#बाप्पाचा_गणपती_(भाग २ )
.
.
. . बाप्पाच्या आजोबांची थेट खाडीपर्यंत पोचलेली भलीमोठी जमीन होती .आजोबांचा उदार , सर्वांना मदत करण्याचा स्वभाव आणि बदलत्या काळाचा न आलेला अंदाज ; ह्यामुळे त्या जमिनीवर त्यांच्या अनेक नातेवाईकांची , सोयर्याधायऱ्यांची , मित्र परिवाराची घरं झाली ; आणि ती ती जमीन , त्या त्या घरमालकाच्या घशात गेली . बाप्पाचे बाबा माळकरी ; व्यवहार त्यांच्याही ध्यानात आला नाही आणि आता त्यांच्या कुटुंबाकडे ते राहात असलेली एक लांबलचक चाळ आणि त्याच्यापुढचं आटोपशीर अंगण एवढंच राहिलं .
.
. . आजोबां पासून त्यांचा गणपतीचा कारखाना होता . भल्यामोठ्या बंदिस्त जागेत जवळ जवळ वर्षभर , नावाला काही महिन्यांची विश्रांती घेऊन कारखाना सुरूच असायचा . भाद्रपदात , गणेश चतुर्थीला सगळा कारखाना रिकामा व्हायचा . पण पूर्ण रिकामा नाही . भयाण , एकाकी वाटू नये म्हणून आजोबा पाच न रंगवलेल्या मूर्ती , निरनिराळ्या घडवंचीवर विखरून ठेवायचे . त्यांच्या घरच्या गणपतीला सोबत म्हणून , सवंगडी म्हणून ! अनंत चतुर्दशीला विसर्जन झाल्यावर कारखाना काही काळ शांत व्हायचा . मग पुन्हा माघी गणपतीचं काम सुरु व्हायचं . हे थोडंच असायचं . ते संपतंय तोवर पुन्हा भाद्रपदातील गणपती !
.
. . आजोबांचा हात कलाकाराचा होता . सगळं नाजूक , कौशल्याचं काम ते स्वतः करायचे . गणपतीचे डोळे ते असे काही रंगवायचे की कोणत्याही कोनातून पाहिलं तरी तो आपल्याकडेच पाहतोय असं वाटायचं . त्याच्या नजरेतील प्रेम , माया , ममता , कृपा , दिलासा , कणव , सर्व भाव वंदन करणाऱ्याच्या हृदया पर्यंत पोचायचे .
.
. . छोटा असल्यापासून बाप्पा आजोबांच्या हाताखाली कारखान्यात लुडबुड करायचा . जमेल ते , झेपेल ते काम करायचा . ओल्या मातीत लडबडायचा , रंगांनी बरबटायचा . बाबापण नोकरीवरून आल्यावर कारखान्यातच घुसायचे . हळू हळू मोठ्या , अवाढव्य मूर्ती बनवण्याचं वेड समाजात आलं . मूर्तिकारांची त्या शर्यतीत दमछाक व्हायला लागली . त्यासाठी लागणारी मोठी , बंदिस्त , सुरक्षित जागा ; त्यात गुंतवायला लागणारा पैसा ! छोट्या व्यावसायिकांची ससेहोलपट व्हायला लागली . जे तगले ते तगले , बाकीच्यांच्या नाकातोंडात पाणी गेलं .
.
. . स्वतःची हक्काची जागा अतिक्रमणाने गिळंकृत केली होती . ह्याच्या त्याच्या हातापाया पडून , दरवर्षी कुठेना कुठे भाड्याने जागा मिळायची .पण स्थैर्य नव्हतं . डोक्यावर टांगती तलवार होती . पैसा अडकवायचा म्हणजे धास्ती वाटायची .; मूर्ती ठेवायला , रंगवायला पुरेशी जागा मिळेल की नाही !गणपती उत्सवात सार्वजनिक गणपतींच्या स्पर्धा असायच्या . त्यांनी पण मोठ्या मूर्ती बनवल्या . पहिली घाबरत घाबरत आठ फुटी , दुसऱ्या वर्षी थोड्या आत्मविश्वासाने दहा फुटी , त्याच्या पुढल्या वर्षी आणखीन हुरूप येऊन बारा फुटी . दोन रौप्य आणि एक सुवर्ण पदक त्यांना मिळालं . तेव्हां आजोबा नव्हते . त्यांनी याची देही , याची डोळा हा सोहळा पाहिला असता , तर ते धन्य धन्य झाले असते .गणपतीचे वत्सल , भावदर्शी डोळे रंगवायचं कौशल्य बाप्पाच्या बोटात आलं नव्हतं . आजोबा रंगकाम करायचे तेव्हां तो खूप छोटा होता . पण त्याच्या चुलत भावाच्या , मन्याच्या बोटात मात्र ती जादू आली होती . डोळे रंगवायचं काम तोच इमाने इतबारे करायचा ! लोक साधारण किती अंतरावरून बघतील ह्याचा अंदाज घेऊन तो आपल्या कुंचल्याने मूर्ती मनोहारी करायचा , जीवंत करायचा #सुरेखामोंडकर ९/३/२०१७
*क्रमशः .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा