#नल_दमयंती
.
काय विधीची दैवगती , वनी एकटी दमयंती
.
कोमल शय्या मृदुल तृणांची
श्रमवी काया दमयंतीची
व्याकूळ नयने शोधीत राही प्राणविसावा निषधपती
.
कोठे असशी प्राण वल्लभा
दीप तू सख्या मी तुझी प्रभा
हाक ऐकुनी येशील का रे , विनवी अजुनी किती
.
किंचित खुलली नयन पाकळी
पण नव्हता नलराजा जवळी
अश्रू विरही झरती गाली , शिणवू आपुले नयन किती
.
तरुण वयात ह्या गीता मधून दमयंती भेटली . गीत गंगाधर महांबरे यांचे आहे . संगीत दिले आहे दशरथ पुजारी यांनी . दरबारी कानडा मध्ये बांधलेले हे गीत त्यांनीच गायले आहे .
.
त्या आधी दमयंती भेटली शाळकरी वयात .विदर्भ नरेशाची ही लावण्यवती कन्या निषधराजा वीरसेन याचा पुत्र , नल ह्याच्या प्रेमात आकंठ बुडाली . विरहाने ती तडपत होती . तिला काहीही गोड लागत नव्हतं .सख्यांबरोबर विहार करण्यात तिला रस उरला नव्हता . तिचा देह तप्त झाला होता . वाळ्याच्या पंख्याचा शीतल वारा , पुष्करणीतील सुगंधी उदक , फुलांची पखरण , चंदनाची गंधित उटी ... कशाकशाचा उपयोग होत नव्हता .आई चिंतातूर झाली होती . वामन पंडितांनी , आपल्या दमयंती आख्यानामधे तिच्या ह्या अवस्थेचं मधुर वर्णन केलं आहे . ते म्हणतात ,
.
ते शीतलोपचारी जागी झाली ,
हळूच मग बोले ,
औषध नलगे मजला .. औषध नल -गे मजला
परिसुनी माता , बरे म्हणुनी डोले .
.
ह्या काव्यपंक्ती 'श्लेष ' अलंकाराचे उदाहरण म्हणून आम्हांला शिकवले होते . आणि मला वाटतं , पिढ्यान पिढ्या , मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांनी हेच उदाहरण पाठ केलेले असणार . दमयंतीने " मला औषध नको ग आई ! ' हे सांगतानाच मोठ्या चातुर्याने ' राजा नल , हेच माझं औषध आहे " हा आपला संदेश पण आई पर्यंत पोचवला होता.
.
पण मला तर दमयंती त्या आधीच भेटली होती , बाल वयात ! चांदोबा मधे !! मधल्या काळात जसे ' अमर चित्र कथा 'ने बाल विश्व समृद्ध केलं , तसं आमच्या काळात चांदोबाने आम्हांला अनेक गोष्टींचा परिचय अत्यंत सुजाण पणे , सर्व मर्यादा पाळून करून दिला . मला तर त्या गोष्टीसह दिलेलं चित्र पण आठवतंय . .... उद्यानात् , तलावाकाठी राजहंसांचा थवा आहे आणि रूपवती राजकन्या दमयंती आपली तलम , महागामोलाची वस्त्रं सांभाळत , त्यांना पकडायला , खट्याळपणे त्यांच्या मागे धावतेय .
.
अगदी आधुनिक सिनेमा मध्ये पण कबुतर प्रेमिकांचे संदेश दूत होतात . पुराणातील ह्या कथे मध्ये नल दमयंतीच्या मिलनामधे राजहंसांनी प्रेमदुतांची भूमिका बजावली आहे .
.
एकदा नल राजाला , त्याच्या महालासमोर , हिमालयावरून आलेल्या राजहंसांचा थवा उतरलेला दिसला . त्याने चपळाईने एका हंसाला पकडलं . हंसाने मोठ्या काकुळतीने राजाकडे जीवदान मागितले . नल राजाची करुणा भाकताना हंसाने त्याच्या समोर दमयंतीच्या रूप गुणांचं कौतुक केलं . दमयंतीच्या सौंदर्याचा डंका तिन्ही लोकी पोचला होता .नल आधीच तिच्यावर मोहित झालेला होता . हंसाने त्याला वचन दिलं की , राजाने जर त्याला जीवदान दिलं तर तो दमयंती कडे राजाची रदबदली करेल .
.
अर्थातच राजाने त्याला सोडून दिलं . हंसांचा तो थवा उडत उडत विदर्भ कन्येच्या पुष्पवाटिकेत येऊन पोचला . तिच्या महालाच्या उद्यानात त्यांनी मनोहर नृत्य करायला सुरुवात केली . दमयंती मोहित होऊन त्यांना पकडायला धावली . ती ज्या हंसाला पकडायची तो हंस तिच्याकडे नलाची स्तुती सुमने उधळायचा आणि तिच्या हातून आपली सुटका करून घ्यायचा . उद्यानात एकच कलरव झाला . नलाच्या रूप, गुण,शौर्याच्या कथा दिगंती पोचल्या होत्या . दमयंती पण त्या ऐकून होती . राजहंसांची शिष्टाई सफल झाली . त्या न पाहिलेल्या राजाच्या प्रेमात दमयंती दिवाणी झाली . विरहाच्या ज्वराने तिने अंथरूण धरलं .राजाने कन्येचं स्वयंवर रचलं . तिच्यावर आशिक असणारे राजे , इंद्र ,वरूण ,अग्नी , यम ह्यांच्या सारखे देव .. सर्वजण स्वयंवराला आले होते . दमयंतीने नलाला वरल्यामुळे सगळे नाराज झाले .
.
निषध देशात राणीला घेऊन आल्यावर , नलाचा भाऊ पुष्कर ह्याने ,त्याला द्यूत खेळायचं आव्हान दिलं . नलाने ते स्वीकारलं . नल त्यात सर्वस्व हरला . नल दमयंती नेसत्या वस्त्रानिशी वनवासी झाले . आपलं सर्वस्व द्यूता मधे हरून देशोधडीला लागलेल्या पांडवानी , वनवासात एका आश्रमात रात्री पुरता निवारा घेतला होता . तेव्हां पांडवांना तेथील ऋषींनी ही , त्यांच्याशी साधर्म्य असलेली कथा सांगितली असा उल्लेख महाभारतात आहे .
.
पुढील नल दमयंतीचा प्रवास अत्यंत खडतर आहे . प्रेम साफल्य झालं , पण त्यांना त्याचा उपभोग घेता आला नाही . एकदा तर थकून भागून दमयंती एका वृक्षा खाली झोपली होती . तिथे सोनेरी पंख असणारा एक हंस आला . नलाने , त्याचं मांस भक्षण करून पोट भरता येईल आणि त्याचे सोन्याचे पंख विकून मोहरा मिळतील ह्या उद्देशाने त्याला पकडण्यासाठी , नेसूचे वस्त्र त्याच्यावर टाकले . तर तो हंस त्या वस्त्रासहीत उडून गेला . राजा निर्वस्त्र झाला . तो अत्यंत हताश झाला , व्याकूळ झाला , अविवेकीपणे लज्जा रक्षणासाठी निद्रिस्थ दमयंतीच्या वस्त्रातील अर्ध वस्त्र फाडून घेऊन , त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या , त्याच्यावर प्रेम करणाऱ्या त्या सुकुमार तरुण , सुंदर राजकुमारीला , घनदाट , भयावह जंगलात , एकटीला सोडून राजा परागंदा झाला .
.
सकाळी जाग आल्यावर आपल्या अपुऱ्या वस्त्रांची आणि एकटेपणाची जाणीव दमयंतीला झाली . तिने टाहो फोडला , पण तिथे ऐकायला , तिच्या मदतीला यायला कोणीही नव्हतं . अपार यातना सोसत , मानहानी , संकटं , व्याधाकडून होणारा बलात्काराचा प्रयत्न अशा , कल्पनातीत वेदनांना तोंड देत कधीतरी , ती आपल्या माहेरी पोचली .
.
नलराजा मधे कली शिरला होता असं पुराणात वर्णन आहे . कालांतराने त्याच्यातील कली निघून गेला . नल दमयंतीची पुनर्भेट झाली . नल आपल्या राज्यात दमयंतीसह परत गेला . पुष्कर त्याचं राज्य बळकावून बसला होता . त्याने भावाला द्यूताचं आव्हान दिलं आणि गमावलेलं सर्व पुन्हा जिंकून घेतलं . पुढे नल दमयंतीने तिथे सुखाने राज्य केलं .
.
नल दमयंतीची कथा ही नुसती प्रेम कथा नाही . त्यात विविध रंग आहेत . प्रेम , पिडा , दर्द ,धोका , वंचना , फसवणूक , असूया , दैव ,विश्वासघात , निष्ठा ,संयम , वैफल्य , आत्मघात , नियती , प्रारब्ध अशा अनेक छटा आणि कंगोरे त्यांच्या कथेला आहेत ,
.
.
शेक्सपिअरिअन शोकांतिकांची जशी वर्षोनुवर्षे सगळ्या जगाला भुरळ पडली तशीच ह्या कथेची पण जगभरातल्या साहित्यिकांना भुरळ पडली . निरनिराळ्या भाषांतून ह्या कथेवर साहित्य निर्मिती झाली . शेक्सपिअरच्या अनेक नाटकांची भाषांतरे झाली . अजुनही त्या कथानकावर सिनेमा , नाटकं , कथा , कादंबर्या , काव्य ह्यांची निर्मिती होत आहे . कयामत से कयामत तक , मकबूल , हैदर , ओंकारा अशी कितीतरी उदाहरणे आपल्याला माहिती आहेत .नल दमयंतीच्या कथेने पण वाचकांवर , लेखकांवर , साहित्यप्रेमींवर युगानुयुगे मोहिनी घातली . #सुरेखामोंडकर १९\०१\२०१८

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा