#भास_आभास_भाग २
.
.
. . श्री तर सारखा घाईतच असायचा . अमेरिकेला शिक्षणासाठी
जायचं म्हणजे पूर्वतयारी पण खूप होतीच , पण सारखे काही ना काही
कार्यक्रम पण असायचे .. कधी कौटुंबिक , कधी मित्रपरिवाराबरोबर . एकदा
त्याच्या सर्व मित्रांना घरी जेवायला बोलवायचं ठरवलं . मला एकदम
आठवण झाली , " ए सलोनीला पण बोलाव हं ! "
.
." कोण सोनाली ? '
.
. " सोनाली नाही रे , सलोनी ! स -लो - नी .. ! "
.
." अशी कोणी माझी मैत्रीण नाहीये ! "
.
." अरे , नाही कशी ? ती आणि तिची आई आपल्या घरी पण आल्या होत्या . ती तुझ्याच बरोबर शिकत होती ."
.
." सलोनी ? नाही , आठवत नाही ! माझ्याबरोबर शिकत होती का ? कधी ?
शाळेत ? कॉलेजात ? की जुनिअर कॉलेजमध्ये ? मला कशी आठवत नाही ? "
.
.अरेच्या ! हे तर मला पण माहीत नव्हतं . आता पुन्हा भेटल्या की
नक्की विचारायचं . पण हल्ली माझं पण वेळापत्रक बदललं होतं .
टेकडीवरच्या फेऱ्या कमी झाल्या होत्या . श्री ची तयारी , खरेदी , ब्यागा
, त्यांची मापं , वजनं , त्याच्यासाठी करायचे आवडीचे पदार्थ आणि
सर्वात महत्वाचं म्हणजे , त्याचा जास्तीत जास्त सहवास लुटण . मी
त्यातच गुंतून गेले होते . दिवस भराभर सरकत होते . सलोनी आणि तिची आई
, दोघीही विस्मरणाच्या कप्प्यात गेल्या होत्या .
.
.
. एक दिवस दुपारी दोघी घरी आल्या . नेमका श्री घरी नव्हता .
एकदा त्यांना भेटला असता म्हणजे बरं झालं असतं . चेहरा बघून
कदाचित त्यालाही ती आठवली असती . त्यांचं चहापाणी करता करतानाच मी
विचारलं , " सलोनी कधी होती श्रीच्या बरोबर शिकायला ? शाळेत होती
का ? एका वर्गात होते ? "
.
. . सलोनीची आई भडाभडा
बोलतच गेली . माझ्या डोळ्यासमोर भर दिवसा काजवे चमकायला लागले .
ती जे सांगत होती ते धक्कादायक होतं . सलोनी श्री बरोबर जुनिअर
कॉलेज मध्ये होती . श्री सायन्सला आणि ती कॉमर्सला ! तेव्हां म्हणे
श्रीने तिला लग्नाचं वचन दिलं होतं . नंतर तो आय . आय .टी. ला गेला .
होस्टेलमध्ये राहायला लागला . त्यांची भेट होईना . सलोनी सैरभैर झाली
. तिच्या अभ्यासावर परिणाम झाला . बारावीला ती नापास झाली . पुन्हा
दोनदा परीक्षेला बसली , पण पुन्हा तिला अपयश आलं . सध्या ती
कॉम्प्यूटर कोर्स करतेय . सलोनीची आई कळवळून सांगत होती , " सलोनी
खरंच खूप हुशार आहे . प्रेमभंगामुळे तिच्या अभ्यासावर परिणाम झाला .
खूप प्रेम आहे तिचं श्री वर . त्यांचं दोघांचं लग्न होऊदे . मी वचन
देते तुम्हांला , ती त्याच्या तोडीस तोड शिकेल . त्याच्या सारखीच
इंजिनिअर होईल . त्याला अभिमान वाटेल असं शिक्षण घेईल . " त्या रडत
होत्या .
.
. . श्रीने तिला फसवलं होतं . तिचा
विश्वासघात केला होता . तिच्या बरबादीला तो कारण होता . मी हादरून
गेले होते . एकदा वाटलं , ह्या बाईच्या झिंज्या उपटाव्यात . एकदा
वाटलं श्रीला कानफटावं . एका निष्पाप मुलीच्या आयुष्याचं असं मातेरं
करायचा त्याला काय अधिकार ? श्री जाणार म्हणून आई आलेली होती .
आमचा आवाज ऐकून ती हॉलमध्ये आली . माझा हात धरून , माझ्या शेजारी
बसली . केवळ तिच्या आधाराने मी खूप प्रयत्नाने स्वतःवर काबू
मिळवला . " बोलते श्री बरोबर ! " एवढं कसं बसं बोलून मी आतल्या घरात
गेले . त्या कधी गेल्या , आई बरोबर काय बोलल्या , काही माहीत नाही .
डोकं ठणकत होतं, डोळ्यातून पाणी येत होतं, हातापायांना कंप सुटला
होता . एका क्षणाला खाडकन जाणवलं , हे सर्व बोलणं चाललेलं असताना
सलोनी हातांची बोटं एकमेकांत गुंफून शांतपणे बसली होती . पापण्या
खाली झुकवून . जणू काही हे सर्व बोलणं दुसऱ्याच कोणाबद्दल तरी चाललं
होतं .
.
. . थोड्या वेळाने आई थंडगार सरबत घेऊन
आली . शेजारी बसली . पाठीवर हात ठेवला आणि माझा बांध फुटला . उरी
फुटून , हंबरडा फोडून मी ढसाढसा रडायला लागले . एकही शब्द न बोलता
आई मला कुशीत घेऊन बसली होती . थोड्या वेळाने माझी मीच शांत झाले
.. आईने माझ्या हातात सरबताचा ग्लास दिला आणि हळूच म्हणाली , " ती
मुलगी कॉमर्सला होती ना , मग इंजिनिअर कशी होणार ? शिवाय जर ते दोघे
बरोबरीचे असतील तर ती जेव्हां पहिल्यांदा बारावी नापास झाली
तेव्हां श्री कुठे आय . आय. टी . ला गेला होता ? तो पण बारावीलाच
होता ना ? सध्या तरी शिक्षण अकरावी पास इतकंच आहे , आणि वय श्री
इतकंच ........ जर त्या सर्व खरं सांगत असतील तर हं ! मग .... हे
सगळं .... '
.
. . मी डोळे पुसत आईकडे पाहिलं . तिचा
चेहरा आश्वासक होता . मी प्रथमच विचार करायला सुरुवात केली .
सलोनीच्या आईशी ओळख झाल्यापासून एक एक प्रसंग पडताळून पाहायला लागले
. आई पुन्हा माझा अंदाज घेत , माझ्या चेहऱ्यावरचे भाव निरखत
म्हणाली , " अगं , चांगल्या घरचा , शिकला सवरलेला , अमेरिकेला जाणारा ,
एकुलता एक मुलगा म्हणजे ...'
.
. . आईची ही सवयच
होती . ती शक्यतो संघर्ष , वादविवाद टाळायची . आपली मत ठामपणे न
सांगता अशी नेमक्या शब्दाला , वाक्य पूर्ण न करता सोडून द्यायची .
तुम्ही तुमच्या पद्धतीने विचार करा .तिने फक्त एक दिशा दाखवली आहे
एवढंच ! " हे बघ , आल्या आल्या त्याला फैलावर नको घेऊस . आधी
तुम्ही दोघे मिळून विचार करा . एखादा दिवस गेला मधे तरी हरकत
नाही . " हे मात्र तिने ठामपणे सांगितलं .
.
. . .
रात्री जेवणं झाल्यावर ह्यांना सर्व सांगितलं . कोणतीही प्रतिक्रिया
व्यक्त न करता , दोघांनीही आपापल्या पध्दतीने पूर्ण विचार करायचा
हे आधीच ठरलं होतं . त्यामुळे क्रोध , हताशपणा , निराशा असं काही
निदान व्यक्त तरी नाही झालं . दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रयासाने मी संयम
बाळगून होते . पण श्रीच्या लक्षात आला होता माझ्यातला बदल . इतका
व्यग्र असूनही म्हणाला , " बरं नाहिए का ? ए आईय , मी परत येणार आहे
." त्याही स्थितीत मला हसू आलं . अमेरिकेतल्या अलीबाबाच्या गुहेत
जाणाऱ्या बहुतेक प्रत्येक मुलाचं हे वाक्य आणि त्यावर विश्वास
ठेवल्यासारखं दाखवणारे माझ्यासारखे पालक ! पण मी हसल्यामुळे श्री
मात्र खूश झाला .
.
. . रात्री जेवणं झाल्यावर मीच विषय काढला . " श्री , ती सलोनी .....'
.
. " झालं का पुन्हा तुझं सोनालीपुराण सुरु ? "
.
. " सोनाली नाही . सलोनी ! " बहुतेक नकळत माझा आवाज चढला असावा . सर्वानीच माझ्याकडे चमकून पाहिलं .
.
. . श्री हाताने मला शांत होण्याची खूण करत म्हणाला , " अग ,
हो . हो ! चिडतेस काय एकदम . सोनाली काय आणि सलोनी काय ! बरं ! काय
झालं त्या सोना ..... सॉरी ... सलोनीचं ? "
.
. . आता सूत्र ह्यांनी हातात घेतली . त्यांनी सरळ विचारलं , " श्री तू तिला लग्नाचं वचन दिलं होतंस ?"
.
. " मी ? " तो फ्रीजमधून काढत असलेला आईस्क्रीमचा डबा त्याच्या
हातातून निसटतच होता . त्याने कसाबसा तो सांभाळला .
.
. मी सांगत असलेलं सर्व त्याने शांतपणे ऐकलं . उठला . म्हणाला ," चला आपण तिच्या घरी जाऊ ! "
.
. " आत्ता ? अरे नऊ वाजून गेलेत . झोपले असतील "
. " झोपले असतील तर उठवूया . आपली झोप उडवायची नसेल तर
त्यांना जागं करायलाच हवं . आत्ताच ! तुम्ही येणार आहात का ?
नाहीतर मी एकटा जातो . "
#सुरेखामोंडकर . ०४/०३/२०१७
*क्रमशः