ज्याचा त्याचा श्रावण . सुरेखा मोंडकर
. काळ बदलला , ऋतू बदलले, माणस बदलली . कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही , अशी अवस्था आली . नाग पंचमी होऊन गेली तरी पावसाचा पत्ता नाही . आषाढात आला होता ! श्रावण सुरु झाला आणि त्याने दडी मारली . आज अचानक कोसळतोय . मध्येच उन्ह पडतंय . उन्ह पाऊस असला की लहानपणी आम्ही सर्व मुलं , 'कोल्ह्याचं लगीन , कोल्ह्याचं लगीन ' म्हणून नाचायचो . जस जसा मोठा होत गेलो , तसा ह्या श्रावणात , उन्ह्पावसात , उदास , अधिकाधिक उदास होत गेलो . आज छत्री आणली नव्हती . मी सुरु केलेल्या शाळेचाच मुख्याध्यापक म्हटल्यावर इतर काम भरपूर असत . पाऊस थांबल्यावर घरी जावं म्हणून , शाळा सुटल्या नंतरही कसली , कसली काम काढून ऑफिसमध्येच पूर्ण करीत बसलो . कामात चित्त लागत नव्हतं . 'तिच्या ' आठवणी उफाळून येत होत्या .त्या गेल्या कधी होत्या ? स्मरणशक्ती हा माणसाला मिळालेला फार मोठा शाप आहे .
माझा जन्म गोकुळ अष्टमीचा ! ती गेली तेव्हां नारळी पौर्णिमा होती . ह्या श्रावणाचा आणि माझ्या आयुष्याचा संबंध काय ? का त्याने माझ्याशी असं वैर धरलं होतं ? कधी कधी वाटतं , तिचं माझ्यावर प्रेम होतं की नव्हतं ? होतं .... तर अशी न सांगता सवरता सोडून कां गेली ? माझं ..? माझं तिच्यावर प्रेम होतं ? तिच्यावरच्या प्रेमामुळे मी ह्या गावात स्वतःला बांधून घेतलंय कां ? संधी असूनही , सर्व महत्वाकांक्षा बेचिराख करून कां राहिलो ह्या गावात ? त्यात प्रेम ही भावना वरचढ होती ? की नाकारलेपणाची खंत , अपमान , दुखः , राग अशा संमिश्र भावना होत्या ? हताशपणा ; जगात आपण कुणालाही नको आहोत , आपलं कोणीही नाही , असा पराभूतपणा बेड्यांसारखा पायात अडकला होता कां ? ह्या सर्व नकारात्मक भावनांनी माझ्या व्यक्तिमत्वाचा घास घेतला होता कां ?
गावात आमचं एकच ब्राह्मण कुटुंब ! चातुर्मासात सणवार , व्रतवैकल्य , पूजाअर्चा , लघुरुद्र , महारुद्र , एकादष्ण्या , महापूजा यांची रेलचेल असायची . नानांना जरा उसंत नाही मिळायची . त्यात नित्य नैमित्यिक पूजा तर असायच्याच .दिव्याच्या अवसेलाच संध्याकाळी बुवा येऊन ठेपायचे . देवळा जवळच्या मठीत उतरायचे . चातुर्मासात त्यांचं कीर्तन , प्रवचन असायचं . पांढरशुभ्र करवती काठी धोतर , तसाच शुभ्र सदरा , डोक्यावर पगडी , खांद्यावरून मानेभोवती टाकलेलं ऐटबाज उपरणं ! नाना नेहमी पंचा नेसतात . पंचाचा रंग आणि जानव्याचा रंग एकच असतो . मळकट ,पिवळट , लाल ! अंगभर कपडे कधी त्यांनी घातलेच नाहीत .
नारळी पौर्णिमेला भरपूर काजू घालून तिने नारळीभात केला होता . बेसनाचे लाडू , खोबऱ्याच्या वड्या केल्या होत्या . मी फस्त करून टाकतो म्हणून नेहमी ती खाऊचे डबे उंच फडताळात ठेवायची . पण त्या दिवशी मात्र लाडू , वड्यांचे डबे तिने घडवंची वर ; माझा हात पोचेल अशा जागी ठेवले होते . सणाला हिरवगार , रेशमी लुगडं ती नेसली होती . अंगभर दागीने घातलेली ती, देवी सारखीच दिसत होती . त्या रात्री कीर्तन संपल्यावर माणस बत्तासा , खडीसाखरेचा प्रसाद घेऊन घरी गेली . नंदादिपात तेल घालून ; गाभारा , सभागार बंद करून , सर्व व्यवस्था लावून नाना घरी आले . पण ती आली नाही . पाऊस पडत होता . छत्री न घेताच , भिजत भिजतच नाना तिला शोधायला पुन्हा देवळाकडे गेले . पण ती आलीच नाही . बुरशी आल्यावर लाडू , वड्या उकिरड्यावर टाकून दिल्या . दुसऱ्या दिवसापासून कीर्तन पण बंद झालं . त्या नंतर गावात चातुर्मासात कधी कीर्तन झालंच नाही .
चौथीत होतो मी तेव्हां . शाळेतली मुलं , " किश्न्याची माय पलाली " असं बोंबलत माझी पाठ धरायची . ओठ गच्च आवळून , डोळ्यातून पाण्याचं ठीपूसही गळू न देता मी घरी यायचो . नानांना मी कधीच , काही सांगितलं नाही . . ते पूजेला देवळात जाताना पण त्यांच्या मागे , " बामनाची बाईल पलाली ... भट्टीन काकू पलाली .. "असं ओरडलेल मी खूप वेळा ऐकलं होतं . ते गावातून मान खाली घालून जायचे .त्यांचं दुखः माझं काळीज चिरत जायचं . त्या नंतर ते कधी बोललेच नाहीत .मुके झाले .
चातुर्मास संपत आला . नानांनी एकएक सामान बांधायला सुरुवात केली . गाव सोडून जायचं , एवढं मला कळल .कुठे ? कधी ? काही माहित नव्हतं . एक दिवस शाळेतून घरी आलो तर ओटीवर गावातली सगळी मोठी मोठी माणस बसली होती . वच्छी भावीण मला तिच्या अंगणात खेळायला घेऊन गेली . दुसऱ्या दिवसापासून पोरांचं चिडवणं बंद झालं . नानांनी एकएक गाठोडं सोडायला सुरुवात केली . गावाला भटजींची गरज होती .गावात पाचवी पर्यंत शाळा असूनही नानांनी मला चौथी झाल्यावर जिल्ह्याच्या शाळेत घातलं .
सुट्टीत मी घरी यायचो . पण ती कधीच दिसली नाही . माझ्या शाळेत देखील चमचा लिंबू , लंगडी , पळण्याच्या शर्यती असायच्या . जिथून पळायला सुरुवात केली , तिथे परत आल्याशिवाय शर्यत संपायची नाही ! मग , ती अशी कुठे पळाली होती की परतच आली नाही ? ती शर्यत पूर्ण करणार ; परत इथेच येणार , ह्या आशेने मी प्रत्येक सुट्टीत घरी येत राहिलो . अनेक प्रश्न माझ्या मेंदूचा भुगा करायचे . मला तिला जाब विचारायचा होता . उत्तर हवं होतं मला . शिक्षण पूर्ण करून मी गावातच परत आलो . तिची वाट बघत दिवस ढकलत राहिलो , काळजात सल घेऊन !
आज पाऊस थांबायची वाट पाहता पाहता मी जवळ जवळ वीस वर्षा पूर्वीच्या काळात जाऊन आलो .दर वर्षी नारळी पौर्णिमा जवळ आली की माझी अशीच सैरभैर अवस्था होते . पाऊस कधीतरी थांबला . विषण्ण मनस्थितीत मी घरी आलो . गडी , वैरण हालवून गोठ्याचा एक कोपरा रिकामा करीत होता . नाना त्याच्यावर देखरेख करीत होते . काय चाललंय मला समजलं नाही . नाना तर काही बोलले नसतेच .ते कधीच काही बोलत नसत ! पण आज माझ्याकडे बघून ते म्हणाले , "" आलास ? उशीर झाला ! भिजलास काय रे ? अंग कोरडं करून घे हो ! "" एवढी वाक्यं? एकदम ? मी आश्चर्यचकित झालो . नेहमी असहाय , विझल्या सारख्या दिसणाऱ्या त्यांच्या डोळ्यात , मला एक वेगळीच चमक दिसली . चेहऱ्यावर सतत दिसणारं अपयश , दूर झाल्यासारखं वाटलं .
डोणीत पाय धुऊन मी पायऱ्या चढून ओटीवर आलो . कोपऱ्यात एक वृद्ध , कृश बाई बसली होती . दात पडल्याने गाल बसले होते .कपाळावर मेणावर लावलेली पिंजर ; ठसठशीत अधेली एवढी ! कोनाड्यातील ; वर्षोनुवर्ष तिथेच असणारी , फणेरीची पेटी तिच्या समोर होती . शरयूलाही मी कधी त्या फणेरीला हात लावू दिला नव्हता .ती ह्या बाईने घेतली होती ? मी थिजल्या सारखा तिथे , खिळ्याने ठोकून ठेवावा तसा उभा होतो .
सात महिन्यांचं , गर्भारपणाने रसरसलेल आपलं शरीर सावरत शरयू माजघरातून बाहेर आली . अंग पुसायला पंचा देत , खालमानेने म्हणाली ,
"अहो ! त्या आल्यात ! " अधिक काही न बोलता , मला अंतर्मनातून सगळं काही न सांगताच समजलं ! ती आली होती ! माझी आई ! परत आली होती ! तिची शर्यत खरी खुरी संपली होती . पण नेमकी कशी आली; शरयूच बाळंतपण जवळ आल्यावर ? लक्ष ठेवून होती का आमच्यावर ? माझा वंश सुरु करून द्यायला आली होती का ? .... काही काही प्रश्नां पेक्षा त्यांची उत्तरं कठीण असतात प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळालंच पाहिजे असं कुठं आहे ? माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते . आज मात्र मी ओठ आवळले नाहीत . त्यांना रोखलं नाही ; वाहू दिले .
अंग मोहरवून टाकणारा ; चित्त प्रफुल्लीत करणारा श्रावण ; प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी येतोच ! त्याला ओळखायचा असतो . पकडून ठेवायचा असतो . त्या श्रावणानेच नानांच्या डोळ्यात चमक आणली , ओठावर शब्द आणले . बाहेर पुन्हा पावसाची सर आली होती . मला माहित होतं ; माझाही मेघ येईल , मला भिजवून जाईल . भिजत भिजतच अंगणातून मी गोठ्यापाशी गेलो , नानांना म्हणालो , " गोठा रिकामा नका करू नाना , घरात खूप जागा आहे ! " .. नानांच्या डोळ्यात फुललेला श्रावण मी तृप्त मनाने , डोळे भरून बघत राहिलो !!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा