बाबा ग्यारेज मधून गाडी बाहेर काढत होते. ती गेट उघडत बाहेर आली होती .
ती आपल्याच तंद्रीत होती . कोणीतरी तिच्याशी बोलत असेल असं तिला वाटलंच नाही .
तिच्या कानावर शिळ आली.
'किसी की मुस्कुराहटों पे हो निसार
किसी का दर्द मिल सके तो ले उधार'
तिने चमकून वळून पाहिलं. आता तर तिच्या डोळ्यात डोळे घालून तो म्हणाला,"खरंच तुला मेकप ची काही गरज नाही."
ती थक्क झाली.हा कोण टिक्कोजीराव सांगणारा?अनोळखी तरुण.सावळा उंच सडपातळ हसरा.
तिच्या घरासमोर! आई आणि बाबा गाडीतून येत आहेत. ते कधीही येऊन पोचतील आणि तरीसुद्धा तिला छेडायची त्याची एवढी हिम्मत!
त्याच्या डोळ्यात अडकलेले डोळे सोडवून घ्यायचं तिला भान राहिलं नाही. त्याला फटकारायचं तिला सुचलं नाही. भारून गेल्यासारखी ती त्याच्याकडे बघतच उभी राहिली.
बाबांची गाडी गेट कडे येत होती.
त्याने एक दृष्टिक्षेप गाडी कडे टाकला . तिच्याकडे पाठ करून किंचित तिरका उभा राहिला ... रिक्षाची वाट बघत असावा असा.
भराभर घाईघाईने म्हणाला," मी चिपळूणचा. नोकरी मुळे इकडे आलो आहे. इंजिनिअर आहे . तुमच्या बंगल्याच्या मागच्या बिल्डिंग मध्ये राहतोय सध्या. तुझ्या बेडरूमच्या बाल्कनी समोर माझी खिडकी येते."
बाबांनी गाडी बाहेर काढली. बाबांच्या शेजारी आई बसली होती. गेट बंद करून पाठीमागच्या सिट वर ती बसली.
त्यांच्याकडे न बघता तो रस्त्यावर उभा होता. त्या गावचाच नाही असा आव आणून!
रात्री घरी आल्यावर तिने मेकप काढून चेहरा स्वच्छ केला. मोकळ्या केसांचा माथ्यावर जुडा बांधतच ती बाल्कनीत आली.
शोधक नजरेने ती समोरच्या बिल्डींगकडे बघत होती.
कोणती खिडकी असेल बरं?
' किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार
जीना इसी का नाम है'
धून तिच्या कानी पडली. ओळख पटल्यासारखी तिने समोरच्या उजेडाच्या चौकटीवर नजर रोखली.
प्रकाशाच्या चौकटीत स्थिरावलेला तो आणि कधीची तिच्या कानात गुंजारव करणारी ती शिळ... किसी की मुस्कुराहटों पे हो निसार .....
तिचा चेहरा मंद स्मिताने मोहरला ... खुण पटल्या सारखा. #सुरेखामोंडकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा