शनिवार, २० जानेवारी, २०१८

दुसरा आदमी ( सिनेरंग )

#सिनेरंग
.
. . दुसरा आदमी . .
.
. . माझ्या अत्यंत आवडत्या चित्रपटांपैकी हा एक आहे . यश चोप्रांच्या १९७७मध्ये आलेल्या ह्या सिनेमात विवाहबाह्य संबंधांवर भाष्य केलेलं आहे . जास्त गुंत्यात न जाता , समाजमान्य मतां समोर जटील , तापदायक प्रश्न उभे न करता केवळ मनोरंजनावर लक्ष केंद्रित केलं आहे . दरीच्या काठावर उभी असणारी व्यक्ती दरीत कोसळली तर एक दुख्खद घटना घडेल , निराळे विचार , भावना आणि परिणाम होतील आणि जर ती सावरली , तिथून परत फिरली तर ; तिथपर्यंत ती ज्या कारणांमुळे पोचली ते व्रण राहतील ; पण हळूहळू ते सुकतील ! त्यावर खपली धरेल ! नवी त्वचा येईल ! कदाचित एक नवीन आयुष्य सुरु होईल .
.
. . हा सिनेमा खोल खाई पर्यंत पोचलेल्या , पण योग्य वेळी तोल सावरून परत फिरलेल्या , दुख्खाने सैरभैर झालेल्या निशाचा ( राखी) आहे . दिग्दर्शक आहेत रमेश तलवार !
.
. . नजरोंसे कहदो , प्यारमें ; मिलनेका मौसम आ गया , अशी एकमेकांबद्दल आतुरता असणारे दोघे ; करण सक्सेना ( ऋषी कपूर ) आणि तिम्सी ( नीतू सिंग ) प्रेमात आकंठ बुडाले होते . दोन्ही कलाकार प्रत्यक्षात पण प्रेमात असल्याने , दोघांची अफलातून केमिस्ट्री जुळलेली आहे . त्यांनी आधीचे प्रेमवेडे आणि नंतर विवाह झाल्यावर कृतार्थ दोघे खूप लोभसपणे व्यक्त केले आहेत .
. ,आंखोमें काजल है
. . काजलमें दिल है
. .चलो दिलमें बिठाके तुम्हें
. . तुमसेही प्यार किया जाय
ह्या एकमेकांना दिलेल्या आणाभाका , त्यांच्या चेहऱ्यावरून आणि देहबोलीतून व्यक्त होतात . बर्फाळ काश्मीरमधील काकडणाऱ्या थंडीत एकमेकांच्या उबेत असणारे ते दोघे . त्यांच्या हनिमूनच्या वेळी खोलीत , टेबलावर साठलेले तीनचार दिवसांचे अन्नपदार्थ आणि बंद दारावर खडूने लिहिलेले ,' Please do not disturb हमें भूख नहीं है ! ह्यातून त्यांचं एकमेकांवर झोकून देऊन केलेलं तारुण्यसुलभ प्रेम कळतंच , पण नंतर कथेला मिळालेल्या कलाटणीमुळे ; दोन प्रेमिकांच्या; घरातल्या सगळ्यांच्या विरोधाला न जुमानता केलेल्या लग्नानंतर , एक जोडपं ह्या दृष्टीने आयुष्यात कशी वादळ येतात , त्यांच्या टवटवीत प्रेमाची कशी पानगळ सुरु होते ; हा विरोधाभास आपल्याला भयचकित करतो
.
. . विवाह झाल्यावर , स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी करण एक advertising agency सुरु करतो . तिथे एक designer तो नोकरीवर ठेवतो . अत्यंत देखणी , बुद्धिमान , सौंदर्यदृष्टी आणि कलात्मकता यांचा आकर्षक मिलाफ असणारी निशा ( राखी ) त्याच्या ऑफिसात आणि जीवनात प्रवेश करते . निशा आधीच पोळलेली असते . तिच्या प्रियकराच्या ( शशी कपूर ) अकाली मृत्यूच्या धक्यातून ती अजून सावरलेली नसते .इथे कलाकारांची निवड अत्यंत योग्य केलेली आहे . शशी कपूर आणि ऋषी कपूर ह्यांच्या मधील साम्य कथेच्या दृष्टीने खूप उपयुक्त ठरलंय .
.
. . करणच्या प्रत्येक हालचालीत निशाला शशी दिसतो . ती त्याच्यात गुंतत जाते . आपल्या अधुऱ्या प्रेम कहाणीची स्वप्नं ती करणच्या सहवासात बघायला लागते . ह्या प्रगल्भ , परिपूर्ण , बुध्धिमान पुरंध्रीच्या प्रेमपाशात करण पूर्णपणे अडकतो .
. . आओ मनाये जश्ने मोहब्बत
. . जाम उठाये , जाम के बाद
.
. . आयुष्यातील आनंदाचे चषक दोघेही बेधुंद होऊन चाखतात . निशाने करणची उष्टी सिगरेट ओढणं , त्याच्या उष्ट्या चषकामधून वारुणीचा स्वाद घेणे ; हे सर्व निशाच्या मित्राला अस्वस्थ करतं ( परीक्षित सहानी ) हे संबंध लपून राहण्यासारखे नसतात आणि कोणाला मान्य होण्यासारखे पण नसतात , करणच्या वैवाहिक आयुष्यात आगडोंब उसळतो . तम्सी पण सहजासहजी हार मानणारी नसते . निशाच्या आयुष्यात उलथापालथ घडते . अपमान , मानहानी , तिरस्कार तिच्या वाट्याला येतो .
.
. . करणच्या गध्ध्ये पंचविशीला हा उतावीळपणा शोभेसा होता पण निशाच्या वयानुरूप आलेल्या प्रगल्भतेला हा उतरणीचा रस्ता कुठे नेणार आहे ते कळत होतं . करण तिच्यावर प्रेम करत असतो पण ती करणवर प्रेम करीत नसते तर त्याच्यात दडलेल्या शशी वर प्रेम करत असते ! करण असतो , ' दुसरा आदमी " शशी नसतोच !
.
. . धुक्याने गच्च भरलेल्या जंगलात , कुणालाही न जुमानता करण तिला पुन्हा पुन्हा साद घालतो , आमंत्रण देतो ,
. . ' क्या मोसम है
. . दो दिवाने दिल
. . ' चल कही और निकल जाये . '
.
. . अत्यंत विचारपूर्वक , अतीव वेदनेने , मनाला लगाम घालून , भावनांना बांध घालून निशाने कठोर निर्णय घेतलेला असतो ,
. . ' अच्छा है संभल जायें '
. . त्याच्या आर्त हाकेकडे अत्यंत उदासपणे दुर्लक्ष करून ती धुक्यात हरवलेल्या वाटेवरून निराशेच्या अंधारात नाहीशी होते .
.
. राखीला उत्कृष्ट अभिनेत्री आणि उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून nomination मिळालं होतं . करण जोहरचा , ' ए दिल है मुश्कील ' हा सिनेमा ह्याच कथानकावर आधारीत आहे . ह्यात रणबीर ( पुन्हा कपूर ! ) ऐश्वर्या आणि अनुष्का यांनी ह्या भूमिका केल्या आहेत . कोणाच्याही मनाला भुरळ घालेल असंच हे कथानक आहे . महाजालात सापडला तर नक्की बघा ! पण जरा सांभाळून , ' दुसरा आदमी ' नावाचा रामसेचा पण एक सिनेमा आहे ! तेव्हां जरा काळजी घ्या !
______________________________________________________ #सुरेखा_मोंडकर

मैसी साहब ( सिनेरंग )

#सिनेपरिक्षण मैसी साहब , ( Massey Sahib )
.
. . फारशी उंची नाही , खरं म्हणजे ज्याला बुटकाच म्हणता येईल असा !, देखणेपणाचा लवलेश नाही , सर्वसाधारण , सर्वसामान्य , चारचौघां सारखा ..किरकोळ शरीरयष्टीचा ; सामान्य , अती सामान्य , ज्याला काल पर्यंत कोणी ओळखतपण नव्हतं असा माणूस एका दिवसात प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन बसतो , देशातच नाही तर परदेशात पण , आपल्या नैसर्गिक अभिनयाच्या जोरावर मान सन्मान मिळवतो ; लोक मान्यता , राज मान्यता मिळवतो . १९८५ मध्ये आलेल्या मैसी साहब , ह्या सिनेमाने , रघुवीर यादव ह्या अभिनय निपुण कलाकाराला हे वैभव मिळवून दिलं .
.
. . रघुवीर यादवचा हा पहिलाच चित्रपट . जेव्हां त्याला ही भूमिका मिळाली तेव्हां आपण क्यामेर्याला कस तोंड देऊ शकू ह्याचीच त्याला काळजी वाटत होती .फ्रान्सिस मैसी च्या भूमिकेत तो इतका चपखल बसला की जणू काही ती भूमिका त्याच्यासाठीच बेतली गेली होती . दिग्दर्शक प्रदीप कृष्ण यांचा पण हा पहिलाच दिग्दर्शित सिनेमा . संगीत दिलं होतं वनराज भाटीया यांनी . रघुवीर यादवला अभिनयाची दोन पारितोषिके मिळाली . राष्ट्रपतींच्या रजत कमल पारितोषिकाने त्याला गौरविण्यात आलं .
.
. . Mister Johnson ह्या Joyce Cary ह्यांच्या कादंबरीवर हा चित्रपट आधारित आहे . चित्रीकरण मध्य प्रदेश मधील पंचमढी इथे केलं आहे . कथानक ब्रिटीश काळात घडतं .मैसी ; अतिशय चलाख , हुशार , जिद्दीने आपल्याला हवं ते मिळवणारा ! आपल्या व्यक्तिमत्वातील सगळ्या लंगड्या बाजूंवर , आपल्या हरहुन्नरी स्वभावाने मात करणारा ! इच्छित प्राप्त करून घेण्याचं कौशल्य तर त्याच्यात होतंच , फक्त आपल्या मर्यादांचं त्याला भान नव्हतं
.
. . त्याला आवडलेली एक आदिवासी मुलगी , तो पत्नी म्हणून कशी मिळवतो , तिला उच्चवर्णीयां प्रमाणे राहणीमान शिकवायचा प्रयत्न कसा करतो , हे सर्व प्रत्यक्ष पाहण्यासारख आहे . त्याच्या पत्नीचं काम करणारी कलाकार पण नवखीच होती . ह्या सिनेमात तिला अभिनयाचं बक्षीस मिळालं नाही पण १९९७मध्ये The God of small things साठी तिला बुकर पारितोषिक मिळालं .हो , ही भूमिका केली आहे , अरुंधती रॉय हिने ! .तो क्रिश्चन असतो , त्याला इंग्लिश येत होतं , Deputy Commissioner's Office मध्ये तो क्लर्क असतो . तेवढ्या भांडवलावर तो स्वतःला त्याच्या बरोबरीच्यां पेक्षा वेगळा मानत होता , गोऱ्या ओफिसरांच्या बरोबरीचा !मैसी साहेब , " बाबू" ! वाटेल त्या परिस्थितीत , इकडची दुनिया तिकडे करून आपल्या गोऱ्या वरिष्ठांना खुश ठेवायचं , त्यांची मर्जी सांभाळायची , त्या साठी वाटेलत्या लटपटी करायच्या , उलाढाली करायच्या हेच त्याचं उद्दिष्ट होतं . त्याच्या साहेबाचं Adam चं , अपुऱ्या पैशां मुळे अर्धवट राहिलेलं , रस्ता बांधणीचं काम पूर्ण व्हावं , आपलाही फायदा व्हावा , पैसे मिळावेत , मोठेपणा मिळावा , गोऱ्या साहेबाच्या नजरेत आणि मनात आपण भरावं म्हणून तो जीवतोड मेहनत घेतो . त्यातूनच त्याच्या कडून काही बेकायदेशीर कृती घडतात . चोपड्याना , लेखी पुराव्यांना महत्व देणाऱ्या ब्रिटीश सरकार कडून त्याला नोकरीवरून हाकलण्यात येतं , अपमानित करण्यात येतं . ज्याच्या साठी त्याने हे सगळं केलं ; ज्याच्या भरोशावर तो होता , तो Adam ही त्याला काही मदत करत नाही . तो निष्ठुरपणे कायद्याच्या , पुराव्यांच्या बाजूने उभा राहतो .ह्या काळ्या नेटीवाशी त्याचे भावबंध कुठेच जुळलेले नसतात ! ह्या सर्व भानगडी मुळे त्याच्या बायकोला आणि छोट्या मुलाला देखील तिच्या माहेरची माणसं जबरदस्तीने परत घेऊन जातात . परिस्थितीचा , दैवाचा तडाखा बसलेला मैसी ह्या सर्वातून बाहेर यायचा जीवतोड प्रयत्न करतो . कमालीचा क्रोध , असहायता ,ह्यामुळे एक अविवेकी .. अविचारी कृती त्याच्या हातून घडते . त्याला मदत नाकारणाऱ्या , त्याच्या मित्राचा त्याच्या हातून खून होतो . एका उत्साहाने भरलेल्या , आशा आकांक्षांनी उफाळणाऱ्या वैविध्यपूर्ण व्यक्तिमत्वाचा असहाय , करुण अंता कडे प्रवास सुरु होतो.
.
. . माणसाचं बहुरंगी , बहुआयामी व्यक्तिमत्व मोठ्या खुबीदार पणे इथे व्यक्त झालं आहे . अनेकरंगी माणूस , स्वार्थी , अहंकारी . आपल्याच तोऱ्यात राहणारा , प्रेमळ प्रेमिक , वत्सल बाप , चापलुसी करणारा , जिंकणारा , हरणारा , हताश होणारा .. खरंच , माणसा किती रंग तुझे ! सिनेमा आपल्याला गुंतवून ठेवतो . काळ्यापांढऱ्या रंगातला हा सिनेमा आपल्या समोर बहुरंगांची उधळण करतो .विचाराला प्रवृत्त करतो . ब्रिटीशकालातील वास्तव आपल्यासमोर उलगडून ठेवतो
____________-
#सुरेखा मोंडकर

मृगया ( सिनेरंग )

मृगया
.
. . सणसणीत लोखंडाच्या कांबी सारखं शरीर , काटक , सडसडीत . अंगावर गुंजभर देखील जास्तीचं मांस नाही . काळा सावळा तजेलदार वर्ण . हसल्यावर पांढरेशुभ्र दात असे चमकतात , एका दिव्याच्या जाहिरातीत दाखवतात ना ; अगदी तस्से ! बळकट बाहू , ,मळकट पावले असलेले , लांब , भक्कम पाय . डोळे तर इतके बोलके की त्याला काही बोलायची गरजच नव्हती . ते डोळे , कधी निष्पाप , कधी त्यात आशेचे डोह भरलेले , कधी व्याकूळ , कधी खट्याळ , कधी प्रेमाने ओथंबून जाणारे , कधी राग , कधी क्रोध . कधी सुडाने पेटलेले तर कधी निखारे फुललेले . कधी हताश , अचंबीत झालेले ! वर्षोनुवर्ष तेलपाणी लागले नसतील असे डोक्यावरचे धुळकट काळे , विखुरलेले केस . ह्या कलाकाराने ' घिनुआ ' ही आदिवासी तरुणाची भूमिका आपल्यापुढे साकार केली आणि पदार्पणातच सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं पारितोषिक पटकावलं .
.
. . मृणाल सेन यांचा ' मृगया ' हा सिनेमा ७६ मध्ये आला . त्यातील घिनुआ ची , पारितोषिक मिळवणारी भूमिका केली होती मिथुन चक्रवर्तीने . त्याच्या पत्नीची भूमिका केली होती ममता शंकर यांनी . दोघांचाही तो प्रथम पदार्पणाचा सिनेमा होता .
.
. . मृगया म्हणजे शिकार ; शाही शिकार The Royal Hunt ! साधारण १९३०मध्ये घडणारी ही घटना आहे . ओरिसा मधील दगडधोंड्याने भरलेल्या, घनदाट जंगलातील आदिवासींच जीवन ह्यात चितारलं आहे . अभावग्रस्त , कसेबसे जगणारे हे संथाल चहुबाजूनी नाडले गेले आहेत . जंगली जनावरं त्यांच्या शेतीची धुळदाण करतात . जमीनदार त्यांचं आर्थिक , शारीरिक शोषण करतो , त्यांच्या स्त्रियांवर अत्याचार करतो .त्यांचा त्राता कोणीच नसतो . तिथे एक ब्रिटीश ऑफिसर येतो . त्याला शिकारीची आवड असते . मृगया ! जिवंत हरीण पकडून आणणाऱ्या चपळ घिनुआ वर त्याची मर्जी बसते . त्याने जर big game केला तर तो घिनुआला मोठ्ठ बक्षीस देणार होता .
.
. . मुख्य कथानकाला एक समांतर कथानक पण आहे . त्याच गावात दऱ्याखोर्यात लपून काम करणारा एक क्रांतिकारी असतो . लोकांची त्याला सहानुभूती असते . त्या मुळे त्याला पकडणं मुश्कील असतं . तो गावात , आपल्या आईला भेटायला आलेला असताना , एका गुन्ह्यात त्याला अडकवून , त्याला ठार मारण्यात येतं आणि त्या बद्दल मारेकऱ्याला सरकार कडून बक्षिस ही मिळत .
.
. . गावातील सावकार, घिनुआ च्या पत्नीला, डुंगरी ला आपल्या हवेलीत पळवून नेतो . तिच्या अब्रूच रक्षण करण्यासाठी घिनुआ सावकाराला ठार मारतो .जंगलातील सगळ्यात खतरनाक जनावराला त्याने ठार मारलेलं असतं , पाड्यावरील लेकीसुनांची इज्जत घेणाऱ्या क्रूरकर्माची त्याने शिकार केलेली असते . ह्याहून मोठा big game कोणता असू शकतो . त्याच्यावर प्रेम करणारा ब्रिटीश अधिकारी त्याला कबूल केल्या प्रमाणे बक्षीस देणार ह्या अपेक्षेने , मोठ्या आशेने , एखाद्या वीरासारखा घिनुआ त्या अधिकाऱ्याकडे येतो . पण त्याच्या पदरी निराशा पडते . कोर्टात त्याच्यावर खुनाचा आरोप सिद्ध होऊन त्याला शिक्षा होते . एका क्रांतिकारकाच्या खुनाला बक्षीस आणि एका मनुष्यरूपी क्रूर जनावराला मारणाऱ्याला शिक्षा ; हा हिशोब निष्पाप घिनुआला समजतच नाही .
.
. . भगवतीचरण पाणीग्रही यांच्या कथेवर हा सिनेमा आधारित आहे . ब्रिटीश ऑफिसर आणि स्थानिक आदिवासी यांच्या संबंधावर ह्यात प्रकाश टाकला आहे . ह्या सिनेमाला तेव्हां उत्कृष्ट सिनेमाचं पारितोषिक मिळालं ; फिल्मफेअरचं क्रिटिक अवार्ड मिळालं . मैसी साहब १९८५ मधील . हा ७६ मधील ! जमल्यास दोन्ही चित्रपट एकामागून एक बघा , म्हणजे कथानक वेगळ असलं तरी , त्यातील साम्य स्थलं लक्ष्यात येतील .
.
.________________-
#सुरेखा मोंडकर

अचानक ( सिनेरंग )

.....काल दुपारी थोडा रिकामा वेळ होता , यू ट्यूब वर फिरता फिरता जुना " अचानक " हा सिनेमा दिसला . पूर्वी जेव्हां आला तेव्हां , म्हणजे १९७३ मध्ये , मी थेटर मध्ये पाहिला होता . पण काल पुन्हा पाहिला . रहस्यपट आहे ! असे सिनेमा खरं म्हणजे एकदा त्यातील रहस्य कळल्या नंतर , पुन्हा पाहण्यात काही मजा नसते .तरी देखील तो इतक्या काळा नंतर पुन्हा बघावासा वाटला ... आणि तेवढाच थरारक वाटला .
ह्या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्यातील रहस्य तेव्हां देखील जगजाहीर होतं . एका खऱ्या घटनेवर आधारित असा हा सिनेमा आहे, N. C. Sippy प्रस्तुत आणि गुलजारजीनी दिग्दर्शित केलेला सिनेमा . १९५९ / ६० मध्ये नानावटी _ आहुजा खून खटला जबरदस्त गाजला होता . तेव्हां तर टीवी नव्हता , ढोल बडवणारी अनेक च्यानेलस नव्हती , तरी देखील ह्या खटल्याकडे सर्वांचं लक्ष वेधलेलं होतं . असं म्हणतात की त्या खटल्याचं विस्तृत आणि परिपूर्ण वार्तांकन करणारं ब्लिट्झ हे पंचवीस पैशाला मिळणारं वर्तमानपत्र काळ्याबाजारात दोन .. अडीच रुपयांना विकलं जात होतं . ह्या खटल्या मुळे घडलेल्या अनेक एकमेवाद्वितीय गोष्टीं पैकी ही एक !
सहा फुट उंच , देखणा , गोरापान , तरणाबांड नौदल अधिकारी , कमांडर नानावटी,! त्याची लावण्यवती ब्रिटीश पत्नी सिल्विया ,! नानावटींचा जिगरीदोस्त प्रेम आहुजा ! .. असा हा प्रेमाचा त्रिकोण . नानावटी दाम्पत्याला दोन मुलगे आणि एक मुलगी ! नानावटीला जेव्हां पत्नीच्या ह्या प्रेम संबंधा बद्दल कळलं तेव्हां त्यांने आहुजाच्या घरी जाऊन शांतपणे सर्विस रीवोल्वर ने त्याचा खुन केला . ..तीन गोळ्या झाडून ! उच्यभ्रू , ऐश्वर्यसंपन्न , पंडित नेहरूं पासून तत्कालीन संरक्षण मंत्री कृष्ण मेनन पर्यंत जवळीक असणाऱ्या , उच्य पदस्थ व्यक्तींच्या हातून घडलेला अपराध.. सर्वोच्य मानला जाणार गुन्हा .. नवऱ्याने बायकोच्या प्रियकराचा केलेला खून ! स्वतंत्र भारतात घडलेली बहुदा ही पहिलीच अशी घटना होती.जेव्हां कोर्टात हा खटला चालायचा , तेव्हां हजारो लोक ऐकायला , पाहायला गर्दी करायचे .हा खटला लढवत होते तेव्हांचे नामवंत कार्ल खंडाळवाला आणि राम जेठमलानी .
ह्या खटल्या पर्यंत " ज्युरी पध्दत " होती . तीच शेवटची . त्या नंतर ती पध्दत बंद झाली .
ह्या खून खटल्यात असणाऱ्या नाट्याच कलाकारांना खूप आकर्षण वाटलं . १९६३ मध्ये , सुनील दत्त .. सौंदर्यवती लीला नायडू आणि रेहमान यांचा , " ये रास्ते हैं प्यारके " हा सिनेमा निघाला . ह्याच सत्य घटनेवर आधारीत . मराठी कलाकारांना देखील ह्या कथानकाचा मोह पडला . मधुसूदन कालेलकर यांनी , " अपराध मीच केला " हे नाटक लिहिलं . त्यात देखणा अभिनेता , अरुण सरनाईक काम करीत होते . आचार्य अत्रेंचं , ' तो मी नव्हेच " धोधो चाललेलं असतानाच ह्या नाटकाने पण मराठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं .
ह्या तिन्ही कलाकृतीमध्ये मुलांचा उल्लेख केलेला नाही . अचानक मध्ये देखणा , ऐन उमेदितला विनोद खन्ना आणि लिली चक्रवर्ती भूमिका करतात . त्यात एकही गाणं नाही , स्वप्न दृश्यात पण नृत्य नाही . नायिकेला भिजवलेलं नाही . सुटलेल्या कड्या खूप आहेत .तरीसुद्धा सिनेमा बघण्यासारखा आहे . ह्यात नायक पत्नीच्या प्रियकराला गोळ्या झाडून मारतो आणि अपरंपार प्रेम असणाऱ्या पत्नीला पण मारतो . " ये रास्तें हैं प्यार के " मध्ये पत्नी शेवटच्या कोर्ट सीन मध्ये , पतीच्या बाहुपाशात आपल्या " अपराधाची " टोचणी सहन न होऊन प्राण त्याग करते . वास्तवात नानावटीला तीन वर्षे तुरुंगवास भोगल्या नंतर शिक्षा माफ होते . त्याच रात्री पत्नी, मुलांसह देशत्याग करून तो क्यानडाला निघून जातो . तिथे आपलं पुढचं आयुष्य व्यतीत करतो .
अचानक मध्ये प्रमुख पात्राला फाशीची शिक्षा होते . अत्यंत बिकट शारीरिक अवस्थेमधून डॉक्टर अनेक ऑपरेशन्स करून विनोद खन्नाला बरे करतात . , त्याला नंतर फाशी देवून शिक्षा बजावली जाते . "मैं अपने धर्मसे मजबूर हुं और कानून अपने धर्मसे ! " ... पेशंटला जीवतोड मेहनत करून , मृत्यूच्या जबड्यातून बाहेर काढणाऱ्या , डॉक्टर चे हे वाक्य आपल्याला अनेक प्रश्नांच्या भोवऱ्यात टाकत . कमी खर्चात , आपल्याला माहित असणाऱ्या कथानका वर काढलेला सिनेमा .... पुन्हा पाहण्यासारखा नक्कीच आहे .
अचानक ... पाहताना मन पाखरू खूप मोठी सफर करून आलं , जे जे मनात आल ते शब्दात उतरलं !
सुरेखा मोंडकर

किरण आशेचा ( कविता )

~ किरण आशेचा
.
दिवसभर दौडत आलेल्या शिलेदारांनी
अखेर इंद्राची वखार लुटली
आपल्या विजयाच्या रंगीबेरंगी पताका
आकाशाच्या मैदानात रोवल्या
सोने चांदी ; हिरे मोती ; रत्न माणकांच्या मोहरा
आकाशभर उधळल्या
चौखूर टापांची सिंदुरी रंगपंचमी
क्षितिजापार पसरली .
सांज आली , विश्वासाने अंधाराच्या बाहुपाशात
अलगद मिसळून गेली .
वितळणार्या चांदीच्या रसात
आपलं अस्तित्व विसरून
वाट बघत राहिली ;
प्रभातीच्या सुवर्ण किरणांची !
रातकिड्यांची कर्कश्य किरकिर
झाडांच्या निस्तब्ध भयाण सावल्या
निशब्द शांतीचा आक्रमक पहारा ;
सर्वांचं परिवर्तन होणार आहे ,
आनंदाच्या , उत्साह्भारीत ,आशेच्या किरणात
उद्याच्या , बाल रवीच्या आगमना नंतर !
.
सुरेखा मोंडकर

हे नक्की काय असतं ( ललित लेख )

. हे नक्की काय असतं ... ( माझे ठाणे )
.
.
. . काही म्हणजे काय , बऱ्याच वर्षा पूर्वीची गोष्ट आहे .आमच्या पाचपाखाडी विभागात फुटपाथवर , जागोजागी सिमेंटचे छान , आरामशीर बाक टाकले गेले . मला ही कल्पना खूप आवडली . त्या बाकांचा चांगला उपयोग केला जायचा . बऱ्याचवेळा , चालण्यावर मर्यादा आलेले , घरात बसून बसून कंटाळलेले वृध्द तिथे निवांत बसायचे . एक आहे म्हणून दुसरा पण यायचा , त्यांचा छान वेळ जायचा . माणसात आल्यासारखं त्यांना वाटायचं . एका बाकाच्या जवळच शाळेच्या बस चा थांबा होता . शाळेच्या वेळेला तो बाक दप्तरांनी भरून जायचा . मुलांच्या आणि त्यांच्या पालकांच्या घोळक्याने वेढून जायचा .
.
. . जेमतेम महिना पण झाला असेल , नसेल ; सकाळी फिरायला बाहेर पडले , पाहते तर काय हे सगळे बाक फोडून टाकलेले .आदल्या रात्री तर त्यावर छोटूला गाड्या दाखवायला घेऊन बसले होते मी आणि सकाळी तो मोडून पडलेला !! अगदी छिन्नविछिन्न करून टाकलेला ; त्याचे पाय पण फोडले होते . म्हणजे कोणीही क्षणभर त्यावर टेकू पण शकत नव्हतं . खूप हळहळले ! अगदी आमच्या झोपायच्या खोली समोर रस्त्यावर येणारा तो बाक , .. जी अवस्था झाली होती त्यावरून अवजारांनी , हत्यारांनी , त्याची वासलात लावली होती ; पण आम्हांला कोणाला पत्ता पण लागला नव्हता ! जाग आली नव्हती !बरेच दिवस ते तसेच तिथेच पडलेले होते ; उद्वस्त ! नंतर काही काळाने तिथे त्याहून सुंदर लाकडी बाकडी ठेवली गेली . हिरव्यागार रंगाने रंगवलेली ! लोक त्यांचा उपयोग करताहेत ;अजून तरी ती आहेत ; पण मधल्या काळात माझी नातवंड मोठी झाली . ; गाड्या आणि रिक्षा , डोळे विस्फारून बघायच्या पलीकडे गेली . स्वतःच्या सायकली चालवायला लागली . ह्या नव्या बाकांवर बसायचा योग मला आला नाही .
.
. . माझा लाडका कचराळी तलाव ! खरं म्हणजे हे उदकाचे तळे , एखाद्या कहाणीत शोभावे असे रत्नजडीत आहे . कोणत्याही मोसमात हा तलाव तिलोत्तम असतो .तळ्याच्या भोवती बांध आहे . तलावाची मर्यादा आखण्यासाठी बाहेरूनही रुंद कठडा करून लोखंडी कांबीचं कुंपण घातलं आहे . हे लोखंडी कुंपण जमेल तेवढं आणि तिथे तोडलेलं , वाकवलेलं असतं . बसण्याच्या हेतूने केलेल्या बांधावरच्या फरशा फोडलेल्या असतात . खरं म्हणजे हे बांधच फोडून टाकलेले असतात . तळ्यात प्लास्टिकच्या पिशव्यांसहीत निर्माल्य टाकलेलं असतं ! तरी देखील हा तलाव कमालीचा देखणा दिसतो ! जातीच्या सुंदरा सारखा ! महापालिकेने त्याचे सुशोभीकरण केलं . आखीव रेखीव जागा करून नवीन झाडं लावली . मुलांसाठी भरपूर वाळू आणि खेळाची साधनं असणारा , खास त्यांचा सुरक्षित हिस्सा केला . त्याच्या सभोवती बुटका बांध टाकला . त्यावर पालकांना , मुलांकडे लक्ष देण्यासाठी बसता येतं .चालायच्या रस्त्यावरचे पेव्हर ब्लॉक्स तुटले होते . लक्ष नसलं तर अडकून पडायला व्हायचं. तिथे छान कॉन्क्रीटचा रस्ता केला . व्यायामासाठी जागृत असणाऱ्या लोकांनी हा रस्ता सकाळ संध्याकाळ फुललेला असतो !
.
. . हे काम हळूहळू बरीच वर्षे चाललं आहे . झाडं आता मोठी झाली आहेत . मध्यंतरी शेलाट्या पाम वृक्षांना कलात्मकरित्या रंगविण्यात आलं . इतकी गोड दिसत होती ती ! रंगीबेरंगी वस्त्रं परिधान केलेल्या उदबत्ती सारखी . जी झाडं तोडली होती त्यांनाही रंगांनी सजवलं होतं .विध्वंस क्षणात करून टाकता येतो , पण काही घडवायचं असेल तर त्याला खूप काळ , मेहनत आणि कल्पकता लागते . हे पाम रंगवायचं कामही महिनाभर तरी चाललं होतं . संपूर्ण तळ्याभोवतीचे पाम रंगवून झाले . संध्याकाळी फिरायला गेलेली मी , दिवेलागणी झाल्यावरही तिथेच बसून राहिले . तो शांत तलाव ,; त्यातील रंगीबेरंगी प्रकाशाची उधळण करणारं कारंज , दुर्गा विहारच्या जांभळ्या दिव्यांच्या रोषणाईची आणि आजूबाजूच्या उंच इमारतींची त्यात पडलेली प्रतिबिंब .आणि घेराव घालून असणारे समारंभासाठी सजून धजून असणारे ते पाम ! जे वेड मजला लागले .. ते वेड तुज लागेल का !! असच वाटत होतं , तिथून पाय निघत नव्हता .
.
. . दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये वाचलं , पर्यावरणवाद्यांनी हरकत घेतली होती . झाडांच्या आरोग्याच्या दृष्टीने ते रंग म्हणे हानिकारक होते . ते म्हणताहेत म्हणजे असणारच ! अरे ; पण मग इतके दिवस तुम्ही काय करत होता . शेवटच झाड रंगवून होई पर्यंत का थांबला होता ? जे झाड प्रथम रंगवलं , ज्याने इतके दिवस तो रासायनिक रंग अंगावर वागवला , त्याचं काय ! त्याच्या आरोग्याचं काय ! ज्यांना झाडांच्या आरोग्याची काळजी आहे त्यांनी इतके दिवस थांबावं ? आपल्या दिरंगाईमुळे त्या पहिल्या झाडांचा बळी द्यावा ? आता ते रंग उतरवले जाताहेत ! अरे , त्यासाठी पण रसायनेच वापरणार ना ??
.
. . काल वर्तमानपत्रात वाचलं , चार मुलांनी पहाटे बागेत घुसून मोडतोड केली .वस्तूंची वासलात लावली . सौंदर्याची बरबादी केली . आज टीवीवर दाखवलेलं सीसी टीवी फुटेज पाहिलं . ती विध्वंस करणारी मुलं अगदी आरामात फिरत होती , मोड तोड करत होती . गोड हसत होती . क्रौर्य , , दुष्टपणा निदान त्यांच्या चेहऱ्यावर तरी दिसत नव्हता . .कोणतंही हत्यार न वापरता लाथा मारून वस्तू तोडत होती .एवढी शक्ती .. एवढी उर्जा होती त्यांच्यात ? मग त्याचा सकारात्मक उपयोग करावासा त्यांना का वाटत नव्हतं ? किरकोळ शरीरयष्टीची , सर्वसामान्य दिसणारी , अगदी रोज आपल्याला भेटणार्या , आपल्याला स्माईल देणाऱ्या , ओळखीच्या किशोरवयीन मुलांसारखी दिसणारी ही विध्वंसक मुलं होती .कुठून , कशी येते ही विकृती त्यांच्यात ? सौंदर्याला कुरूप बनवणं , नायनाट करणं , हा एखाद्याचा खेळ होऊ शकतो ? सगळंच अचंबित करणारं !
.
. . जर काही चांगल्या , सुशोभिकरणाच्या , उपयुक्त गोष्टी केल्या तर त्या निदान आहेत तशा टिकवणं आपलंच काम नाहीये का ?सगळं सरकारने केलं पाहिजे ! पण जे आपल्याला जमण्यासारखं आहे तेवढंही आपण नाही करणार का ? म्हणजे आहे ते सांभाळणं ...??#सुरेखा_

अनेक प्रश्न ( ललित लेख )

अनेक प्रश्न
.
ह्या वर्षी आमच्या गावात पण मस्त थंडी पडलीय हं ! # माडीवरची मंडळी खाली आली # म्हणजे माळ्यावर टाकलेली गरम कपडयांची ब्याग खाली उतरली ........ जगभर फिरताना .... ह्यांचा आपल्याला काहीही उपयोग नाही .....हे माहित असूनही ....त्यांच्या कलाकृतीचा मोह पडून ....विकत घेतलेले ...छान छान ...स्वेटर्स , हातमोजे , स्कार्फ , टोप्या ...( स्वतःला :) ) ..घालायची संधी मिळाली .
गारव्याचा ऋतू म्हणजे # भटकण्याचा मोसम #
सुट्या पण इतक्या सोयीस्कर मिळाल्या होत्या की ....जातिवंत भटक्यां साठी ....# हातात वाफाळणारा चहाचा कप ..आणि ..साथीला गरमागरम भज्यांची रास .#
थोडक्यात ......दुग्ध शर्करा योग !

आमचं गाव पण खूप छान आहे हं ! सिने दिग्दर्शकांच लाडक गाव .... # महेश मांजरेकर # नी वाखाणलेल ....# टाईमपास # आणि # होणार सून # मुळे ""जगप्रसिद्ध "" झालेलं .
(" ती" एकदा " त्या' घरची सून झाल्या नंतर , आमचं गाव त्या सीरिअल मध्ये दिसत की नाही माहित नाही !आमचा मोहरा कधीच दुसऱ्या चानेल कडे वळला आहे ........वीट आला की वळायच
त्यांनी ठरवलं पकवायचं
तरी आपण थोडंच त्यांना भुलायचं !!!!!!!!!!!!
( अरे ....तिरोळी झाली की ! :) )
कोसळणाऱ्या पावसात ....तापवणाऱ्या उन्हाळ्यात ....जेव्हां बाहेर कुठे जाता येत नाही ....तेव्हां फिरायचं आपल्या गावात ! ह्या थंडीत बाहेर भरपूर भटकतेय !
तर मी काय सांगत होते .......आत्ताच जवळच्या एका रिसोर्ट मध्ये गेले होते छोटे छोटे देखणे बंगले .....जिम .. टेनिस कोर्ट ...पोहण्याचा तलाव ...( काही उपयोग झाला नाही . पाण्यात बोट घालून पाहिलं तर बोटाच लाकूड झालं .उतरले असते तर शरीराचा ओंडका झाला असता ! )...मन प्रसन्न करणारी वनराई !
त्यांच क्लब हाउस पण होत > गावातले बरेच लोक सभासद होते < रोजच्या व्यायामासाठी त्यांचा पण तिथे वावर होता .मी morning walk साठी निघाले असताना एक BMW आली ...कोपऱ्यातल्या कचरापेटी शी थांबली ....पन्नाशीतला एक माणूस खाली उतरला ....डिकी उघडलीन ...गच्च भरलेल्या दोन मोठ्या पिशव्या बाहेर काढल्यान .....सगळ्या बिअर च्या रिकाम्या बाटल्या होत्या . दोन दोन करून त्याने त्या कचरापेटीत टाकल्या ....गाडी parking मध्ये नेवून ठेवली आणि आपली राकेट घेवून तो टेनिस कोर्ट कडे गेला .
मला क्षणभर त्याचं कौतुक वाटलं . स्वच्य्यता अभियानाचा उपयोग झाला असं वाटलं . नंतर लक्षात आल , ...त्याने बाटल्यांवर ची लेबलं काढली नव्हती किवा खरवडून खराब करून ही ठेवली नव्हती .....त्या बाटल्यांचा भेसळयुक्त बिअर विकायला उपयोग केला जाणार नाही ....ह्या साठी आपल्या परीने प्रयत्न करायला हवा होता !
आम्ही जेव्हा आमच्या घरातले जुने डबे , बाटल्या , बरण्या काढतो ,तेव्हा आमचा कचरावाला ते घेवून जातो ....मग ह्यांना का बर इकडे आणून टाकाव्या लागल्या . नंतर कळल ....ते गावातले एक प्रतिष्ठित आहेत ! मग तर मनात अनेक प्रश्न आले .....एक चेहरे पे कयी चेहरे लगा लेते है लोग .......तुमच्याही मनात काही प्रश्न आले असतील !
सुरेखा मोंडकर

उषा अनिरुद्ध कथा ( ललित लेख )

#उषा_अनिरुद्ध_कथा
.
प्रेम व्यक्त करताना , किंवा प्रणया मधे पुरुषाने पुढाकार घ्यावा असं साधारणपणे मानलं जातं . अनेकदा तर " तो विचारेल " किंवा 'ती विचारेल ' ह्याची वाट पाहताना वेळ निघून जाते . प्रेम अव्यक्तच राहाते आणि प्रेमकथेचा शेवट अप्रिय होतो .
.
ह्याला अपवाद अशा बऱ्याच तरुणी असतात . त्या धिटाईने आपलं प्रेम व्यक्त करतात आणि इप्सित साध्य करून घेतात . टीवीवर काही कार्यक्रम पाहताना प्रेमविवाहात , ' तिनेच आधी विचारलं ' असं सांगणारे बरेच तरुण आढळतात . पुराणकथांमध्ये तर स्वयंवरात जिंकल्यावर देखील , तो विवाह नाकारून आपलं दुसऱ्या पुरुषावरील प्रेम व्यक्त करणारी स्त्री , ( महाभारत -भीष्म कथा ) हवा तो पती मिळण्यासाठी घनघोर तप करणारी कन्या ( पार्वती ) , दुसऱ्याशी लग्न ठरवलं जातंय हे बघून प्रियकराला पळवून नेण्यासाठी सांगावा धाडणारी प्रेयसी ( सुभद्राहरण ) अशा मनस्वी स्त्रिया आढळतात . पण एकतर्फी प्रेम करून , प्रियकराचे रातोरात अपहरण करून त्याच्या नकळत , त्याला आपल्या महालात आणणारी " उषा " ही एकमेव राजकन्या असेल .प्रेमिकेकडून प्रियकराचे हरण झाल्याची पुराणातील कदाचित ही एकमेव कथा असेल
.
उषा अनिरुद्ध कथा मी लहानपणी चांदोबा मधे वाचली . चांदोबा मधे सचित्र ,इतक्या लोभस शैलीत कथा लिहिल्या जायच्या , की त्या कायम स्मरणात राहिल्या .
.
शोणितपूरचा दैत्य राजा बाणासूर ह्याची सौंदर्यवती कन्या उषा विवाहयोग्य झाली होती . तिच्यासाठी वर संशोधन सुरु होतं , पण एकही राजपुत्र तिच्या पसंतीला उतरत नव्हता .आई वडील हवालदिल झाले होते . राजकन्या उषाच्या सख्यांना तिच्या स्वभावात , वागण्यात होणारे बदल लक्षात येत होते .ती दिवसेंदिवस हरवल्या सारखी राहायची .एकांत प्रिय झाली होती . कधी लाजायची , कधी हसायची , कधी फुरंगटायची . एकदिवस तिने आपलं गुपित आपल्या सख्यांना सांगितलं .
.
उषाच्या स्वप्नात एक तरुण , मर्द राजकुमार येत होता . स्वप्नातच त्यांच्या प्रणय क्रीडा व्हायच्या , पण त्याच्या निशाण्या मात्र प्रत्यक्षात राजकुमारीच्या शरीरावर दिसायच्या . तिची चुरगळलेली वस्त्रे , तिच्या अंगाला येणारा पुरुषी कस्तुरी गंध , ह्या सर्व चिन्हांमुळे तिच्या सख्यापण बे चैन झाल्या होत्या .
.
तिची प्रियसखी चित्रलेखा उत्कृष्ट चित्रकार होती . उषाने तिच्या स्वप्नीच्या राजकुमाराचे वर्णन केले आणि चित्रलेखा फलकावर त्या प्रमाणे चित्र रेखाटत गेली . साकार झालेला तरुण तोच होता , जो उषाच्या स्वप्नात येत होता . ( टीवी सिरीयल मधे जेव्हां गुन्हेगाराचे वर्णना प्रमाणे चित्र काढलं जातं , तेव्हां माझा त्यावर विश्वास बसत नाही .पण असे हुबेहूब वर्णन करणारे ... आणि हुबेहूब चित्र काढणारे असतात तर ! )
.
राजकुमार तर कळला ., पण तो आहे कोणत्या देशीचा , हे कसं कळणार ? त्याचं रंग रूप , पेहराव , आभूषणे ह्यावरून चित्रलेखाने अंदाज केला की हा यादव वंशाचा असावा . कदाचित श्रीकृष्णाचाच वंश असेल . चित्रलेखा रातोरात योग सामर्थ्याने द्वारकेला गेली . श्रीकृष्णाचा महाल धुंडाळताना तिला एका शयनकक्षात मंचकावर गाढ झोपलेला तो देखणा राजपुत्र दिसला , जो तिच्या लाडक्या उषाच्या स्वप्नात येत होता . चित्रलेखाने मंचाकासह त्याला झोपेतच उचलून उषाच्या महालात ठेवले . तो होता अनिरुद्ध ! कृष्ण पुत्र प्रद्युम्नचा पुत्र !
.
अनिरुध्दने जेव्हां डोळे उघडले तेव्हां तो परक्या ठिकाणी आणि समोर एक लावण्यवती . तो थक्कच झाला . पण उषाच्या अनुपम लावण्याने तो देखील मोहित झाला . दोघांनी गांधर्व विवाह केला आणि ते नवविवाहित जोडपं उषाच्या महालात राहू लागलं .
.
ह्या सर्व कथानकावर ग . दि . माडगूळकरांनी मधुर गीत लिहिलं . आशा भोसले यांनी ते गायले आहे , संगीतबद्ध केलं आहे वसंत प्रभू यांनी ( एका ठिकाणी , संगीतकार वसंत देसाई असं आहे . पण माझ्या आठवणी प्रमाणे वसंत प्रभू च आहेत )
.
हेच ते ग , तेच हे ते . स्वप्नी येती सारखे
मूर्त केले स्वप्न तू हे , चित्रलेखे लाडके |
.
हेच डोळे ते टपोरे , हीच कांती सावळी
नासीके खालील रेषा , हीच काळी कोवळी
हेच हसरे ओठ बाई , मूक तरीही बोलके |
.
हीच छाती रुंद जेथे , मीच माथे टेकले
लाजुनिया चूर झाले , भीत डोळे झाकिले
ओळखीची माळ मी ती , हीच मोती माणके |
.
गुज करिती हे कधी ग , धरुनी माझी हनुवटी
प्रश्न पुशिती धीट केव्हां , मूठ पडते मनगटी
ओठ ओले करुनी जाती , काय सांगू कौतुके ?
.
साक्षात महाकवीने केलेल्या वर्णना नंतर मी पामर काय बोलणार . पण तुम्हांला उत्सुकता वाटत असेल म्हणून पुढील गोष्ट सांगते . इकडे द्वारकेला हलकल्लोळ माजला होता . आपल्या कन्येच्या महाली परपुरुष वास्तव्य करून आहे हे बाणासुराला पण कळले होते . कृष्ण आपल्या सैन्यासह शोणितपूर वर चाल करून आला . घनघोर युद्ध झालं . बाणासुराचा पराजय झाला , पण प्रेम जिंकलं . उषा अनिरुद्ध यांचा वैभवशाली विवाह झाला . ही प्रेमकथा अमर झाली आणि कदाचित एकमेवाद्वितीय ठरली

शुक्रवार, १९ जानेवारी, २०१८

कोहरा ( ललित लेख )

......... कोहरा ..........
आजचा morning walk ........अविस्मरणीय होता . सगळ्या गावावर धुकं पसरलं होतं __ _ खिडक्यांमधून घरात घुसत होतं ___ ____ येउरची टेकडी ..चहुबाजूनी धुक्यान वेढली होती ....झाडांचे शेंडे तर दिसत पण नव्हते .
झाडं.... फुलं.....धुक्याच्या तलम मलमली त गुरफटली होती !!! धुक्यात हरवलेली वाट .......तिच्या वरून चालताना ....एखाद्या # # भिंती वर टांगलेल्या ...भल्या मोठ्या ,,,चित्रात ..प्रवेश करते आहे असं वाटत होतं ##
झाडांची पान थोडी जरी हालली तरी डोक्यावर दवबिंदूंचा वर्षाव होत होता . तरण तलावावर धुकं हलकेच विसावलं होत . दरीतला जलाशय तर धुक्यान गच्च भरून नाहीसाच झाला होता .
.......मी दोन्ही हात पसरून त्या धुक्याला कवटाळल......कवेत घेतलं ...वाटलं ..घरी घेवून जावं त्याला ....राहायलाच ....पण ते त्याचं # निसर्ग रम्य # घर सोडून माझ्या सिमेंटच्या घरात थोडंच येणार होतं !!!!!!!!!!!!! मला गुंगारा देवून निसटलं !!!!!!!!!! आठ वाजले तरी सूर्यान आपला ,,'''मुख चंद्रमा ''''' दाखवला नव्हता ........आणि जेव्हां....माडांच्या झावळी तून ..''त्याचं'' चमकदार..चांदीच्या ...तेजस्वी ..रंगात ....क्षणभर दर्शन झालं....तेव्हां डोळे दिपून गेले .......असा # धवल कांती # सूर्य कधी पाहिला नव्हता !!!!!!!!!!
निरोप घेणारी थंडी आपले विलोभनीय " नजारे " दाखवते आहे ...तिचा हा # नखरा # पुन्हा ......पुढच्या वर्षी .....तिची इछ्या असली तरच ....दिसणार आहे ........आम्हा शहरवासियांना ...धुक्याची नवलाई आहे .
पहाटे ....पहाटे ...दुलईत गुरफटून ..झोपायला ..खूप मजा येते ....खर आहे .. पण दुलईच्या बाहेर .... रस्त्यावर ...आणखीन गंमत आहे !!!!!!! दुलई भिरकावून बाहेर तर प डा ....धुक्याच्या उदी रंगाची गंमत अनुभवा .....थंडी आता फार दिवस थांबणार नाही ...सलाम करते आहे आपल्याला !
खूप ## रत्नजडीत ## आठवणी ठेवून जातेय आपल्या साठी ....आनंदाने निरोप देवूया .....घेवूया ...!!!!!
नंतर आहेतच गरमीचे दिवस .......झोपण्या साठी !!!!!!!!!!!!!!
सुरेखा मोंडकर

नल दमयंती

#नल_दमयंती
.
काय विधीची दैवगती , वनी एकटी दमयंती
.
कोमल शय्या मृदुल तृणांची
श्रमवी काया दमयंतीची
व्याकूळ नयने शोधीत राही प्राणविसावा निषधपती
.
कोठे असशी प्राण वल्लभा
दीप तू सख्या मी तुझी प्रभा
हाक ऐकुनी येशील का रे , विनवी अजुनी किती
.
किंचित खुलली नयन पाकळी
पण नव्हता नलराजा जवळी
अश्रू विरही झरती गाली , शिणवू आपुले नयन किती
.
तरुण वयात ह्या गीता मधून दमयंती भेटली . गीत गंगाधर महांबरे यांचे आहे . संगीत दिले आहे दशरथ पुजारी यांनी . दरबारी कानडा मध्ये बांधलेले हे गीत त्यांनीच गायले आहे .
.
त्या आधी दमयंती भेटली शाळकरी वयात .विदर्भ नरेशाची ही लावण्यवती कन्या निषधराजा वीरसेन याचा पुत्र , नल ह्याच्या प्रेमात आकंठ बुडाली . विरहाने ती तडपत होती . तिला काहीही गोड लागत नव्हतं .सख्यांबरोबर विहार करण्यात तिला रस उरला नव्हता . तिचा देह तप्त झाला होता . वाळ्याच्या पंख्याचा शीतल वारा , पुष्करणीतील सुगंधी उदक , फुलांची पखरण , चंदनाची गंधित उटी ... कशाकशाचा उपयोग होत नव्हता .आई चिंतातूर झाली होती . वामन पंडितांनी , आपल्या दमयंती आख्यानामधे तिच्या ह्या अवस्थेचं मधुर वर्णन केलं आहे . ते म्हणतात ,
.
ते शीतलोपचारी जागी झाली ,
हळूच मग बोले ,
औषध नलगे मजला .. औषध नल -गे मजला
परिसुनी माता , बरे म्हणुनी डोले .
.
ह्या काव्यपंक्ती 'श्लेष ' अलंकाराचे उदाहरण म्हणून आम्हांला शिकवले होते . आणि मला वाटतं , पिढ्यान पिढ्या , मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांनी हेच उदाहरण पाठ केलेले असणार . दमयंतीने " मला औषध नको ग आई ! ' हे सांगतानाच मोठ्या चातुर्याने ' राजा नल , हेच माझं औषध आहे " हा आपला संदेश पण आई पर्यंत पोचवला होता.
.
पण मला तर दमयंती त्या आधीच भेटली होती , बाल वयात ! चांदोबा मधे !! मधल्या काळात जसे ' अमर चित्र कथा 'ने बाल विश्व समृद्ध केलं , तसं आमच्या काळात चांदोबाने आम्हांला अनेक गोष्टींचा परिचय अत्यंत सुजाण पणे , सर्व मर्यादा पाळून करून दिला . मला तर त्या गोष्टीसह दिलेलं चित्र पण आठवतंय . .... उद्यानात् , तलावाकाठी राजहंसांचा थवा आहे आणि रूपवती राजकन्या दमयंती आपली तलम , महागामोलाची वस्त्रं सांभाळत , त्यांना पकडायला , खट्याळपणे त्यांच्या मागे धावतेय .
.
अगदी आधुनिक सिनेमा मध्ये पण कबुतर प्रेमिकांचे संदेश दूत होतात . पुराणातील ह्या कथे मध्ये नल दमयंतीच्या मिलनामधे राजहंसांनी प्रेमदुतांची भूमिका बजावली आहे .
.
एकदा नल राजाला , त्याच्या महालासमोर , हिमालयावरून आलेल्या राजहंसांचा थवा उतरलेला दिसला . त्याने चपळाईने एका हंसाला पकडलं . हंसाने मोठ्या काकुळतीने राजाकडे जीवदान मागितले . नल राजाची करुणा भाकताना हंसाने त्याच्या समोर दमयंतीच्या रूप गुणांचं कौतुक केलं . दमयंतीच्या सौंदर्याचा डंका तिन्ही लोकी पोचला होता .नल आधीच तिच्यावर मोहित झालेला होता . हंसाने त्याला वचन दिलं की , राजाने जर त्याला जीवदान दिलं तर तो दमयंती कडे राजाची रदबदली करेल .
.
अर्थातच राजाने त्याला सोडून दिलं . हंसांचा तो थवा उडत उडत विदर्भ कन्येच्या पुष्पवाटिकेत येऊन पोचला . तिच्या महालाच्या उद्यानात त्यांनी मनोहर नृत्य करायला सुरुवात केली . दमयंती मोहित होऊन त्यांना पकडायला धावली . ती ज्या हंसाला पकडायची तो हंस तिच्याकडे नलाची स्तुती सुमने उधळायचा आणि तिच्या हातून आपली सुटका करून घ्यायचा . उद्यानात एकच कलरव झाला . नलाच्या रूप, गुण,शौर्याच्या कथा दिगंती पोचल्या होत्या . दमयंती पण त्या ऐकून होती . राजहंसांची शिष्टाई सफल झाली . त्या न पाहिलेल्या राजाच्या प्रेमात दमयंती दिवाणी झाली . विरहाच्या ज्वराने तिने अंथरूण धरलं .राजाने कन्येचं स्वयंवर रचलं . तिच्यावर आशिक असणारे राजे , इंद्र ,वरूण ,अग्नी , यम ह्यांच्या सारखे देव .. सर्वजण स्वयंवराला आले होते . दमयंतीने नलाला वरल्यामुळे सगळे नाराज झाले .
.
निषध देशात राणीला घेऊन आल्यावर , नलाचा भाऊ पुष्कर ह्याने ,त्याला द्यूत खेळायचं आव्हान दिलं . नलाने ते स्वीकारलं . नल त्यात सर्वस्व हरला . नल दमयंती नेसत्या वस्त्रानिशी वनवासी झाले . आपलं सर्वस्व द्यूता मधे हरून देशोधडीला लागलेल्या पांडवानी , वनवासात एका आश्रमात रात्री पुरता निवारा घेतला होता . तेव्हां पांडवांना तेथील ऋषींनी ही , त्यांच्याशी साधर्म्य असलेली कथा सांगितली असा उल्लेख महाभारतात आहे .
.
पुढील नल दमयंतीचा प्रवास अत्यंत खडतर आहे . प्रेम साफल्य झालं , पण त्यांना त्याचा उपभोग घेता आला नाही . एकदा तर थकून भागून दमयंती एका वृक्षा खाली झोपली होती . तिथे सोनेरी पंख असणारा एक हंस आला . नलाने , त्याचं मांस भक्षण करून पोट भरता येईल आणि त्याचे सोन्याचे पंख विकून मोहरा मिळतील ह्या उद्देशाने त्याला पकडण्यासाठी , नेसूचे वस्त्र त्याच्यावर टाकले . तर तो हंस त्या वस्त्रासहीत उडून गेला . राजा निर्वस्त्र झाला . तो अत्यंत हताश झाला , व्याकूळ झाला , अविवेकीपणे लज्जा रक्षणासाठी निद्रिस्थ दमयंतीच्या वस्त्रातील अर्ध वस्त्र फाडून घेऊन , त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या , त्याच्यावर प्रेम करणाऱ्या त्या सुकुमार तरुण , सुंदर राजकुमारीला , घनदाट , भयावह जंगलात , एकटीला सोडून राजा परागंदा झाला .
.
सकाळी जाग आल्यावर आपल्या अपुऱ्या वस्त्रांची आणि एकटेपणाची जाणीव दमयंतीला झाली . तिने टाहो फोडला , पण तिथे ऐकायला , तिच्या मदतीला यायला कोणीही नव्हतं . अपार यातना सोसत , मानहानी , संकटं , व्याधाकडून होणारा बलात्काराचा प्रयत्न अशा , कल्पनातीत वेदनांना तोंड देत कधीतरी , ती आपल्या माहेरी पोचली .
.
नलराजा मधे कली शिरला होता असं पुराणात वर्णन आहे . कालांतराने त्याच्यातील कली निघून गेला . नल दमयंतीची पुनर्भेट झाली . नल आपल्या राज्यात दमयंतीसह परत गेला . पुष्कर त्याचं राज्य बळकावून बसला होता . त्याने भावाला द्यूताचं आव्हान दिलं आणि गमावलेलं सर्व पुन्हा जिंकून घेतलं . पुढे नल दमयंतीने तिथे सुखाने राज्य केलं .
.
नल दमयंतीची कथा ही नुसती प्रेम कथा नाही . त्यात विविध रंग आहेत . प्रेम , पिडा , दर्द ,धोका , वंचना , फसवणूक , असूया , दैव ,विश्वासघात , निष्ठा ,संयम , वैफल्य , आत्मघात , नियती , प्रारब्ध अशा अनेक छटा आणि कंगोरे त्यांच्या कथेला आहेत ,
.
.
शेक्सपिअरिअन शोकांतिकांची जशी वर्षोनुवर्षे सगळ्या जगाला भुरळ पडली तशीच ह्या कथेची पण जगभरातल्या साहित्यिकांना भुरळ पडली . निरनिराळ्या भाषांतून ह्या कथेवर साहित्य निर्मिती झाली . शेक्सपिअरच्या अनेक नाटकांची भाषांतरे झाली . अजुनही त्या कथानकावर सिनेमा , नाटकं , कथा , कादंबर्या , काव्य ह्यांची निर्मिती होत आहे . कयामत से कयामत तक , मकबूल , हैदर , ओंकारा अशी कितीतरी उदाहरणे आपल्याला माहिती आहेत .नल दमयंतीच्या कथेने पण वाचकांवर , लेखकांवर , साहित्यप्रेमींवर युगानुयुगे मोहिनी घातली . #सुरेखामोंडकर १९\०१\२०१८