रविवार, ५ मार्च, २०१७

भास आभास ( भाग ४ )

#भास_आभास_भाग४
.
.
. . श्री अमेरिकेला गेल्यावर घर एकदम रिकामं झालं . थोडे दिवस खूप उदास , बेचैन वाटत राहिलं . पण त्याचा कॉम्प्यूटर घरात होता , आधुनिक काळातल्या जलद संपर्काच्या सर्व गोष्टी मी हळू हळू शिकले . सगळं जगच जवळ आलं . श्री खूप दूर आहे असं वाटेनासं झालं . काही काळ रेंगाळलेलं आयुष्य पुन्हा धावायला लागलं . आता मी सकाळी टेकडीवर जायचं बंद केलं होतं . लांब पडलं तरी चालायला उद्यानात जात होते .
.
. . एकदा बाजारातून घरी येत होते , तर ह्या दोघी फाटकाशी उभ्या . माझीच वाट पहात होत्या . खरं सांगते , मला एकदम भीतीच वाटली .आता काय आणखीन ? वळून जाणंही शक्य नव्हतं . त्यांनी मला येताना पाहिलं होतं . घरात कोणीच नव्हतं . आईपण तिच्या घरी गेली होती . मी सगळं बळ एकवटून पुढे आले .फाटक उघडलं . माझ्या पाठोपाठ त्या दोघी आत आल्या . मी घराच्या पायरीवरच पिशव्या ठेवल्या . सलोनीच्या आईकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं .
.
. . त्यांच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वहात होते . दाटलेल्या आवाजात म्हणाल्या , " का ? का , छळतोय हा आम्हांला असा ? "
.
." कोण ? "
..
." तुमचा मुलगा . तुम्ही सांगितलंत ते सर्व आम्ही मान्य केलं ना ? त्यानंतर एकदाही सलोनी श्रीला भेटली नाही . आता तर तो अमेरिकेला गेलाय . तिकडे मजा करत असणार . जगू दे की आम्हांला पण शांतपणे . किती छळणार ? अजून किती छळणार ? "
.
." काय झालं काय ? " मी घाबरूनच गेले .
.
." हा पोरगा सलोनीला रोज ईमेल करतोय . प्रेमाने ओथंबलेल्या . आणाभाका घेतोय . माफी मागतोय . पण मी तुम्हांला साफ सांगते , माझी मुलगी काही रस्त्यावर नाही पडलेली . इतका अपमान झाल्यावर ती त्याच्याकडे पुन्हा ढुंकूनही नाही पाहणार . असे हजार श्री तिच्या पायावर लोळण घेतील असं रूप आहे तिचं . "
.
. . ह्या वेळेला मला त्यांचा राग नाही आला .एकही हिंस्र विचार मनात नाही आला . मी जरा सावध झाले होते . " हो सलोनी ,? श्री तुला ईमेल करतो ? "
.
. तिने नेहमीप्रमाणे नजर नसलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहिलं . नेहमीप्रमाणेच काही बोलली नाही . मला तिची खूप खूप कणव आली . मी पुढे काही बोलणार इतक्यात तिची आई गरजली , " तिला कशाला विचारता , मी सांगतेय ना ? "
.
. " तुम्ही पाहिली ती ईमेल ? "
.
." पाहिल्याशिवाय सांगतेय का? "
.
." वाचली होती ? "
.
.आता त्या गडबडल्या . प्रामाणिकपणे म्हणाल्या ," मी चष्मा नव्हता लावला ."
.
." पण तुम्हांला वाटलं नाही का , की चष्मा लावून एकदा त्या ईमेल्स वाचाव्यात ? " आता त्या सावरल्या होत्या . " अहो मेल वाचून ही इतकी रडते , कासावीस होते . तिला सावरणार की मेल्स वाचणार ? "
.
."बरं , एका इमेलचा प्रिंट आउट आणून द्या . "
.
." आमच्या कडे प्रिंटर नाही " त्यांनी खालच्या स्वरात सांगितलं .
.
." ठीक आहे . निवडक ईमेल्स मला फॉरवर्ड करा ." मला माझा ईमेल आय डी त्यांना द्यायचा नव्हता , पण नाईलाजाने द्यावा लागला .
.
" त्यापेक्षा तुम्ही तुमच्या मुलाला चांगली समज द्या ना . म्हणावं , झालं ना तुझ्या मनासारखं , मग आता माझ्या मुलीच्या वाटेला जायचं नाही . ती तुझ्यापेक्षा हुशार मुलाशी लग्न करून , तुझ्या नाकावर टिच्चून येईल की नाही बघ अमेरिकेला . "
.
. " सगळं सांगते त्याला . आधी त्या मेल्स मी स्वतः वाचेन . फॉरवर्ड करा मला .".
.
.त्या पुन्हा आल्याच नाहीत . ईमेल्स पण फॉरवर्ड केल्या नाहीत .#सुरेखामोंडकर
०५/०३/२०१७ ....... * क्रमशः

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा