#ऐकतेहेस_ना?
#सुरेखा_मोंडकर
तू कहाँ ये बता
इस नशिली रातमें
तू कहाँ ये बता
इस नशिली रातमें
माने ना मेरा दिल दिवाना
हाये माने ना मेरा दिल दिवाना
पाच वर्षांनी तो गावाला आला होता . एका अनामिक ओढीने . आता त्याला त्याचं जंगलच प्यारं वाटत होतं. त्या घनगर्द गूढ बिकट किर्र अरण्यावर त्यातील पायवाटांवर पक्षी प्राण्यांवर त्याचा जीव जडला होता. तेच आता त्याचे सगे सोयरे झाले होते.
आसासून धावत यावं असं आता त्याचं गावाला कोणी उरलेलं पण नव्हतं. अफाट पसरलेली वाडी , वाडीतलं देखणं चिरेबंदी घर विहीर पाण्याचे पाट सगळं जागच्याजागी होतं. प्रल्हाद त्याची व्यवस्थित काळजी घेत होता. नसती घेतलीन तरी काही बिघडणार नव्हतं. त्या सगळ्यातून त्याचा जीव कधीच उडाला होता .
चांद तारोंने सुना
इन बहारोंने सुना
उंची मद्याची नशा नाजूक रेशीम धाग्यांसारखी अगदी हळुवारपणे त्याच्या रक्ताच्या कणाकणामधून चाहूल न देता वावरत होती. शरीर मन हलकं झालं होतं.
दर्दका राग मेरा
रेहगुजारोंने सुना
तू भी सून जानेमन
आ भी जा
खूप काळ तो गावापासून दूर राहिला होता.
त्याला माणसांचा तिटकारा नव्हता.
गर्दीची कुबट घुसमट त्याला सतावत नव्हती.
ओळखीच्या माणसांचे चेहरे चुकवावेसे वाटत नव्हतं.
मित्रांच्या घोळक्यात श्वास कोंडत नव्हता.
शांततेचं, जंगलाचं फार मोठं आकर्षण नव्हतं,तरी एका तिरीमिरीने त्यानं जंगल खात्याची नोकरी स्वीकारली होती.
सगळ्या ओळखीच्या परिचित जगाकडे पाठ फिरवली होती.
कदाचित कायमची!
आता अचानक त्याला साद ऐकू आली होती .मन अनामिक हुरहुरीने व्याकुळ झालं होतं. कासावीस होऊन मंत्रचळा सारख्या माथेफिरू कृतीने त्याने फक्त ब्याक प्याक घेऊन कसलाही विचार न करता गाव गाठला होता.
दुपारीच येऊन पोचला होता तो!
आल्या आल्या पारिजातकाच्या कट्यावर बैठक मारून त्याने फेसबुक उघडलं. आज तिचा वाढदिवस होता. तिच्या wall वरच्या पहिल्याच पोस्टच्या तळाशी सर्व सामान्य फेसबुक मित्राप्रमाणे त्याने वाढदिवसाच्या शुभेच्छा टाईप केल्या.
सेन्डला क्लिक करण्याच्या आधी तो चमकला . स्क्रोल करून पुन्हा तिच्या त्या पोस्ट वर गेला . .........
.
..............त्याने मानेला एक हिसडा दिला. ग्लासातील उरलेलं पेय एका घोटात गिळून टाकलं.
घशापासून एक सौम्य जळजळीत कडू चव अन्ननलिकेत घुसली.
त्याने डोळे घट्ट आवळून धरले.
दर्द्का राग मेरा
रेहगुजारोंने सुना
तू भी सून जानेमन
आ भी जा
तू कहाँ ये बता
इस नशीली रातमें
डोळे अत्यंत निष्ठूरपणे खसाखसा चोळत त्याने पुन्हा फेसबुक उघडलं.
पहाट व्हायला आली होती. बर्थडेची नवीन नोटिफिकेशन्स आली होती.
तो तिच्या wall वर गेला . तिची पोस्ट दोन दिवसांपूर्वीची होती.
अश्रूंच्या थेंबांचे शिंतोडे उडालेली काळी पार्श्वभूमी तिने निवडली होती.
त्यावर लिहिलं होतं,
.
जिवलगा कधी रे येशील तू.....?
रक्ताचा अणुरेणू तुला साद घालतोय!
ऐकतोहेस ना?
.
खाली कमेंट होत्या . वाह , छान , आलोच , सुंदर , काय झालं ग असं अचानक? मस्तच , सावर स्वत:ला ....कमेंट्सचा एक दुसऱ्याशी काहीच संबंध नव्हता . काहीतर नुसत्याच स्मायली होत्या.
त्या नंतर अचानक RIP , shocking, so sad , भावपूर्ण श्रद्धांजली, विश्वास नाही बसत अश्या कमेंट्स ....आणि ... सगळ्यात शेवटी त्याची सेंड न केलेली कमेंट, " वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!"
त्याने फेसबुक बंद केलं.
मदिरा त्याने तिचा आणि स्वत:चा आब राखून एक आवडीचं पेय म्हणून मोठया मरातबानेच प्रत्येकवेळी प्राशन केली होती.
बर्फाचा ठोकळा दु:खाच्या गळ्यात बांधून त्याला बुडवायचं एक साधन म्हणून त्याने कधीच त्या मदिर चषकाचा उपयोग केला नव्हता.
आजही त्याचे डोळे कोरडेठाकच होते.
त्याला आठवलं, तिचं लग्न झाल्यावर एकाएकी वैराग्य आल्याप्रमाणे तो जंगलात चालता झाला होता.
थरथरत्या हाताने त्याने नवा पेग ग्लासात ओतला.
हताशपणे पुटपुटला, " मी आलोय! ऐकतेहेस ना?"#सुरेखा_मोंडकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा