शनिवार, २० जानेवारी, २०१८

मैसी साहब ( सिनेरंग )

#सिनेपरिक्षण मैसी साहब , ( Massey Sahib )
.
. . फारशी उंची नाही , खरं म्हणजे ज्याला बुटकाच म्हणता येईल असा !, देखणेपणाचा लवलेश नाही , सर्वसाधारण , सर्वसामान्य , चारचौघां सारखा ..किरकोळ शरीरयष्टीचा ; सामान्य , अती सामान्य , ज्याला काल पर्यंत कोणी ओळखतपण नव्हतं असा माणूस एका दिवसात प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन बसतो , देशातच नाही तर परदेशात पण , आपल्या नैसर्गिक अभिनयाच्या जोरावर मान सन्मान मिळवतो ; लोक मान्यता , राज मान्यता मिळवतो . १९८५ मध्ये आलेल्या मैसी साहब , ह्या सिनेमाने , रघुवीर यादव ह्या अभिनय निपुण कलाकाराला हे वैभव मिळवून दिलं .
.
. . रघुवीर यादवचा हा पहिलाच चित्रपट . जेव्हां त्याला ही भूमिका मिळाली तेव्हां आपण क्यामेर्याला कस तोंड देऊ शकू ह्याचीच त्याला काळजी वाटत होती .फ्रान्सिस मैसी च्या भूमिकेत तो इतका चपखल बसला की जणू काही ती भूमिका त्याच्यासाठीच बेतली गेली होती . दिग्दर्शक प्रदीप कृष्ण यांचा पण हा पहिलाच दिग्दर्शित सिनेमा . संगीत दिलं होतं वनराज भाटीया यांनी . रघुवीर यादवला अभिनयाची दोन पारितोषिके मिळाली . राष्ट्रपतींच्या रजत कमल पारितोषिकाने त्याला गौरविण्यात आलं .
.
. . Mister Johnson ह्या Joyce Cary ह्यांच्या कादंबरीवर हा चित्रपट आधारित आहे . चित्रीकरण मध्य प्रदेश मधील पंचमढी इथे केलं आहे . कथानक ब्रिटीश काळात घडतं .मैसी ; अतिशय चलाख , हुशार , जिद्दीने आपल्याला हवं ते मिळवणारा ! आपल्या व्यक्तिमत्वातील सगळ्या लंगड्या बाजूंवर , आपल्या हरहुन्नरी स्वभावाने मात करणारा ! इच्छित प्राप्त करून घेण्याचं कौशल्य तर त्याच्यात होतंच , फक्त आपल्या मर्यादांचं त्याला भान नव्हतं
.
. . त्याला आवडलेली एक आदिवासी मुलगी , तो पत्नी म्हणून कशी मिळवतो , तिला उच्चवर्णीयां प्रमाणे राहणीमान शिकवायचा प्रयत्न कसा करतो , हे सर्व प्रत्यक्ष पाहण्यासारख आहे . त्याच्या पत्नीचं काम करणारी कलाकार पण नवखीच होती . ह्या सिनेमात तिला अभिनयाचं बक्षीस मिळालं नाही पण १९९७मध्ये The God of small things साठी तिला बुकर पारितोषिक मिळालं .हो , ही भूमिका केली आहे , अरुंधती रॉय हिने ! .तो क्रिश्चन असतो , त्याला इंग्लिश येत होतं , Deputy Commissioner's Office मध्ये तो क्लर्क असतो . तेवढ्या भांडवलावर तो स्वतःला त्याच्या बरोबरीच्यां पेक्षा वेगळा मानत होता , गोऱ्या ओफिसरांच्या बरोबरीचा !मैसी साहेब , " बाबू" ! वाटेल त्या परिस्थितीत , इकडची दुनिया तिकडे करून आपल्या गोऱ्या वरिष्ठांना खुश ठेवायचं , त्यांची मर्जी सांभाळायची , त्या साठी वाटेलत्या लटपटी करायच्या , उलाढाली करायच्या हेच त्याचं उद्दिष्ट होतं . त्याच्या साहेबाचं Adam चं , अपुऱ्या पैशां मुळे अर्धवट राहिलेलं , रस्ता बांधणीचं काम पूर्ण व्हावं , आपलाही फायदा व्हावा , पैसे मिळावेत , मोठेपणा मिळावा , गोऱ्या साहेबाच्या नजरेत आणि मनात आपण भरावं म्हणून तो जीवतोड मेहनत घेतो . त्यातूनच त्याच्या कडून काही बेकायदेशीर कृती घडतात . चोपड्याना , लेखी पुराव्यांना महत्व देणाऱ्या ब्रिटीश सरकार कडून त्याला नोकरीवरून हाकलण्यात येतं , अपमानित करण्यात येतं . ज्याच्या साठी त्याने हे सगळं केलं ; ज्याच्या भरोशावर तो होता , तो Adam ही त्याला काही मदत करत नाही . तो निष्ठुरपणे कायद्याच्या , पुराव्यांच्या बाजूने उभा राहतो .ह्या काळ्या नेटीवाशी त्याचे भावबंध कुठेच जुळलेले नसतात ! ह्या सर्व भानगडी मुळे त्याच्या बायकोला आणि छोट्या मुलाला देखील तिच्या माहेरची माणसं जबरदस्तीने परत घेऊन जातात . परिस्थितीचा , दैवाचा तडाखा बसलेला मैसी ह्या सर्वातून बाहेर यायचा जीवतोड प्रयत्न करतो . कमालीचा क्रोध , असहायता ,ह्यामुळे एक अविवेकी .. अविचारी कृती त्याच्या हातून घडते . त्याला मदत नाकारणाऱ्या , त्याच्या मित्राचा त्याच्या हातून खून होतो . एका उत्साहाने भरलेल्या , आशा आकांक्षांनी उफाळणाऱ्या वैविध्यपूर्ण व्यक्तिमत्वाचा असहाय , करुण अंता कडे प्रवास सुरु होतो.
.
. . माणसाचं बहुरंगी , बहुआयामी व्यक्तिमत्व मोठ्या खुबीदार पणे इथे व्यक्त झालं आहे . अनेकरंगी माणूस , स्वार्थी , अहंकारी . आपल्याच तोऱ्यात राहणारा , प्रेमळ प्रेमिक , वत्सल बाप , चापलुसी करणारा , जिंकणारा , हरणारा , हताश होणारा .. खरंच , माणसा किती रंग तुझे ! सिनेमा आपल्याला गुंतवून ठेवतो . काळ्यापांढऱ्या रंगातला हा सिनेमा आपल्या समोर बहुरंगांची उधळण करतो .विचाराला प्रवृत्त करतो . ब्रिटीशकालातील वास्तव आपल्यासमोर उलगडून ठेवतो
____________-
#सुरेखा मोंडकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा