गुरुवार, ३ ऑगस्ट, २०२३

 #तो_भेटलाच_ नसता_तर 


.
खूप दिवसांनी ..नाही .. खूप वर्षांनी तो दिसला .गोरापान! बळकट शरीर . घनदाट केसांनी कपाळावरून थोडीशी माघार घेतलेली . तांबूस तपकिरी मऊशार केसात काही रुपेरी चंदेरी तारा सैरभैर झाल्या होत्या
नाकावर सोनेरी काड्यांचा चष्मा स्थिरावला होता . एवढाच काय तो फरक !
देखणा तसाच .
लवभर कमी नाही .
प्रौढपणी शशी कपूर दिसायचा तसाच दिसत होता .
.
तो तिच्याकडेच बघत होता . चेहऱ्यावर ओळख नव्हती .
तोच आहे ना? की त्याच्यासारखा दिसणारा दुसरा कोणी?
पुढे निघून जावं का? की विचारावं त्याला ? आधीच वीस एक वर्षांनी दिसतोय .
आजचा क्षण गमावला तर कोण जाणे पुन्हा भेटेल की नाही?
.
जुन्या घरात त्यांच्या दोन्ही कुटुंबांचा दाट घरोबा .
एकमेकांकडे जाणं येणं .
जेवणं खाणं.
तिची मुलं तर त्याच्या अंगाखांद्यावर लोळायची . वयाने मोठा असला तरी मित्र होता तो त्यांचा .एक जबाबदार मित्र !
अनेकवेळा मोठ्या विश्वासाने त्याच्यावर मुलं सोपवून ती आपलं एखादं काम पटकन करून यायची .
त्या काळात अचानक अनेक जबाबदाऱ्या अंगावर कोसळल्यावर तिला त्याचा अबोल विनाअट निश्चीत आधार बहुमोलाचा वाटायचा .
.
घर बदलल्यावर काही दिवस संपर्क राहिला .
तो तर नव्या घरात कधी आलाच नाही. योगायोगाने पण कधी चुकुनही भेटला नाही .
तिच्या कुटुंबावर जीव लावला होता त्याने . इतकं असुनही मुलांना कसा भेटला नाही ? असा कसा विसरला? तिला अचंबा वाटायचा .
हळूहळू जनरहाटी प्रमाणे अंतर पडत गेलं .
वेगळ्या मार्गावर वेगळी कामं .. वेगळे परिवार ..वेगळे सवंगडी . आयुष्य बेफाम धावत सुटलं.
.
आजची संधी सोडायची नाही . ती पुढे झाली . जवळ गेली .
आता त्याच्या चेहऱ्यावर ओळखीचं हसू उमललं . ते पण माफक . पूर्वी सारखं खळखळून नाही .
."ओळखलंस? की विसरलास?"
"विसरेन कसा?" तिच्या डोक्यावरून पलीकडे कुठेतरी दूरवर पहात तो म्हणाला .
"कोणी यायचंय का? वाट पाहातोहेस का कुणाची?"
"चक् ! वाट पाहून थकलो."
संभाषण पुढे सरकत नव्हतं . एवढ्या वर्षांनी भेटल्यावर एकदम अचानक विषय तरी कसे सुचणार ?जरा निवांतपणा हवा .
"घाईत नाहीस ना?वेळ आहे का तुला ? बसूया कुठेतरी?"
तिला वाटलं होतं कुठेतरी चहा कॉफी घेत थोड्या गप्पा मारुया . जरा हालहवाल विचारूया .
तो समोरच्या सार्वजनिक बागेकडे वळला .
एका सिमेंटच्या बाकावर ती बसली . तो अंतर राखून अगदी एका टोकाला बसला .
संवाद होत नव्हता . सगळं ठप्प झालं होतं .
एका क्षणाला तिला वाटलं जाऊदे , उठून जाऊया . इतके वर्षांनी काही मृदु उरलं नाहीये . तेव्हां किती बोलका होता . न थांबता अखंड बडबड ! ऐन विशीत होता तेव्हां . वाढत्या वयाने , अनुभवांनी , परिस्थितीने बरंच काही शिकवलेलं दिसतंय .अबोल गंभीर झाला होता.
.
"आता सांग आई बाबा कसे आहेत ? कुठे असतात? तू कुठे असतोस? बायको काय करते?"
.
अजुनही तो मोकळा झाला नव्हता .
तिच्याकडे न बघता आरपार कुठेतरी पहात म्हणाला ,
"चेन्नईला असतो . आईबाबा माझ्याकडेच असतात . लग्न नाही केलं."
विचारलेल्या प्रश्नांना थोडक्यात जेवढ्यास तेव्हढी उत्तरं . काही सांगितलं नाही असं नाही आणि सर्व सांगितलं असं पण नाही .
मध्यंतरी उडत उडत तिच्या कानावर आलं होतं; त्याचं प्रेम होतं एकीवर पण त्याला प्रतिसाद मिळाला नव्हता , म्हणून सगळ्या जगापासून तो तुटत गेला होता .
.
नकळतपणे तिच्या तोंडून गेलं," का रे ? लग्न का नाही केलंस?"
"खरंच तुम्हांला माहिती नाही?"
आता प्रथमच त्याने तिच्याकडे पाहिलं. नजरेला नजर भिडवली .
तिने प्रश्नार्थक चेहरा केला .
थोडावेळ तो घुटमळला . बेचैन झाला . त्यालाही तो क्षण गमवायचा नव्हता . सर्व शक्ती एकवटल्यासारखा मोठ्ठा श्वास घेऊन म्हणाला ,
"मला तुम्ही हव्या होता . माझं तुमच्यावर प्रेम होतं..आहे ! का नाही तुम्ही माझ्यावर प्रेम केलं? का नाही लग्नाला तयार झालात?"
.
हा वेडा आहे का? किती वाह्यात बोलतोय . बेताल .
तिला कड्यावरून खोल खोल दरीत गटांगळ्या खाल्यासारखं झालं. पोटात खड्डा पडला .हातापायाला कापरं भरलं . बर्फाची शिरशिरी सबंध शरीरभर पसरली .
.
तो आवडायचा तिला . एक सच्छील प्रामाणिक मेहनती प्रेमळ सरळमार्गी मुलगा म्हणून . त्या संकटांच्या काळात त्याचा आधारही वाटायचा . नात्याचं कोणतंही नाव नव्हतं . त्याच्या आईवडिलांना माहिती असेल आपल्या मुलाच्या मनात काय चाललंय ते ?
.
नकळत अनावधानाने आपल्याकडून त्याला तसे काही चुकीचे संदेश तर नाही गेले? आपण सावध नव्हतो का? आपल्या मोकळेपणामुळे पारदर्शी स्वभावामुळे त्याचा गैरसमज तर नाही झाला?
त्याच्या भावना आपल्या कधी कशा लक्षात नाही आल्या? आपण आपलंच दु:ख गोंजारण्यात मग्न होतो.
ती गोठून गेली होती .
त्याची नजर पुन्हा शून्यात गेली. दृष्टीहीन झाली .
तो कुठेतरी बघत होता आणि कुठेच बघत नव्हता .
भूतकाळात डोकावत होता का?
.
काय बोलावं तिला समजत नव्हतं . त्याच्या भावनांचा अपमान करावासा पण वाटत नव्हतं .
आपली दुखावलेली नजर गोळा करून त्याने पुन्हा तिच्यावर रोखली .
" तुम्ही एकट्या कशा दोन मुलांना वाढवणार होता? मला चांगली नोकरी तर लागणारच होती . तुमच्यावर कोणताही आर्थिक भार पडणार नव्हता . का नाही थोडा पुढाकार घेतलात? का नाही मला दिलासा दिलात? आता पण दोन्ही मुलं परदेशी . एकट्याच ना तुम्ही इथे? तुमचं आणि माझं पण आयुष्य वैराण.. ते फुलवणं शक्य होतं."
ती भानावर आली होती . अजूनही धक्का ओसरला नव्हता . बोलण्याची थोडीफार स्थिती आली होती . किती गोष्टी हा गृहीत धरतोय !
.
" चुप , एकदम चुप! आपल्या वयात किती अंतर आहे ह्याचं जरातरी भान ठेव !"
.
"असा वयातील फरक कितीतरी जणांमध्ये असतो . चित्रकार देऊस्कर , दिलीपकुमार ,मिलिंद सोमण , अनुप जलोटा .. वीस पंचवीस वर्षांचं अंतर असुनही झालीच न त्यांची लग्नं ? संसार?"
.
"ह्या सर्व जोड्यांमध्ये नवरा बायकोपेक्षा वयाने मोठा आहे . इथे मी .. एक स्त्री तुझ्यापेक्षा वयाने खूप मोठी आहे ."
.
"बायको मोठी असलेली उदाहरणं पण सांगतो...."
"नको!".. त्याच्याशी बोलणं व्यर्थ होतं .ती उठून उभी राहिली .
मनातले विचार उघडेबंब नसतात हे किती बरं आहे !
पर्स खांद्याला लटकावून ती वळली .
निरोप घ्यायला पण थांबली नाही .
.
इतकी वर्षं त्याचं नखही दिसलं नव्हतं .
आता तरी का भेटला ?
भेटायलाच नको होता .
तो लक्ष ठेवून होता का?
तिला जी भेट सहज वाटत होती ती त्याने प्रयत्नपूर्वक घडवून तर आणलेली नव्हती?
आयुष्य चांगलं चाललं होतं ,
एकटेपणाचे ताणेबाणे सोसायला ती इतक्या वर्षात शिकली होती .
ह्या वावटळीला ती कसं तोंड देणार होती ?
एकीने त्याच्या प्रेमाला प्रतिसाद दिला नव्हता ही केवळ हुल नव्हती .
'ती' कोण होती ते तिला कळलं होतं .
पूर्ण उध्वस्त झाली होती ती !#सुरेखा_मोंडकर
ers



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा