मंगळवार, १३ फेब्रुवारी, २०१८

झिका आणि कतरिना

........... झिका आणि कतरिना .......
. . झिका ह्या जबरदस्त , भीतीदायक विषाणूचा फैलाव होत आहे . तो हळूहळू जगभर पसरेल अशी काळजी व्यक्त केली जातेय . नवजात बालकांच्या मेंदूला ग्रासून , त्यांचं अवघं आयुष्यच विस्कटून टाकणारा हा विषाणू , आज जगाची झोप उडवतोय .
ह्या पार्श्वभूमीवर , टाटा मोटर्स ने आपल्या " झिका " नावा च्या छोट्या कारचं ठरवल्या प्रमाणे , त्याच नावाने अनावरण तर केलं ; पण झिका ची दहशत एवढी आहे की , कंपनीने ; ' ऐनवेळी नवे नाव शोधणे शक्य झाले नाही , पण लवकरच नवे नाव शोधले जाईल ' असे जाहीर केले.
. . आज पर्यंत असे कितीतरी , माहित नसलेले विषाणू आले , विचार सुद्धा केला नव्हता असे त्या पासून रोग पसरले; बर्ड फ्लू , चिकन गुनिया, म्याड काऊ !.. कितीतरी विषाणू आले आणि गेले . त्यांच्या मुळे झालेली हानी , आयुष्याचा आणि संपत्तीचा झालेला विध्वंस ... तो मात्र कायम लक्षात राहिला . त्यांनी केलेल्या काही जखमा बुजल्या पण न मिटणारे व्रण राहिले ; काही जखमा तर अजूनही भळभळत राहिल्या .
. . ह्या विध्वंसक विषाणूंची नावे तरी आपल्याला अपरिचित आहेत . पण जी महावादळे , चक्रीवादळे येतात त्यांची बरीचशी नावे आपल्याला परिचित असतात .( हरिकेन , टोर्नाडो ) हरिकेन जान , फ्रान्सिस , कतरिना ! आंध्रप्रदेश च्या किनारपट्टीची वाताहत करणारं लैला चक्रीवादळ . वादळांची नावे आधीच ठरलेली असतात ; पण कसं कोण जाणे जी वादळे धूळधाण करणारी , नामोनिशाणी न ठेवणारी ,महाविध्वंसक होती त्यांची नावं नेमकी स्त्रीलिंगी होती .
जागतिक हवामान संघटने च्या आंतरराष्ट्रीय ' हरिकेन समिती ' मध्ये सर्वानुमते ही नावे निश्चित करून , जाहीर केली जातात . हिंदी महासागरात होणाऱ्या वादळांच बारसं करण्याचा हक्क फक्त किनारपट्टी वर असणाऱ्या देशांना आहे . भारत , बांगलादेश , पाकिस्तान, श्रीलंका , मालदीव , ओमान , थायलंड ; हे ते देश ! वादळांची पुढील ६४ नावे तयार आहेत . एकामागून एक ती दिली जातील .
नर्गिस( पाकिस्तान ) रश्मी ( श्रीलंका ) खाई-मुक ( थायलंड) निशा ( बांगलादेश ) बिजली ( भारत ) अशी नावांची यादी तयार आहे . लैला हे नाव पाकिस्तानच होतं . हुडहुड हे ओमान चं होतं . अरेबिक मध्ये हे एका पक्षाचे नाव आहे . वेगवेगळ्या देशांनी सुचवलेली , निलोफर , प्रिया, , मेघ , सागर ; अशीही नावं आहेत .
ह्यातली बरीचशी नावं स्त्री , पुरुषांची आहेत . टाटा , आपल्या गाडीचं नाव बदलणार आहेत . पण ह्यातल्या काही नावांच्या ज्या व्यक्ती असतील , त्या आपल्या नावाचं काय करणार ?
. . सामान्य माणूस सुद्धा नाव सुचवू शकतो हं का ! बघा कुणाला आपल्या सासूचं , छळवादी बॉस चं नाव , एखाद्या चक्रीवादळाला द्यायचं असलं तर ! फक्त काही नियम आहेत , तेवढे पाळा म्हणजे झालं . नाव छोटं असावं, अर्थ पटकन कळावा , संवेदनाशील , भावना दुखावणारं असू नये !
माझा मुलगा म्हणजे उत्साहाचा , एनर्जीचा लाव्हा आहे . तो घरी आला की आम्ही म्हणतो , " वादळ आलं ! " तसंच ' कतरिना ' नावाचं वादळ पण काहींना चालेल . माधुरी नावाची त्सुनामी तर आपण पाहिलीच आहे . विध्वंसक गोष्टींना नाव दिलं म्हणून , ते नावच थोडंच बदनाम होतं ! तसं पाहिल्यास छान, मोहक, नावं असूनही काही जण विध्वंसक वृत्तीचे असतात की !!
सुरेखा मोंडकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा