रविवार, १९ फेब्रुवारी, २०१७

छोटू


.
.~~~~~~~~~~~~ छोटूचं आणि माझं नातं म्हणजे ' अतूट बंधन प्यारका ' ! तो फक्त माझा आहे , हे सर्वांनी स्वीकारलं होतं . त्याचा उल्लेख करताना देखील , ' तुझा छोटू ' असाच व्हायचा . माझा देखील , छोटू म्हणजे जीव की प्राण .त्याच्यावर प्रेमाचा अधिकार फक्त माझा आहे ; हे माझ्या डोक्यातही अगदी फेविकॉल ने पक्कं झालं होतं . तो दीड एक वर्षांचा झाला आणि त्याच्या आई बाबां बरोबर दुसरीकडे राहायला गेला . एकाच गावात असलो तरी , अंतरा मुळे , कामातील व्यग्रतेमुळे फारसं भेटणं व्हायचं नाही !
एकदा एका समारंभाला आम्ही सगळे जाणार होतो . आम्ही आमच्या घरून आणि ते त्यांच्या घरून ! हॉलमध्ये आम्ही आधी पोचलो . मी डोळ्यात प्राण आणून
त्याची वाट पहात होते . .... आणि तो आला . आम्हांला पाहून त्यालाही प्रेमाचं भरत आलं . बाबाच्या हातून उसळी मारून तो निसटला . दोन्ही हात पसरून आमच्या दिशेनं धावत सुटला . खूप दिवसांनी त्याला पहात होते . माझे डोळे अश्रूंनी डबडबले होते ! बाजूलाच ' हे ' कौतुकभरल्या चेहऱ्यानं , हा आजू नातवाच्या प्रेम भेटीचा सोहळा बघत उभे होते . त्याला कुशीत घ्यायला मी देखील हात फैलावून त्याच्या दिशेनं पुढे सरकले . आणि......................................
तुम्ही ' लम्हे ' पाहिला आहे ? दुख्खी श्रीदेवीला भेटायला अनिल कपूर जातो . दुख्खाने व्याकूळ झालेली श्रीदेवी दोन्ही हात फैलावून धावत सुटते , अनिल कपूर तिला मिठीत घेवून , तिचं सांत्वन करायला तैय्यार राहतो . आणि ही बया त्याच्याकडे ढुंकूनही न बघता बाजूलाच असणाऱ्या तिच्या प्रियकराच्या मिठीत शिरते , जो आपल्याला आणि अनिल कपूरला नंतर दिसतो , पण तिला मात्र आधीच दिसलेला असतो !!
आता अधिक काय सांगू ! अकल्पनिय्ररित्या छोटूनं पायाला विळखा घातल्या मुळे हे पण जरा गडबडले . ह्यांनी त्याला उचलून घेतलं , पण निराशेने माझा पांढरा फटफटीत पडलेला चेहरा , अपेक्षांचा झालेला चुराडा बघून , ते मात्र कासावीस झाले .
लम्हें मध्ये त्या परिस्थितीत अनिल कपूरची भावनिक अवस्था कशी झाली असेल , हे त्या दिवशी मला चांगलंच कळलं ! कुणालाही गृहीत धरू नये , स्वामित्वाची भावना ठेवू नये हे तर चांगलंच समजलं . मुलं कधी आपल्याला तोंडघशी पाडतील ते सांगता येत नाही !
-------------
#सुरेखा मोंडकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा