शनिवार, २० जानेवारी, २०१८

अचानक ( सिनेरंग )

.....काल दुपारी थोडा रिकामा वेळ होता , यू ट्यूब वर फिरता फिरता जुना " अचानक " हा सिनेमा दिसला . पूर्वी जेव्हां आला तेव्हां , म्हणजे १९७३ मध्ये , मी थेटर मध्ये पाहिला होता . पण काल पुन्हा पाहिला . रहस्यपट आहे ! असे सिनेमा खरं म्हणजे एकदा त्यातील रहस्य कळल्या नंतर , पुन्हा पाहण्यात काही मजा नसते .तरी देखील तो इतक्या काळा नंतर पुन्हा बघावासा वाटला ... आणि तेवढाच थरारक वाटला .
ह्या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्यातील रहस्य तेव्हां देखील जगजाहीर होतं . एका खऱ्या घटनेवर आधारित असा हा सिनेमा आहे, N. C. Sippy प्रस्तुत आणि गुलजारजीनी दिग्दर्शित केलेला सिनेमा . १९५९ / ६० मध्ये नानावटी _ आहुजा खून खटला जबरदस्त गाजला होता . तेव्हां तर टीवी नव्हता , ढोल बडवणारी अनेक च्यानेलस नव्हती , तरी देखील ह्या खटल्याकडे सर्वांचं लक्ष वेधलेलं होतं . असं म्हणतात की त्या खटल्याचं विस्तृत आणि परिपूर्ण वार्तांकन करणारं ब्लिट्झ हे पंचवीस पैशाला मिळणारं वर्तमानपत्र काळ्याबाजारात दोन .. अडीच रुपयांना विकलं जात होतं . ह्या खटल्या मुळे घडलेल्या अनेक एकमेवाद्वितीय गोष्टीं पैकी ही एक !
सहा फुट उंच , देखणा , गोरापान , तरणाबांड नौदल अधिकारी , कमांडर नानावटी,! त्याची लावण्यवती ब्रिटीश पत्नी सिल्विया ,! नानावटींचा जिगरीदोस्त प्रेम आहुजा ! .. असा हा प्रेमाचा त्रिकोण . नानावटी दाम्पत्याला दोन मुलगे आणि एक मुलगी ! नानावटीला जेव्हां पत्नीच्या ह्या प्रेम संबंधा बद्दल कळलं तेव्हां त्यांने आहुजाच्या घरी जाऊन शांतपणे सर्विस रीवोल्वर ने त्याचा खुन केला . ..तीन गोळ्या झाडून ! उच्यभ्रू , ऐश्वर्यसंपन्न , पंडित नेहरूं पासून तत्कालीन संरक्षण मंत्री कृष्ण मेनन पर्यंत जवळीक असणाऱ्या , उच्य पदस्थ व्यक्तींच्या हातून घडलेला अपराध.. सर्वोच्य मानला जाणार गुन्हा .. नवऱ्याने बायकोच्या प्रियकराचा केलेला खून ! स्वतंत्र भारतात घडलेली बहुदा ही पहिलीच अशी घटना होती.जेव्हां कोर्टात हा खटला चालायचा , तेव्हां हजारो लोक ऐकायला , पाहायला गर्दी करायचे .हा खटला लढवत होते तेव्हांचे नामवंत कार्ल खंडाळवाला आणि राम जेठमलानी .
ह्या खटल्या पर्यंत " ज्युरी पध्दत " होती . तीच शेवटची . त्या नंतर ती पध्दत बंद झाली .
ह्या खून खटल्यात असणाऱ्या नाट्याच कलाकारांना खूप आकर्षण वाटलं . १९६३ मध्ये , सुनील दत्त .. सौंदर्यवती लीला नायडू आणि रेहमान यांचा , " ये रास्ते हैं प्यारके " हा सिनेमा निघाला . ह्याच सत्य घटनेवर आधारीत . मराठी कलाकारांना देखील ह्या कथानकाचा मोह पडला . मधुसूदन कालेलकर यांनी , " अपराध मीच केला " हे नाटक लिहिलं . त्यात देखणा अभिनेता , अरुण सरनाईक काम करीत होते . आचार्य अत्रेंचं , ' तो मी नव्हेच " धोधो चाललेलं असतानाच ह्या नाटकाने पण मराठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं .
ह्या तिन्ही कलाकृतीमध्ये मुलांचा उल्लेख केलेला नाही . अचानक मध्ये देखणा , ऐन उमेदितला विनोद खन्ना आणि लिली चक्रवर्ती भूमिका करतात . त्यात एकही गाणं नाही , स्वप्न दृश्यात पण नृत्य नाही . नायिकेला भिजवलेलं नाही . सुटलेल्या कड्या खूप आहेत .तरीसुद्धा सिनेमा बघण्यासारखा आहे . ह्यात नायक पत्नीच्या प्रियकराला गोळ्या झाडून मारतो आणि अपरंपार प्रेम असणाऱ्या पत्नीला पण मारतो . " ये रास्तें हैं प्यार के " मध्ये पत्नी शेवटच्या कोर्ट सीन मध्ये , पतीच्या बाहुपाशात आपल्या " अपराधाची " टोचणी सहन न होऊन प्राण त्याग करते . वास्तवात नानावटीला तीन वर्षे तुरुंगवास भोगल्या नंतर शिक्षा माफ होते . त्याच रात्री पत्नी, मुलांसह देशत्याग करून तो क्यानडाला निघून जातो . तिथे आपलं पुढचं आयुष्य व्यतीत करतो .
अचानक मध्ये प्रमुख पात्राला फाशीची शिक्षा होते . अत्यंत बिकट शारीरिक अवस्थेमधून डॉक्टर अनेक ऑपरेशन्स करून विनोद खन्नाला बरे करतात . , त्याला नंतर फाशी देवून शिक्षा बजावली जाते . "मैं अपने धर्मसे मजबूर हुं और कानून अपने धर्मसे ! " ... पेशंटला जीवतोड मेहनत करून , मृत्यूच्या जबड्यातून बाहेर काढणाऱ्या , डॉक्टर चे हे वाक्य आपल्याला अनेक प्रश्नांच्या भोवऱ्यात टाकत . कमी खर्चात , आपल्याला माहित असणाऱ्या कथानका वर काढलेला सिनेमा .... पुन्हा पाहण्यासारखा नक्कीच आहे .
अचानक ... पाहताना मन पाखरू खूप मोठी सफर करून आलं , जे जे मनात आल ते शब्दात उतरलं !
सुरेखा मोंडकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा