सोमवार, २८ ऑगस्ट, २०१७

कवितेचा जन्म ( ३ )

कवितेचा  जन्म  ( ३ )
.
.
कविता हा असा प्रांत आहे की , आवडो न आवडो तिचा उल्लेख नेहमीच होत राहतो . प्राचीनकाळी कवींना राजाश्रय असे . कालिदासा सारखे अनेक कवी राजदरबारी असत . राजाश्रयामुळे त्यांच्या चरितार्थाची सोय व्हायची आणि काव्य निर्मितीला त्यांना स्वस्थता लाभायची . तेव्हांही आणि आताही केवळ लेखनावर उचित अर्थार्जन अशक्यच . लेखन हा एक हौसेचा भाग होता आणि आहे . पैसे मिळवण्यासाठी काहीतरी निराळा उद्योग , धंदा करावा लागतो .
.
मोंगल बदशाहानी , राजस्थानातील राजांनी प्रतिभावान कवींना पदरी ठेवलं होतं . त्यांना भाट , चारण असं ही म्हटलं जायचं . हे कवी प्रामुख्याने आपल्या आश्रयदात्याच्या स्तुतीपर गीत रचायचे . त्यांना मानाचं स्थान होतं . राजे जेव्हां मोहिमेवर निघायचे तेव्हां वीर रसयुक्त , शौर्याला पोषक अशी गीतं गात हे भाट , चारण सैन्याच्या सर्वात पुढे असत . पण हळूहळू ह्या आश्रित कवींचं लांगुलचालन इतकं वाढलं की भाटगिरी करणं हा एक वाकप्रचारच तयार झाला . थोडक्यात मस्का मारणं .
.
तरी देखील अनेक राज कवींनी आपल्या प्रतिभेने काव्य सृष्टीत मानाचं स्थान मिळवलं . बडोदा संस्थानाने अनेक कवींना राजाश्रय दिला . यशवंत दिनकर पेंढारकर ( कवी यशवंत ) , भा . रा . तांबे , चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे हे राजकवी होते . गोपाळ नरहर नातू ( कवी मनमोहन ) यांनी मात्र स्वतःला राजकवी म्हणवून घेण्या पेक्षा लोककवी म्हणवून घेणे अधिक पसंत केलं .
.
कविता म्हणजे गागरमें सागर ! थोड्या शब्दात बरंच काही आपल्याला सांगून जाते . काही शब्दात जीवनाचं सार सांगते . आयुष्याकडे बघायचा दृष्टीकोन तयार करते . .प्रेरणा देते . कविता हा आपल्या भावविश्वाचा आधार असतो . अनुभव कवीचा असतो , पण त्याचं व्यक्तीकरण , काव्यरूप स्थलकालातीत असतं . म्हणूनच कधीही डफोडील ची फुले पाहिलेली नसली तरी ती कविता आपल्याला आवडते . कवी डाफोडील्स ची कुरणं आपल्या डोळ्यासमोर फुलवतो .
.
तरी देखील आजतागायत कवी हा टवाळकीचा विषय झाला आहे " जे न देखे रवी ,ते देखे कवी , ' असं अभिमानाने म्हणायचं ! प्रौढत्वी निज शैशवास जपणे बाणा कवीचा असे ' असं त्याचं कौतुक करायचं ! त्याच्या कवितांना , ' सृजनशील आत्म्याचा उच्चार ' म्हणायचं ! ' भावनांचा उत्स्फूर्त आणि उत्कट आविष्कार म्हणजे कविता ' असं मानायचं आणि त्याच कवीला कवडा म्हणायचं , त्याची टर उडवायची ; हे परंपरेने चालत आलंय .
.
नारायण मुरलीधर गुप्ते , ( कवी बी , १८७२ /१९४७ ) हे आधीपण कविता करत होते , पण त्यांची ' ट ला ट , री ला री | जन म्हणती काव्य करणारी " ही कविता प्रसिद्ध झाली आणि त्यांना अभूतपूर्व अशी प्रसिद्धी मिळाली . म्हणजे काय जे स्वतः काव्य करीत होते त्यांनी पण कवींची खिल्ली उडवली आहे .
.
राम गणेश गडकरी ! कवी , नाटककार , विनोदी लेखक ! बाळकराम ह्या नावाने ते विनोदी लेखन करायचे . " कवीचा कारखाना " ह्या आपल्या विनोदी लेखात , त्यांनी कवींची विनोदी दृष्टीकोनातून मांडणी केली आहे . आपली कविता छंदोबद्ध , वृत्तबद्ध व्हावी ह्या साठी कवी शब्दांची किती ओढाताण करीत हे सांगताना त्यांनी एक वानगीदाखल रचना दिली आहे ,
"उत्तिष्ठोत्तिष्ठ राजेंद्र मुखं प्रक्षालयस्व ट : |
प्रभाते रोदिती कुक्कु : चवैतुहि चवैतुहि |
निरर्थक शब्दांचा भरणा , शब्दांची ओढाताण , नको तिथे शब्द तोडणे ,मोडणे ; कवींच्या ह्या सवयीचा त्यांनी मोढ्या खुमासदारपणे आढावा घेतला आहे . पुढे ते म्हणतात , " ऐशी काव्ये कराया ; इकडून तिकडून आणलेली बुद्धी दे चक्रपाणी ! "
.
केशवसुत हे मराठी कवितेचे युगप्रवर्तक ! आद्य क्रांतिकारी कवी . व्यक्ती स्वातंत्र्याची , समतेची , क्रांतीची त्यांनी द्वाही फिरवली . आधुनिक मराठी कवितेचे ते पहिल्या मानाचे मानकरी .कवी आणि काव्य ह्या बद्दल त्यांना उचित अभिमान होता . ह्या टिंगल टवाळी वर त्यांनी प्रथम सणसणीत प्रहार केला . अभिमानाने मान उंचावून , त्यांनी टेचात , खणखणीत जाब विचारला , .
आम्ही कोण म्हणुनी काय पुससी
आम्ही असू लाडके देवाचे
आम्हांला वगळा ,गतप्रभ झणी होतील तारांगणे
आम्हांला वगळा , विकेल कवडीमोलावरी हे जिणे
दिक्कालांतुनी आरपार आमुची दृष्टी पहाया शके
फोले पाखडिता तुम्ही , निवडितो ते सत्व आम्ही निके '
..
ही गर्वोक्ती मुकाट्याने ऐकून घेतील तर ते आचार्य अत्रे कसले . आता कसं आहे अत्रे स्वतः सुद्धा समर्थ साहित्यिक , सिद्धहस्त लेखक , साहित्याच्या ..कलेच्या अनेक प्रांतातून त्यांनी मुशाफिरी केली . ते स्वतः एक चांगले कवी . त्यांनी केशवकुमार ह्या नावाने काव्य निर्मिती केली आहे . त्यांनी विडंबनात्मक उत्तर दिलंय ..,
आम्ही कोण ? म्हणून काय पुसता दात वेंगाडूनि
फोटो मासिक पुस्तकात ना तुम्ही का आमुचा पहिला ?
किंवा 'गुच्छ तरंग ' 'अंजली ' कसा अद्यापि न वाचला ?
चाले ज्यावरी अखंड स्तुतीचा वर्षाव पत्रांतुनी ?
ते आम्ही -पर वाग्मयातील करू चोरून भाषांतरे
ते आम्ही - न कुणास देऊ अगदी याचा सुगावा परी
डोळ्यां देखत घालुनी दरवडा आम्ही कुबेरा घरी
त्यांचे वाग्धन वापरून लपवूनही आमुची लक्तरे
काव्याची भरगच्च घेउनी सदा काखोटीला पोतडी
दाऊ गाउनी आमुच्याच कविता आम्हीच रस्त्यामधे
दोस्तांचे घट बैसवून करूया आम्ही तयांचा उदे
दुष्मनावर एकजात तुटुनी का लोंबवू चामडी
आम्हांला वगळा -गतप्रभ झणी होतील साप्ताहिके
आम्हांला वगळा - खलास सगळी होतील ना मासिके
.
आचार्य अत्रे यांनी विडंबन काव्य केली . त्या नंतर आजतागायत अनेक विडंबन काव्य लिहिली गेली . पण त्यांच्या ' झेंडूची फुले ' ह्या विडंबन काव्य संग्रहाच्या तोडीचा , केवळ विडंबन काव्य असणारा एकही संग्रह आजतागायत नाही . ती व्यक्तीच अफाट होती !
.
प्रत्येकजण आयुष्यात एकदातरी कविता करतो असं म्हणतात . मी मात्र अपवाद होते . पण फेसबुक वर माझी 'हायकू ' चारोळ्या ' ह्या काव्य प्रकारांशी ओळख झाली . खूप पूर्वी मी शिरीष पै ( आचार्य अत्रे , यांच्या प्रतिभावान कन्या ) यांच्या हायकू वाचल्या होत्या ,पण फेसबुकवर आल्यानंतर मी प्रथम कविता केल्या . एका समूहाच्या चारोळी स्पर्धेत मला काही वेळा बक्षीसही मिळालं . पण ते तेवढंच , मला कवितेची प्रतिभा नाही हे माझं मलाच लक्षात आलं
.
आजही कवितांची आणि कवीची टिंगलटवाळी होते . काहीजण दुखावतात , त्यांच्या साठी केशवसुत सांगून गेले आहेत , ते त्यांनी कायम लक्षात ठेवावं ,
.
अशी असावी कविता फिरून
तशी नसावी कविता म्हणून
सांगावया कोण तुम्ही कवीला
आहांत मोठे , पुसतो तुम्हांला .....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा