मंगळवार, १३ फेब्रुवारी, २०१८

दुविधा ( सिनेरंग )

........ ...... दुविधा ...............................
.
.  ज्यांनी " दुविधा " पाहिला , त्यांचं खूप खूप अभिनंदन . त्यांची सहनशक्ती अपरंपार आहे ; ह्या बद्दल त्यांना काहीतरी मोठ्ठ बक्षीस दिलं पाहिजे . मी पण संपूर्ण पाहिला बरं का ! आणि तो सुध्धा तिसऱ्यांदा . तेव्हां बक्षीस देताना माझाही विचार केला जावा ! ( ही नम्र विनंती )
.
. खूप वेळ पडद्यावर अंधार , कावळा , चिमणी , कबूतर , जुनाट अती प्रचंड मातीचे वाडे , वृक्षहीन माळरान , अंगावर येणारी शांतता , संभाषण अपवादानेच , डोकं फिरेल इतका वेळ रातकिड्यांचा आवाज , आता हा सूर्य बुडणार आहे की नाही ; अशी काळजी वाटेल , इतका ताणलेला सूर्यास्त ....हे सर्व असून सुद्धा च्यानेल न बदलता जे निष्ठेने बघत राहिले त्यांच्या लक्षात आलं असेल ," सब्र का फल मीठा होता है ! "
.
. . ह्या सिनेमाने आपल्या पर्यंत मनुष्य स्वभावाचे कंगोरे इतके समर्थपणे पोचवले आहेत की आपण अवाक होऊन जातो . १९७३मध्ये आलेल्या ह्या सिनेमाने त्यावेळी अनेक पारितोषिके मिळवली . खूप गाजला . विजयदन देठा यांच्या कादंबरीवर आधारित हा सिनेमा आहे . ही एक लोककथा आहे . जोधपूर जवळच्या एका खऱ्याखुऱ्या खेड्यात चित्रण झालं आहे . राजस्थानी लोक संगिताची साथ देण्यात आली आहे . दिग्दर्शक आहेत , मणी कौल !
.
. . एका नवविवाहित जोडप्याची ही कथा आहे . रवी मेनन आणि रईजा पदमसी यांनी ह्या भूमिका केल्या आहेत , त्या दोघांचा आणि सासरा झालेल्या अभिनेत्याचा अभिनय अप्रतिम . त्यांची एकएक हालचाल डोळे खिळवून ठेवते .
घरचा मोठा व्यापार असतो . बापाने मुलाला दुरदेशीचा व्यापार सांभाळण्यासाठी एका विशिष्ट मुहूर्तावर जाण्याची आज्ञा केलेली असते . लग्नाच्या पहिल्या रात्री , बायकोला जवळ घेण्याच्या ऐवजी तो मुलगा तिला उपदेशाचे डोस पाजतो ,पाच वर्षं हाहा म्हणता जातील , ह्याची आशा देतो , आपली वळकटी बांधतो आणि पहाटे , पाच वर्षांसाठी दूरदेशी निघून जातो . त्या सुंदरीच्या प्रेमात पडलेलं आणि कौटुंबिक वातावरण अनुभवायची तीव्र इछ्या असणार एक भूत त्या नवऱ्याच हुबेहूब रूप घेऊन त्या वाड्यात येतं . आणि मग सुरु होते प्रत्येक पावलावर " दुविधा " ; dwidha मनस्थिती ! त्या प्रत्येक वेळेला मानवतेवर , माणुसकीवर , न्यायावर ; स्वार्थ विजय मिळवतो .
.
. . भूत सगळं सत्य आधीच सांगत , तरीदेखील शरीरसुख आणि वैवाहिक आयुष्य ह्याचा मोह पडून गप्प बसणारी पत्नी ! मुलाचं दुरादेश्याहून पत्र येत असूनही ते दडपून , भूता कडून रोज मिळणाऱ्या पाच मोहरांची लालच भारी पडलेला बाप ! मुलगा परत आल्यावर , इज्जत , इतर अनेक फायदे ह्यांच्या गळाला अडकून सख्या मुलाला नाकारणारे आईबाप ! नंतर एका धनगराने खरा मुलगा ओळखण्यासाठी केलेली युक्ती ! खऱ्या मुलाने अभिमानाने , ऐटीत घरी परत आल्यावर भूता पासून झालेल्या बाळा सहित केलेला पत्नीचा स्वीकार ... सगळंच चक्रावून टाकणारं ; अद्भुत ! नऊ रिळांच्या , ह्या सिनेमाचा क्यानवास खूप मोठा आहे . सबंध मानव जातीचा !
.
. . ह्या कथेने भल्या भल्यांना मोह घातला . २००५मध्ये , अमोल पालेकर यांनी ; राणी मुखर्जी आणि शाहरुख खान यांना घेवून , " पहेली " चित्रीत केला . तो देखील गाजला ! दोन्ही सिनेमा बघण्यासारखे आहेत . दुविधा पाहिल्यावर माझी पण इच्छा चाळवली गेली आहे . आता वेळ मिळाल्यावर मी पहेली पाहणार ...दुसऱ्यांदा ! यूट्यूब वर दोन्ही सिनेमा आहेत .
.

झिका आणि कतरिना

........... झिका आणि कतरिना .......
. . झिका ह्या जबरदस्त , भीतीदायक विषाणूचा फैलाव होत आहे . तो हळूहळू जगभर पसरेल अशी काळजी व्यक्त केली जातेय . नवजात बालकांच्या मेंदूला ग्रासून , त्यांचं अवघं आयुष्यच विस्कटून टाकणारा हा विषाणू , आज जगाची झोप उडवतोय .
ह्या पार्श्वभूमीवर , टाटा मोटर्स ने आपल्या " झिका " नावा च्या छोट्या कारचं ठरवल्या प्रमाणे , त्याच नावाने अनावरण तर केलं ; पण झिका ची दहशत एवढी आहे की , कंपनीने ; ' ऐनवेळी नवे नाव शोधणे शक्य झाले नाही , पण लवकरच नवे नाव शोधले जाईल ' असे जाहीर केले.
. . आज पर्यंत असे कितीतरी , माहित नसलेले विषाणू आले , विचार सुद्धा केला नव्हता असे त्या पासून रोग पसरले; बर्ड फ्लू , चिकन गुनिया, म्याड काऊ !.. कितीतरी विषाणू आले आणि गेले . त्यांच्या मुळे झालेली हानी , आयुष्याचा आणि संपत्तीचा झालेला विध्वंस ... तो मात्र कायम लक्षात राहिला . त्यांनी केलेल्या काही जखमा बुजल्या पण न मिटणारे व्रण राहिले ; काही जखमा तर अजूनही भळभळत राहिल्या .
. . ह्या विध्वंसक विषाणूंची नावे तरी आपल्याला अपरिचित आहेत . पण जी महावादळे , चक्रीवादळे येतात त्यांची बरीचशी नावे आपल्याला परिचित असतात .( हरिकेन , टोर्नाडो ) हरिकेन जान , फ्रान्सिस , कतरिना ! आंध्रप्रदेश च्या किनारपट्टीची वाताहत करणारं लैला चक्रीवादळ . वादळांची नावे आधीच ठरलेली असतात ; पण कसं कोण जाणे जी वादळे धूळधाण करणारी , नामोनिशाणी न ठेवणारी ,महाविध्वंसक होती त्यांची नावं नेमकी स्त्रीलिंगी होती .
जागतिक हवामान संघटने च्या आंतरराष्ट्रीय ' हरिकेन समिती ' मध्ये सर्वानुमते ही नावे निश्चित करून , जाहीर केली जातात . हिंदी महासागरात होणाऱ्या वादळांच बारसं करण्याचा हक्क फक्त किनारपट्टी वर असणाऱ्या देशांना आहे . भारत , बांगलादेश , पाकिस्तान, श्रीलंका , मालदीव , ओमान , थायलंड ; हे ते देश ! वादळांची पुढील ६४ नावे तयार आहेत . एकामागून एक ती दिली जातील .
नर्गिस( पाकिस्तान ) रश्मी ( श्रीलंका ) खाई-मुक ( थायलंड) निशा ( बांगलादेश ) बिजली ( भारत ) अशी नावांची यादी तयार आहे . लैला हे नाव पाकिस्तानच होतं . हुडहुड हे ओमान चं होतं . अरेबिक मध्ये हे एका पक्षाचे नाव आहे . वेगवेगळ्या देशांनी सुचवलेली , निलोफर , प्रिया, , मेघ , सागर ; अशीही नावं आहेत .
ह्यातली बरीचशी नावं स्त्री , पुरुषांची आहेत . टाटा , आपल्या गाडीचं नाव बदलणार आहेत . पण ह्यातल्या काही नावांच्या ज्या व्यक्ती असतील , त्या आपल्या नावाचं काय करणार ?
. . सामान्य माणूस सुद्धा नाव सुचवू शकतो हं का ! बघा कुणाला आपल्या सासूचं , छळवादी बॉस चं नाव , एखाद्या चक्रीवादळाला द्यायचं असलं तर ! फक्त काही नियम आहेत , तेवढे पाळा म्हणजे झालं . नाव छोटं असावं, अर्थ पटकन कळावा , संवेदनाशील , भावना दुखावणारं असू नये !
माझा मुलगा म्हणजे उत्साहाचा , एनर्जीचा लाव्हा आहे . तो घरी आला की आम्ही म्हणतो , " वादळ आलं ! " तसंच ' कतरिना ' नावाचं वादळ पण काहींना चालेल . माधुरी नावाची त्सुनामी तर आपण पाहिलीच आहे . विध्वंसक गोष्टींना नाव दिलं म्हणून , ते नावच थोडंच बदनाम होतं ! तसं पाहिल्यास छान, मोहक, नावं असूनही काही जण विध्वंसक वृत्तीचे असतात की !!
सुरेखा मोंडकर

बायका म्हणजे ... ( ललित लेख )

............................... बायका म्हणजे..........
................मैत्रिणीकडे सर्वांना मांसाहार आवडतो ; पण ती घरी करत नाही . कारणं ना , तशी बरीच आहेत . हं... आलं माझ्या लक्षात ! तुम्ही मला बोलण्यात गुंतवता आहात ना !! तर तिच्याकडे माश्यांचे प्रकार बनवले जात नाहीत ; हॉटेलमध्ये गेल्यावर खातात ; पण घरी बनवलेला पदार्थ म्हणजे , त्याला वेगळीच चव . म्हणून जेव्हां ही काहीतरी खास बनवते ; तेव्हां आवर्जून मैत्रिणीला पाठवते . आज हिने चिम्बोर्यांच कालवण बनवलं होतं . मैत्रिणीच्या छोट्याला चिम्बोर्या खूप आवडतात ते हिला माहित होतं . एका डब्यात हिने कालवण भरलं ; आपण नेऊन द्यावं की तिच्या घरच कोणी इकडे येऊ शकतंय ते पहावं , म्हणजे फेरी वाचेल ; ह्या हेतूने , विचारण्या साठी तिने मैत्रिणीला फोन लावला .
. . फोन उचलल्या बरोबर मैत्रीण आनंदाने चीतकारली ,.. " शंभर वर्षं आयुष्य आहे बघ तुला . मीआत्ता करणारच होते तुला फोन . "
.... " कशाला गं ? "
..... " अग, तू बांगड्याच भुजण पाठवलं होतंस ना .. खूपच टेस्टी झालं होतं हं ! सगळ्यांना जाम आवडलं . "
" पण ते मी पंधरा दिवसां पूर्वी.. आणि तू आत्ता ..... " हिने बोलायचा प्रयत्न केला . पण तिची जलद गाडी होती ; कुठेही न थांबणारी . क्षणभर दोघीही एकाचवेळी बोलत होत्या .मग हिने तोंड बंद केलं , आणि ऐकायचा पर्याय निवडला .
..... ' इतकं छान झालं होतं . मी फक्त त्यात थोडसं मीठ , जरा तिखट आणि उगीच एवडासा चिंचेचा कोळ घातला . एकदम चवदार ...."
. " मासे नाहीस ना घातलेस त्यात ? " हिने न राहउन विचारलं . दुसर्याला द्यायचं म्हणून हिने अगदी निवडक बांगडे तिच्या डब्यात भरले होते .पण हिच्या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून , ती आपलं बोलणंच रेटत होती .
. " मुलं तर म्हणालीच , आई ; अगदी तुझ्या हातचीच चव वाटतेय . मी सांगितलं नाही त्यांना .. तू पाठवलं आहेस म्हणून... "
. " तू मासे करतेस घरी ? " हिने चकित होऊन , थोड्याशा दुखावलेल्या स्वरातच विचारलं .
. ती जरा गांगरली , पण पटकन सावरली , " छे गं ! मी कसली करतेय ! तुला सगळं माहितीच आहे ; ते अग , सुरवातीच्या काळात .. जरा शिकून बघावं म्हणून ... ए , ते जाऊदे ! तू फोन कशाला केला होतास सांग ना ! "
. विसरले बघ , कशाला केला होता तेच ! हे वय नां .... आठवल्यावर करते पुन्हा ! "
. ' ए , ऐक ना ... "
. " बघ साफ विसरले . मला ब्यांकेत जायचं होतं . नंतर करते हं फोन "
तिने फोन खाली ठेवला . किचनमध्ये जाऊन , डब्यातल्या चिम्बोर्या पुन्हा कढईत काढून ठेवल्या आणि रिकामा डबा सिंक मध्ये घासायला टाकला !!
#सुरेखा मोंडकर

पालकांची परीक्षा ( मुलं आणि आपण )

#पालकांची_परीक्षा
.
~~~~~~~~ " डाडू , बर्थ डे ला माझ्यासाठी गिफ्ट घेशील ? "
" अरे ! 'घेशील ' म्हणजे काय ; घेणारच ! बोल काय हवं तुला ? "
थोडावेळ घुटमळून , डाडूच्या गळ्यात हात टाकून ; त्याच्या गालाला गाल घासत ; लाघविपणाची पराकाष्टा करीत ; गोड स्वरात उत्तर , " बे ब्लेड ! "
" ओक्के ! घेऊया ! केवढ्याला असतं ? "
" तीन हजार रुपये ! "
" काय ? तीन हज्जार रुपये ? किंमत खूप आहे रे ! "
" पण बर्थ डे गिफ्ट आहे डाडू ! माझ्या सगळ्या मित्रांकडे आहे . मला पण हवं ! "
" तुझ्या वाढदिवसाला मस्त काहीतरी घ्यायचंच , पण हे नाही . आपली वस्तू विकण्या साठी केलेल्या ह्या सगळ्या युक्त्या असतात . जाहिरातींना फसायचं नाही ! तुला दहा हजाराची सायकल हवी असेल तर मी घेतो , पण हे तीन हजाराचं बे ब्लेड नाही . त्याच्या साठी ही किंमत , अव्वाच्या सव्वा आहे . "
थोडावेळ निरव शांतता . डबडबलेले डोळे ; मान खाली घालून निराशा लपवायचा प्रयत्न .
" तुझ्या लक्षात येतंय ना , मला काय म्हणायचंय ? " डाडू ने विचारलं ." पैसे खर्च करायचे , पण ते योग्य जागीच ! काहीतर उपयुक्त वस्तू घे . शरीर , मन , बुद्धी ह्याच्या विकासासाठी उपयोगी पडेल अशी काही ! मला पैसे वाचवायचे नाहीयेत ! समजतंय ना तुला ?"
तो बराच वेळ तसाच फुरंगटून बसला . आपला निकाल देऊन डाडू आपल्या कामात व्यस्त झाला . सगळा दिनक्रम नेहमीप्रमाणेच ; काही घडलं नाही , असाच चालला होता . घरातल्या कोणीही त्याच्या रुसव्याची दखल घेतली नाही . जेवायच्या वेळेला तो हाक मारल्या बरोबर ; मुकाट्याने , कसलेही आढेवेढे न घेता , टेबलावर आला . जेवताना चाललेल्या गप्पागोष्टीत तोम्हणाला , " आर्यनला नेहमी तो म्हणेल ती वस्तू मिळते !"
.."" म्हणजे , तो मिळवतोच ! " मोठा म्हणाला
" ते कसं काय ? "
" त्याला हवी ती वस्तू मिळाल्या शिवाय तो शांत होतच नाही . रडतो , भांडतो , पुस्तकं फाडतो , हातपाय आपटतो, घरातल्या वस्तू खिडकीतून बाहेर फेकून देतो ..... कुणाच्या डोक्यात पडल्या तर.... ! "
' त्याचे आई , बाबा त्याला ओरडत नाहीत ? "
" ओरडतात ना ! पण तो काय करतो त्याला हवी ती वस्तू मिळाल्या शिवाय तो जेवतच नाही . दोनदोन दिवस उपाशी राहतो . मग काय करणार ना , ते तरी ! मुकाट्याने , त्याला हवीअसणारी वस्तू विकत आणून देतात ! "
" तुझा बेत आहे का त्याच्या प्रमाणे न जेवायचा ? " डाडू ने कुतूहलाने छोट्याला विचारलं .
" नाहीनाही , मी बाबा जेवणार ! मला माहिती आहे ; तू सगळे छान छान पदार्थ मिटक्या मारून संपवून टाकशील , आणि मला ठेवशील उपाशी ! " समोर आलेल्या थाई करीचा ताबा घेत तो म्हणाला !
जेवण संपल्यावर दोघांनी मिळून अमेझॉन डॉट कॉम वर पुस्तकं खरेदी केली . " तुला हवी तेव्हढी घे " डाडू ने सांगितलं . छोटूने सत्तावीस पुस्तकं निवडली . बर्थ डे गिफ्ट होतं ना !
मुलांना वैयक्तिक , कौटुंबिक , सामाजिक , आर्थिक शिस्त शिकवायची असेल तर ती लहानपणापासूनच शिकवायला हवी . उगाचच" नाही" म्हणू नका . त्यांना योग्यती बाजू नीट समजावून सांगा , आपल्या मुद्यावर ठाम राहा . त्यांच्या भावनिक ब्ल्याकमेलिंग ला बळी पडू नका . Be assertive ! मुलं पालकांना पुरेपूर जोखून असतात . आपली डाळ शिजणार नाही ह्याची त्यांना पुरेपूर जाणीव असते . हे सगळं लहानपणापासूनच करायला हवं . पण आपल्या मुलांना काही प्रश्न असला तर मात्र तो न नाकारता , तात्काळ तज्ञांची मदत घ्या
_______
#सुरेखा मोंडकर

शनिवार, १० फेब्रुवारी, २०१८

काळाने गिळले सारे

#काळाने_गिळले_सारे
.
आमच्या गावात माध्यमिक आणि पुढील शिक्षणाची काही सोय नव्हती . शिक्षणासाठी म्हणून गावाच्या बाहेर पडलो . शहराच्या अलिबाबाच्या गुहेला बाहेर पडायची वाट नव्हती . गोष्टीतल्या सिंहाच्या गुहेत जसे फक्त आत जाणाऱ्या प्राण्यांच्या पावलांचे ठसे दिसायचे ; बाहेर येणारे ठसेच नसायचे , तसंच हे शहराच्या बाबतीत सुद्धा !
.
. . खूप वर्ष गावाकडची याद सतावत होती . आज शेवटी आलोच गावी . सगळं बदललंय . माझं गांव मलाच ओळखता येत नाहीये . खाडीच्या काठाकाठाने शहराकडे जाणारा एक रस्ता होता . जाताना खूप दूर पर्यंत त्याने माझी सोबत केली होती ; पण ती खाडीच आता दिसत नव्हती . गडप झाली होती . खाडी , तळी , विहिरी सगळंच बुजवलं होतं . तिवरांची जंगलं , वाड्या , आमराया सगळं सफाचट झालं होतं . ह्या गगनाला भिडणाऱ्या इमारतींच्या जंजाळात मला माझं , लहानपणीचं छोट्ट घर शोधून काढायचं होतं . ज्या वाड्यात आम्ही तिन्ही त्रिकाळ उच्छाद घालायचो , तो पाटलाचा वाडा शोधायचा होता . समोरच एक पोलीस स्टेशन दिसलं . रम्याची आठवण आली . म्हटलं बघूया त्याचा काही ठावठिकाणा लागतोय का ! भेटला तर त्याच्याच संगतीनं गांव पालथा घालू . लहानपणी विटीदांडू खेळताना करायचो तसा . ह्याच पोलीस स्टेशन मध्ये तो होता .

. . शिरलोच आत मध्ये . कोणीतरी दखल घेई पर्यंत , भिंतीवर लावलेले गुन्हेगारांचे फोटो बघत बसलो . शेवटी हात हालवत बाहेर पडलो . रम्या आता तिथे नव्हताच . पण पाटलाच्या वाड्याचा मात्र पत्ता मिळाला . पोचलो तिथे . आबाबाबाबा ! वाडा कसला बकिंगह्याम प्यालेसच होता तो ! पण आता तो पाटलाचा वाडा नव्हता , इनामदाराचा होता . पम्यापण दोस्तच माझा ! म्हटलं बघूया भेटतो का !
.
. . गेट वरचा दरवान पाहिल्यावर पोटात गोळाच आला . जुन्या सिनेमात दाखवतात तसा चंबळ च्या खोर्यातला डाकू वाटत होता . ह्या भल्यामोठ्या मिशा , त्यातच कानाशिलाकडचे कल्ले मिसळले होते , चेहराभर नुसत्या मिशाच मिशा .मनाचा हिय्या करून त्याला विचारलं . कायम पम्या म्हणायची संवय , त्याचं नावच आठवेना . शेवटी साहेब भेटतील का , म्हणून विचारलं . महालात फोन , नोंद वहीत संपूर्ण माहिती , मेटल डिटेक्टर मधून तपासणी , अंगाची चाचपणी असे सगळे सोपस्कार करून एकदाचा आत गेलो . माझी गाडी मात्र मला गेटच्या बाहेरच ठेवावी लागली .
.
. . जाताना दोन्ही बाजूला कमांडोंची कतार . दहशत बसेल असे एकेक चेहरे . महालात मात्र दिवाणखान्यातच शाही इतमानात पम्या बसला होता . मला पाहिल्या बरोबर , दोन्ही हात पसरून उठला , मला गळामिठी मारलीन . मी खुश , इतक्या वर्षानी देखील मला ओळखलं म्हणून आणि अचंबित ; पाचवीतच शाळा सोडल्या नंतर ह्याची स्मरणशक्ती एवढी कशी वाढली ह्या कल्पनेने . बोलता बोलता कळल त्याने अबराकाडबरा युनिवर्सिटीची डॉक्टरेट मिळवली होती .
.
. . माझं आगतस्वागत तर जंगी झालं . सोन्याच्या ट्रोली वर ठेवलेल्या सोन्याच्या टी सेट मधून मला चहा देण्यात आला . मी प्यायलो नाही , ओठ आणि जीभ भाजेल ह्या भीतीने ! बिस्किटं पण होती . ती देखील मी खाल्ली नाही . कोण जाणे , सोन्याच्या बिस्किटांना ग्लुकोज चा मुलामा दिलेला असायचा ! एक म्हणता दोन व्हायचं ! दाताचा तुकडाच पडायचा ! ट्रोली घेऊन आलेला माणूसही नखशिखांत सोन्याने लहडलेला होता . गळ्यात मनगटा एवढ्या जाडीच्या डझनभर सोन्याच्या चेनी , मनगटात , दंडावर , कमरे भोवती , बोटात , सगळीकडे निरनिराळ्या आकारात सोनंच सोनं . एवढंच काय त्याची स्लीपर देखील सोन्याची होती . हा चेहरा देखील मला ओळखीचा वाटला होता . एकाच वेळी भीतीने माझ्या पोटात खड्डा पडून त्यात वटवाघळ उडत होती ; मित्राचा उत्कर्ष बघून अभिमानाने भरून आलेल्या हृदयात फुलपाखर उडत होती ; मेंदूत नाना विचारांचा गुंता होऊन , त्यात कोळी कोळिष्टके करीत होता . .
.
. . एकदम माझ्या डोक्यात प्रकाश पडला . अरेच्या ह्या सगळ्यांचे फोटो मी पोलीस स्टेशनच्या भिंतीवर wanted च्या यादीत पाहिले होते .हा चहा देणार्याचा फोटो गंठण आणि चेनी खेचाणार्यांच्या विभागात होता . मी बाहेर जाण्यासाठी धडपडून , गांगरून उभा राहिलो . पम्या मात्र चाणाक्ष , अंतर्ज्ञानी . त्याने माझा जांगडगुठ्ठा बरोब्बर ओळखला . माझ्या पाठीवर थोपटत म्हणाला , " तुला वाटतंय ते खरं आहे . अरे हे सगळे गुन्हेगार माझ्या चाकरीला आहेत म्हणूनच तर पोलिसांना सापडत नाहीयेत . मी त्यांना मोठ्या उदार मनाने आधी माझ्याच घरात कामाला ठेवलेत . आता हळूहळू मी त्यांना सुधारणार आहे . माझ्याच घरात असल्यामुळे मला ते सोपेही जाणार आहे . नाहीतर कुठे शोधत फिरू मी त्यांना सुधारण्यासाठी !! मित्रा एक लक्षात ठेव सज्जन ..दुर्जन ; सत्य .. असत्य ..." तो थोडा घुटमळला
" पुण्य ... पाप ; चांगले ... वाईट " मी म्हणालो .
.
.तो हसला ! खळखळून , गडगडून आणि म्हणाला , " शाब्बास ! तर मी काय म्हणत होतो , ह्या सगळ्यांमध्ये नेहमी सज्जन , सत्य , पुण्य , चांगले ह्यांचाच विजय होत असतो . दोस्ता , अंतिम विजय आपलाच आहे . " मला त्याची तळमळ कळत होती . त्याची कळकळ माझ्या जिव्हारी जाऊन पोचली होती .
.
. मी मुंडी हलवली .पुन्हा पम्याने मला मिठी मारली . कमांडोंच्या पहाऱ्यातून मी बाहेर आलो . दरवानाने गेट उघडलं . मी माझ्या गाडीकडे वळलो .... आणि मटकन खालीच बसलो . गाडीची चारी चाकं , स्टीअरिंग व्हील , डेक सगळं चोरीला गेलं होतं . सैरावैरा धावतच मी पुन्हा महालाच्या गेट कडे वळलो . गेट बंद होतं ,पण दरवानाच्या चौकीत मला एकावर एक ठेवलेली चार चाकं आणि इतर वस्तू दिसत होत्या .
.
. मी दाणदाण गेट वाजवायला सुरुवात केली . कोणीही माझी दखल नाही घेतली . कमांडोंची ट्रिगर वरची बोटं मला दिसली . मी मुकाट्याने खाली मुंडी घालून रस्त्यावर आलो . आता काय करावं बर ! रिक्षाने जवळच्या पोलीस स्टेशन वर जावं की शहाण्यासारखं एखादं ग्यारेज गाठावं ? काहीही करायचं तर पैसे तर हवेत ! मी खिशात हात घातला आणि ....
.
. . पम्याच्या गळामिठीचं रहस्य मला कळल . पैश्याचं पाकीट गुल झालेलं होतं . मी कपाळावर हात मारला आणि स्वतःला कोसत , पाय फरफटवत , समजुतदारपणे स्टेशनच्या दिशेने चालायला सुरुवात केली .
LikeShow more reactions
Comment

मंगळवार, ६ फेब्रुवारी, २०१८

चला सुट्टी झाली .. आणि .. सुधा करमरकर

>>>>>>>>>>>>> चला सुट्टी झाली <<<<<<<<<<<<<<<
शाळेतील परीक्षा झाल्या झाल्याच ... दुसऱ्या दिवसा पासूनच बालनाट्य सुरु होत होती . मला प्रश्न पडला कधी केल्या असतील ह्यांनी तालमी ... मुलांनी परीक्षा सांभाळून कसा काय वेळ दिला असेल .... पालकांचं पण कौतुक वाटलं ... " सगळेच पालक काही , मुलांना मार्कांच्या मागे दौडवत नाहीत .... त्यांच्या कलागुणांना अग्रक्रम देणारेही पालक आहेत तर ! " ... घरातल्या बच्चेकंपनी ला घेऊन नाटकाला गेले . नाटक कसलं ... छोट्या छोट्या ४० /४५ मिनिटांच्या .... कसलाही आगा पिछा नसणाऱ्या ....भरपूर धांगडधिंगा असणाऱ्या ...तीन गोष्टी होत्या ..... सादर करणारी मोठी मुल , ह्या छोट्यांना सांभाळून घेऊन वेळ मारून नेत होती .
माझी मुलं लहान होती तेव्हां ह्याच रंगायतन मध्ये आम्ही दरवर्षी ...सबंध सुट्टीभर धमाल नाटकं बघायचो ... सुधा करमरकर ... रत्नाकर मतकरी ... सुलभा देशपांडे .... एकाहुन एक ...बाल रंगभूमीला वाहून घेतलेले लेखक ...दिग्दर्शक ...कलाकार होते ....मधुमंजीरी...हिमगौरी आणि सात बुटके ... अलिबाबा आणि चाळीस चोर ... दुर्गा झाली गौरी .... एकापेक्षा एक सरस नाटके .... जागा संपेल , पण यादी नाही संपणार ..... मुद्दामहून, खास मुलांसाठी लिहिलेली नाटके ... डोळे खिळवून ठेवणारे सर्वांग सुंदर नेपथ्य ... कलात्मक , सुयोग्य पोशाख ...चोख , दर्जेदार अभिनय .... ह्याच " बाल रंगभूमी " तून आजचे किती तरी अभिनयपटू तावून सुलाखून झळाळत्या सोन्याचे तेज घेऊन बाहेर पडले .
बच्चेकंपनी ने पाहिली नाटकं ... " आवडली " असं पण म्हणाली .... पण मला वाटतं कदाचित त्यांना ते मध्यंतरात मिळणारं आईसक्रिम ...वडे ..सामोसे .. फ्रुटी ... हेच जास्त आवडलं असेल .... अरे तुम्ही कुठे पाहिला आहे बाल रंगभूमीचा सुवर्ण काळ ... बाल नाट्य म्हणजे काय असतं ते तुम्हाला काय कळणार आहे ... आता जे हिणकस समोर दिसतंय त्यालाच तुम्ही छान म्हणणार !!!!
मुलांवर खूप प्रेम करणारे ... त्यांना अभिरुचीसंपन्न बनवणारे ...त्यांना कलेची ओळख करून देणारे ...पदरमोड करून ...लाभाची अपेक्षा न ठेवता बालाना , भरभरून देणारे तसे किमयागार पुन्हा जन्मतील का ... बाल रंगभूमीचा तो रत्नजडीत काल पुन्हा येईल का ...की त्या आधीच ... त्या सर्वांग सुंदरतेची चव घेण्या आधीच ....ही आजची मुलं ..प्रौढ आणि त्या नंतर म्हातारी होऊन जातील ~~~~~~~~ !!!!!!!!!!!
सुरेखा मोंडकर
२६/०४/२०१५
#एक_तारा_निखळला
.
#सुधा_करमरकर
.
२०१५मध्ये लिहिलेली ही वरील पोस्ट !.बालनाट्याकडे होणारं अक्षम्य दुर्लक्ष , त्याची होणारी हेळसांड , मला व्यथित करते . कारण बाल रंगभूमीचा सुवर्ण काळ मी पाहिला आहे . अनुभवला आहे . त्या नाटकांनी माझ्या मुलांचं बाल्य झळाळून टाकलं . त्यांना अभिरुची संपन्न केलं . सुधाताई गेल्या आणि आतड्याला पीळ पडला . पोटातून , अंतरात्म्यातून दु:ख उफाळून आलं . बालनाट्याच्या इतिहासात त्यांनी आपलं अढळ स्थान निर्माण केलं .
तात्यासाहेब आमोणकरांची ही कन्या . नाट्यसृष्टी घरातच मुक्कामाला होती . वडिलांमुळे 'साहित्य संघाच्या ' नाटकांत , लहानपणापासून त्यांनी छोट्या मोठ्या भूमिका केल्या . नृत्यात पारंगत झाल्या . रीतसर नाट्यशिक्षण घेण्यासाठी त्या अमेरिकेला गेल्या . तिथे त्यांची बाल रंगभूमीशी ओळख झाली आणि मराठी नाट्याचा इतिहासच बदलला .भारतात परत आल्यावर त्यांनी बालनाट्य चळवळच सुरु केली . स्वतःचे एक वेगळे , वैशिष्ट्यपूर्ण स्थान त्याला मिळालं . बालनाट्याच्या त्या जन्मदात्या आहेत .
.
रत्नाकर मतकरींसारख्या ताकदीच्या लेखकाने बालनाट्य लिहिलं आणि १९५९मध्ये खरंखुरं बाल नाट्य रंगभूमीवर आलं . " मधुमंजिरी " ! दिग्दर्शन , निर्मिती त्यांची होती . त्यात त्यांनी चेटकिणीची भूमिका केली होती ." लिटल थिएटर " निर्माण झालं होतं .आणि मग बाल गोपाळांची चंगळ झाली . चिनी बदाम , अलिबाबा आणि चाळीस चोर , जादूचा वेल , अल्लाउद्दीन आणि जादूचा दिवा .. एकसे एक सरस नाटकं रंगभूमीवर आली .मुलं आणि पालक मे महिन्याच्या सुट्टीची आतुरतेने वाट बघायचे , ह्या वर्षी कोणते नवे नाटक मुलांना बघायला मिळणार ही उत्सुकता असायची .मोठ्यांच्या नाटकाच्या तोडीस तोड असणारं खास मुलांचं नाटक . आवडती गोष्ट , अभिनय निपुण कलाकार , भरजरी, खास मेहनत घेऊन तयार केलेलं नेपथ्य .मुलं खुश असायची .
.
सुधाताईच्या आधी पण बाल नाट्य होती . आम्ही पण लहानपणी , दोरीने चादरी बांधून , खोट्या मिशा आणि गंगावनं लावून नाटकं करीत होतो . पण सुधाताईनी बालांना खास दर्जा दिला . बाल नाट्य म्हणजे फक्त लहान मुलांना घेऊन केलेलं नाटक एवढंच नव्हे ,हे त्यांनी जाणलं ..बालांचं एक वेगळे विश्व असते , त्यांच्या कल्पना , त्यांची स्वप्नं एवढंच काय त्यांचं वास्तव पण वेगळेच असते , हे प्रथम त्यांनी जाणलं . पदरमोड केली . अफाट मेहनत केली . आपल्या सर्व निष्ठा , मेहनत , श्रम त्यांनी बाल रंगभूमीला वाहिले .त्यांच्या नाटकात काम केलेली अनेक बालकं पुढे मोठे अभिनेते बनले . भक्ती बर्वे सारख्या कलाकारांनी तर अभिनयावरच शिलालेखा प्रमाणे आपलं नाव कोरून ठेवलं .
त्यांनी , पुत्रकामेष्टी , पती गेले गं काठेवाडी , वीज म्हणाली धरतीला , अश्रूंची झाली फुले , रायगडला जेव्हां जाग येते .. अशा अनेक नाटकांतून व्यक्तिरेखा साकार केल्या . त्यातील 'पुत्रकामेष्टी 'तर काळाच्या पुढे असणारं नाटक! . . अत्यंत देखणी , राजस , अभिनय निपुण , नाट्यवेडी अभिनेत्री . त्या आज जगात नसल्या
.तरी माझ्या आणि माझ्या मुलांच्या मनात कायम राहणार आहेत .
.
रंगभूमीच्या समृद्ध कालखंडात पण बाल रंगभूमी वाळीतच पडलेली होती . आज तर व्यावसायिक , नफ्यातोट्याच्या गणितात ही नाटकं बसतच नाहीत . पुन्हा एखादी सुधा करमरकर जन्म घेईल का , की जी बालविश्वाला नफ्यातोट्याच्या तराजूत तोलणार नाही ? मग कदाचित माझ्या नातवंडांच्या मुलांना , माझ्या पतवंडाना तृप्त करणारी नाटकं पुन्हा नव्याने रंगभूमीत जान निर्माण करतील .#सुरेखामोंडकर .७\२\२०१८
..