रविवार, १९ फेब्रुवारी, २०१७

नटसम्राट ( सिनेमा )

.
.
.~~~~~~~~~~~~~~~~~~~ नटसम्राट ~~~~~~~~~~~~
. रविवारची दुपार म्हणजे , मन चाहेल ते करण्याचा परवाना असतो . नेहमीच नाही हं ; पण बरेच वेळेला . काल खूप दिवसांनी मला असा रिकामा , शांत , आळशी रविवार मिळाला . दुपारी यू ट्यूब वर मराठी नाटक " नटसम्राट " पाहिलं .
नटसम्राट हे सदाहरित नाटक आहे ; अजरामर ! कुसुमाग्रज म्हणजे वि. वा. शिरवाडकर ह्या सिद्हस्त , प्रतिभावान लेखकाने , प्रत्येकाला गुंतवून ठेवणारं हे नाटक लिहिलं. १९७० मध्ये दि गोवा हिंदू असोशिअशन ह्या संस्थेने हे नाटक रंगभूमीवर आणलं . तेव्हां अप्पासाहेब बेलवलकर ही प्रमुख भूमिका डॉ. श्रीराम लागू यांनी केली होती . त्यांनी बरेच प्रयोग केले . उत्कृष्ट कलाकार , ती भूमिका प्रत्यक्ष जगत असतो .ह्या शोकांतिकेचा कलाकारावर मानसिक ताण येतो .मन: स्वास्थ्या वर परिणाम व्हायला लागल्यावर डॉ. लागूनी ही भूमिका सोडली . नाटक सुरूच राहिलं होतं . त्यानंतर सतीश दुभाषी , यशवंत दत्त अशा अनेक कलाकारांनी ही भूमिका साकार केली . हे शिव धनुष्य होतं . येरागबाळयाला पेलण्या सारखं नव्हतं . ही भूमिका साकारणे हे कलाकाराला आव्हान होतं . नामवंत अभिनेते ही भूमिका मिळणे म्हणजे आपले भाग्य मानत असत ; ते त्यांचं स्वप्न असे .
मी डॉ. लागूंची भूमिका पाहिली ; तेव्हां सरकार होत्या शांता जोग . नंतर दत्ता भट यांनी साकारलेली व्यक्तिरेखा पाहिली . ऐशीच्या पहिल्या पंचकात दूरदर्शनवर देखील हे नाटक सादर करण्यात आलं होतं . शेक्सपिअरच्या एकाहून अनेक कलाकृतीवर हे नाटक बेतलेलं आहे . पण हे भाषांतर किवा रुपांतर नाही . तात्यासाहेब शिरवाडकर यांनी त्याला अस्सल मराठी मातीचा , वातावरणाचा , कुटुंब संस्थेचा गंध दिला आहे .
काल नटसम्राट पाहताना ते सगळे मंतरलेले दिवस ; एकंदरीतच रंगभूमीचा सुवर्णकाळ आठवला .ह्या नाटकाचं चित्रीकरण श्रीराम लागूंच्या उतार वयात , त्यांना कंपवात सुरु झाल्यावर केलेलं आहे . भूमिकेला ते अत्यंत शोभून दिसतात . नाटकाचं लेखन पण दमदार आहे . शिरवाडकरांची स्वगते लागूंनी अतिशय सहजपणे पेलली आहेत . त्यांचे उच्चार , शब्दांची फेक , शब्दांचं वजन , प्रेक्षकांपर्यंत नेमका आशय पोचवण्याच सामर्थ्य ; आपल्याला अचंबित करतं . सुरकुतलेल्या चेहऱ्या वरचे भाव ; डोळ्यातील विषण्णता , हाताशता , आनंद , दुखः , वेदना , समाधान - नाना भावना आपल्या काळजाला हात घालतात . नाट्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांना हा एक वस्तूपाठ आहे
अप्पासाहेब आणि सरकार मुलीकडे जायला स्टेशन वर उतरतात . खूप वाट पाहिल्या नंतर गडबडीने ; समाधानाने दोघेही मुलीकडे जायला निघतात . बरोबर आणलेला फिरकीचा तांब्या आणि हातात धरायची काठी तिथेच विसरतात . ( खऱ्या नाटकात नाही हं! चित्रित नाटकात ! ह्याला आम्ही' दिग्दर्शकाच्या डुलक्या' म्हणतो ) फिरकीचा पितळी तांब्या इतका सुबक होता . माझ्या अगदी मनात भरला होता . नाटकाशी मी इतकी एकरूप झाले होते की न राहवून दोनदा तीनदा ओरडले , " सरकार , तांब्या राहिला ! " पण कोणी माझ्याकडे लक्षच दिलं नाही . ढुंकूनही पाहिलं नाही . माझा जीव हळहळत राहिला. शेवटी एका प्रसंगात तो तांब्या टेबलावर दिसला ; तेव्हां कुठे माझा जीव तांब्यात .. म्हणजे आपलं... भांड्यात पडला .
आता नटसम्राट सिनेमा विषयी . थांबा थांबा , पळू नका . मी त्या बद्दल काहीही लिहिणार नाहीये . कारण मी अजून तो पाहिलाच नाहीये . काही आठवडे सिनेमा धोधो चालल्या नंतर त्यात ' नाना आणि विक्रम गोखले ' यांचा एक सीन नव्याने घातल्याचं जाहीर करण्यात आलं . सिनेमा धावायला लागला . आतल्या गोटातून बातमी आहे की पुढच्या आठवड्यात ' विक्रम गोखले आणि नाना ' यांचे आणखीन एक दृश्य नव्याने घालण्यात येणार आहे . मी तेव्हां सिनेमा पाहणार आहे . तर.... पुढच्या आठवड्यात लिहीन ' नटसम्राट ' सिनेमावर !!
#सुरेखा मोंडकर
०८/०२/२०१६

अनुभव


.
.
आमच्या गावात माध्यमिक आणि पुढील शिक्षणाची काही सोय नव्हती . शिक्षणासाठी म्हणून गावाच्या बाहेर पडलो . शहराच्या अलिबाबाच्या गुहेला बाहेर पडायची वाट नव्हती . गोष्टीतल्या सिंहाच्या गुहेत जसे फक्त आत जाणाऱ्या प्राण्यांच्या पावलांचे ठसे दिसायचे ; बाहेर येणारे ठसेच नसायचे , तसंच हे शहराच्या बाबतीत सुद्धा !
.
. . खूप वर्ष गावाकडची याद सतावत होती . आज शेवटी आलोच गावी . सगळं बदललंय . माझं गांव मलाच ओळखता येत नाहीये . खाडीच्या काठाकाठाने शहराकडे जाणारा एक रस्ता होता . जाताना खूप दूर पर्यंत त्याने माझी सोबत केली होती ; पण ती खाडीच आता दिसत नव्हती . गडप झाली होती . खाडी , तळी , विहिरी सगळंच बुजवलं होतं . तिवरांची जंगलं , वाड्या , आमराया सगळं सफाचट झालं होतं . ह्या गगनाला भिडणाऱ्या इमारतींच्या जंजाळात मला माझं , लहानपणीचं छोट्ट घर शोधून काढायचं होतं . ज्या वाड्यात आम्ही तिन्ही त्रिकाळ उच्छाद घालायचो , तो पाटलाचा वाडा शोधायचा होता . समोरच एक पोलीस स्टेशन दिसलं . रम्याची आठवण आली . म्हटलं बघूया त्याचा काही ठावठिकाणा लागतोय का ! भेटला तर त्याच्याच संगतीनं गांव पालथा घालू . लहानपणी विटीदांडू खेळताना करायचो तसा . ह्याच पोलीस स्टेशन मध्ये तो होता .
. . शिरलोच आत मध्ये . कोणीतरी दखल घेई पर्यंत , भिंतीवर लावलेले गुन्हेगारांचे फोटो बघत बसलो . शेवटी हात हालवत बाहेर पडलो . रम्या आता तिथे नव्हताच . पण पाटलाच्या वाड्याचा मात्र पत्ता मिळाला . पोचलो तिथे . आबाबाबाबा ! वाडा कसला बकिंगह्याम प्यालेसच होता तो ! पण आता तो पाटलाचा वाडा नव्हता , इनामदाराचा होता . पम्यापण दोस्तच माझा ! म्हटलं बघूया भेटतो का !
.
. . गेट वरचा दरवान पाहिल्यावर पोटात गोळाच आला . जुन्या सिनेमात दाखवतात तसा चंबळ च्या खोर्यातला डाकू वाटत होता . ह्या भल्यामोठ्या मिशा , त्यातच कानाशिलाकडचे कल्ले मिसळले होते , चेहराभर नुसत्या मिशाच मिशा .मनाचा हिय्या करून त्याला विचारलं . कायम पम्या म्हणायची संवय , त्याचं नावच आठवेना . शेवटी साहेब भेटतील का , म्हणून विचारलं . महालात फोन , नोंद वहीत संपूर्ण माहिती , मेटल डिटेक्टर मधून तपासणी , अंगाची चाचपणी असे सगळे सोपस्कार करून एकदाचा आत गेलो . माझी गाडी मात्र मला गेटच्या बाहेरच ठेवावी लागली .
.
. . जाताना दोन्ही बाजूला कमांडोंची कतार . दहशत बसेल असे एकेक चेहरे . महालात मात्र दिवाणखान्यातच शाही इतमानात पम्या बसला होता . मला पाहिल्या बरोबर , दोन्ही हात पसरून उठला , मला गळामिठी मारलीन . मी खुश , इतक्या वर्षानी देखील मला ओळखलं म्हणून आणि अचंबित ; पाचवीतच शाळा सोडल्या नंतर ह्याची स्मरणशक्ती एवढी कशी वाढली ह्या कल्पनेने . बोलता बोलता कळल त्याने अबराकाडबरा युनिवर्सिटीची डॉक्टरेट मिळवली होती .
.
. . माझं आगतस्वागत तर जंगी झालं . सोन्याच्या ट्रोली वर ठेवलेल्या सोन्याच्या टी सेट मधून मला चहा देण्यात आला . मी प्यायलो नाही , ओठ आणि जीभ भाजेल ह्या भीतीने ! बिस्किटं पण होती . ती देखील मी खाल्ली नाही . कोण जाणे , सोन्याच्या बिस्किटांना ग्लुकोज चा मुलामा दिलेला असायचा ! एक म्हणता दोन व्हायचं ! दाताचा तुकडाच पडायचा ! ट्रोली घेऊन आलेला माणूसही नखशिखांत सोन्याने लहडलेला होता . गळ्यात मनगटा एवढ्या जाडीच्या डझनभर सोन्याच्या चेनी , मनगटात , दंडावर , कमरे भोवती , बोटात , सगळीकडे निरनिराळ्या आकारात सोनंच सोनं . एवढंच काय त्याची स्लीपर देखील सोन्याची होती . हा चेहरा देखील मला ओळखीचा वाटला होता . एकाच वेळी भीतीने माझ्या पोटात खड्डा पडून त्यात वटवाघळ उडत होती ; मित्राचा उत्कर्ष बघून अभिमानाने भरून आलेल्या हृदयात फुलपाखर उडत होती ; मेंदूत नाना विचारांचा गुंता होऊन , त्यात कोळी कोळिष्टके करीत होता . .
.
. . एकदम माझ्या डोक्यात प्रकाश पडला . अरेच्या ह्या सगळ्यांचे फोटो मी पोलीस स्टेशनच्या भिंतीवर wanted च्या यादीत पाहिले होते .हा चहा देणार्याचा फोटो गंठण आणि चेनी खेचाणार्यांच्या विभागात होता . मी बाहेर जाण्यासाठी धडपडून , गांगरून उभा राहिलो . पम्या मात्र चाणाक्ष , अंतर्ज्ञानी . त्याने माझा जांगडगुठ्ठा बरोब्बर ओळखला . माझ्या पाठीवर थोपटत म्हणाला , " तुला वाटतंय ते खरं आहे . अरे हे सगळे गुन्हेगार माझ्या चाकरीला आहेत म्हणूनच तर पोलिसांना सापडत नाहीयेत . मी त्यांना मोठ्या उदार मनाने आधी माझ्याच घरात कामाला ठेवलेत . आता हळूहळू मी त्यांना सुधारणार आहे . माझ्याच घरात असल्यामुळे मला ते सोपेही जाणार आहे . नाहीतर कुठे शोधत फिरू मी त्यांना सुधारण्यासाठी !! मित्रा एक लक्षात ठेव सज्जन ..दुर्जन ; सत्य .. असत्य ..." तो थोडा घुटमळला
" पुण्य ... पाप ; चांगले ... वाईट " मी म्हणालो .
.
.तो हसला ! खळखळून , गडगडून आणि म्हणाला , " शाब्बास ! तर मी काय म्हणत होतो , ह्या सगळ्यांमध्ये नेहमी सज्जन , सत्य , पुण्य , चांगले ह्यांचाच विजय होत असतो . दोस्ता , अंतिम विजय आपलाच आहे . " मला त्याची तळमळ कळत होती . त्याची कळकळ माझ्या जिव्हारी जाऊन पोचली होती .
.
. मी मुंडी हलवली .पुन्हा पम्याने मला मिठी मारली . कमांडोंच्या पहाऱ्यातून मी बाहेर आलो . दरवानाने गेट उघडलं . मी माझ्या गाडीकडे वळलो .... आणि मटकन खालीच बसलो . गाडीची चारी चाकं , स्टीअरिंग व्हील , डेक सगळं चोरीला गेलं होतं . सैरावैरा धावतच मी पुन्हा महालाच्या गेट कडे वळलो . गेट बंद होतं ,पण दरवानाच्या चौकीत मला एकावर एक ठेवलेली चार चाकं आणि इतर वस्तू दिसत होत्या .
.
. मी दाणदाण गेट वाजवायला सुरुवात केली . कोणीही माझी दखल नाही घेतली . कमांडोंची ट्रिगर वरची बोटं मला दिसली . मी मुकाट्याने खाली मुंडी घालून रस्त्यावर आलो . आता काय करावं बर ! रिक्षाने जवळच्या पोलीस स्टेशन वर जावं की शहाण्यासारखं एखादं ग्यारेज गाठावं ? काहीही करायचं तर पैसे तर हवेत ! मी खिशात हात घातला आणि ....
.
. . पम्याच्या गळामिठीचं रहस्य मला कळल . पैश्याचं पाकीट गुल झालेलं होतं . मी कपाळावर हात मारला आणि स्वतःला कोसत , पाय फरफटवत , समजुतदारपणे स्टेशनच्या दिशेने चालायला सुरुवात केली .

डबल ब्यारल

'
.
.
, , माझ्या मैत्रिणीच्या मुलीचं नाव निशीगंधा मुरलीमोहन माडखोलकर! मालगाडी सारख्या ह्या नावाला ती इतकी वैतागायची, आईला म्हणायची , " बाबांचं नाव, आडनाव बदलता येत नाही! पण माझं नाव तरी छोटं ठेवायचं! अगदी ऊ नाहीतर ठू ठेवलं असतं तरी चाललं असतं! ढ ठेवलं असतंस तरी चाललं असतं! पण हे काय अगडबंब नाव ठेवलंय? " कोणताही form भरताना तिचं संपूर्ण नाव त्या चौकोनात मावायचं नाही! तिने पण केला होता, " लग्न करेन तर एकाक्शरी आडनावाच्या मुलाशी! त्यातून त्याचं नाव ही एकाक्शरी असलं तर सोने पे सुहागा! "
, , बरीच वर्ष आम्ही तिच्या सर्व मावश्या, पै, रे डे, अशी एकाक्शरी आडनावाची मुलं भेटली की वेळ न दवडता तिला माहिती द्यायचो! एकदाचं तिने लग्न केलं! प्रेम विवाह! स्वत: निवडलेला मुलगा! त्याचं नाव भारतभूषण इचलकरंजीकर!
, . तेव्हां माहेरचं आणि सासरचं, असं डबलब्यारल आडनाव लावायची फ्याशन ऐन भरात होती. आता आमची निशीगंधा भारतभूषण माडखोलकर इचलकरंजीकर, आपल्या नावाचं स्पेलिंग forms च्या चौकोनात कसं बसवणार ह्याचीच आम्हां मैत्रिणींना काळजी पडली होती

ध्यानीमनी ( मराठी नाटक )

१९/०२/२०१७
.
.
.
. .#ध्यानीमनी ( मराठी नाटक )
.
. १९८० चं दशक आणि त्याच्या मागचा , पुढचा काही काळ हा मराठी नाटकाचा सुवर्णकाळ होता . जयवंत दळवी , तेंडूलकर , मतकरी यांच्यासारख्या अनेकांच्या नितांत सुंदर कलाकृती आम्ही पाहिल्या . आम्हांला आनंदाचं कोठार फोडून देणाऱ्या सर्व नाटककारांची , कलाकारांची , दिग्दर्शकांची नावं लिहायची म्हटली तर तोच एक भलामोठा लेख होईल . बाल रंगभूमी , प्रायोगिक रंगभूमी , समांतर .. व्यावसायिक ; सगळ्या नाट्य प्रकारांत कमालीचं चैतन्य होतं . नवे नवे प्रयोग केले जात होते आणि त्यांना भरभरून दाद दिली जात होती . मधला काही काळ जरा मरगळलेला गेला . काहीतरी खोगीरभरती होत राहिली . मी तर त्या काळात क्वचितच नाटक पाहायचे . आता पुन्हा नाट्यसृष्टीला नवी पालवी फुटतेय , धुमारे फुटताहेत .
.
. . जुनी गाजलेली नाटकं पुनरुज्जीवीत केली जात आहेत आणि आशयघन नाटकांचे चित्रपट ही होत आहेत . कट्यार काळजात घुसली , नटसम्राट ह्या नाटकांचे सिनेमात रुपांतर केल्यावर त्याला भरभरून यश मिळालं . आता ध्यानीमनी हे नाटक सिनेमा बनून चित्रपटगृहात दाखल झालं आहे . " हा सिनेमा पाहू नका " अशी नकारार्थी जाहिरात केली जात आहे . खरोखरच मी हा सिनेमा पाहणार नाहीये ! अर्थात त्यांच्या जाहिरातीमुळे नाही !
.
. . मी हे नाटक पाहिलं आहे . पंचवीस वर्षांपूर्वी ! लेखक प्रशांत दळवी . तेव्हां नाविन्यपूर्ण नाटकं त्यांनी सादर केली . अत्यंत गाजलेलं ' चारचौघी ' त्यांचंच . दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि निर्माते महेश मांजरेकर ! या सर्वांनी , मोठ्या धाडसाने हे नाटक उभं केलं होतं . पहिले काही प्रयोग सप्पाटून आपटले , नंतर मात्र नाटक धोधो चाललं .
.
. . शालू आणि सदानंद ह्या जोडप्याचं काम केलं होतं नीना कुलकर्णी आणि शिवाजी साटम यांनी . त्यातील क्लिनिकल सायकोलॉजीस्टचं काम केलं होतं महेश मांजरेकर यांनी . नेपथ्यकार आता आठवत नाही , पण त्यांनी उभारलेला घराचा सेट , अजूनही , जस्साच्या तस्सा माझ्या डोळ्यासमोर उभा आहे .
.
. .मध्यमवर्गीय मराठी कुटुंबाचं घर , छोट्या छोट्या वस्तूंनी भरलेलं . थोडसं नीटनेटक , बरचस अस्ताव्यस्त . घरभर पडलेल्या लहान मुलाच्या वस्तू .. त्याची खेळणी , पुस्तकं , कपडे आणि पदर खोचून त्याच्या आईची चाललेली लगबग . घर आवरणं , कपड्यांच्या घड्या करणं , त्यातच , मोहित साठी , त्यांच्या छोट्या मुलासाठी , त्याच्या आवडीचा खाऊ बनवणं . शालूच मातृ हृदय , मुलावरच अपरंपार प्रेम , त्याच्यासाठी चाललेली धावपळ , त्याच्या बद्दल असणारी कळकळ ; नीना कुलकर्णी प्रत्यक्ष ही भूमिका जगल्या होत्या . नंतर एका मुलाखतीत ह्या भूमिकेचा त्यांना येणारा ताण , त्यांनी व्यक्त केला होता असं आठवतंय . आईच्या प्रेमाला आवर घालू पाहणारा , तिला समजून घेणारा , कधी हताश होणारा , कधी समजूत काढणारा , कधी तिला वास्तवात आणू पाहणारा . कधी निराश होणारा , कधी चिडणारा , तर कधी हतबुद्ध होऊन खांदे पाडून तिला बघत बसणारा सदानंद , मोहितचे बाबा , शिवाजी साटम नी ताकदीने अभिनीत केला होता .
.
. . ह्या नाटकाचा परिणाम माझ्या मनावर अत्यंत खोलवर झाला होता . सुन्न होऊन गेले होते . सत्य कळल्यावर थरकाप झाला होता . बसलेला धक्का इतका दूरगामी होता , की काय वाट्टेल ते झालं तरी कोणत्याही मुलाचं नाव ' मोहित ' ठेवणार नाही , असं मी पक्कं केलं होतं . आणि कसं कोण जाणे , इतकं लोभस नाव असूनही ,' मोहित टाकळकर ' खेरीज कोणीही ह्या नावाचं माझ्या परिचयात नाही .
.
. . कथाबिजाचा जीव छोटासा आहे . दोन अंकी नाटकाएवढाच . सिनेमाचा आवाका खूप मोठा असतो . बऱ्याच पद्धतीने कथानक खुलविता येतं . आज मेडिकल सायन्स इतकं प्रगत आहे की नाटकातील समस्येवर अनेक , सहजसाध्य उपाय आहेत . हा सगळा हृदयस्पर्शी कथाभाग कसा खुलवितात हे कौशल्याचं काम आहे . प्रेक्षक आज , त्या समस्येशी कितपत एकरूप होऊ शकतील , हे ही सांगता नाही येणार .
.
. . हे कथानक मनोविश्लेषणात्मक रहस्य प्रधान आहे . आणि असे थ्रिलर मला खूप आवडतात . नाटक पाहिलं तेव्हां मी बरीच तरुण होते तरीही त्यातील ते संवेदनशील नाट्य मी सहन करू शकले नाही . आजही मी पाठकांच ते घर , मोहित आणि त्याचे आई , बाबा विसरू शकत नाही . कधीतरी सुती साडी नेसलेली शालू , मोहितला हाका मारत लगबगीने माझ्या किचन मधून सटकन दुसऱ्या खोलीत जाते . सदानंद तिला समजुतीच्या चार गोष्टी सांगू बघतो आणि हताशपणे गप्पच बसतो . तो ताण आज पुन्हा मी नाही सहन करू शकणार ! मी तर बाबा , हा सिनेमा नाही पाहणार .
.
. . जर नाटक पाह्यचं भाग्य तुम्हांला मिळालं नसलं तर नक्की हा सिनेमा बघा . पुनरुज्जीवीत नाटक रंगभूमीवर येईल म्हणून वाट पाहत बसू नका . नाही आलं तर ? हे ही नाही , ते ही नाही असं होईल . पदरात पडतंय ते पाडून घ्या ! ज्यांनी पूर्वी नाटक पाहिलं आहे त्यांनीही पुनःप्रत्ययाचा आनंद घ्यायला हरकत नाही .#सुरेखामोंडकर

गोलू

१४/०२/२०१७
.
.
आज मला अनपेक्षित पणे लाल गुलाब आणि मिठाई मिळाली ! आमच्या नव्या शेजार्याचा भाचा! सुट्टीत येतो मामाकडे. गोड, स्मार्ट, स्टाइलिश! खूप आवडतो तो मला. त्यालाही मी आवडते हे कधीच लक्ष्यात आलं होतं माझ्या. पण आज गुलाब घेऊन येईल, असं मात्र वाटलं नव्हतं. ही आजकालची पोरं म्हणजे किती फास्ट असतात. आलं मनात बस्स! आता आयत्या वेळेला ह्याला गिफ्ट काssय दे.. णा.. र... !!! पिल्लू साठी आणलेली नवी कोरी water bottle होती घरात आणि ह्यांनी अमेरिकेहून आणलेलं भल्लं मोठ्ठं Toblerone!! अस्सा खुलला! उड्या मारत, नाचतच घरी गेला! माझ्या पिल्लांच्याच शाळेत आहे 1St standard ला! त्याच्या मुळे माझा valentine "s day साजरा झाला! मला मिळालेले दोन गुलाब.. एक फूल आणि दुसरा हा... गोलू !!

छोटू


.
.~~~~~~~~~~~~ छोटूचं आणि माझं नातं म्हणजे ' अतूट बंधन प्यारका ' ! तो फक्त माझा आहे , हे सर्वांनी स्वीकारलं होतं . त्याचा उल्लेख करताना देखील , ' तुझा छोटू ' असाच व्हायचा . माझा देखील , छोटू म्हणजे जीव की प्राण .त्याच्यावर प्रेमाचा अधिकार फक्त माझा आहे ; हे माझ्या डोक्यातही अगदी फेविकॉल ने पक्कं झालं होतं . तो दीड एक वर्षांचा झाला आणि त्याच्या आई बाबां बरोबर दुसरीकडे राहायला गेला . एकाच गावात असलो तरी , अंतरा मुळे , कामातील व्यग्रतेमुळे फारसं भेटणं व्हायचं नाही !
एकदा एका समारंभाला आम्ही सगळे जाणार होतो . आम्ही आमच्या घरून आणि ते त्यांच्या घरून ! हॉलमध्ये आम्ही आधी पोचलो . मी डोळ्यात प्राण आणून
त्याची वाट पहात होते . .... आणि तो आला . आम्हांला पाहून त्यालाही प्रेमाचं भरत आलं . बाबाच्या हातून उसळी मारून तो निसटला . दोन्ही हात पसरून आमच्या दिशेनं धावत सुटला . खूप दिवसांनी त्याला पहात होते . माझे डोळे अश्रूंनी डबडबले होते ! बाजूलाच ' हे ' कौतुकभरल्या चेहऱ्यानं , हा आजू नातवाच्या प्रेम भेटीचा सोहळा बघत उभे होते . त्याला कुशीत घ्यायला मी देखील हात फैलावून त्याच्या दिशेनं पुढे सरकले . आणि......................................
तुम्ही ' लम्हे ' पाहिला आहे ? दुख्खी श्रीदेवीला भेटायला अनिल कपूर जातो . दुख्खाने व्याकूळ झालेली श्रीदेवी दोन्ही हात फैलावून धावत सुटते , अनिल कपूर तिला मिठीत घेवून , तिचं सांत्वन करायला तैय्यार राहतो . आणि ही बया त्याच्याकडे ढुंकूनही न बघता बाजूलाच असणाऱ्या तिच्या प्रियकराच्या मिठीत शिरते , जो आपल्याला आणि अनिल कपूरला नंतर दिसतो , पण तिला मात्र आधीच दिसलेला असतो !!
आता अधिक काय सांगू ! अकल्पनिय्ररित्या छोटूनं पायाला विळखा घातल्या मुळे हे पण जरा गडबडले . ह्यांनी त्याला उचलून घेतलं , पण निराशेने माझा पांढरा फटफटीत पडलेला चेहरा , अपेक्षांचा झालेला चुराडा बघून , ते मात्र कासावीस झाले .
लम्हें मध्ये त्या परिस्थितीत अनिल कपूरची भावनिक अवस्था कशी झाली असेल , हे त्या दिवशी मला चांगलंच कळलं ! कुणालाही गृहीत धरू नये , स्वामित्वाची भावना ठेवू नये हे तर चांगलंच समजलं . मुलं कधी आपल्याला तोंडघशी पाडतील ते सांगता येत नाही !
-------------
#सुरेखा मोंडकर

ठसका

१९/०२/२०१७
.
.
.~~~~~~~~~~~~ कालच्या पार्टीत अचानक ती भेटली . कॉलेजात असताना देखील आम्ही मैत्रिणी नव्हतो . ती एका देखण्या , उमद्या मुलाच्या प्रेमात आकंठ बुडाली होती . दोघांनाही आजूबाजूचं जग जाणवतच नव्हतं . त्यांना मात्र अख्ख कॉलेज ओळखत होतं .
काल ती एकटीच आली होती . स्वतःहून जवळ आली . मग खूप रंगल्या आमच्या गप्पा . स्टार्टर फिरत होते , गप्पा रंगत होत्या . ओघातच ती म्हणाली , " प्रत्येक व्यक्ती अनेक रोल्स निभावत असते . प्रत्येक रोल मध्ये ती वेगळी असते . एकच व्यक्ती प्रियकर .. प्रेयसी म्हणून वेगळी ; आणि तिच व्यक्ती नवरा ... बायको म्हणून वेगळी . मला तर वाटतं जिच्यावर आपण दिलोजानसे मुहब्बत करतो तिच्याशी कधीच लग्न करू नये ! "
. " कां ग ? "
" ह्या जगात एकतरी व्यक्ती आपल्यावर , बेहिशेबी , बेफाम , बेफाट प्रेम करणारी आहे ह्याचा विश्वास आयुष्यभर आपल्याला राहतो . "
आम्ही दोघीही बेजार हसलो . पण हसता हसता एकाएकी तिचे डोळे कां भरून आले ,ठसका का लागला ; कळलंच नाही मला . खात असलेलं चिली चिकन इतकं काही तिखट नव्हतं ! पाणी प्यायला म्हणून ती जी उठली , ती नंतर त्या विस्तीर्ण लॉंन वर पुन्हा दिसलीच नाही मला !
तिने त्याच हिरो शी लग्न केलं का . रती मदनाच्या त्या जोडीने आयुष्याचा स्वर्ग केला का ; हे विचारायचं राहूनच गेलं !
१९/०२/२०१७
.
.
मुझे गलेसे लगालो, बहुत उदास हूँ मैं
गमें जहाँ से उठालो, बहुत उदास हूँ मैं
हे भावपूर्ण गीत, इतके दिवस मला प्रेम गीत वाटायचं! आज और कल, ( अशोक कुमार, नंदा, सुनील दत्त, तनुजा) आत्ताच पाहिला ; आणि मला कळलं हे प्रेमगीतच आहे ; पण प्रियकर आहे ; साक्षात मृत्यू!! आळवणी, विनवणी, आर्जवं त्याची केली आहे! नंदा लावण्यवती दिसली आहे! अभिनय पण दर्दभरा आहे! You tube वर उपलब्ध आहे! वेळ मिळाल्यास जरूर बघा!
मूळ इंग्रजी नाटकावर ही कथा बेतलेली आहे! पु ल देशपांडेंचं " सुंदर मी होणार " हे नाटक पण ह्या कथानकावरच आहे! ( थोडासा रुमानी हो जाएँ.. अशीच आहे कथा ) सुंदर कथानक, देखणे अभिनयपटू कलाकार, सुमधूर गीतं, मनोवेधक चित्रण! वसंतराव जोगळेकरांची फिल्म आहे! खट्याळ तनुजा तर इतकी गोड दिसते ; बाहुली सारखी! वाटतं तिला उचलून घ्यावी आणि खूप खूप लाड करावेत ; आपल्या मुली सारखे!!

प्यारा देवानंद

१९/०२/२०१७
.

सौ साल पहले, मुझे तुमसे प्यार था.. ये मौसम.. ऊफ यूँ मा, आणि सगळयात मोहवणारं, जिया ओ.. जिया ओ जिया, कुछ बोल दो.. अर्थातच, " जब प्यार किसीसे होता है! "
आधी चांगली देवानंद आणि आशा पारेख ची प्रेम कथा होती! इंटरव्हल पर्यंत सगळी छान छान गाणी संपवून तो अचानक विनोदी सिनेमा झाला! म्हणजे काय झालं, देवानंद ने चक्क काळ्याकातळां वर, कोसळणार्या पर्वत कड्यांवर फायटींग सुरू केली ; ती ही कोणाबरोबर तर, तरण्याबांड प्राण बरोबर! पाहिली आहे तुम्ही देवानंद ची सिनेमातली फायटींग? जाँनी मेरा नाम.. . आठवतोय? तेव्हां ही हेमामालिनी बरोबर रोमांटिक गाणी म्हणत, प्रेम करून, शेवटी त्याला प्राण बरोबर च फायटिंग करावी लागली होती! इतकी विनोदी! मी पण त्याला बसल्या जागेवरून भरपूर सूचना दिल्या, " अरे यहाँ से, अरे वहाँ से, छोडना नहीं, झुक जा यार! " तो माझं न ऐकताच, आपल्या केसाचा कोंबडा सांभाळत, हवे तस्से हात मारत होता! खूप मजा आली! शेवटी देवानंद तो देवानंद ना! जुन्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी " जब प्यार किसीसे होता है ! " पहात होते you tube वर !!
२३/०२/२०१७

 अरे , तू मला ल्यांड वर फोन कां केलास ? "
.
" तुझा मोबाईल स्विच्ड ऑफ येतोय "
.
" असा कसा , चालू तर आहे ...... हां हां ... नेटवर्क बदलले ना , सीम बदलायचय ! "
.
" मग बदल की ! "
.
" मला नाहीना येत . माझ्या आधीच्या नोकिया चं मला यायचं , पण ह्या android चं काही येत नाही ."
.
" मग शिकून घे . सोपं तर असतं. हे बघ तू चार्जिंग करतेस ना , तिथेच बाजूला ...."
.
" आत्ता नको , मग शिकते . पण तरी सुद्धा तू मला मोबाईल वर फोन करू शकला असतास ! त्याच्यावर येतंय ' emergency calls only ' म्हणून !
.
' हाहाहाहाहाहा..............."
.
" हसायला काय झालं ! त्यांना काय कळतंय ,तुझा कॉल emergency आहे की नाही ते ! त्याच्यावर थोडंच काही लिहिलेलं असतं . आणि माझ्या द्रुष्टीने तो emergency आहे . "
.
हसणं थांबलेलच नाही , " तुला काय वाटलं , तुला तुझ्या नवऱ्याशी , मुलाशी , मैत्रिणींशी बोलावसं वाटलं की ते emergency झालं काय ??? "'
.
"मग , तसं नसतं काय ... समज मी आत्ता चक्कर येऊन पडले , आणि मला माझ्या डॉक्टर ला फोन करायचा असेल तर तो emergency call नाही होणार ? " अचंबीत होऊन .
.
. " ए पात्रू , इथे emergency calls म्हणजे फक्त पोलीस , फायर ब्रिगेड असे ! आणि ते सुद्धा लागतील अशी ग्यारंटी नाही "
.
" हंSSSSS हो का SSSSSSSSS आता मला काय माहीत ! माझं हे असं पहिल्यांदाच होतंय ना !!!!!!!!!!!
.
" ज्याला त्याला टांगत असतेस ना तुझ्या wall वर ! देवानंद पासून सगळ्यांना ... एकाला सोडत नाहीस ... जा आता हे जे तारे तोडलेस ना ते पण नेऊन टांग ! तुझी wall तारांकित करून टाक ! "
.
" बरं बरं ... आता सांग मला सीम कसं बदलायचं असतं ते !!!!!!!!!!!!!! "
_____________________
सुरेखा मोंडकर