रविवार, ५ मार्च, २०१७

भास आभास ( भाग १ )

. #भास_आभास ( भाग १ )
. . सकाळच्या कोवळ्या उन्हात , अंगणातल्या झोपाळ्यावर मी पेपर वाचत बसले होते . खूप दिवसांनी अचानक आलेल्या ह्या गारव्यात उबदार उन्ह सुखद वाटत होतं पेपरवर कुणाचीतरी सावली पडली म्हणून दचकून वरती पाहिलं. रोज सकाळी फिरायला जाताना हमखास भेटणाऱ्या बाई आणि त्यांची मुलगी उभ्या होत्या . मी थक्कच झाले . नेहमी भेट होत असल्यानं एकमेकींकडे बघून हसणं - कधी दूरवर असलोतर हात करणं , एखाद्यावेळी भेट नाही झाली तर , " दिसला नाहीत बऱ्याच दिवसांत ! " असं एखादं वाक्य टाकणं , एवढीच ओळख होती आमची . पण तेवढ्या ओळखीवर त्या अशा अगदी घरी येऊन उभ्या राहतील असं वाटलं नव्हतं ..
.
. " अरे ! तुम्ही ? " मी गडबडूनच गेले होते . '
.
." हो ! आज आला नाहीत तुम्ही टेकडीवर ! दोन दिवस सर्दी पण झाली होती ना तुम्हांला ! बरं नाहिए की काय ? आम्ही ह्याच रस्त्याने जात होतो . तुम्हांला बाहेर बसलेलं पाहिलं ; म्हटलं , हालहवाल विचारून जाऊया . तब्येत ठीक आहे ना ? "
.
. " हो , हो ! एकदम छान . सकाळी जरा जास्तच गारवा होता ना , सर्दी वाढायला नको म्हणून नाही आले आज चालायला . आता संध्याकाळी जाईन , " मनात आलंच , ह्यांच्या कसं लक्षात आलं मला सर्दी झालीय ते ! सूक्ष्म निरीक्षण दिसतंय . पण आता मी स्थिरस्थावर झाले होते . अजून त्या उभ्याच आहेत हे माझ्या लक्षात आलं . " बसा ना ! " मी झोपाळ्यावर जरा सरकून त्यांना बसायला जागा करून दिली .इतका वेळ शांतपणे बाजूला उभ्या असलेल्या त्यांच्या मुलीला पण म्हटलं , " बस गं! उभी का तू ? " एक छोटंसं स्मितहास्य पण न देता , आंब्याच्या झाडाखाली मुद्दामहून ठेवलेल्या एका मोठ्या दगडावर जाऊन ती बसली .
.
. . बसायला तर सांगितलं , पण संभाषण पुढे कसं न्यायचं तेच माझ्या लक्षात येईना . रोज भेटत होतो खरं , पण मला त्यांचं नाव देखील माहीत नव्हतं . जवळच असलेल्या टेकडीवर सकाळी खूप जण व्यायामाच्या निमित्ताने फिरायला येतात . नियमित येणार्यांची एकमेकांशी तोंडओळख होतेच . मग त्यातूनच स्मितहास्याची ; सुप्रभात ; हरि ओम ; जय मातादी ! अशा निरनिराळ्या शुभेच्छाची देवाणघेवाण होते . पण तेवढंच . थांबून एकमेकांशी गप्पा मारायला कोणालाच वेळ नसतो . त्यामुळे नावबिव समजायची शक्यता तशी कमीच असते .. आता काय करावं ह्या विचारात मी असतानाच त्या म्हणाल्या , " श्री च्या आई , बाग छान आहे हं तुमची . हा झोपाळा , दगडांच्या केलेल्या बैठका , ह्या मुळे कसं अगदी गावच्यासारखं वातावरण वाटतं . "
.
. . . मी दचकलेच . म्हणजे ह्या बाई मला ओळखताहेत . ते पण ' श्री ची आई 'म्हणून . म्हणजे आम्ही खूप जवळच्या परिचित आहोत की काय ? मग मला कशा ह्या आठवत नाहीत ? मी मनातल्या मनात डोक्यावर चार टपल्या मारून नाव आठवायचा प्रयत्न केला . पण छे ! मेंदू पूर्णपणे कोरा ! जरा देखील आठवेना ,
.
. . अशा वेळेला खूप पंचाईत होते . समोरची व्यक्ती इतकी जवळीक दाखवत असताना आपल्याला तिचं नाव पण आठवत नाहीए , हे व्यक्त करताना आपल्याला थोडं अपराधी वाटतं . त्यांच्या स्नेहाचा अपमान केल्यासारखंही वाटतं . कसं चलाखीनं ह्यांचं नाव जाणून घ्यावं ह्या विचारात मी असतानाच त्या पुढे म्हणाल्या " सलोनी , अगं पाहिलंस का . ह्यांच्याकडे लाजाळूची झाडं पण आहेत हं ! अगं , त्यांना नुसता स्पर्श जरी झाला ना , तरी त्यांची पानं मिटून जातात . जा ना बघ हात लावून ! "
.
. .ही सलोनी काय ! वा ! सुंदर ! छान नाव आहे . तिला शोभेल असंच . माझा प्रश्न सुटला . मी ' श्री ची आई ' तर ह्या ' सलोनीच्या आई .' माझ्या मनातला ताण गेला . सलोनी लाजाळूच्या मिटल्यापानासारखा चेहरा ठेवून उठली . शांतपणे लाजाळूच्या रोपांना हात लावून आली . जणू काही नेमून दिल्याप्रमाणे पुन्हा आपल्या जागेवर येऊन बसली . ती त्या निसर्गाच्या सान्निध्यात असूनसुद्धा त्यात नसल्यासारखी वाटत होती . माझ्या लक्षात आलं , तिला आवडलं नसणार आईचं असं आगंतुकासारखं माझ्याकडे येणं . मनाविरुद्ध अगदी नाईलाजाने तिला यावं लागलं असणार . आता बाहेर पडल्यावर ही चांगली झापणार आहे आईला . श्री पण असाच करतो . काही मनाविरुद्ध करावं लागलं तर चार जणांसमोर आमचा मान ठेवतो , पण मग मात्र चांगलंच कीर्तन करतो . तिला थोडंसं मोकळं वाटावं म्हणून मीच म्हटलं , " सलोनी , एखादं फूल आवडलं असेल तर सांग , मी देते तुला तोडून ." तशाच शांत चेहऱ्याने एखाद्या बाहुलीसारखी ती फुलझाडांकडे गेली . राग कमी झालेला दिसत नव्हता .
.
. . सलोनीची आई मात्र सहजपणे सगळीकडे बघत होती . " तुमचं घर पण छान आहे . आतून तर खूपच छान असणार ". त्यांची इच्छा माझ्या लक्षात आली . मी सवयीने लवकर उठते , पण माझं घर मात्र अजून झोपलेलंच होतं . बाई पण अजून आल्या नव्हत्या . पारोशा घरात एवढ्या अल्पपरिचयावर कोणाला ते दाखविण्यासाठी आत नेण्याची माझी इच्छा नव्हती . मी हसून उत्तर द्यायचं टाळलं .
.
. अजूनही मला संभाषण वाढवता येत नव्हतं . माझी अस्वस्थता कदाचित त्यांच्या देखील लक्षात आली असेल . " अग बाई ; उशीरच झाला . बोलता बोलता वेळ कसा गेला कळलंच नाही . ' " मनगटी घड्याळाकडे बघत त्या म्हणाल्या . " सलोनी , चला निघूया ! " आज्ञाधारकपणे ती आईबरोबर निघाली . तिने माझ्याकडे एकही फूल मागितलं नाही , आणि मी देखील स्वतःहून दिलं नाही .
.
. . गेटपाशी जाऊन त्या थोड्या घुटमळल्या . वळून म्हणाल्या ," श्री नाहीए का घरात ? "
.
. " आहे , पण अजून उठला नाही ! "
.
. " आलोच आहोत तर त्याला भेटून गेलो असतो . सलोनीचा मित्र आहे ना तो . अमेरिकेला चाललाय ना ? परत कधी भेटेल कोण जाणे ! "
.
." अहो भेटेल की . जायला अजून खूप अवकाश आहे . सलोनी त्याच्या वर्गात होती का ? "
.
.' "हो ना ! बरोबरच शिकले दोघे . खूप दोस्ती बरं का दोघांची ! "
.
.त्या सलोनी , श्री आणि त्यांचा मित्रपरिवार ह्याबद्दल बरंच काही सांगत होत्या . सलोनी गप्पच होती . मला त्यातलं काहीच माहीत नव्हतं . जरा आश्चर्यच वाटलं . श्रीने मला कधीच कसं काही सांगितलं नाही ? खरं म्हणजे त्याचे सर्व मित्र , मैत्रिणी नेहमी आमच्या घरी येत .त्यांच्या कुटुंबाशी पण आमचे घरोब्याचे संबंध तयार झाले होते . आमच्या घराची गच्ची मोठी असल्यामुळे कोजागिरी , गाण्याचे कार्यक्रम , एखाद्याचे नाट्य वाचन , नाहीतर नुसताच धांगडधिंगा करायला अड्डा आमच्याचकडे असायचा . पण त्यात सलोनीला पाहिल्याचं मला आठवत नव्हतं .आणि सलोनीसारख्या देखण्या मुलीकडे दुर्लक्ष होणं शक्यच नव्हतं. एखाद्या मॉडेल सारखी उंची , डौलदार बांधा . लांब , घनदाट केस . सावळी तजेलदार कांती आणि सौम्य शांत चेहरा . खूप आवडली होती मला ती .#सुरेखामोंडकर ०४/०३/२०१७
*क्रमशः
LikeShow more reactions

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा