सोमवार, २८ ऑगस्ट, २०१७

कवितेचा जन्म (२)

कवितेचा  जन्म  ( २ )
.
.
#साहित्याचे , गद्य आणि पद्य असे दोन विभाग केले तर त्यातील पद्य विभाग अधिक समृद्ध आहे . अगदी लहानपणापासून आपला संबंध काव्याशी , लय , तालाशी येतो . बाळाला पाळण्यात ठेवताना ' कुणी गोविंद घ्या .. कुणी गोपाल घ्या .. कुणी माधव घ्या ...' अशी नावं लयीत घेतली जातात . ( मुलीला पाळण्यात घालताना पण असंच म्हटलं जातं का ? की " कुणी लक्ष्मी घ्या .. कुणी सरस्वती घ्या ... " असा काही बदल करतात ? )
.
.नंतर मुल मोठं होत जातं तेव्हांही त्याच्या वाढी बरोबर , 'इथे इथे , इथे इथे नाचरे मोरा ... ; एक पाय नाचीवरे गोविंदा ...; बाळ उभं राहिलं , आम्ही नाही पाहिलं ......, ,चाल चाल बाळा , तुझ्या पायात वाळा .., , अशी कितीतरी सहज सुंदर बडबडगीते म्हटली जातात .
.
इसविसनपूर्व दहा हजार वर्षापूर्वी , " मा निषाद...." ही आद्य कविता , वाल्मिकी आद्य कवी आणि रामायण हे आद्य महाकाव्य मानलं जातं . गद्याच्या आधी पद्याचा जन्म झाला असं मानतात . प्राचीनकाळी सर्वच साहित्य निर्मिती पद्यामध्ये होत होती . गणिता वरील ' लीलावती ' हा ग्रंथ काव्यात आहे . त्या काळातील ज्योतिष शास्त्र , खगोलशास्त्र. , असे दुर्मिळ ; माहितीपूर्ण ग्रंथ पण काव्यात आहेत . पूर्वी यज्ञ करताना आदी मानव ऋचा म्हणत असतं . कवितेचा जन्म इतका प्राचीन आहे .
.
अभ्यासकांनी संत कवी , पंत कवी , तंत कवी असे ढोबळमानाने विभाग केले आहेत . कवितेचे विविध प्रकार आहेत . निसर्ग वर्णनात्मक ( कालिदासाचं , मेघदूत .. सर्वांनाच माहीत असलेलं काव्य ) , खंड काव्य , महा काव्य , दिंडी , लावणी , भलरी ( शेतकरी गीत ) , कोळी गीत , भूपाळी , फटका , भारुड , दशपदी , कणिका अशा विविध कविता . त्यात नंतर चित्रपट गीते , नाट्य गीते यांची भर पडली . शिवाय प्रासंगिक कविता पण होत्या . लग्नाच्या वेळी पारंपरिक मंगलाष्टका ! त्या संपल्यावर हौस म्हणून केलेल्या कविता . डोहाळतुली साठी , बारशाच्या वेळी , विहीणबाईसाठी केलेल्या कविता . मंगळागौर , भोंडला अशा खास प्रसंगासाठी रचलेल्या कविता !
.
मराठीने पर भाषेतील कविता पण आपल्याशा केल्या . हायकू ( जपानी ) सुनीत ( सोनेट ) गझल , रुबाया अशा काव्यामुळे मराठी कविता समृद्ध होत गेली . आधी कविता छंदोबद्ध होती . त्यावेळी कवितेचे नियम पाळण्याच्या प्रयत्नात , अनेक वेळा कविता जटील व्हायच्या . काव्यात मुक्तछंद आला , आणि कविता अधिकाधिक फुलत गेली .
.
.कविता इतकी प्रिय असते की त्यातील अनेक प्रकार आपण नामकरणासाठी स्वीकारले . ओवी , अभंग , श्लोक , कविता , काव्या ,ऋचा , अशी नावे , हौसेने आपण आपल्या मुलांची ठेवतो . पण प्रबंध , नाटक , नाट्यछटा , चरित्र अशी गद्य प्रकारांची नावे सहसा मुलांना ठेवलेली आढळत नाहीत . त्यातल्या त्यात कादंबरी नाव असतं , कथा सुद्धा कदाचित असू शकेल . पण बाकी गद्य प्रकार आपण मुलांच्या नामकरणात टाळतोच .
.
चालीवर म्हटलेलं , गद्यापेक्षा कवितारुपात सांगितलेलं , छंदात लिहीलेलं अधिक चांगलं लक्षात राहत . देवाची स्तुती स्तोत्रात केली आहे , आरती , भजन , कीर्तन हे काव्यात असतं आणि म्हणूनच अनेक वर्ष ते लक्षात राहून एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे अलगद हस्तांतरित होतं .आयुर्वेदाच्या कारिका वृत्तां मधे लिहिल्या आहेत . शास्त्रातील , गणितातील महत्वाची सूत्रे लक्षात ठेवण्यासाठी आपण त्यांना छोटंसं काव्यरूप देतो . लहानपणी झोपाळ्यावर झोके घेत तालावर म्हटलेले पाढे , आठवीत असताना पित्रे सरांनी सुरावर पाठ करून घेतलेलं ' देव: देवौ देवा : ' आणि संस्कृत मधील इतर शब्द , भिडे बाईनी पाठ करून घेतलेलं अलंकारांच गीत .." जाणा वसंततिलका तभजाजगागी ... भुजंगप्रयाती य हे चार येती ' आजही चांगलंच लक्षात आहे .
.
कवितेचा महिमा इतका अगाध असून सुद्धा एकंदरीतच कविता आणि कवी ह्यांची टिंगलटवाळी करण्याकडे एकंदरीत कल असतो #सुरेखा_मोंडकर २७/०८/२०१७
Add photos

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा