बुधवार, ९ ऑगस्ट, २०२३

 #अजा_पुत्राचा_बळी

. भलं मोठ्ठं घर , ह्या टोका पासून त्या टोका पर्यंत पसरलेलं . छोट्या दीड वर्षाच्या बाबूला तर ते अख्खं जगच होतं . भिंतीच भिंती सगळीकडे , आणि खिडक्या , दारं कतीतरी . त्याला अजून आकडे मोजता येत नव्हते , नाहीतर त्याने नेमकी संख्या सांगितली असती . वरती ऐसपैस माडी ; त्याच्या मागे पोटमाळा . जीनेच जीने , लाकडी ! उंबरठे तर त्याच्या मांडीपर्यंत पोचतील इतके उंच . घरातच , पाण्याने काठोकाठ भरलेल्या , तीन विहीरी . एक रांधपघराला लागून , स्वयंपाक करता करताच बायका , छोट्या खिडकीतून पाणी ओढून काढायच्या . एक न्हाणीघराच्या शेजारी आणि एक मधल्या घरात ; धुणीभांडी करायला सोयीस्कर पडेल अशी . पूर्वीच्या काळात आक्रमणं व्हायची ; तेव्हां घराबाहेर पडायची वेळच येणार नाही ; अशी सर्व रचना होती .
.
. .. अंधुक उजेड किंवा कौलात लावलेल्या चौकोनी काचातून येणारी सूर्यप्रकाशाची तिरीप मिरवणाऱ्या , अगडबंब खोल्या . एकीत नारळांचा ढिगारा ! एकदा बाबू त्या खोलीत कडमडायला गेला होता . त्याच्या धक्क्याने नारळांची उतरंड कोसळली होती . नशिबानं बाबू आटोकटी वाचला . पण तेव्हां पासून नारळाची खोली , भाताची खोली , तांदळाची , तुसाची , बाळंतीणीची खोली ; त्या सगळ्या सगळ्या खोल्यांच्या जाड लाकडी दारांच्या पितळेच्या दणकट कड्या नेहमी लावलेल्याच असायच्या .
.
. .. एके काळी घर भरलेलं होतं , माणसांनी पण आणि दौलतीनं पण ! हळू हळू सगळ्यालाच गळती लागली . प्राचीन घर . पोर्तुगीजांच्या काळातलं . त्याच्या जाड भिंतींमध्ये , जमिनी खाली मोहरांचे हंडे , रांजण पुरून ठेवले आहेत अशी सगळ्यांना खात्री होती . घरात दाढी वाढलेले , जटा झालेले , भगव्या कपड्यातले अनोळखी यायचे . रमल विद्या जाणणारे , भविष्य सांगणारे ,अंतर्ज्ञान असणारे , सोनं बनवणारे किमयागार असे कैकाडे , भूताडे कोण कोण यायचे . ते येऊन गेले की रात्री ही खोली खणली जायची , ती भिंत उकरली जायची . पण ते गुप्त धन हुलकावण्या देत होतं . .
.
. .. बाबूचा जास्त वावर मागच्या घरातच असायचा . विहिरी पल्याड असणाऱ्या अरुंद खोलीत त्याचे आबोजा होते . कायम बाजेवर पडलेले , सतत खोकणारे . पण फक्त त्यांच्या कडे बाबू साठी वेळ होता . बाबू तिथेच रमायचा . त्याला पाहिल्यावर अबोजांचे डोळे लकाकायचे . त्यांच्या कडे बाबू ला द्यायला काही नव्हतं , पण बाबुला त्यांचा स्पर्श , त्यांचं कुरवाळणं , त्यांच्या बाजूला बसून बिट्टीच्या , पांगार्याच्या बियांबरोबर , गुंजांबरोबर खेळायला आवडायचं . रात्री खेळता खेळता तो तिथेच झोपायचा . कोणीतरी येऊन त्याला नंतर घेऊन जायचं . सकाळी तो उठायचा पुढच्या घरात .
.
. . एकदा असाच कोणी बैरागी आला होता . गुप्त धन शोधून देणार होता . घर त्याच्या भोवती जमलं होतं . " घरातलाच कोणीतरी तुमच्या वायाटावर आहे . धन हाताशी येतं , पण त्याची काळी छाया पडली की ते दूर कुठेतरी , दुसर्याच बाजूला जातं ! " तो सांगत होता . कोण आहे तो ; हे शोधणं चाललं होतं .पणती लावली होती . तिच्या ज्योतीवर उलटा चमचा धरला होता . त्यावर काजळी धरत होती . कोणीतरी जाऊन बाबूला बखोटीला धरून आणलं . तो नाराज होता , तोअबोजांच्या खोलीत त्यांच्या बरोबर खेळत होता , त्यांच्यातली पेज खात होता . तंगड्या झाडत तो ; आबोजा , आबोजा असं ओरडत होता . पण त्याला थांबवायची शक्ती त्याच्या आबोजा मध्ये नव्हती .

. . बाबूच्या आक्रस्ताळेपणा कडे लक्ष न देता त्याला बैराग्या समोर आदळलं गेलं . बैराग्याने खोट्या मायाळू आवाजात विचारलं , '' कोण दिसतंय तुला ह्याच्यात ? '' काजळीने भरलेला चमचा त्याने बाबुसमोर धरला . बाबूला तिथे कोणीच दिसत नव्हतं . त्याने रडवेल्या चेहऱ्याने एक नजर चमच्याकडे टाकली . कोणीतर नव्हतं . त्याने पुन्हा रडायला सुरुवात केली ... "" आबोजा आबोजा ! "" जमलेल्या सगळ्यांनी एकमेकांकडे अर्थपूर्ण नजर टाकली . कोणीतरी पुटपुटल , " मला संशय होताच , हे म्हतारडच आडव येतंय ! "
.
. . बाबू हाताला हिसडा मारून तिथून पळाला . आबोजाच्या खोलीत त्याच्याशी खेळता खेळता त्यांच्याच बाजेवर झोपला . दुसऱ्या दिवशी पुढच्या घरात जागा झाला ; नेहमी प्रमाणे ! पण आज काहीतरी वेगळंच दिसत होतं . ओटीवर जमिनीवर चटई वर आबोजा शांतपणे झोपले होते . त्यांच्यावर पांढर पांघरूण होतं . . बाबू ने त्यांच्या कडे धाव घेतली . ''आबोजा , आबोजा ..." पण ते काहीही बोलले नाहीत , त्याला जवळ घेतलं नाही .
.
. . बाबूला काही समजत नव्हतं . त्याला एक आठवत होतं , रात्री त्याला न्यायला कोणीतरी आलं होतं , तेव्हां त्याच्या हातात उशी होती .पेंगुळलेल्या बाबूला तेव्हां कळल नव्हतं की ती उशी आबोजांच्या डोक्या खाली न ठेवता त्यांच्या तोंडावर का दाबली जात होती ?? आणि आत्ता तीच उशी अबोजांच्या डोक्याखाली .का ठेवली होती ?? तेव्हांच का नाही ती उशी आबोजांच्या डोक्याखाली ठेवली ??
.
. .. त्याला ते काही कळत नव्हतं तेच बर होतं . नेहमी अजापुत्रालाच बळी दिलं जातं , हे कळायला त्याला अजून खूप मोठ व्हायचं होतं !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा