संध्याकाळची वेळ. नेहमी प्रमाणेच वाहनांनी दुथडी वाहणारा रस्ता . सगळ्यांनाच लवकरात लवकर घरी किंवा त्यांच्या इच्छित स्थळी जायचे वेध लागलेले . वाघ मागे लागल्यासारखी पिसाटलेली वाहने अंतहीन धावत होती .
नेहमी प्रमाणेच उद्वेगाने तिने स्वत:शी उद्गार काढले आणि मग लक्षात येऊन गालातल्या गालात हसली .
ती पण रोजच्यारोज त्याच गर्दीचा एक भाग झालेली असते की! तिला हक्क कुठे होता ह्या गर्दीला बोल लावायचा !
ह्या गर्दीच्या वेगानेच आपल्याला जायचंय.. नो पर्याय . जितकं डोकं शांत ठेवू तेवढी दमणूक कमी . समोर पसरलेल्या गाड्यांच्या ह्या अफाट गर्दी वरून उडत उडत तर नाही जाता येणार ?
पुन्हा तिला त्या कल्पनेचंच हसू आलं. " पंख होते तो उड आती रे ....." तिने मोकळ्या गळ्याने लकेर घेतली . गाडीच्या काचा बंद होत्या . बाहेर कोणाला ऐकू जाण्याची शक्यता नव्हती . " माझे आई गाऊ नकोस ... गाऊ नकोस ." असं म्हणून हिरमोड करणारं गाडीत पण कोणीच नव्हतं. एकटीने गाडी हाकत जाताना विरंगुळा म्हणून तिने स्वत:ला अशा काही ताण कमी करणाऱ्या आनंददायी सवयी लावून घेतल्या होत्या .
बैठकीतल्या बैठकीत ती थोडी सैलावली ... आणि अचानक पाठीमागून एक बाइकस्वार सुसाटत तिला कट मारून पुढे निघून गेला . पापणी लवायच्या आत तो पुढच्या गर्दीत मिसळून नाहीसा झाला होता . तिला दिसला त्याच्या बाईकचा चमकदार मेंदी कलर .. ज्याकेट पासून बुटापर्यंत संपूर्ण काळ्या रंगात लपेटलेली त्याची सडसडीत शरीरयष्टी .
ती थोडी हेलपाटली. कौशल्याने प्रतिक्षिप्त क्रियेने तिने गाडी ताब्यात ठेवली . " मरायचंय का? " गाडीच्या बाहेर कुणालाच ऐकू जाणार नाहीये ... त्याला तर नाहीच नाही .. ह्याची कल्पना असूनही ती क्षुब्ध होऊन किंचाळली .
आधी तिला वाटलं हा नेहमीचाच पाजीपणा असणार . बाई ड्रायव्हरच्या जागी असली की तिला हूल द्यायची कट मारायचा हा अनेकांचा मनोरंजनाचा उद्योग असतो . त्याच जातकुळीचा असणार हा !
पण पाहिलं तर झिगझ्याग करीत समोरच्या सर्वच वाहनांना वळसे वेलांट्या घालत अंदाज मधल्या राजेश खन्ना सारखा हुडलैहुडलै करीत तो चालला होता . हा हा म्हणता दूर निघून गेला .
दीर्घ श्वसन करीत तिने आपली चित्तवृत्ती ताब्यात आणली . रस्त्यावर लक्ष केंद्रित केलं.
काही अंतर कासवाच्या गतीने कापल्यावर तिला समोर काहीतरी गडबड जाणवली . वाहनं चालत होती ,पण एकाएकी त्यांची गती कमी झाली होती. ड्रायव्हिंग वरील लक्ष विचलित होऊ न देता ती रस्त्यावर कडेकडेला दृष्टिक्षेप टाकत होती .
तिला हादराच बसला . रस्त्याच्या कडेला वाढवलेल्या शोभिवंत झाडांच्या गर्दीत एक बाईक चेंदामेंदा होऊन अस्ताव्यस्त पडली होती. नवी कोरी ..मेंदी कलरची ! आणि तिथून थोड्याच अंतरावर .. रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला बाईकस्वार ... संपूर्ण काळ्या पेहरावात लपेटलेला . दूरवर पडलेली त्याची ब्याक प्याक ! काळीच !
ती नखशिखांत थरारली . आत्ताच तर काही वेळापूर्वी तिने तळतळाट दिल्या प्रमाणे त्याला म्हटलं होतं," मरायचंय का?" आणि ... हा .. खरोखरच मेला की काय ?
तिला बाजूला गाडी लावायला थोडी जागा होती . शक्य तेवढी कडेला गाडी लावून ती त्याच्याकडे धावली . वाहतूक पोलीस पोचलेले होते . पोलीस, रुग्णवाहिका त्यांच्या त्यांच्या गतीने येणार होते . त्याचे ओठ थोडे हालले . खरोखर की तिला भास झाला कोण जाणे !
ती पुन्हा तिच्या गाडी कडे धावली . गाडीतली पाण्याची बाटली घेऊन झाकण काढत च पळत पळत ती त्याच्याकडे आली. त्याच्या उघडलेल्या मुखात तिने पाणी टाकलं. थोडं तोंडात गेलं ..थोडं रक्तमाखल्या गाला वरून ओघळलं.
पोलीस बघ्यांना हाकलतच होते . ती देखील तिथे जास्त वेळ थांबू शकत नव्हती . कोण होता तो तिचा ? तिला हूल देताना कदाचित त्याने तिलाही धोक्यात टाकलं असतं. इतरांप्रमाणेच तिलाही नसत्या जंजाळात पोलीस लफड्यात अडकायचं नव्हतं.
घरी आल्यावर रात्री नेहमी प्रमाणे ल्यापटोप वर ती काम करीत बसली होती. गल्लीतले भटके कुत्रे सवयीने येणाऱ्याजाणार्यांवर भुंकत होते . काही गळे काढून रडत होते . दात विचकटत चालत्या वाहनांच्या मागे धावायची तर त्यांची रीतभातच होती .रोजची डोकेदुखी होती . तिला सवय झाली होती ह्या सर्व गोंधळाची .
पण आज एकाएकी सगळी कुत्री एकजूट करून तार स्वरात केकटायला लागली . सगळा जीव कंठी आणून जीवाच्या आकांताने भुंकायला लागली. झालंय तरी काय ह्यांना? दार उघडून ती बाल्कनीत आली .
रस्ता तसा सुनसान होता . बरीच रात्र झाली असावी . कामाच्या नादात तिला वेळेचं भान राहिलं नव्हतं . सुसाट वेगाने एक बाईकस्वार चालला होता . त्या असहाय माणसाच्या मागे हे शूर वीर आपले अक्राळविक्राळ सुळे पाजळत झेपा टाकत भुंकत धावत होते .
अचानक त्याने खच्चकन ब्रेक लावले . इमर्जन्सी ब्रेक लावल्यामुळे गाडी गर्रकन वळली . तिला वाटलं आता हे खवीस त्या गरीब बिचाऱ्यावर तुटून पडणार . त्याचे लचके तोडणार . बाल्कनीतून ती त्याला कशी मदत करू शकणार होती ? तरीही ती ओरडायला लागली .." हाड हाड !"
पण आज आश्चर्यच घडत होतं . तोंडात बोळे कोंबल्या सारखे कुत्रे गपगार झाले . त्यांचे डोळे खोबणीतून बाहेर आले होते . जागच्याजागी पुतळ्या सारखे ते उभे राहिले भानामती केल्या सारखे .
बाईक स्वाराने गाडी सावरली . क्षणभर तो स्थिर राहिला आणि मग मानेला एक झटका देऊन त्याने गाडी रेज केली . आता कुत्र्यांचा तांडा केकाटत पुढे धावत होता आणि त्यांच्या मागे रोरावत बाईक लागली होती.
ती अवाक होऊन ते दृश्य पहात होती . बाजूच्या बोळात शिरल्यावर ती बाईक दिसेनाशी झाली .
ती घरात वळली . इतक्यात तिला ती बाईक वळून येताना दिसली . तिच्याच फ्ल्याटच्या खाली रस्त्यावर उभी राहिली .उत्सुकतेने रस्त्यावरील दिव्यांच्या पिवळ्या प्रकाशात ती निरखून बघत राहिली .
बाईकस्वाराने ब्याक प्याक काढली त्यातून एक पाण्याची बाटली काढून तोंडाला लावली . पाणी घटाघटा पिऊन चिअर्स करावं त्या प्रमाणे त्याने तिच्याकडे बघून बाटली उंचावली ..तिला दाखवतच रिकामी बाटली रस्त्याच्या कडेला फुटपाथवर ठेवून दिलीन आणि तो सुसाटत निघाला . दिसेनासा झाला .
भानावर आल्यावर तिच्या लक्षात आलं त्याने नखशिखांत काळा पेहेराव केला होता आणि बाईकचा मेंदी कलर होता . फुटपाथवर पाण्याची प्लास्टिक ची रिकामी बाटली दिसत होती .
घामाने निथळत ती घरात आली .
कोण होता तो तिचा?
कोणीच तर नव्हता?
की गत जन्मीचा ... जन्मोजन्मीचा तो तिचा कोणीतरी होता ?
तिने योग्य वेळी दिलेल्या घोटभर पाण्याचं ऋण ह्या जन्मीच चुकवून त्याने त्याचा पुन्हा पुन्हा होणारा जन्म मरणाचा फेरा वाचवला होता का?
तिच्या एका दयाळू कृतीचा उतराई झाला होता का ?
माहिती नाही .
पण त्या नंतर कधीही तिला दहशत घालणारे ते रक्तपिपासू कुत्रे त्या गल्लीत पुन्हा फिरकले नव्हते . #सुरेखामोंडकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा