शनिवार, २० जानेवारी, २०१८

उषा अनिरुद्ध कथा ( ललित लेख )

#उषा_अनिरुद्ध_कथा
.
प्रेम व्यक्त करताना , किंवा प्रणया मधे पुरुषाने पुढाकार घ्यावा असं साधारणपणे मानलं जातं . अनेकदा तर " तो विचारेल " किंवा 'ती विचारेल ' ह्याची वाट पाहताना वेळ निघून जाते . प्रेम अव्यक्तच राहाते आणि प्रेमकथेचा शेवट अप्रिय होतो .
.
ह्याला अपवाद अशा बऱ्याच तरुणी असतात . त्या धिटाईने आपलं प्रेम व्यक्त करतात आणि इप्सित साध्य करून घेतात . टीवीवर काही कार्यक्रम पाहताना प्रेमविवाहात , ' तिनेच आधी विचारलं ' असं सांगणारे बरेच तरुण आढळतात . पुराणकथांमध्ये तर स्वयंवरात जिंकल्यावर देखील , तो विवाह नाकारून आपलं दुसऱ्या पुरुषावरील प्रेम व्यक्त करणारी स्त्री , ( महाभारत -भीष्म कथा ) हवा तो पती मिळण्यासाठी घनघोर तप करणारी कन्या ( पार्वती ) , दुसऱ्याशी लग्न ठरवलं जातंय हे बघून प्रियकराला पळवून नेण्यासाठी सांगावा धाडणारी प्रेयसी ( सुभद्राहरण ) अशा मनस्वी स्त्रिया आढळतात . पण एकतर्फी प्रेम करून , प्रियकराचे रातोरात अपहरण करून त्याच्या नकळत , त्याला आपल्या महालात आणणारी " उषा " ही एकमेव राजकन्या असेल .प्रेमिकेकडून प्रियकराचे हरण झाल्याची पुराणातील कदाचित ही एकमेव कथा असेल
.
उषा अनिरुद्ध कथा मी लहानपणी चांदोबा मधे वाचली . चांदोबा मधे सचित्र ,इतक्या लोभस शैलीत कथा लिहिल्या जायच्या , की त्या कायम स्मरणात राहिल्या .
.
शोणितपूरचा दैत्य राजा बाणासूर ह्याची सौंदर्यवती कन्या उषा विवाहयोग्य झाली होती . तिच्यासाठी वर संशोधन सुरु होतं , पण एकही राजपुत्र तिच्या पसंतीला उतरत नव्हता .आई वडील हवालदिल झाले होते . राजकन्या उषाच्या सख्यांना तिच्या स्वभावात , वागण्यात होणारे बदल लक्षात येत होते .ती दिवसेंदिवस हरवल्या सारखी राहायची .एकांत प्रिय झाली होती . कधी लाजायची , कधी हसायची , कधी फुरंगटायची . एकदिवस तिने आपलं गुपित आपल्या सख्यांना सांगितलं .
.
उषाच्या स्वप्नात एक तरुण , मर्द राजकुमार येत होता . स्वप्नातच त्यांच्या प्रणय क्रीडा व्हायच्या , पण त्याच्या निशाण्या मात्र प्रत्यक्षात राजकुमारीच्या शरीरावर दिसायच्या . तिची चुरगळलेली वस्त्रे , तिच्या अंगाला येणारा पुरुषी कस्तुरी गंध , ह्या सर्व चिन्हांमुळे तिच्या सख्यापण बे चैन झाल्या होत्या .
.
तिची प्रियसखी चित्रलेखा उत्कृष्ट चित्रकार होती . उषाने तिच्या स्वप्नीच्या राजकुमाराचे वर्णन केले आणि चित्रलेखा फलकावर त्या प्रमाणे चित्र रेखाटत गेली . साकार झालेला तरुण तोच होता , जो उषाच्या स्वप्नात येत होता . ( टीवी सिरीयल मधे जेव्हां गुन्हेगाराचे वर्णना प्रमाणे चित्र काढलं जातं , तेव्हां माझा त्यावर विश्वास बसत नाही .पण असे हुबेहूब वर्णन करणारे ... आणि हुबेहूब चित्र काढणारे असतात तर ! )
.
राजकुमार तर कळला ., पण तो आहे कोणत्या देशीचा , हे कसं कळणार ? त्याचं रंग रूप , पेहराव , आभूषणे ह्यावरून चित्रलेखाने अंदाज केला की हा यादव वंशाचा असावा . कदाचित श्रीकृष्णाचाच वंश असेल . चित्रलेखा रातोरात योग सामर्थ्याने द्वारकेला गेली . श्रीकृष्णाचा महाल धुंडाळताना तिला एका शयनकक्षात मंचकावर गाढ झोपलेला तो देखणा राजपुत्र दिसला , जो तिच्या लाडक्या उषाच्या स्वप्नात येत होता . चित्रलेखाने मंचाकासह त्याला झोपेतच उचलून उषाच्या महालात ठेवले . तो होता अनिरुद्ध ! कृष्ण पुत्र प्रद्युम्नचा पुत्र !
.
अनिरुध्दने जेव्हां डोळे उघडले तेव्हां तो परक्या ठिकाणी आणि समोर एक लावण्यवती . तो थक्कच झाला . पण उषाच्या अनुपम लावण्याने तो देखील मोहित झाला . दोघांनी गांधर्व विवाह केला आणि ते नवविवाहित जोडपं उषाच्या महालात राहू लागलं .
.
ह्या सर्व कथानकावर ग . दि . माडगूळकरांनी मधुर गीत लिहिलं . आशा भोसले यांनी ते गायले आहे , संगीतबद्ध केलं आहे वसंत प्रभू यांनी ( एका ठिकाणी , संगीतकार वसंत देसाई असं आहे . पण माझ्या आठवणी प्रमाणे वसंत प्रभू च आहेत )
.
हेच ते ग , तेच हे ते . स्वप्नी येती सारखे
मूर्त केले स्वप्न तू हे , चित्रलेखे लाडके |
.
हेच डोळे ते टपोरे , हीच कांती सावळी
नासीके खालील रेषा , हीच काळी कोवळी
हेच हसरे ओठ बाई , मूक तरीही बोलके |
.
हीच छाती रुंद जेथे , मीच माथे टेकले
लाजुनिया चूर झाले , भीत डोळे झाकिले
ओळखीची माळ मी ती , हीच मोती माणके |
.
गुज करिती हे कधी ग , धरुनी माझी हनुवटी
प्रश्न पुशिती धीट केव्हां , मूठ पडते मनगटी
ओठ ओले करुनी जाती , काय सांगू कौतुके ?
.
साक्षात महाकवीने केलेल्या वर्णना नंतर मी पामर काय बोलणार . पण तुम्हांला उत्सुकता वाटत असेल म्हणून पुढील गोष्ट सांगते . इकडे द्वारकेला हलकल्लोळ माजला होता . आपल्या कन्येच्या महाली परपुरुष वास्तव्य करून आहे हे बाणासुराला पण कळले होते . कृष्ण आपल्या सैन्यासह शोणितपूर वर चाल करून आला . घनघोर युद्ध झालं . बाणासुराचा पराजय झाला , पण प्रेम जिंकलं . उषा अनिरुद्ध यांचा वैभवशाली विवाह झाला . ही प्रेमकथा अमर झाली आणि कदाचित एकमेवाद्वितीय ठरली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा