिचा जीव अडकलेला असायचा .
माझा नोकरीतला ताण कमी व्हावा म्हणून तिने माझ्या बऱ्याच जबाबदाऱ्या मला समजणार पण नाही अशा सहजतेने , बेमालूमपणे स्वत:च्या खांद्यावर घेतल्या .
माझ्या बालपणीचा खूप मोठा काळ आजोळी गेला . आमच्या शाळेच्या प्रत्येक मोठ्या सुट्टीत आई माहेरी जायची .
भलामोठा वाडा .तीन स्थरांत विभागली गेलेली प्रशस्त अंगणं.
मागे एकरभर पसरलेली नारळी सुपारीची बाग .
त्याला लागून जरा खालच्या स्थरावर थेट खाडीच्या काठाला जाऊन भिडलेली भात शेती .
सड्यावर आंब्याच्या बागा .
माडीवर सर्व खोल्या भरून लागलेल्या रसाळ आंब्यांच्या अढ्या.
गोठ्यात दुभत्या गाई म्हशी .
समृद्ध आजोळ आहे माझं!
गाव सुद्धा देखणं.डोंगराच्या कुशीलाच गुडूप बिलगलेलं. Land स्केपिंगचा उत्कृष्ट नमुना .
माझं लग्न झाल्यावर एकदा आणि नंतर मुलं झाल्यावर देवीची ओटी भरायला गेले होते .
आयुष्य इतकं तुफान वेगाने धावत होतं की शरीर मन त्याच्या बरोबर फरफटत कण्हत कुथत कधी उसनं अवसान आणून तर कधी खऱ्या जोमाने धावतच होतं.
आजोळ सतत ध्यानीमनी स्वप्नी मुरून गेलं होतं ; आनंद निधान होतं तरी जायला वेळ होत नव्हता .
हल्ली मात्र काही वर्षं मामाचं बोलावणं येत होतं.
"आम्ही दोघे आता वृध्द झालोत. सगळा व्याप झेपेनासा झालाय . थकली कुडी. नंदू आता आम्हांला इथे एकटं ठेवायला तयार नाही . आम्ही आहोत तोवर एकदा येऊन जा !"
माझं हो हो चाललं होतं. त्याचा निर्वाणीचा निरोप आला .
"सगळी आवरा आवरी .. निरवा निरवी करून वर्ष अखेर नंदुकडे जात आहोत . काहीही करून ये.पुन्हा आमचं इथे येणं होणार नाही . डोळे तिकडेच मिटू! मे मध्येच ये . घरचे आंबे फणस शहाळी काजू तुझी वाट पाहताहेत !"
मग मात्र मी हादरले . आपली माणसं कधी तरी आपल्याला कायमची सोडून जाणार आहेत ह्याची आपल्या मेंदूत नोंदच झालेली नसते . ते असतात तो पर्यंत आपण लहानच असतो आणि ते तरुण!
मन ओढ घेत होतं . आजोळच्या गवताची पात ,गडग्याचे चिरे , कौलातील काचेचं कौल , वृंदावनासमोरील निरांजन, विहिरीचं अथांग थंड गार पाणी . सर्वच मला बोलावू लागलं. आठवणी दाटून आल्या .
मग मात्र त्या मे महिन्यात मी गेलेच आजोळी . सरता मे होता. मामाने आवराआवर सुरु केली होती तरीही डोळे दिपवणाऱ्या आंब्याच्या आढ्या होत्या . ओथंबून आलेली फणसाची झाडं होती . शहाळी नारळ सुपाऱ्या होत्या .
मामा मामी थकले होते पण मला पाहून त्यांचे चेहरे खुलले . पुन्हा इथे येणं नाही हे माझं अंतर्मन मला जाणवून देत होतं.
ओळखीच्या एकेक ठिकाणी मी जात होते .
ताता मधुमामा नारायणमामा नानामामा यांच्या घरी जाऊन आले .
दिनेश बरोबर पुन्हा चुलीत भाजलेल्या आठळ्या खाल्या .
मुक्तामावशी बरोबर पुन्हा लक्ष्मी नारायणाच्या मंदिराची घंटा घणाघणा हात थके पर्यंत वाजवली .
एक दिवस दुपारचा चहा झाल्याबरोबर भगवतीला जायला निघाले . सोबत कोणी नकोच होतं मला .
मी आणि माझ्या आठवणी .
आजगावकरांची खानोलकरांची नाईकांची घरं तशीच होती . काही बदललं नव्हतं.
बहुसंख्य अवाढव्य घरं रिकामी होती .
अजुनही सावरीच्या झाडाखाली रेशन दुकान होतं.शंकू वाण्याचं दुकान तसंच लाकडी जाळी मारलेलं होतं. भावईचं देऊळ मात्र नवं कोरं भव्य बांधलं होतं.
समोरची गुरवांची वस्ती पण सुधारली होती .
वाटेतला निखळ पाण्याचा झरा मुद्दाम वाकडी वाट करून तुडवत , सोनटक्क्याच्या बनातली सापडतील तेवढी फुलं खुडत देवीचं दर्शन घेऊन थोडावेळ तळ्यावर बसून वळले. पुजाऱ्यांची घरं ओलांडून जरा पुढे येते तो पाऊस टपटपायला लागला . हास ना भास मे महिन्यात कसा काय पाऊस?
मी पाय भराभर उचलायला सुरुवात केली .
निघताना पावसाचं कुठलंच लक्षण नव्हतं त्यामुळे जवळ छत्री नव्हतीच .
हा हा म्हणता पावसाच्या धारा वाढल्या . धो धो पाऊस कोसळायला लागला.
अंधारून आलं.
रस्त्यावर दिवे नाहीत .
लोक वस्ती संपलेली .
कोणाच्या घरात आसरा घ्यावा तर तिथे घरंच नव्हती .
सगळ्या नारळी सुपारीच्या वाड्या पसरलेल्या . त्यांच्या सीमारेषा आखणारे गडगे.
आता तर अंधार गडद झाला .
पाऊस उभा आडवा सपकारे मारू लागला .
मी भिजून चिंब झाले होते .
मामा मामी दोघेही वृध्द.
त्यांच्या मदतीला असणारा सखाराममामा त्याच्या घरी गेला होता .
इतर कुणाला माहितीही नव्हतं मी कुठे गेलेय .
साडी भिजून गच्च चिकटली होती .पायात अडकून चालता येत नव्हतं.
रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहत होते.
आमचं कोकण साप किरडूंसाठी प्रसिद्ध.
आता मात्र मला भीती वाटायला लागली .
आपोआपच मनात देवीचा जप सुरु झाला . स्तोत्र सुरु झाले .
इतक्यात मला वेत्रेकरांचा मांगर दिसला . ओस पडला होता .
कोणी राहात नव्हतं तिथे . पण कोरडा होता .
निवाऱ्याला जागा होती . मी चिखल तुडवीत तिथे पोचले.
फारतर साडेसहा सात झाले असतील मध्यरात्री सारखा गडद अंधार होता .
आणि तो रों रों करीत कोसळणारा पिसाट पाऊस.'रस्त्यावर चिटपाखरू नव्हतं.
असण्याची शक्यता नव्हती .
त्या मांगरात थांबून तरी मी काय करणार होते !
रात्री इकडे वाघरं पण येतात .
भीतीने आणि काळजीने माझ्या मनाचा कबजा घ्यायला सुरुवात केली होती .
अंगात थंडी भरली होती . अंग थडथडत होतं.
कोकणातला पाऊस ! कधी थांबेल हे देखील सांगता येत नाही .
कडी कधी तीन तीन दिवस कोसळतच राहतो.
देवीचं नाव घेत होते आणि समोरून मिणमिणता कंदिल माझ्या दिशेने येताना दिसला
घोंगड्याची खोळ इरल्यासारखी पांघरून हातात कंदील घेऊन ती व्यक्ती जवळ आली . अंधार पावसात घोंगडीच्या गुंडाळ्यात कोण आहे नीट दिसत नव्हतं. हालचालींनी आकारमानाने मी अंदाज केलाच..
'आई?'
हो आईच ! आई खेरीज लेकीसाठी एवढा मोठा धोका पत्करणारी दुसरी कोण असणार?
प्रत्येक आई हिरकणीच असते .
माझी आई तर एकदम बिनधास्त निडर शूर वीर !
माझ्या जवळ येऊन तिने मला पण घोंगडीची एक खोळ दिली .
मी ती डोक्यापासून लपेटून घेतली .
आता थोडी उब पण आली अंगात .
" आई , अग पाऊस येईल असं वाटलंच नव्हतं. पण तू का आलीस एवढ्या पावसात? मी आले असते की पाऊस थांबल्यावर ."
आई काही बोललीच नाही . रागावली असणार . तिचं हे नेहमीचंच आहे .
राग आला की मौन व्रत !
पावसाच्या गदारोळात काही ऐकू पण येत नव्हतं.
मी मुकाट्याने कंदिलाची ज्योत दिशेसाठी डोळ्यात पकडून तिच्या पावलावर पाऊल टाकून चालत होते .
वाट तिच्या सरावाची होती . तिचा जन्मच त्या गावात झाला होता .
न अडखळता ती चालत होती .
पोचलो एकदाचे घरी.मामा मामी घायकुतीला आले होते . त्यांच्या ओट्यावर फेऱ्या चालल्या होत्या . मला बघून त्यांचा जीव भांड्यात पडला .
आई माझी पण खोळ घेऊन वाळत टाकण्यासाठी फणसाच्या झाडाखालच्या न्हाणीघराकडे वळली .
" काय करावं ? कसं करावं? काही कळत नव्हतं." मामी टॉवेल पुढे करीत म्हणाली ,"आधी कोरडी हो !"
"कुठे तरी थांबायचं ग !"
" थांबले होते वेत्रेकरांच्या मांगरात !"
" वेत्रेकरांच्या?" मामाने आश्चर्याने विचारलं . " तिथे तर कोणीच नाहीये. गेल्या वादळातच त्यांचं घर आणि मांगर जमीनदोस्त झालं.'
" असू दे असू दे ! तिला काय अंधारात कळणार आहे? दुसऱ्या कुणाचातरी असेल मांगर !" मामी लगबगीने .. मामालाअधिक काही बोलायला न देता म्हणाली . " तू आता आधी ते ओले कपडे बदल."
"मामी आणखीन एक टॉवेल दे ना!"
"आणखीन एक ? देते ना! कशाला ग ?"
"आई साठी!"
"आई साठी?" मामी स्तब्ध उभी राहिली .
मामा पण आश्चर्याने माझ्याकडे बघायला लागला .
" अग , मला आईनेच इथे आणून सोडलं .ती पण भिजलीय!"
"कुठे आहे ताई?" मामा म्हणाला .
" ती घोंगड्या वाळत घालायला न्हाणीघरात गेलीय!"
" तू आधी आत ये बरं!" मामी मला तशीच ओलेती देवघरात घेऊन गेली . देवाला हात जोडून बरंच काही पुटपुटली .माझी दृष्ट काढून मला अंगारा लावला . देवापुढे नारळ ठेवला . सामायांमध्ये तेल घालून पेटलेल्या वाती सरश्या केल्या .
तिचं हे वेळ काढणं मला बिलकुल पसंत पडलं नाही . आई पण काकडली असणार . ती न्हाणीघरातून यायच्या आत टॉवेल नको का तयार ठेवायला?
खरं म्हणजे आता आधी गरम गरम चहा किंवा छान तूप घालून पेज करायला हवी .
" देतेस ना टॉवेल आईसाठी?" मी तिला घाई केली .
मामीने आपण ओली होऊ ह्याची पर्वा न करता मला जवळ घेतलं.
मामा हळुवारपणे म्हणाला , " ताईला .. तुझ्या आईला जाऊन वर्ष झालं !"
माझ्या पायाखालची जमीनच सरकली . अंत:करणात सतत भळभळणारी जखम आणि असं कसं मला विस्मरण झालं! मी भानावर आले .
पावसाचा दडपून टाकणारा आवाज .
रस्त्यावरून वाहणारे लाल मातीचे प्रचंड लोट .
मनात दाटलेली अनामिक धारदार भीती . काळ्याकुट्ट अंधारातला तो भयाण एकटेपणा .
अपरिचित स्थान .
वाऱ्यावर स्वार होणाऱ्या झाडांचे ते श्वापदासारखे अक्राळविक्राळ आवाज .
ह्यामुळे माझं स्थल कालाचं भान बहुतेक सुटलं होतं.
मेंदू बधीर झाला होता . विचारशक्तीवरच काहीतरी भानामती झाली होती.
पण मला सोबतीला नक्कीच कोणीतरी आलं होतं . मुक्ता मावशी किंवा जिवल्या मावशी तर नाही ना?
मला वाटतच होतं पावसाच्या थेंबांनी कंदिलाच्या तापल्या काचेला तडा कसा जात नाहीये?
कोण होती ती ? ... कोण आहे ती?
मी न्हाणीघराकडे शोधक नजरेने बघत धावले .
माझ्या मागोमाग मामा मामी .
खुंटीवर घोंगडीच्या दोन खोळी लटकत होत्या . ओल्याचिंब झालेल्या .
मी उंबरठ्यावर मटकन बसले . मनात विनवणी करीत होते .
" आई आयुष्यभर तू माझी काळजी घेतलीस . माझी , माझ्या मुलांची , तुझ्या जावयाची ! आता नको ग माझ्यात जीव अडकवूस . निश्चिंत राहा . तू गेलीस आणि ..एकाएकी .मी मोठी झालेय , जबाबदार झालेय .मी ...मी .. खरंच मोठी झालेय आई!"
मी मुसमुसत होते .
मामा मामी माझ्या डोक्यावरून सांत्वनाचा हात फिरवत होते .
खुंटीवर लटकणाऱ्या त्या घोंगडीच्या ओल्या खोळी वाऱ्याने हालत होत्या . फणसाच्या बुंध्याशी ठेवलेल्या कंदिलाच्या उजेडात
भिंतीवर पडलेल्या त्यांच्या सावल्या दिलासा दिल्यासारख्या नाचत होत्या.
पावसाचे शिंतोडे झेलणार्या पेटत्या कंदिलाच्या गरम काचेला अजुनही तडा गेला नव्हता. #सुरेखामोंडकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा