बुधवार, ९ ऑगस्ट, २०२३

 #प्रवासी_पालीची_कथा

." अग , काल शिरवळहून येताना . फूड mall ला थांबलो . गाडीचं पोट , आमचं पोट भरून निघालो . एक्स्प्रेस वे ला गाडी लागली ... बघतो तर काय गाडीच्या पुढच्या काचेवर एक चांगली बोटभर काळी कुळकुळीत पाल ! "
." ईssssssss याक ..याक ..पा ss ल ??? गाडीच्या काचेवर ? " ललिता शहारून किंचाळलीच . " मला नाही हं आवडत पाल .... "
." मला खूप आवडते ! मी आता पाळणारच आहे पाल ! मग त्यांना पिल्लं झाली की दुकानच घालणार आहे पालींचं . " मी नाक उडवत म्हटलं .
." काहीतरीच काय बोलतेस गं ! मी मुळीच येणार नाही हं , तुझ्या पालींच्या दुकानात ... ! "
." ऐकणार आहेस का तू आता ? "
.हं ...... "
." अगं पाल काचेवर बाहेरून होती . गाडीत नव्हती काही ! पार्क केलेली असताना , चढली असेल कुठून तरी . नाही म्हटलं तरी आम्ही अर्धा तास तरी होतोच ना तिथे ! गाडी रस्त्याला लागली होती . वेग पकडला होता , सुसाट वाऱ्याला तिला तोंड देता येत नव्हतं . तिने काचेवर रोवलेल्या तिच्या छोट्या छोट्या पायांना दिलेला जोर आम्हांला आतून कळत होता . फार वेळ नसता तिने तग धरला .मेलीच असती ती ! चक्रधरला गाडी कडेला थांबवून , तिला एखाद्या काडीने काढून टाकायला सांगितलं ! "
.इतका वेळ ओठ आवळून , अंग आक्रसून बसलेली ललिता एकदम सैलावली . " बरं झालं ग बाई , तिला काढून टाकलंस ते ! मला वाटलं बरोबर घेऊन आलीस की काय ! "
." अग , ऐक तरी ! चक्रधरला साईड मिळतेय तोवर धुमधार पाऊस सुरु झाला . त्याने वायपर सुरु केले आणि अलगद ती पाल , वायपरच्या फटक्याने काचेवरून उडाली . सुटलो एकदाचे . रस्त्यावर पडली असेल आणि गेली असेल कुठेतरी निवाऱ्याला ! "
." बरं झालं बाई ! पण बाजूने जाणाऱ्या एखाद्या गाडीखाली तर सापडली नसेल ना ?? "
." नाही ग .. मुळीच नाही . घरी पोचलो , ब्याग काढायला डिकी उघडतोय तर , कुठेतरी फटीत लपून बसलेली ती पाल सरसरत गाडीच्या टपावर चढली . "
." म्हणजे ??? ती वायपरने ... सोसाट्याच्या वाऱ्या पावसाने उडालीच नव्हती ? "
." नाहीना ! पाहिलंस एवढ्याश्या जीवाची जीवनेच्छा पण किती तीव्र असते ! सुरक्षित जागी बसून आरामात तिने खोपोली पासून ठाण्यापर्यंत प्रवास केला ! "
." तो ही फुकटात ! हुशारच आहे ग ती ! "
." नंतर सुद्धा गाडी सोडत नव्हती ! टपावरून धावत पुन्हा पुढच्या काचेवर उतरली ! मग मात्र चक्रधरने तिला काडीने उडवली "
." मग , गेली कुठे ती ? "
." गेली .. बाजूच्या झाडाझुडपात कुठे तरी ! "
.ललिता थोडावेळ गप्प बसली .मग म्हणाली , " ती पाल ना नक्कीच माझ्या पुण्याची असणार .एवढी धाडसी , महत्वाकांक्षी , चतुर ,निश्चयी पाल पुण्याखेरीज इतर कुठली असूच शकत नाही ..वडाप , ट्रक , बस , टेम्पो ,अशी मजल दरमजल करत ती खोपोलीला पोचली . तुमची MH 04 पाहिल्यावर तिची सोयच झाली ना ! "
. " ती कशी काय ? "
." आता बघ , तुमच्या बिल्डींग मधले बरेच लोक रोज मुंबईला जातात . अशीच एखादी सवारी पकडून ती मुंबईला पोचेल . मग चतुराईने टर्मिनल टू ला पोचेल . एखादं विमान पकडून ती चार महिन्यांच्या आत अमेरिकेला पोचते की नाही बघ ! "
.मी गोंधळून गेले . एखादी पाल एवढा विचार करू शकते ? दूरदृष्टीने योजना करू शकते .... ?
." तू त्या पालीच्या पाठीवर काहीतरी खुण करायला हवी होतीस ... लिपस्टिकने ! " .... माझ्या वटारलेल्या डोळ्यांकडे बघून ती पटकन म्हणाली , " नाहीतर नेल पेंटने ! "
."कां पण ? "
." अग विसा शिवाय अमेरिकेला जाणारा तो पहिलाच जीवंत भारतीय प्राणी ठरला असता ना ! लिम्का बुकात नोंद झाली असती ! ..अं ... तू ना त्या पालीच्या पाठीवर MH 12 लिहायला हवं होतंस . "
." कां ? " मी कपाळाला आठ्या घालून विचारलं .
." हे बघ ती पाल पुण्याहून आली होती ह्याची मला खात्री आहे . एव्हढा बुद्धिमान प्राणी आणखीन कुठे असूच शकत नाही .तू तिच्या पाठीवर MH 12 ची खुण केल्यावर माझ्या पुण्याला श्रेय पण मिळालं असतं ना , लिम्का बुकात नोंद होऊन . "
." ललिता , अग पाऊस थांबलाय बघ . पुढचा ढग कोसळायच्या आत तू न भिजता घरी जा कशी ! "
.ललिताला दोन दिवस सर्दीने चांगलंच पछाडलं होतं . तिला भिजायचं नव्हतंच . ती चटकन घरी जायला उठली .
ती बिल्डींग मधून बाहेर पडल्याची मी खात्री करून घेतली . माझ्या कडे असणारी धुतल्या न जाणाऱ्या रंगाची बाटली आणि ब्रश घेऊन मी खाली उतरले .मी पण एकारांत आहे म्हटलं . म्हणजे आडनावाने नाही , पण गावाच्या नावाने आहे . लालिताचे पुणे तर माझे ठाणे ! आता गुगलिंग करून त्या पालीला शोधून काढेन .
.गाडी माझी , डीझेल माझं , गाव माझं , बिल्डींग माझी ... म्हणजे ती पाल पण माझीच ना ! लिम्का मधे नाव जाणारच तर MH 12 का ??? मी काढेन तिला शोधून आणि लिहीन तिच्या पाठीवर MH 04 .. !! #सुरेखा_मोंडकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा