गुरुवार, ३ ऑगस्ट, २०२३

 #आठवणी

#सुरेखा_मोंडकर

एका हातात पिशवी , खांद्यावर झोळी . ह्या दोन्ही थैल्या भाजीपाला , फळ , लायब्ररीची पुस्तकं , काही सटर फटर वस्तू , अशा ऐवजाने फुगलेल्या . कोणी आपल्या हस्तकौशल्याचा नमुना दाखवू नये म्हणून पर्स काखेत घट्ट आवळून धरलेली . अशा अवतारात मी रस्ता ओलांडायला उभी .

समोरची अवाढव्य बस गेली की पुढे पाऊल टाकायचं ह्या तयारीत असताना माझ्याच रोखाने एक कार आली .मी पाऊल मागे घेतलं . गाडी आणखीनच माझ्याजवळ आली . ' माझ्यावरच पार्क करायचा बेत दिसतोय ! ' असं वैतागाने स्वतःशीच पुटपुटत मी आणखीन मागे सरकले . त्याहून मागे सरकणे मात्र शक्यच नव्हतं . पाठीमागे उघडं गटार होतं . सुदैवाने माझी आणि गटाराची गळाभेट होण्याची वेळ आली नाही . गाडी माझ्याजवळ येऊन उभी राहिली .

. पांढरीशुभ्र , डौलदार ,गाडी . मी कशाला बघतेय तिकडे . माझं लक्ष रस्ता ओलांडायला कधी मिळतोय इकडेच . समोरून एक ट्रक जात होता .स्कूटर , रिक्षा ,एवढंच काय , कार्सना पण मी दाद देत नाही . बेधडक क्रॉस करते . पण ट्रक आणि बस समोर मात्र माझी हुशारी चालत नाही . भीती वाटते . नाईलाजाने थांबावंच लागलं होतं.

.." तू दीपा ना ? " कानावर शब्द आले म्हणून गाडीत पाहिलं . ओळख काही पटेना . मला नावाने ओळखणारी ही सुंदरी कोण ?

" बघ आठवतंय का ? आपण एकाच कॉलेजात होतो . " तिने हलकेच स्मित केलं . तिच्या डाव्या गालावर एक नाजूकशी खळी उमटली . खळी ! खड्डा नव्हे बरं का ! माझी ट्यूब लखकन चमकली .
" परवरीश ! "
" बरोब्बर ! चांगलंच ओळखलंस की ग ! "
आम्हांला दोघींनाही हसू आलं . .

. सायन्सला असलेल्या आम्ही मुली संख्येने जरा कमीच होतो . कळप करूनच राहायचो . कुठेही जायचं यायचं असलं तरी सगळ्या मेंढ्या एकत्रच . समजा चुकून एखादी एकटी पडली तरी तिचा घोळक्यात येऊन पडे पर्यंत जीव अर्धा व्हायचा . आधीच एफ वाय फूल्स आणि त्यात तो पंचवीस एक वर्षांपूर्वीचा काळ . आम्ही चक्क सर्व लेक्चर्स अटेंड करायचो .आणि लायब्ररीत बसून जिच्या तिच्या मगदुराप्रमाणे अभ्यास पण करायचो . परीक्षेची नोटीस झळकल्यावर नाही , तर अगदी जूनपासूनच ..

. पण ही अरुणा मात्र लेक्चर्स बुडवण्यात एकदम एक्स्पर्ट . जुने हिंदी सिनेमे खूप आवडायचे तिला . कंपनी म्हणून कोणीही चालायचं . कधीकधी तर एकटीच जायची . बहुतेक करून आर्टसच्या मुली असायच्या तिच्या बरोबर .

.एकदा रोल कॉल घेताना सरांनी मिस्कीलपणे हसून तिला सांगितलं , " तुमची कालची प्रेझेंटी लावलेली आहे हं ! कारण काल रोल कॉल 'परवरीश' ला घेतला होता ." वर्गात हसण्याचा कल्लोळ झाला . अरुणा आदल्या दिवशी लेक्चर्स बुडवून ' परवरीश ' बघायला गेली होती . आणि सरांच्या ते लक्षात आलं होतं . निमित्ताला ठेपलेल्या पोरांना काय , बरंच झालं ! त्या दिवसापासून तिचं नाव ' परवरीश ' पडलं .
" घरीच चालली आहेस ना ? चल सोडते तुला ! "
"अगं , समोर तर राहते मी . ती पांढरी बिल्डींग दिसतेय ना , तिथे ! येतेस का ? चहा घेऊन जा ! "
तिने मनगटावरच्या चमकदार घड्याळाकडे पाहत म्हटलं , " आता उशीर झालाय . उद्या येते . "
मी तिला पत्ता समजावून सांगितला .

अरुणा एक वर्ष आमच्या बरोबर होती . इंटरला तिने ' ए ' ग्रुप घेतला आणि आमचे वर्ग बदलले . तशा बरोबर असलो तरी आमची काही खूप मैत्री नव्हती . ती आमच्यात असायची पण आणि नसायची पण ! तिचं जगच वेगळ होतं . त्या जगापासून येणारा वारा पण आमच्यासारख्या सर्वसामान्य मुलींपर्यंत पोचत नव्हता . खूप आनंदी , प्रेमळ आणि निगर्वी होती ती . त्यामुळे ती आमच्यापेक्षा निराळी कधी वाटली नाही . तरीसुद्धा आम्ही मनोमन तिचं विश्व ओळखून होतो . जेव्हां ती आमच्यात असायची तेव्हां आमच्या डब्यातल्या पोळीभाजी पासून सगळ्यात तिचा वाटा असायचा . पण जेव्हां ती नसायची , तेव्हां कधीच आम्हांला तिची आठवण यायची नाही किंवा चुकल्यासारखं वाटायचं नाही .

. एकंदरीतच दैवाची तिच्यावर मेहेरनजर होती . इतक्या उनाडक्या करायची , पण तिचा फर्स्ट क्लास कधी चुकला नाही . आणि जून पासून अभ्यास करूनही आम्हांला मात्र सेकंड क्लास . अगदी जास्तीत जास्त म्हणजे जेमतेम बॉर्डरवर फर्स्ट क्लास . उत्तम शिलाईचे सुरुचीपूर्ण कपडे तिचे असायचे . त्या काळातही तिचे केस आधुनिक पद्धतीने कापलेले असायचे , आम्हांला स्वप्नात सुद्धा अप्राप्य असलेल्या जगातली ती प्रत्यक्ष रहिवासी होती .

. आज ती अगदी गाडी थांबवून माझ्याशी बोलली त्यात मला फारशी अपूर्वाई वाटली नाही . तिच्या मोकळ्या , निष्कपट मनात कसलेच हेवेदावे , लहानमोठे भेदाभेद नव्हते . तिच्या गोड स्वभावाचा तो एक निर्भर आविष्कारच होता . घरी आले आणि सगळं विसरून गेले.


. दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजताच बेल वाजली . दार उघडलं तर समोर अरुणा उभी . मी थक्कच झाले . म्हणजे ती म्हणाली होती , 'उद्या येईन ' म्हणून ; पण मला वाटलं नव्हतं ती खरोखरच येईल असं ! ही एक खूप दिवसांनी भेटल्यावर बोलायची पद्धत असते असाच माझा समज झाला होता .

" ये ना ! घर सापडलं ना बरोबर ? शोधायला त्रास नाही ना झाला ? "
माझी जरा गडबड उडाली . मुलं सकाळीच ट्रीपला गेली होती . काम काहीच नव्हतं म्हणून मी शिवणाचा पसारा मांडून बसले होते .

" बस गं ! " मी एकीकडे पसारा आवरून घेतला . सगळं गुंडाळून मशीनमध्ये टाकलं आणि मशीन बंद केली .

. अरुणा इतक्यात घरभर फिरून आली होती . तिला माझ्या सांगण्याची गरज पडलीच नव्हती . जणू काही ती नेहमीच आमच्या घरी येत होती .

" छान आहे तुझं घर ! ठेवलं आहेस पण मस्त ! "
कोचावर आरामात मांडी घालून ती बसली ." मुलं कुठे आहेत गं ? " एकेकाची चौकशी करीत तिने पर्स मधून दोन इंग्लिश कादंबर्या आणि चॉकोलेट्स चा बॉक्स काढला .

" हे काय ? एवढं कशाला आणलंस ? "

. मला कसंतरीच वाटलं . मी बुकस्टाल मध्ये ह्या कादंबर्या बघितल्या होत्या . महाग होत्या . एवढी किमती भेट तिने माझ्या मुलांसाठी आणावी अशी काही आमची जवळीक नव्हती .

.तिच्या बोलण्यात सहजता होती , " बघ बरं , ही पुस्तकं तुझ्या मुलांनी वाचली आहेत का ? "
" नाही वाचलेली . पण एवढी भेट कशाला आणलीस उगीच ? "

तिने हसूनच माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं . पर्स मधून सोनेरी पेन काढून सुंदर अक्षरात तिने पुस्तकांवर , ' अरुणा मावशी कडून सप्रेम भेट " असं लिहून पुस्तकं माझ्याकडे दिली .आणि म्हणाली , " आता कळलं , का आणली ते ? अगं , भाचवंड आहेत माझी ती ! "

" आणि ही एवढी थोरली चॉकलेट्स कशाला ती ? मुलं काय आता लहान आहेत चॉकलेट खायला ? "
" मुलांसाठी आणलीच नाहीत . तुझ्यासाठी आणलीत ." मग खोटं खोटं ,गांभीर्याने म्हणाली , " मुलांनी चॉकलेट खाऊ नयेत . दात किडतात . आपल्याला हरकत नाही . आपल्या दातांचं काय व्हायचंय ते सगळं झालंच आहे . "

. तिच्या वागणुकीतील ह्या सहजतेमुळे तिचं जग निराळं असूनसुद्धा कॉलेजात ती अलगदपणे आमच्यात मिसळून जायची . कुठेही कृत्रिमतेचा रंग नसायचा .

" मी जेवायला आले आहे हं ! " तिने लगेच सांगून टाकलं .

आज आयत्या वेळेला दहा पाहुणे आले असते जेवायला तरी मी डरले नसते . कारण कालच सगळी खरेदी झाली होती . फ्रीज भरलेला होता . गप्पा मारता मारता मी फ्रीज मधली एकएक वस्तू बाहेर काढत होते .पापलेट काढून ताटलीत ठेवलं .
" ए , जेवण माझ्या आवडीचं पाहिजे हं !
" बोल , काय फर्माईश आहे ? "
" वरण , भात आणि बटाट्याची भाजी . सर्व गरमागरम ! "
मला हसूच आलं , " अरुणा , हल्ली आमच्या घरी सर्वजण नॉनवेज खातात . मी खात नाही . जुने संस्कार ना ! नाही खावंसं वाटत मला . पण सर्व प्रकार करता येतात . घाबरू नकोस . अगदी चटकदार करेन . "

" तुझ्या सुगरणपणा बद्दल मला मुळीच शंका नाही . पण आज मला अगदी तुमच्या पद्धतीचं जेवायचंय आणि अतिथीची इच्छा महत्वाची , खरं की नाही ? "

" बरं ,बरं ! आपण सुवर्णमध्य शोधून काढूया . अतिथीला पण खुश करूया आणि यजमानाला पण समाधान देऊया . "

आमच्या गप्पा खूप रंगल्या . अरुणा लग्न झाल्यानंतर काही महिन्यांनी नवर्या बरोबर परदेशी गेली होती . हल्लीच सर्व मंडळी परत आली होती . तिचे सासरे थकले होते . आता इथेच राहून घरचा व्यवसाय सांभाळायचा होता . तिच्या सोनेरी नशिबाला साजेसंच तिचं सर्व आयुष्य होतं .

एक एक जुन्या आठवणी येत होत्या . " दीपा , तुला आठवतं , एकदा आपण पार्ल्याला कुमुदकडे गेलो होतो . परत येताना रेल्वे लाईन क्रॉस करून येत होतो . समोरून कर्कश्श शिट्या मारत धडधडत लोकल ट्रेन येत होती "
" हो गं , आपल्याला वाटलं , गाडी स्टेशनवर थांबणार आहे . लाईन स्लो ट्रेनची होती . गप्पा मारत , रमतगमत आपण लाईन क्रॉस केली . सगळ्यांचं पाऊल पलीकडे पडलं आणि रोरावत गाडी आपल्या शेजारून गेली फास्ट ट्रेन होती . स्टेशन वर थांबलीच नव्हती ."

" त्या दिवशी एका क्षणाची चूक झाली असती तर आपण सर्वच मेलो असतो , नाही गं ? आणि आपल्या घरी कुणाला पत्ताच लागला नसता . ऑफ मिळाला म्हणून कुमुदकडे गेलो होतो . घरी सगळ्यांची कल्पना , आपण कॉलेज मध्येच आहोत . " माझ्या अंगावर शहारे उभे राहिले .

" अरुणा , अजुनही कधीकधी ती कर्कश्श शिट्टी माझ्या कानात घुमते आणि काय प्रसंग घडला असता ह्या कल्पनेने माझ्या जीवाचं पाणी होतं . "

.बोलणं एका विषयावरून दुसऱ्या विषयावर कसं जात होतं ते कळतच नव्हतं .

" आपल्या कॉलेजमध्ये ' संगीत -समारोह ' किती सुंदर व्हायचा नाही ? "
" एक उत्सवच होता तो ! "

' शास्त्रीय संगीताची बैठक असलेली गाणी गाऊन दरवर्षी हुकमी पहिलं बक्षीस मिळवणारी रेवती आणि तो दर्दभरी गाणी म्हणणारा मुजुमदार ! दोघांचाही आवाज किती गोड होता नाही ? ए , त्या मुजुमदारला ' मुकेश ' म्हणायचे ना ? की " तलत ' ? "

" तो मुजुमदार वर्षभर गण्याच्या आणि लोकप्रियतेच्या नशेत राहिला . मग काय झालं पाहिलंस ना ? एफ वायला त्याला फॉर्म मिळाला नाही "

" त्याने रेवती सारखंच आर्टसला जायला हवं होतं . नाहीतर कॉमर्सला , खरं की नाही ? "

" सगळं आयुष्य फुकट गेलं गं त्याचं ! आपलं कॉलेज संपल्यावर एकदा मला दादरला भेटला होता . ' आई हॉस्पिटलमध्ये सिरीयस आहे . शेवटच्या घटका मोजतेय ', असं सांगून माझ्याकडे पन्नास रुपये मागीतलेन . सिरीयस आईला पन्नास रुपयांनी तो काय करणार ? सगळं खोटं बोलतोय हे कळत होतं मला .पण मला तो कॉलेजमधला , स्टेजवर बेफाम होऊन गाणारा , राजकुमाराच्या ऐटीत चालणारा , रुबाबदार मुजुमदार आठवला . काय दैना झाली होती गं त्याची ! दिले मी त्याला पैसे ! पुनःपुन्हा सांगत होतं , पत्ता दे , पैसे परत करीन "

" मग दिलास पत्ता ? . "

" नाही दिला . मुजुमदारची मला खूप दया आली . पण हे शुक्लकाष्ट कायमचं मागे लागेल अशी भीती पण वाटत होती . " मी क्षणभर गप्प बसले .

अरुणा पण गंभीर झाली . तिलासुद्धा माझी तेव्हाची उलघाल समजली असावी . तिने मला दोष दिला नाही . उसना उत्साह आणून म्हणाली ,

" रेवती आता खूप प्रसिद्ध झाली असेल ना तेव्हाच तिच्या संगीताच्या बऱ्याच परीक्षा झाल्या होत्या . संगीत माझा प्राण आहे म्हणायची . भेटते काय गं ? "

"भेटत नाही कधी . कशी भेटणार ? अंबरनाथला राहते . ब्यांकेत सर्विस करते . आता ब्यांकेच्या परीक्षा देते . रियाज पण सोडून दिला आहे . सासरी कुणाला गाणं आवडत नाही म्हणे ."

उगाचच गप्पांना गंभीर वळण लागलं होतं . अरुणाने जवळचं मासिक उचलून चाळायला सुरुवात केली . मी उठून रेडीओ लावला . जुनं गाणं लागलं होतं , ' दिल पुकारे ...... आरे आ रे आ रे .'


अरुणा पुन्हा खुलली ." ए , ती केमिस्ट्रीची लेक्चरर पटेल दिसली की सगळी मुलं हे गाणं म्हणायची , नाही गं? दिल पुकारे .. आरे आरे आरे .. "

" हो ना ! " मला पण हसू आलं . " म्हणणारा कधीच सापडायचा नाही . सगळ्यांचे चेहरे निर्विकार आणि ओठ स्तब्ध . ओठ न हलवता कसे म्हणायचे गं ? "

" मजाच होती नाही ? त्या पटेलचं आणि फिजिक्सचे लेक्चरर आर . ए . पाडळकरांच काहीतरी होतं म्हणे . लग्न केलं असेल काय गं त्यांनी ? "

" कोण जाणे ? कॉलेज सोडल्यावर गेलंय कोण पुन्हा कॉलेज मध्ये !"
हास्यविनोदातच जेवण झालं . अरुणा गालिच्यावरच लवंडली .

" हे काय ? इकडे वरती झोप ना ! "

" झोपत नाही गं ! असं जमिनीवर लोळायला मजा वाटते नाही ? "
बोलता बोलता मला मध्येच आठवण झाली .

" अरुणा तुला मोरेचं कळलं ? "
" कोण मोरे ? " अरुणा दचकलीच .
मला कळेना , हिला इतकं दचकायला काय झालं ?
" बाजीराव मोरे गं ! आपल्या वेळचा सीआर ! "
अरुणा उठून बसली .

" फार वाईट झालं नाही ! गाडीतले सगळे वाचले आणि तो एकटाच गेला . किती दुर्दैव ना ? "
" हो गं ! इतका उमदा होता . गावात किती नाव आणि प्रतिष्ठा मिळवली होती ."

अरुणा गप्प बसून ऐकत होती . " किती वर्ष लग्न करीत नव्हता . नंतर एकदाचा तयार झाला . आईच्या आवडीची , अगदी पत्रिका वगैरे बघून मुलगी पाहिली. तर काय गं , जेमतेम तीन-चार वर्षं काय तो संसार झाला . '

" कुठे असते ती ? "
" कोण ? त्याची बायको ? तिने पुन्हा लग्न केलं . लव्ह म्यारेज आहे . " मी थोडीशी अडखळले . अरुणा शांतपणे माझ्याकडे बघत होती . मला उगीचच तिची नजर टोचत होती . मी घाईघाईने म्हटलं ,
" ती तरी काय करणार ? तरुण वयात असा आघात ! उभं आयुष्य कुणाच्या आधाराने काढणार ? "

माझ्या सारवासारवीचं मलाच नवल वाटलं . असं कुठे तिने विचित्र केलं होतं ! अरुणा तर पहिल्यापासून उदारमतवादी आणि आधुनिक विचारसरणीची होती . त्यातून इतकी वर्षं परदेशी राहिलेली ! अरुणाने नक्कीच समजून घेतलं असतं . शिवाय तिच्या कृतीवर टीका टिप्पणी करणाऱ्या आम्ही कोण ?

" छान चाललंय तिचं ! नवरा फार चांगला आहे . तिच्या मुलाला पण प्रेमाने सांभाळतो . " माझा आवाजावर काबू आला होता .
"मुलगा आहे त्याला ? "

" हो गं , तो गेला तेव्हां इतका लहान होता . त्याला तर आपले बाबा आठवतही नाहीत . "

अरुणाचा चेहरा उदास झाला होता . कोणालाही वाईट वाटावं अशीच ती घटना होती. त्याला न ओळखणारे पण तेव्हां हळहळले होते . मग आमच्या सारख्या ओळखीच्यांना तर किती वाईट वाटलं असेल . इतकी वर्षं उलटली तरी अजून विसरता येत नाही .

" अगं , आमच्या शेजारचे तिन्ही फ्ल्याट त्यानेच घेतले होते . केवढी मोठी जागा आहे ग त्याची ! सगळं इंटीरिअर त्याने स्वतः केलं होतं . आर्किटेक्ट होता ना ! इतका देखणा फ्ल्याट आहे . पण कधी कोणी राहायला आलंच नाही इथे . मुहूर्त करायच्या आधीच हे असं झालं . आता फ्ल्याट मुलाच्या नावावर केलाय . किल्ली आमच्याचकडे असते बघायचाय तुला ? "

" आत्ता भेटेल " तिने अविश्वासाच्या नजरेने माझ्याकडे पाहिलं .

"कोण भेटेल ? " मला काही कळेनाच .

" मुलगा त्याचा ! " तिने उत्सुकतेने विचारलं .

" अगं , मुलगा कसा भेटेल ! मी फ्ल्याट बघायचाय का विचारतेय ! मुलगा त्याच्या आईकडे नाही का ? "

हिचं माझ्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं तर ! मला तिची बेचैनी समजू शकत होती . ती दुर्घटना घडल्यावर मी पण कितीतरी दिवस उदास होते .

" अरुणा , अगदी डोळ्यांसमोर उभा राहतो बघ तो ! एक वर्षंच आपल्या बरोबर होता . नंतर आय आय टी ला गेला .सुट्टीत आला की कधीना कधी ; कुठेना कुठे भेटायचाच . ' कॉफी कॉर्नर ' मध्ये नेहमी बसलेला असायचा ."

" आता तो ' कॉफी कॉर्नर ' पण राहिला नाही " अरुणा उदासपणे म्हणाली .

" तुझ्या लक्षात आलं वाटतं . अगं , कधीच पाडला . आता तिथे केवढी मोठ्ठी बिल्डींग झालीय . '

अरुणाची बडबड थांबली होती . मी गप्प बसून तिच्याकडे बघत होते . किती दिवस एक प्रश्न मनात उमटत होता . विचारावा का हिला ? की राग येईल ?
" अरुणा , एक विचारू ? "
तिने काही न बोलता , माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं .

" रागावणार नाहीस ना ? "
..
"विचारून टाक ."

" अरुणा , मोरेचं तुझ्यावर प्रेम होतं काय गं? तुम्ही दोघे लग्न करणार होता ? " माझा आवाज अत्यंत हळुवार झाला होता .

" चल ग , काहीतरीच काय ! " तिने हसत हसतच मला उडवून लावलं .
मला उगाचच तिचा स्वर जरा उंच लागल्यासारखा वाटला . माझ्या डोक्यावर एक चापट मारत ती म्हणाली , " तुझी कल्पनाशक्ती मात्र घोड्याच्या पुढे धावते हं ! "

हसून हसून तिच्या डोळ्यात पाणी आलं . त्यात एवढं हसण्यासारखं काय होतं. मला कळेना . हसता हसताच तिला एकदम ठसका लागला .

" अगं हळू . एवढं हसायला काय झालं ? "
मी तिच्या पाठीवरून हात फिरवत होते . पण ती आणखीनच खोकायला लागली .नुसती लालबुंद झाली .मी घाबरलेच . पटकन पाण्याचा ग्लास घेऊन आले .पाणी प्यायल्यावर ती जरा सावरली . डोळ्यातलं पाणी पुसत नेहमीच्या स्वरात म्हणाली ,
" अग , तो आमच्या जातीचा नव्हता . शिवाय मला कडक मंगळ .पत्रिका पण जुळली नसती . आणि माझी आजी आठवतेय ना ? नुसती वाघीण होती . खाऊनच टाकलं असतं तिने मला . तुला ना अगदी अद् भूत कथा सुचत असतात . '
पुन्हा ती मोठ्याने हसली आणि अचानकच म्हणाली , " निघते आता ! " उठून उभीच राहिली .
" ए , हे काय ? इतक्यात कुठे निघालीस ? चहा करते ना ! "
" नको गं ! "
" हो खरंच , तू चहा नाही घेत ना ! विसरलेच होते बघ ! तू पक्की कॉफी बहाद्दर . कॉफी पण अगदी ठराविकच हवी .खरं ना ? आता सगळं आठवलं बघ . तू कॉलेजच्या क्यांटीन मधली कॉफी कधीच घ्यायची नाहीस . लांब पडलं तरी कॉफी घ्यायला तू ' कॉफी कॉर्नर 'मध्येच जायचीस . मग अर्थातच दोन तरी लेक्चर्स बुडायचीच . पण बुडली तर बुडली . तू ' कॉफी कॉर्नर ' मधली कॉफी कधी बुडवली नाहीस . " मी हसले . पण तिचं लक्षच नव्हतं .

" फार उशीर झालाय ग ! "
" ड्रायव्हरला तू साडेपाचला बोलावलं आहेस ना ? आत्ता तर चार वाजताहेत "

" अचानक एक महत्वाचं काम आठवलं . जायलाच हवं . ड्रायव्हर आल्यावर त्याला गाडी कंपनीत घेऊन जायला सांग , मी रिक्षाने जाते . "

" थांब ना अरुणा , पाच मिनिटांत कॉफी होईल बघ ! "

" तू वाईट नको वाटून घेऊस दीपा , अगं कॉफी सोडलीय मी . हल्ली नाही घेत .निघते हं ! " माझ्या आग्रहाला न जुमानता अरुणा बाहेर पडली . तिला निरोप देऊन मी घरात आले . बाल्कनीतून हात करत होते ; पण ती इतकी घाईत होती की वरती बघायला पण विसरली .

दिवस खूप छान गेला होता . अरुणा इतकी भावनाप्रधान आहे हे माहीत नव्हतं मला . नाहीतर बाजीराव मोरेचा विषयच काढला नसता मी . फार वाईट वाटलं बिचारीला . माझं मन पण चूटपुटत होतं . पण मला कळेना ; मोरे गेल्याचं अरुणाला आधीपासूनच कसं माहीत होतं ? तेव्हां तर ती परदेशात होती . मग तिला कुणाकडून समजलं ? कधीतरी तिच्याकडे गेल्यावर विचारलं पाहिजे .

हो , पण जाणार कसं ? एकदम माझ्या लक्षात आलं , अरुणाने मला तिच्याकडे बोलावलं होतं , पण पत्ता लिहून घ्यायला मी विसरले होते .आणि द्यायला ती विसरली होती . म्हणजे आता एकमेकीना पुन्हा भेटायचं की नाही , हे सुद्धा तिच्याच मर्जीवर अवलंबून होतं .#सुरेखामोंडकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा