गुरुवार, २६ जानेवारी, २०१७

 <<<<<<<<<<<<<<<<  शर्यत  दोन   पिढ्यांची   >>>>>>>>>>>>>>>>>>>>>
.
.                   .फटफटी  कशीबशी  उभी  करून , अंगणातूनच  हाका  देत  , सर्जेराव  घरात  घुसला  . "" आबा sssssओ   आ ssबा  ""  ओटीवर  , कणग्याच्या  खोलीत  , सगळी  कडे तो  फणफणत  फिरत  होता  . त्याचा  आवाज  ऐकून  आतल्या  घरातून  मालती  लगबगीने  पाण्याचा  तांब्या  आणि  फुलपात्र  घेऊन  आली  . 
                   . सर्जेराव  घामाने  थबथबला  होता . शर्ट  अंगाला  चिकटला  होता .  डोक्यावरचे  केस  ओले  गच्च  होऊन  कपाळाला    चीपकले  होते  . घाम  पुसायचं  ही  त्याला  भान नव्हतं .रागाने  लाल पिवळा  झाला  होता . सापासारखे फुस्कारे  सोडत  होता .  काहीतरी  त्रांगड  झालंय  हे मालतीच्या  लक्षात  आल  .अशावेळी  नवऱ्या  पासून   कासराभर  दूरच  राहायचं  एवढ ती अत्तापोतूर  शिकली  होती  . तांब्या भांड  तिथेच  टेबलावर  ठेवून  , शिवल्या  ओठाने  ती  आत  गेली  .
                 , तिची  सासू  मान  उंचावून   चाहूल  घेतच  होती  . ""  काय  झालं  ग  सर्ज्याच  ? "" तिने  विचारलं  . "" काय  की  ? ""  मालतीने   खांदे  उडवले  . सासू  पदराने  घाम  पुसतच  चुली  समोरून  उठली  . मालतीने तिची  जागा  घेतली  . तिचे हात चालू  होते आणि  कान  बाहेरच्या   संभाषणाकडे  लागले  होते .
.                .सर्जेरावाच्या  हाका  चालूच  होत्या  . ""  आर , गप  गप  ! काय  आग  लागलीय  का  गावाला  ? ""
                 "" आग  माझ्या  कलेजाला  लागलीय . आबान  तो  ओढ्या  पल्याडला  बागायातीचा  तुकडा  कवडीमोलान  फुकून   टाकलान ग ! आणि  सर्वे  पैशे   घेऊन  आज  बाजाराला  गेलाय  ! "" सर्जेराव वेडापिसा झाला  होता .
.              ""  आर  , माझ्या  कर्मा ! कुटून  ही  अवदसा   आठवली  ? कली  शिरलाय   रं  माझ्या  सौन्सारात  !  हा सैतान  आता  सगळ्याची  बरबादी   करूनच  शांत  होणार  रं बाबा  !! "" आईन  बसकण  मारली . तिचे  डोळे  पाझरायला   लागले  होते  . सर्जेराव  पण   हातापायातली   शक्ती  गेल्या  सारखा  , झोपाळ्यावर  कोलमडला  . तिकडे  चुलीतला  धूर  डोळ्यात  गेल्याचं  निमित्त  करून  मालती  पण  वाहणारे  डोळे  पुसत  होती . सर्जेरावाच्या  डोक्यात  विचारांची  मळणी  चालली  होती  .
                आबा  आधी  असे  नव्हते  . आजोबा  आजी  गेले  ; सर्व  सत्ता  त्यांच्या  हातात  आली आणि  आबांना  बैलगाडा  शर्यतीचा  नाद  लागला  . शर्यती  साठी  लागणारे  बैल  अस्सल   खिलारी   , सुलक्षणी   असतात  . त्यांची  अंगकांती  , वेलांटी  सारख  कमानदार  वशिंड , टोकदार , कंस करणारी  एकसारखी  देखणी  शिंगं , भक्कम   सडसडीत   पाय , भेदक  तेज  डोळे  ; असा  बत्तीस  लक्षणी  बैल  शोधून  शोधून   मिळवावा  लागतो  . अशा  बैलाची  किंमत  पण  लाखात  असते  . आबांना  बैलाची  पारख  उत्तम  होती  . सिझनला  सात  आठ  शर्यती  तरी  आबा  जिंकायचे  . 
                ह्या  बैलांचा  राजेशाही  थाट  असतो  . खूप  निगुतीन  , डोळ्यात  तेल  घालून  त्यांची  बडदास्त  ठेवावी  लागते .खास  खुराक  द्यावा  लागतो  . काटक ,चपळ  झाले  पाहिजेत  पण  स्थूल  , जाडे  होता कामा  नयेत. आबा  सगळं  जातीने  करायचे .. तरुण  असताना  ते  स्वतः  धुऱ्यावर  उभे  राहून  रिंगी  पळवायचे . त्या साठी  ते  स्वतःची  पण  काळजी  घ्यायचे  . खाण्यापिण्याची  बंधनं , व्यायाम  ह्या  बाबतीत  त्यांनी  कधी  हयगय  केली  नाही . धुरकरी  पण  कमी  वजनाचा  , काटक  , बलवान  हवा  . उधळलेले  बैल  आवरायची  ताकद  त्याच्या  मनगटात  हवी  . 
             शर्यतीच्या  वेळी  सुद्धा  वीस  पंचवीस  माणसांची  गरज  पडायची  .ही   माणस  सांभाळून  ठेवावी  लागायची . बैलांना  टेम्पोत  चढवायचं , उतरवायचं. त्यांना  उन्माद  चढावा ; धुंदी  चढावी  म्हणून  वाजंत्री वाले  लागायचे . फुरफुरणाऱ्या  बैलांना  आवरण्यासाठी  धडधाकड   आठ  दहा  माणस लागायची  . आणि  जर  शर्यत  जिंकली  तर  शेमले  फडकावत , गुलाल  , भंडारा  उडवत , ""   यळकोट    यळकोट  जय  मल्हार "  करत  ; विजय ध्वज  नाचवत मिरवणूक  काढायला  माणसांचा  ताफा  लागायचा  . त्यांच्यावर  उधळायला   नोटांची  थप्पी  लागायची  .
           सर्जेराव  मोठा  व्हायला  लागला  तेव्हां  एक गोष्ट  त्याच्या  लक्षात  आली . मोसमात  सात  आठ  बक्षिसं  मिळाली  तरी बैलांचा  खर्च  भरून  यायचा  नाही  . शर्यतीच्या  आधी  बैलांना  दारू  पाजायचे  .ते सावध व्हावेत  , संतापाने  वेडेपिसे  व्हावेत , असह्य  यातना  व्हाव्यात म्हणून  त्यांना  काठीने , चाबकाने   बेदम  मारले  जायचे .पराणी  मारणे , कानाजवळ  खिळ्यांची  पिंजरी बसवण ,  इलेक्ट्रिक   शॉक देणं  हे  तर  सर्रास  चालायचं  .सर्जेरावाला  हा  क्रूरपणा  सहन  होत  नव्हता  . पण  आबांच्या  समोर तो  बोलू  पण  शकत  नव्हता  . अमानुष  अत्याचार  होतात  म्हणून  नंतर  कोर्टानेच  बंदी  आणली , पण विनाकाठी  , विनालाठी  शर्यतीला  परवानगी  मिळाली . मग  तर  काय  पोलीस , खबरे , फुकट  फौजदार , प्रमाणपत्र  देणारे  सगळ्यांनाच  कुरण  मोकळं  झालं .
             मधली  काही  वर्षं शेतकी  शिक्षणा  साठी तो दुसऱ्या  शहरातच  होता  . पदवी  घेऊन , डोळ्यात  अनेक  स्वप्नं  घेऊन  तो  गावी  परत  आला  . पण  ती  काळी  माय , जिच्यावर  तो प्रयोग  करणार  होता  , ती कुठे  होती  ?  आबांनी ह्या  शर्यतीच्या  नादापायी  एकेक  तुकडा  करीत  भलीमोठी  जमीन  विकून  टाकली  होती  .. बापाच्या  नादी  लागायचं  नाही  . उरलं  आहे  ते  सांभाळायचं असं  सर्जेरावान  मनोमनी  पक्कं  केलं  होतं .
             गेल्या  वर्षी  जेव्हां  छोट्या  अक्षयला  कळलं की  त्याचे  लाडके चिकू  आणि  गोरा  शर्यतीत  धावणार आहेत  ; तेव्हां  त्याने  शर्यत  बघायचा  हट्ट  धरला . शर्यतीच्या  वेळेला  होणारा  गोंधळ , उन्माद , कल्लोळ  सर्जेरावाला  माहित  होता . बैलच  नाहीत  प्रेक्षक  पण  पुरे  ढोसून  आलेले  असतात . म्हणून  सर्जेराव  स्वतः अक्षुला  घेऊन  गेला .
           माळरानावर   शर्यतीची  आखणी  केली  होती  . शर्यतीसाठी  मोकळ्या  ठेवलेल्या  भागाच्या  दुतर्फा  लोकांनी  शर्यत  बघायला  गर्दी  केली  होती  . चिकू  , गोरा  मार  खाऊन  बेचैन  झाले  होते  . पाजलेल्या  दारूने  बेभान  झाले  होते  .त्यांच्या  नजरेत  ओळख  नव्हती . जाडीत अडकवताना  पण ते  उसळ्या  मारत  होते . कसे बसे  त्यांना  जुपले . धुरकरी  हातात  कासरा धरून  ठाम  उभा  राहिला . बैलांना  धरून  उभे  असलेले  क्षणात  चपळाईने  , सुरक्षित  जागी  पळाले . डोळ्याचं  पात  लवत न लवत  तोच  बंदुकीच्या  गोळी  सारखा  बैलगाडा  सुटला  . बैल  उधळले , वाऱ्याच्या  वेगाने  त्यांनी निशाण  गाठलं . आबा  शर्यत  जिंकले .
          पण  कसा  कोण  जाणे  , अंतिम  क्षणाला  धुरकर्याच्या  हातून  कासरा  निसटला . बेधुंद  असणारे  , अफाट  वेगात  असणारे , वेदनांनी  तळमळणारे  बैल  स्वतःला  सावरू शकले  नाहीत  . गाड्या  सहित  ते  बाजूच्या  गर्दीत  घुसले .एकच  हलकल्लोळ  माजला . माणस जीव  वाचवायला  सैरावैरा  धावत  सुटली . कुणी  तुडवली  गेली  . चेंगराचेंगरी झाली . खाली  पडलेल्या  धुरकर्याने धाव  घेऊन  कासरा  पकडला  . आणखीनही  काही लोक  मदतीला  आले  , त्यामुळे  अनर्थ  टळला. 
          तेव्हां  अक्षुला  नीट  दिसावं  म्हणून  सर्जेरावान  त्याला  खांद्यावर  घेतलं  होतं  . आंधळ्या  पळापळीत  अक्षु खाली  पडला  . आपल्या  शरीराचं  पांघरूण  त्याच्यावर  घालून  जीवाच्या  कराराने  सर्जेरावाने  त्याला  वाचवलं . पण  अक्षयचा  पाय  फ्र्याकचर  झाला . मोठ्या  नशिबाने  तो वाचला . सर्जेरावाला  वाटलं  होतं ; लाडक्या  नातवाच्या  जीवावर  बेतल होतं म्हणून  तरी  आबा  आता  शर्यत  बंद  करतील . पण  कसलं काय ; जित्याची  खोड  मेल्याशिवाय  जात  नाही . 
         रात्री  सगळी  नीजानीज  झाली . सर्जेरावाला  झोप येत नव्हती . रात्री  दीड  दोन  ला  दिंडी  दार वाजल्याचा  आवाज  आला  . एक टेम्पो  आत  आला  . त्यातून  पांढराशुभ्र   , दर्जेदार  बैल  खाली  उतरवला  गेला . रस्त्यावरच्या  दिव्यांच्या उजेडात  त्याचा  बादशाही  रुबाब  डोळ्यात  भरत  होता . सहज  दोन  लाखांचा  असेल . सर्जेराव  डोक्यावर  बुक्या  मारून  घेत  होता . त्याच्या  डोक्यात  घण पडत  होते . बैलांची  व्यवस्था  लावून  , पैसे  घेऊन  माणस  निघून  गेली . ओटीवरच  झोपलेल्या  गणप्याने  आबांना  दार  उघडून  घरात  घेतलं . सगळ  काही  चुपचाप  चालल  होतं . 
         पहाट  व्हायला  आली  होती  .घरात  सामसूम  होती .आबा  गाढ झोपले  होते  .सर्जेराव  बेचैन  मनाने  बाहेर  आला . अस्वस्थपणे अंगणात  फेऱ्या  मारू  लागला  .मघाशी  दिंडी  दरवाजा  उघडा  राहिला  होता  . तो  गोठ्याकडे  गेला  . दार  सताड  उघडलन . त्याला  बघून  चिकू  , गोरा ,आणि  आजचा  नवीन  पाहुणा  , तिघेही  खडबडून  उभे  राहिले . सर्जेरावाने  एकदा  त्यांच्या  पाठीवरून  हात  फिरवला  आणि  दाव  सोडलं . तो  कोपऱ्यात  सरकला . त्या  उमद्या  , तरण्याबांड  , उत्साहाने  मुसमुसलेल्या  बैलांनी  एक  उसळी  मारली आणि  तिघेही   गोठ्यातून   बाहेर  पडले .उघड्या  दिंडी  दारातून सुसाट  वाऱ्यावर  स्वार  होऊन  भन्नाट  धावत  सुटले  .
        ते  दिसेनासे  होई  पर्यंत  सर्जेराव  त्यांच्या  कडे  बघत  होता . मग  एकाएकी  शक्तीपात  झाल्या  सारखा तो  तिथेच  वैरणीच्या  ढिगार्यावर  बसला  . गुढग्यात  तोंड  खुपसून  त्यानं हंबरडा  फोडला  . हमसाहमशी  रडू  लागला  कोणीतरी  मेल्यावर  रडावं  तसा  !त्याचा  टाहो  ऐकायला  कोणीही  जाग  नव्हतं  !!!!
 
 सुरेखा   मोंडकर  
२७/०१/२०१७ 

मंगळवार, १७ जानेवारी, २०१७

. हे नक्की काय असतं ... ( माझे ठाणे )
.
.
. . काही म्हणजे काय , बऱ्याच वर्षा पूर्वीची गोष्ट आहे .आमच्या पाचपाखाडी विभागात फुटपाथवर , जागोजागी सिमेंटचे छान , आरामशीर बाक टाकले गेले . मला ही कल्पना खूप आवडली . त्या बाकांचा चांगला उपयोग केला जायचा . बऱ्याचवेळा , चालण्यावर मर्यादा आलेले , घरात बसून बसून कंटाळलेले वृध्द तिथे निवांत बसायचे . एक आहे म्हणून दुसरा पण यायचा , त्यांचा छान वेळ जायचा . माणसात आल्यासारखं त्यांना वाटायचं . एका बाकाच्या जवळच शाळेच्या बस चा थांबा होता . शाळेच्या वेळेला तो बाक दप्तरांनी भरून जायचा . मुलांच्या आणि त्यांच्या पालकांच्या घोळक्याने वेढून जायचा .
.
. . जेमतेम महिना पण झाला असेल , नसेल ; सकाळी फिरायला बाहेर पडले , पाहते तर काय हे सगळे बाक फोडून टाकलेले .आदल्या रात्री तर त्यावर छोटूला गाड्या दाखवायला घेऊन बसले होते मी आणि सकाळी तो मोडून पडलेला !! अगदी छिन्नविछिन्न करून टाकलेला ; त्याचे पाय पण फोडले होते . म्हणजे कोणीही क्षणभर त्यावर टेकू पण शकत नव्हतं . खूप हळहळले ! अगदी आमच्या झोपायच्या खोली समोर रस्त्यावर येणारा तो बाक , .. जी अवस्था झाली होती त्यावरून अवजारांनी , हत्यारांनी , त्याची वासलात लावली होती ; पण आम्हांला कोणाला पत्ता पण लागला नव्हता ! जाग आली नव्हती !बरेच दिवस ते तसेच तिथेच पडलेले होते ; उद्वस्त ! नंतर काही काळाने तिथे त्याहून सुंदर लाकडी बाकडी ठेवली गेली . हिरव्यागार रंगाने रंगवलेली ! लोक त्यांचा उपयोग करताहेत ;अजून तरी ती आहेत ; पण मधल्या काळात माझी नातवंड मोठी झाली . ; गाड्या आणि रिक्षा , डोळे विस्फारून बघायच्या पलीकडे गेली . स्वतःच्या सायकली चालवायला लागली . ह्या नव्या बाकांवर बसायचा योग मला आला नाही .
.
. . माझा लाडका कचराळी तलाव ! खरं म्हणजे हे उदकाचे तळे , एखाद्या कहाणीत शोभावे असे रत्नजडीत आहे . कोणत्याही मोसमात हा तलाव तिलोत्तम असतो .तळ्याच्या भोवती बांध आहे . तलावाची मर्यादा आखण्यासाठी बाहेरूनही रुंद कठडा करून लोखंडी कांबीचं कुंपण घातलं आहे . हे लोखंडी कुंपण जमेल तेवढं आणि तिथे तोडलेलं , वाकवलेलं असतं . बसण्याच्या हेतूने केलेल्या बांधावरच्या फरशा फोडलेल्या असतात . खरं म्हणजे हे बांधच फोडून टाकलेले असतात . तळ्यात प्लास्टिकच्या पिशव्यांसहीत निर्माल्य टाकलेलं असतं ! तरी देखील हा तलाव कमालीचा देखणा दिसतो ! जातीच्या सुंदरा सारखा ! महापालिकेने त्याचे सुशोभीकरण केलं . आखीव रेखीव जागा करून नवीन झाडं लावली . मुलांसाठी भरपूर वाळू आणि खेळाची साधनं असणारा , खास त्यांचा सुरक्षित हिस्सा केला . त्याच्या सभोवती बुटका बांध टाकला . त्यावर पालकांना , मुलांकडे लक्ष देण्यासाठी बसता येतं .चालायच्या रस्त्यावरचे पेव्हर ब्लॉक्स तुटले होते . लक्ष नसलं तर अडकून पडायला व्हायचं. तिथे छान कॉन्क्रीटचा रस्ता केला . व्यायामासाठी जागृत असणाऱ्या लोकांनी हा रस्ता सकाळ संध्याकाळ फुललेला असतो !
.
. . हे काम हळूहळू बरीच वर्षे चाललं आहे . झाडं आता मोठी झाली आहेत . मध्यंतरी शेलाट्या पाम वृक्षांना कलात्मकरित्या रंगविण्यात आलं . इतकी गोड दिसत होती ती ! रंगीबेरंगी वस्त्रं परिधान केलेल्या उदबत्ती सारखी . जी झाडं तोडली होती त्यांनाही रंगांनी सजवलं होतं .विध्वंस क्षणात करून टाकता येतो , पण काही घडवायचं असेल तर त्याला खूप काळ , मेहनत आणि कल्पकता लागते . हे पाम रंगवायचं कामही महिनाभर तरी चाललं होतं . संपूर्ण तळ्याभोवतीचे पाम रंगवून झाले . संध्याकाळी फिरायला गेलेली मी , दिवेलागणी झाल्यावरही तिथेच बसून राहिले . तो शांत तलाव ,; त्यातील रंगीबेरंगी प्रकाशाची उधळण करणारं कारंज , दुर्गा विहारच्या जांभळ्या दिव्यांच्या रोषणाईची आणि आजूबाजूच्या उंच इमारतींची त्यात पडलेली प्रतिबिंब .आणि घेराव घालून असणारे समारंभासाठी सजून धजून असणारे ते पाम ! जे वेड मजला लागले .. ते वेड तुज लागेल का !! असच वाटत होतं , तिथून पाय निघत नव्हता .
.
. . दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये वाचलं , पर्यावरणवाद्यांनी हरकत घेतली होती . झाडांच्या आरोग्याच्या दृष्टीने ते रंग म्हणे हानिकारक होते . ते म्हणताहेत म्हणजे असणारच ! अरे ; पण मग इतके दिवस तुम्ही काय करत होता . शेवटच झाड रंगवून होई पर्यंत का थांबला होता ? जे झाड प्रथम रंगवलं , ज्याने इतके दिवस तो रासायनिक रंग अंगावर वागवला , त्याचं काय ! त्याच्या आरोग्याचं काय ! ज्यांना झाडांच्या आरोग्याची काळजी आहे त्यांनी इतके दिवस थांबावं ? आपल्या दिरंगाईमुळे त्या पहिल्या झाडांचा बळी द्यावा ? आता ते रंग उतरवले जाताहेत ! अरे , त्यासाठी पण रसायनेच वापरणार ना ??
.
. . काल वर्तमानपत्रात वाचलं , चार मुलांनी पहाटे बागेत घुसून मोडतोड केली .वस्तूंची वासलात लावली . सौंदर्याची बरबादी केली . आज टीवीवर दाखवलेलं सीसी टीवी फुटेज पाहिलं . ती विध्वंस करणारी मुलं अगदी आरामात फिरत होती , मोड तोड करत होती . गोड हसत होती . क्रौर्य , , दुष्टपणा निदान त्यांच्या चेहऱ्यावर तरी दिसत नव्हता . .कोणतंही हत्यार न वापरता लाथा मारून वस्तू तोडत होती .एवढी शक्ती .. एवढी उर्जा होती त्यांच्यात ? मग त्याचा सकारात्मक उपयोग करावासा त्यांना का वाटत नव्हतं ? किरकोळ शरीरयष्टीची , सर्वसामान्य दिसणारी , अगदी रोज आपल्याला भेटणार्या , आपल्याला स्माईल देणाऱ्या , ओळखीच्या किशोरवयीन मुलांसारखी दिसणारी ही विध्वंसक मुलं होती .कुठून , कशी येते ही विकृती त्यांच्यात ? सौंदर्याला कुरूप बनवणं , नायनाट करणं , हा एखाद्याचा खेळ होऊ शकतो ? सगळंच अचंबित करणारं !
.
. . जर काही चांगल्या , सुशोभिकरणाच्या , उपयुक्त गोष्टी केल्या तर त्या निदान आहेत तशा टिकवणं आपलंच काम नाहीये का ?सगळं सरकारने केलं पाहिजे ! पण जे आपल्याला जमण्यासारखं आहे तेवढंही आपण नाही करणार का ? म्हणजे आहे ते सांभाळणं ...??#सुरेखा_१६ /१ /१७
. वावटळ ( भाग ६ )
.
.
. .बाळासाहेबाच्या सहनशक्तीचा अंत झाला . तो पिसाळलाच !" रांड , साली , छिनाल ..... तुझे धंदे काय मला माहिती नाहीत ! तुला पोर नकोय . कधीच नकोय . एकदा पोर झालं की तुझी किंमत कमी होणार . रस्त्यावरचं काळ कुत्रंही तुला विचारणार नाही . कुणाकुणा बरोबर झोपतेस मला माहिती नाही काय ? " तो गरळ ओकत होता , वर्षानुवर्षे साठलेलं .
.
. . कुसुम पण आता पिसाटली .बाळासाहेबाच्या तोंडचा शिव्यांचा वर्षाव , तिच्या चारित्र्याची केली जाणारी लक्तरं , तिला सहन होत नव्हती . बारा गावाचं पाणी प्यायलेला तिचा मूळ स्वभाव उफाळून आला . लाव्हा उसळला . निखार्यासारखा तिचा चेहरा फुलला होता . नजरेतून ठिणग्या टाकत , तिने शब्दांची आग लावली . " दिलंस काय तू मला ? चार दागिने ... भाड्याचं घर ! तुझ्याहून वरचढ , छप्पन माझ्या पायाशी लोळण घेतात , माझे तळवे चाटतात , माझ्यासमोर कुत्र्यासारखी शेपटी घोळवत , लाळ टपकवत उभे राहतात . माझ्या डोळ्यांच्या एका इशाऱ्यावर लोटांगण घालतात . तुझ्या पेक्षा तरणेबांड रोज माझ्या शेजेवर येतात ........"
.
. . बाळासाहेबाची होळी धडाडून पेटली . आपल्या बाहेरख्यालीपणाचा तिच्याच तोंडून , मोठ्या तोऱ्यात केला गेलेला स्वीकार , समर्थन , त्याच्या जिव्हारी लागलं . शब्दाने शब्द वाढत गेला . आवाज खोलीच्या बाहेर ऐकू येऊ लागले . त्याच्याच जोडीला आदळ आपटीचेही आवाज बाहेर येत होते . लॉज मधल्या , आजूबाजूच्या खोल्यांमधली माणसं धसक्याने बाहेर उभी होती ,नोकरवर्ग जमला होता .संपत बंद दार ठोकत होता . पण कोणीही दार उघडलं नाही . आतून किंकाळ्या , रडणं भेकण ; शिवीगाळ सगळं बाहेर ऐकू येत होतं . मालकाची खोली ! काय करावं कुणाला सुचत नव्हतं. हळूहळू किंकाळ्या थांबल्या . नुसताच , काहीतरी आदळल्याचा आवाज बाहेर येत होता . आणि क्षीण हुंदके ... कण्हण्याचे सुस्कारे .!
.
. , संपतने इतरांच्या मदतीने दार फोडलं . जमिनीवर कुसुम अस्ताव्यस्त पसरली होती . तिच्या छाताडावर बसून , बाळासाहेब तिच्या झिंज्या पकडून , तिचं डोकं जमिनीवर आपटत होता . त्याच्या दुसऱ्या हातात फुटलेली सोड्याची बाटली होती . त्याच्या डोळ्यातून अंगार बरसत होते . सैतानाने त्याचा ताबा घेतला होता . कुसुम मध्ये आता कण्हण्याचे पण त्राण राहिलं नव्हतं . ती निपचित पडली होती , चिंध्यांच्या बाहुली सारखी . .जमिनीवर काचांचा सडा पडला होता . रक्ताचं थारोळ झालं होतं .
.
. . बघ्यांमध्ये एकच हलकल्लोळ माजला . हाहा म्हणता तिथे शुकशुकाट झाला . आपल्याला कसली झळ लागू नये ; पोलिसांचा ससेमिरा सुरु होऊ नये , म्हणून सगळे नाहीसे झाले . तिथे स्मशान शांतता पसरली . पोलीस आले तो पर्यंत संपतने बरेच पुरावे नाहीसे करायची पराकाष्ठा केली होती . शव विच्छेदनात कुसुमचा चेहरा , मान , दोन्ही हात , हातांचे तळवे ,ह्या सर्व निळून त्र्यहात्तर लहान मोठ्या जखमा झाल्या होत्या . सगळ्या धारदार काचे मुळे झालेल्या होत्या .
.
. . कुसुमच्या मग्रुरीचा , तिच्या अर्वाच्य वर्तणुकीचा , तरुण पुरुषांना तिच्याकडे आकृष्ट करून घेणारा तिचा एकमेव आधार , तिचा चेहरा ; तोच बरबाद करायचा निश्चय बाळासाहेबाने केला होता . सर्वात जास्त घाव चेहऱ्यावर होते . स्वतःचा बचाव करण्यासाठी चेहरा झाकताना , तो सांभाळताना , कुसुमच्या हातांवर प्रहार झाले होते . ज्या चेहऱ्याने .. ज्या तिलोत्तमेने बाळासाहेबाला भुरळ घातली होती , जिच्या साठी त्याने आपल्या सामाजिक स्थानाचा , आई वडिलांचा पण विचार केला नव्हता ; " अरे नाचीला कोणी देव्हाऱ्यात बसवतं का ? तिला रखेल ठेव की " अशा व्यवहारी सल्यांना ज्याने धुत्कारलं होतं ; त्याच बाळासाहेबाने राग , क्रोध , अपमान , तिरस्कार अशा भावनांच्या आहारी जाऊन , आपल्या हाताने , आपल्या प्रेमाचा चक्काचूर केला होता .
.
. . आरोपी म्हणून पोलीस त्याला पकडून घेऊन जात होते , तेव्हां त्याच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते . चेहरा पाषाणासारखा थिजला होता .. गारगोटी सारखे डोळे भकास होते , शरीरातील चेतनेची वाताहत झाली होती . उरलं होतं एक शुष्क , विदीर्ण , विवश , निर्माल्य ! मला कळल्यावर खूप हळहळले मी ! एक प्रेमकथा बेचिराख झाली होती . पण कोण काय करू शकणार होतं ? बुडत्याचा पाय खोलातच जाणार होता !#सुरेखामोंडकर
१५/०१/२०१७
समाप्त

. वावटळ ( भाग ५ )
.
.
. . सरत्या पावसात सृष्टी हिरवीगार झाली होती . डोंगरांवर खळाळत्या निर्झरांची , धबधब्यांची नक्षी उमटली होती . बाळासाहेबाच्या विनवणीला यश येतंय असं दिसत होतं . कुसुमचा कल जरा घर , गृहस्थी कडे वळतोय असं वाटत होतं . त्या दिवशी ती खूप खुश होती . प्रसन्न होती . तिने लाडात येऊन बाळासाहेबाला विचारलं , " आपण पन्हाळ्याला जाऊया फिरायला ? "
.
. . खूप दिवसांनी बायकोला प्रफुल्ल पाहून , तिच्या आनंदात त्यानेही डुंबायला सुरुवात केली . पन्हाळ्याला जायला त्याने गाडी काढली . " नको , बाईक वरून जाऊया की ! " त्याच्यावर आपली मधाळ नजर रोखत ती म्हणाली . त्याच्या पाठीमागे , त्याला घट्ट बिलगून ती बसली . वार्याशी स्पर्धा करीत , आपले उडणारे केस सावरत , चेहऱ्यावर आदळणारे थंडगार वार्याचे झोत आसासून शोषून घेत , दोघे पन्हाळ्याला आले . कधीमधी पडणारे पावसाचे थेंब , मध्येच येणारी उन्हाची कोवळी किरणं , शहारे आणणारी वाऱ्याची भिंगरी , गडावरची हिरवीगार वनराई आणि मिठीतली ती मादक मदालसा ! जिच्यावर तो प्रेम करीत होता . बाळासाहेब उत्तेजित झाला होता . स्वप्नपूर्तीच्या इच्छेने व्याकूळ झाला होता .
.
. . संध्याकाळी त्रिनेत्र मधील रूम वर परत आल्यावर तिला मिठीत गोळा करत त्याने तिच्यावर चुंबनांचा वर्षाव केला . तिच्या घनदाट केसांच्या पिसार्यात गुरफटताना त्याच्यातला तो जुना पिसाट प्रियकर पुन्हा जागा झाला . पण ती सावध होती . ऐन क्षणाला तिने त्याला ढकलून दिलं , " नाही .... इतक्यात नाही ... थांबूया आणखीन दोन तीन वर्ष ! आधी आपला स्वतःचा बंगला होऊ दे , मग बघू या ! "
.
. त्याच्या पौरुशाचा घोर अपमान झाला होता .. बाप व्हायला आसुसलेल्या बाळासाहेबाला तो निषेध सहन झाला नाही . त्याने खूप वाट पाहिली होती . तिच्या कलाने घ्यायचा , तिला न दुखावता सदा प्रसन्न ठेवायचा आटापिटा केला होता . घरच्या सर्व माणसांना लाथाडून त्याने तिला प्रतिष्ठा , मान मरातब दिला होता आणि गृहस्थधर्मातली त्याची एक इच्छा ती पूर्ण करत नव्हती . सबबी सांगत होती . तिला मातृत्व का नकोय हे तो चांगलंच जाणून होता . आईपण हा तिच्या स्वैर आयुष्यातला अडसर ठरला असता . #सुरेखामोंडकर १५/०१/२०१७
क्रमशः
. .वावटळ ( भाग ४ )
.
.
. . नेमक्या त्याचं वेळी कुसुमला एका मराठी सिनेमातल्या दुय्यम भूमिकेसाठी विचारणा झाली . सिनेमा नाटकात काम करणं बिलकुल नामंजूर असणाऱ्या बाळासाहेबाने बायकोच्या कळवळ्याने ; केवळ तिचं मन प्रफुल्लित राहावं , तिच्या आवडीच्या कलाविष्कारात तिने गुंतून राहावं , या हेतूने तिला सिनेमात काम करायला संमती दिली .
.
. . बाळासाहेब आपल्या हॉटेल व्यवसायात व्यग्र झाला . बंधमुक्त झालेल्या कुसुमचा अबलख वारू सुसाट सुटला . दुःखाने पोळलेला बाळासाहेब व्यवसायात स्वतःला अधिकाधिक गुंतवून घेत होता . दुःख विसरायचा हा त्याचा उपाय होता . कुसुमच्या हातात आणखीन एक दोन सिनेमा आले . भूमिका यथातथाच होत्या , पण तिच्या मनोवृत्तीला मानवणारी ही जिंदगी होती .
.
. . हळूहळू बाळासाहेबाच्या कानावर कुसुमच्या एकएक करामती , रंगढंग पोचू लागले . तो घरात नसताना , त्याच्या घरासमोर , मालदार , वतनदारांच्या ; नवश्रीमंतांच्या पोरांच्या , वैभवशाली परदेशी गाड्या तासनतास उभ्या राहू लागल्या . कुसुमचं जडजवाहीर वृद्धिंगत होऊ लागलं . ती बाळासाहेबाला जुमानिशी झाली . आधीच चंचल , ऐयाशी वृत्ती , त्यात तारुण्याचं उधाण ! रोजची भांडण , कलह , हमरीतुमरी , दोषारोप ! बाळासाहेब बेजार झाला होता . एकदिवस वैतागून त्याने बंगल्याला कुलूप ठोकलं आणि सर्व बाडबिस्तरा त्रिनेत्र मधल्या एका आलिशान रूम मध्ये हलवला .
.
. . आता कुसुम सदैव त्याच्या डोळ्यासमोर राहात होती . आपलं उथळ आयुष्य क्षणभंगुर आहे , हे तिला कळत होतं , तरी देखील , स्वैर आयुष्याच्या आठवणी , अनुभव तिला रोमांचित करीत होते . दिल है की मानता नहीं ; अशी तिची अवस्था झाली होती . हे असं बंदिस्त आयुष्य तिला पसंत नव्हतं . इथे ती सतत बाळासाहेबाच्या देखरेखीखाली , पहार्याखाली होती . जवळ जवळ नजर कैदच होती ती ! खूप नाराज होती ती ! तिची मुळची बंडखोर वृत्ती उफाळून आली होती .पहिलं बाळ देवाघरी जाऊन तीन वर्षे होऊन गेली होती . बाळासाहेबाने पुन्हा बाळाची संधी घेण्यासाठी कुसुमची मनधरणी करायला सुरुवात केली होती . आशिकी , फुलपंखी आयुष्याला चटावलेल्या कुसुमला आता आपल्या तारुण्यातली सुंदर वर्षं , गरोदरपण , बाळंतपण , बालसंगोपन ह्यात वाया घालवायची नव्हती . बाळासाहेबाने तिला तिच्या भूतकालासह स्वीकारलं होतं . लग्न झाल्यावर ती सर्वस्वी त्याची , फक्त त्याचीच राहावी अशी त्याची अपेक्षा होती . भूतकाळाच्या भानामातीतून ती कधी बाहेरच येणार नाही ह्याची त्याला कल्पना नव्हती . त्याने तिच्या साठी उच्च , रसिल्या राहणीमानाची कवाडे उघडली होती , स्थैर्य , प्रतिष्ठा , सामाजिक दर्जा दिला होता , पण कोंबडीला माणिक सापडावं तसं झालं होतं . #सुरेखामोंडकर १५/१/२०१७
क्रमशः.
. वावटळ ( भाग ३ )
.
.
. लग्नाचा थाटमाट होणं शक्यच नव्हतं . नरसोबाच्या वाडीला जाऊन त्याने लग्न केलं . बाळासाहेबाच्या घरचं चिटपाखरू पण नव्हतं . हौसाच्या शेजारपाजार पैकी चार जण आली होती . अफाट वैभवाच्या वारसदाराच बिन वाजंत्रीचं लग्न झालं . बातमी कळल्यावर माझ्या संमिश्र भावना होत्या . एका भरकटलेल्या गलबताला बंदरात निवारा मिळाला म्हणून हर्ष होता आणि ही आवळ्या भोपळ्याची मोट किती दिवस , कशी टिकणार ह्याची चिंता पण होती .हे लग्न टिकाव अशी मी मनापासून प्रार्थना केली .
.
. . शाहूपुरीतल्या अलिशान तीनमजली बंगल्याचे उभे दोन भाग झाले . उत्तरेकडचा भाग बाळा साहेबाला मिळाला . दक्षिणेकडच्या भागात आबासाहेब , दादासाहेब आणि पुरा कुटुंब कबिला राहात होता . बाळासाहेबाचा हिस्सा त्याला मिळाला . पण सर्व घराने , भाउबंदानीं त्याला जणू वाळीतच टाकलं होतं .त्याच्या कडे कुणाचं येणं जाणं नव्हतं . सणवार , हौस मौज , कुलाचार , कशाचाच तो हकदार नव्हता . दोन घरांच्या मधले दरवाजे नुसतेच कडी कुलपं लावून बंद केले नव्हते , तर त्यावर लोखंडी पट्यां ठोकून कायमचे बंदिस्त केले होते . केवळ घर तोडलं नव्हतं तर एक नातंच तोडून टाकलं होतं .कुसुम सारखी अक्करमाशी , तमासागीरीण , त्यांनी बाळासाहेबाची बायको म्हणून स्वीकारली हेच खूप होतं . मनात आणलं असतं तर हौसाच्या , कुसुमच्या चिंध्या करून त्यांनी गिधाडांनी खायला घातल्या असत्या आणि ह्या कानाचं त्या कानाला कळलं नसतं .असा त्यांचा गावात वचक होता .
.
. ,कुसुम आयुष्यात आली आणि बाळासाहेब फुलारून आला . त्याच्या पौरुशाचा केवढा मोठा सत्कार झाला होता .इंद्राच्या दरबारातील अप्सरा त्याला मिळाली होती . मधाचा थेंब टाकलेल्या जांभळा सारखे गर्द , टपोरे डोळे . घनदाट झालर लावल्या सारख्या लांबसडक पापण्या , मदनाच्या ताणलेल्या धनुष्यासारख्या भुवया , तपकिरी , तजेलदार केसांच्या महिरपिखाली झाकलं जाणारं थोडं अरुंद कपाळ ., टोकाला किंचित उचलेलं , सर्व जगाला तुच्छ लेखणारं , नाजूक पारदर्शक नाकपुड्या असणारं पिटकुलं नाक . वरचा ओठ अंम्मळ अरुंद , पातळ आणि गावठी गुलाबाची पाकळी थोडी डौलदार पणे दुमडावी असा आव्हान देणारा , दळदार खालचा ओठ . सुरई सारखी , कमळाच्या देठा सारखी नाजूक मान , आंब्याच्या कोयीसारखी सुबक , थोडी टोकदार हनुवटी आणि गालावरची अमृताच्या कुपी सारखी खळी . तिला घडवून विश्वकर्मा आपल्याच कलाकृतीवर खुश झाला असणार . तिच्या यौवनाची बाळासाहेबला नशा चढली होती . सौंदर्याच्या भांडाराचा तो जहागीरदार होता . तिच्यावरून त्याने दुनिया ओवाळून टाकली होती . बेपर्वा , बिनधास्त , ,बेधडक , श्रीमंतीमुळे आलेला निर्धास्तपणा असलेल्या बाळासाहेबाला जगाची पर्वा नव्हती . त्याने कुसुमला सोन्या हिर्यांनी मढवली . तिच्या एका खुशीच्या कटाक्षासाठी अफाट दौलत उधळली . नखशिखांत दागिने आणि उंची निवडक साड्या लेवून , सगळ्यांच्या नाकावर टिच्चून ती गावभर मिरवत होती .
.
. . वडिलोपार्जित संपत्तीतून मिळालेलं अर्ध घरही प्रचंड होतं . बाळासाहेबाने त्यात तळमजल्यावर हॉटेल काढलं . ;" त्रिनेत्र " ! त्याचा विश्वासू , जिगरी दोस्त संपत , व्यवस्थापक म्हणून मिळाला . वरचे मजले दोघे नवरा बायको वापरत होते . हॉटेलला जबरदस्त बरकत आली . प्रत्येक मजल्यावर पांच पांच खोल्या होत्या . बाळासाहेबाने त्याचं रुपांतर लॉज मध्ये केलं . तिथून जवळच , ताराबाई पार्क मध्ये त्याने टुमदार , देखणा बंगला भाड्याने घेतला . दोघे तिथं राहू लागले . हा बंगला त्यांना लाभला पण आणि नाही पण लाभला !
.
. .ह्या बंगल्यातच त्यांच्या चिमुकल्याने जन्म घेतला . पण त्याने तीन सूर्योदय पण नाही पाहिले . कुसुमच्या डोळ्याचं पाणी खळत नव्हतं .बाळासाहेब मुळापासून हादरला होता . खूप दुखावला होता . आपण सर्वांच्या मनाविरुद्ध लग्न केलं , त्यांचे तळतळाटच आपल्याला बाधताहेत अशी त्याची भावना झाली होती . पोराचं नाव तो ' राजा ' ठेवणार होता . ' राजासाहेब ! ' पण त्याची इछ्या अपुरीच राहिली . . कुसुम दिसामासी खंगत होती . कुढत होती , कोमेजत होती . तिला कशातही रस राहिला नव्हता . एका रसरशीत फुलवेलीच चिपाड झालं होतं .#सुरेखामोंडकर १४/०१/२०१७
.
. क्रमशः
. वावटळ ( भाग २ )
. . सडसडीत , सुकुमार बांधा . हवी तिथे गच्च भरलेली . अटकर कंबर , बन न घालता होणारा नारळा एवढा अंबाडा . आणि दृष्टी खिळेल असं लावण्य ! तमाशाच्या फडाबरोबर ती गावोगावी फिरत होती . तमाशा नृत्यांगनांना तेव्हां सुगीचे दिवस आले होते . अलौकिक सौंदर्य , बेफाम नृत्य , जुजबी अभिनय , कच्या तारुण्यातले स्वैर वर्तन ! कुसुमचं नाव सगळीकडे गाजत होतं . तिचं गावच मुळी मराठी सिनेमाची पंढरी . एका सिनेमात तिला काम मिळालं . एका मराठी नाटकात तिला प्रमुख भूमिका मिळाली . सिनेमा फारसा चालला नाही . नाटक मात्र धोधो चाललं .मी पाहिलं होतं ते नाटक . इतकं जुनं नाटक ! मला तर आता नाटकाचं नाव पण नाही आठवत . पण ती आठवतेय ! स्त्री असून मी तिच्या देखणेपणावर भाळले होते ,एखादी स्त्री इतकी विलोभनीय असू शकते ! शहारले होते !, तर पुरुषाची काय स्थिती होत असेल ! तिची कीर्ती मुंबई , पुण्या सारख्या शहरातून पसरली . त्याच बरोबर कुसुम म्हणजे गुलबकावलीच फुल नाही ; योग्य किंमत मोजल्यावर सहज मिळू शकते , ही बातमी देखील कर्णोकर्णी झाली .
. . तिच्याच गावातला बाळासाहेब तिच्या प्रेमात पडला होता . हा पेहलवान गडी तिच्यासाठी वेडा झाला होता . तिचा एकही कार्यक्रम तो चुकवत नव्हता . जिथे तिचा कार्यक्रम असेल , त्या त्या गावी सर्व खेळांना तो हजेरी लावायचा . लालमातीतली मेहनत , काम धंदा सर्व त्याने सोडून दिलं होतं . मोठं तालेवार घराणं होतं त्याचं . गावात त्यांना मोठी प्रतिष्ठा होती .शाहूपुरीत टोलेजंग तीनमजली घर , औरसचौरस जमीन , उसाचे मळे , अनेक एकर शेती , शेत घरं , हिरवेगार भाजीचे मळे , साखर कारखाना ; ओघाने असणारी मद्य निर्मिती ! खूप मोठा बारदाना होता त्यांचा . मोठा भाऊ दादासाहेब ! त्यांची बायको राजघराण्यातली होती . डोक्यावरचा भरजरी पदर कधी ढळला नाही तिचा . दागदागिन्यांनी लहडलेल्या त्या मोठ्या सुनेचं नखही कुणाला दिसणं अशक्य होतं . आबासाहेब खमकेपणाने अजून सर्व व्यवहार बघत होते . घरातल्या मुली देखील नावाजलेल्या , संपन्न घरात सुखाने नांदत होत्या . आबासाहेबांच्या आज्ञे बाहेर जायची कुणाची शामत नव्हती . पण बाळासाहेबांच्या ह्या नसत्या थेरांनी त्यांची मान गावात खाली गेली होती . नाक कापल गेलं होतं . पत राहिली नव्हती .
.
. . बाळासाहेब कुणाला जुमानणारा नव्हता . एक दिवस त्या गलिच्छ वस्तीतल्या , शेणामुताचा वास दरवळणाऱ्या , हौसाबाईच्या झोपडीत तो स्वतः गेला आणि त्याने कुसुमला मागणी घातली . हौसाबाई हादरली . त्या प्रतिष्ठित घराण्याशी सोयरिक जुळवायची म्हणजे , आकाशातील तारे तोडण्यासारख होतं ; सुळावरची पोळी होती , हे अनुभवी हौसा जाणून होती . पण बाळासाहेब ठाम होता . हौसालाही हे प्रलोभन टाळण्या पलीकडचं होतं . तिचे हात प्रत्यक्ष स्वर्गाला पोचले होते .कुसुमला मात्र हे लग्न पसंत नव्हतं . अवघी पंधरा वर्षांची होती ती ! तमाशातील , नाटकासिनेमातील , मुक्त आयुष्य तिला मोह घालत होतं . भोवती रुंजी घालणारे पुरुष , तिची थुंकी झेलणारे मजनू , तिच्यावर होणारी पैशांची उधळण , कौतुकाचा वर्षाव , तिच्या सौंदर्याची आतषबाजी ! ह्या सर्वांचा तिला ध्यास होता . बेधुंद आयुष्याची तिला भुरळ पडली होती .
.
. . हौसाने दुनिया अनुभवली होती . नाचणारणीचं आयुष्य , लवकर उतरणीला लागतं हे ती जाणून होती . तिची उर्जितावस्था , तिचा थाटमाट आणि आमदनी ; एकदा तिचं तारुण्य ढळलं की संपणार ! स्थैर्य , इज्जत , मान मरातब , स्वतःच्या पायाने चालत तिच्या झोपडीच्या दारात आला होता . साक्षात कुबेराशी सोयरिक जुळत होती . भीती होती फक्त आबासाहेब आणि दादासाहेबांची ! पण घरातल्या या राजबिंडया पोरावर सगळ्यांचा जीव होता . त्याच्या समोर सगळे नांगी टाकून गपगार होते . बाळासाहेबाची एकच अट होती , ' कुसुमनं बारीत नाचायचं नाही , सिनेमा नाटकात काम करायचं नाही . ' एकदा ती त्याची झाल्यावर तिच्या भूतकाळाची सावलीही त्याला तिच्यावर नको होती #सुरेखामोंडकर . १४/०१/२०१७
.
.क्रमशः