रविवार, ५ मार्च, २०१७

पंख होते तो ......... ( भाग २ , अंतिम ) लघुकथा समाप्त

... . पंख होते तो ..........! ( भाग २ )
.
.
. . तिने सुगृहिणी प्रमाणे मग , नीट धुऊन पुन्हा ट्रे मध्ये ठेवला . ब्याग उघडून त्यातले झोपताना घालायचे कपडे बाहेर काढले . " मी आलेच रे ! " कॉफी पिता पिता मी मुंडी हालवली .ती बाथरूम मध्ये गेली .
.
. . किती साधी , सरळ , निष्कपट आहे ही ! व्यवसायानिमित्ताने माझं जग फिरून झालं . कधीच बरोबर येण्याचा हट्ट केलान नाही . मी पण कसा कधीच तिला आग्रह केला नाही ? आत्ता सुद्धा , " लांब कशाला जायचं ? तुझा वेळ फुकट जाईल ! इथेच कुठेतरी इगतपुरी , लोणावळा , महाबळेश्वर, असं जाऊया ना ! कशाला इतके कामाचे दिवस वाया घालवायचे ? " अशी माझीच समजून घालत होती . किती अल्पसंतुष्ट आहे . हिच्या आर्थिक गरजा काहीच नाहीत . आज तिचा नवरा अशा स्थानावर आहे की ती जगभर बिझनेस क्लासने फिरू शकते , उंची वस्त्रं , सॉलीटेअर वापरू शकते . पण पाय जमिनीवर घट्ट रोवून ती तळागाळातील लोकांसाठी , समाजकार्य करतेय ! तेच आयुष्याचं उद्दिष्ट ठरवलंन आहे . आजवर खूप अन्याय केलाय मी तिच्यावर ! आता सनी अमेरिकेला शिकायला गेलाय . त्याच्या पदवीदान समारंभाला जाऊ , तेव्हां महिन्याभराची ट्रीप करूया ! अमेरिका फिरुया . जाताना येताना ब्रेक जर्नी करून युके , युरोप कुठेतरी फिरून येऊया . मी मनाशी पक्कं केलं !
.
. . ती बाथरूममध्ये गेल्याची खात्री झाल्यावर मी पटकन उठून माझी ब्याग उघडली . आजच्या साठी , तिच्यासाठी खास खरेदी केलेला , पीच कलरचा , सळसळता , मृदू मुलायम नाईट गाऊन बाहेर काढून ठेवला . समोर पाहिलं तर माझ्यापण आत्ताच लक्षात आलं ; बाथरूमची बेडरूम कडील विभाजक भिंत पूर्ण काचेची होती . त्याला नक्षीदार पडदा होता . पण ते तिच्या देखील लक्ष्यात आलेलं नव्हतं . तिने पडदा सारला नव्हता . मी अनिमिषपणे तिच्या सहज , डौलदार हालचाली बघत होतो . टब मध्ये तिने नळ सोडून ठेवले होते . बाजूच्या छोट्या कप्यात ठेवलेल्या तऱ्हेतऱ्हेच्या रंगीबेरंगी कुप्या ती न्याहाळून बघत होती . डोळे बारीक करून , त्यावर लिहीलेलं वाचायचा प्रयत्न करीत होती .ती चष्मा बाहेर केटलच्या जवळ विसरली होती . चष्मा घेण्यासाठी तिने बाथरूमचं दार उघडलं आणि मी चपळाई करून , अलगद तिला मिठीत गोळा केलं . तिने सुटकेची थोडी धडपड केली , लटकी नापसंती दाखवली . पण तिच्या दळदार ओठांवर ओठ रोवून मी तिला गप्प केलं , तिचा विरोध मोडून काढला . तिच्या बरोबरच मी पाण्याने भरलेल्या टब मध्ये शिरलो . तिने वरची लेबलं न वाचताच , भराभर एकूण एक कुप्या टब मध्ये रिकाम्या करून टाकल्या , पाण्यात खळखळून हा थोरला फेस करून टाकलान ; त्या फेसाखाली स्वतःला झाकून टाकलंन . त्या शुभ्र धवल फेसात ती अलवार पणे हळूहळू माझ्या मिठीत विरघळत गेली .
.
. . अंगाला अलगद लपेटून बसलेल्या गाऊन मध्ये ती ताज्या टवटवीत फुलांच्या छडी सारखी दिसत होती .रूमवर मागवलेली , चांदीचा मुलामा असलेल्या छोट्या बादलीतली श्यांपेन घेताना आधी तिने खूप आढेवेढे घेतलेन , नाराजी दाखवलीन ," ए , मी कधी दारू पिते का ? " .." श्यांपेन म्हणजे दारू नसते ! " असे थोडे सौम्य संवाद झाले . पण तिचा विरोधही तीव्र नव्हता . हळूहळू श्यांपेन संपत गेली . रात्र फुलत गेली . स्पर्श बहरत गेले . शरीर रोमांचानी शहारत गेलं . सुखाची मखमल पसरत गेली . आजपर्यंत आम्ही फक्त एकत्र आयुष्य जगत होतो , आता एकरूप झालो होतो . ध्येयाच्या मागे बेफाम धावताना मी किती किती ..काय काय गमावलं होतं , ते मला आता कळत होतं . अजुनही फार उशीर झाला नव्हता . उरलेल्या आयुष्यात सर्व भरपाई करायची ! आता तिच्या बरोबर , तिच्या साठी , तिच्या जगात जगायचं ! उरलेल्या आयुष्यात तिला खूप खूप सुख द्यायचं ! मी अनावर झालो होतो .
.
. . रात्र गहिरी होत गेली . उत्तर रात्री कधीतरी मला जाग आली . माझ्या कुशीत ती गाढ झोपली होती , अत्यंत विश्वासाने ! तिच्या बद्दल अपार माया माझ्या मनात दाटून आली . मी तळहातावर हनुवटी तोलत तिच्या श्रांत चेहऱ्याकडे एकटक बघत होतो . न राहवून मी हलकेच वाकलो ; तिच्या गालावर अलगद ओठ टेकले . तेवढ्याही स्पर्शाने ती थरारली . तिच्या गालावरच्या खळीतील अमृत टिपायला मी जिभेने स्पर्श केला . हुंकार देत , तिने हात उभारले , माझ्या मानेभोवती टाकले आणि अतीव तृप्तपणे म्हणाली ......." विश्वनाथ .... ! "
.
. . मी चरकलो . माझं संपूर्ण शरीर लाकडासारखं ताठरलं होतं . दगडासारखं निष्ठूर , निश्चल झालं होतं . माझा माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता . प्रयासाने , सर्व बळ एकवटून मी आणखीन वाकलो ; तिच्या ओठांजवळ कान नेला .. ती पुटपुटत होती , " विश्वनाथ ... विशू .. विशू !! "
.
. . तिचे ओठ आंधळ्यासारखे माझ्या चेहऱ्यावर , मानेवर , इथून , तिथून फिरत होते . तृप्ती , समाधान तिच्या अंगोपांगी ओथंबलं होतं . श्यांपेनच्या नशेने तिला बंधमुक्त केलं होतं .... आणि मी .... अनेक शंका कुशंकांच्या कोळिष्टकात अडकलो होतो . कोण होता हा विश्वनाथ ? तिचा लग्ना आधीचा प्रियकर ? .. अधुरी राहिलेली , पण हृदयात रुजलेली प्रेम कहाणी ? .. की आताच्या समाजकार्यातला कोणी सहकारी ? म्हणजे ते , " पंख होते तो उड आती रे " हे गाणं चुकून नव्हतं सुचलेलं ? मनाच्या तळाची वेदना व्यक्त करण्यासाठी होतं ?
.
. . मी हळूहळू तिच्या अंगाखालचा माझा हात सोडवून घेतला . निर्जीवपणे खिडकीपाशी येऊन , खाली पेटून उठलेल्या निखार्यांसारख्या हॉंगकॉंग वर विमनस्कपणे सिगरेटचा धूर सोडीत राहिलो . ती तशीच , मदिर धुंदीत , हसऱ्या , प्रसन्न चेहऱ्याने ; एकाच खोलीत पण कोसों दूर गाढ झोपली होती . #सुरेखामोंडकर २८/०२/२०१७
समाप्त !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा