बुधवार, २४ ऑक्टोबर, २०१८

आर्त  ( कथा )
.


.
. रात्र संपता संपत नव्हती , उजाडायला अवकाश होता . असली अडनिडी काहूर माजवणारी वेळ .दिवसभर उसळत , धिंगाणा घालणारं रिसोर्ट गपगार पडलं होतं. सगळीकडे काळा करंद हिरवा रंग ! वाभरं गवत ,पिसाट झाडं झुडपं ; पोहण्याचा तलाव , कमळाचे डोह , पुष्करणी , कृत्रिम तलाव , सर्व काही गुडूप ; शेवाळी करड्या हिरव्या रंगांत बुडून गेलेलं . त्यात मुळात पांढऱ्या असणाऱ्या मातकट पिवळ्या फरशांनी केलेला चक्रव्यूहासारखा पदमार्ग ; कुठून निघाला होता ..कुठे जाणार होता, पत्ता लागू देत नव्हता. कदाचित ह्याच्याही वरून , आत जाण्याचा ,आत शिरण्याचा मार्ग असेल ; पण परतीची दिशा , परतीची आंस नसेल .
. . चंद्रकोरी सारखा तो समुद्र किनारा . घनरात्री गुढ , निर्जीव वाटणाऱ्या कुटी ; पोटी ,निर्धास्त माणसांना घेऊन चिडीचूप ,एकमेकिंशी फटकून राहणाऱ्या ! दूर ..दूर ! त्याच हिरव्या काळ्या महाकाय पंजांनी मुसक्या बांधलेल्या .
. . कुटीतून बाहेर पडताना त्याचं त्यालाच माहिती नव्हतं ; कुठे जायचंय? का जायचंय? कशासाठी ? कुणासाठी ? कोण कुठे त्याच्यासाठी ओठंगून उभं होतं ? तळहातावर हनुवटी टेकवून , सागरी निळ्या ,अथांग डोळ्यातील आर्त लपवत ! शुकशुकाट , सन्नाटा , मृत , श्वास थांबलेलं किर्र ,गर्द वातावरण . कुठेतरी काही चुकार कर्मचारी साफसफाई करताना दिसत होते .
. . दिवसभर दारू मुबलक वहात होती . मद आणि मादकता बिअर सारखी फसफसत होती . मुक्त ..बंधमुक्त वातावरणात अतृप्तीची ज्वाला लसलसत होती . निखारे फुलत होते , पलिते ,मशाली शेंदरटलेल्या होत्या . आता त्यांची कलेवरे उचलली जात होती . दिशाहीन , अंध पावलांनी तो त्या कुटील अंधारात लपेटून भरकटला होता . त्याच्या शिलगावलेल्या सिगरेटचा लाल पिवळा जहाल ठिपका अधांतरी तरंगल्या सारखा पुढे पुढे सरकत होता .
. . समोरचा सागर संध्याकाळी उसळत होता आणि आता शांत पडला होता , पालथ्या घातलेल्या घमेल्यासारखा . दूर कुठेतरी मालवत्या दिव्यांच्या पर्वता प्रमाणे , जागच्या जागी तटस्थ उभ्या असल्या सारख्या वाटणाऱ्या प्रचंड , महाकाय बोटी दिसत होत्या . उजव्या बाजूला ती छोटीशी टेकडी . प्रेमिकांचं विव्हल स्थान . तिथे अनेकांची प्रीत फुलली आणि अनेक निराश प्रेमिकांनी कड्याच्या टोकावरून खालच्या अथांग , भक्षक खाऱ्या पाण्यात स्वतःला झोकून दिलं . प्रसिद्ध आणि कुप्रसिध्द अशी ती बुटकी , स्थूल टेकडी . भारलेली . काजळ काळिमा माखलेली .
. . भानामती केल्यासारखा तो त्या टेकडीकडे खेचला जात होता .शिखरावर हात फैलावून ख्राइस्त दि रिडीमर सारखी तीच उभी होती का ? नक्की तीच? वाऱ्याबरोबर फडफडणारे कपडे , उसळणारे सैरावैरा धावणारे मोरपंखी केस ! तिच्या मागे हात फैलावून टायट्यानिक सारखं उभं राहावं !त्याने दुसरी सिगरेट शिलगावली . मिट्ट अंधारात त्याला फक्त तो पेटणारा आणि विझणारा आगीचा बिंदू दिसत होता .
. .आभाळ ओथंबून आलं होतं . चंद्र चांदण्या सगळ्यांना पोटात घेऊन ते ढेरपोट्यासारखं टम्म फुगलं होतं .एक टाचणी टोचली असती तर ते ठिकऱ्या ठिकऱ्या होऊन फुटलं असतं . सगळ्या चांदण्या चमचमत धबाधबा कोसळल्या असत्या . अंधाराला तडा गेला असता . पण त्याला उजेड , आशेचा किरण , प्रकाशाची तिरीप काही काही नको होतं . अंधारयात्री तो ! एकटा ..एकाकी अंधारयात्री !
. . समोरचं काहीच दिसत नव्हतं .त्या टेकडीवरच कपाळमोक्ष होणार होता . टेकडी चढायची वेळच येणार नव्हती .हपापल्या उर्मीत , एखादं लक्ष गाठावं अशा आतुरतेनं तो बेफाम चालला होता . त्याचं पुढचंच पाऊल खचकन ओल्या मऊ मातीत रुतलं .महासागर मरगळून मागे हटला होता ; पण त्याचे थंडगार गिळंकृत करणारे अवशेष मागे सोडून गेला होता . रेतीचा किनारा संपला होता . सगळी दलदल होती . नकळतपणे त्याचं दुसरं पाऊल पुढे पडलं . ते गुढग्यापर्यंत रुतलं . अशा खादणाने गिळंकृत केलेली माणसं , प्राणी त्याने सिनेमात पाहिले होते .
. . भयावह अजगराचा थंडगार लिबलिबीत विळखा त्याच्या सबंध शरीराभोवती पडला . जीवाच्या आकांताने तो पाय वर खेचायचा प्रयत्न करीत होता आणि अधिकाधिक खोलवर जात होता . ओठातली सिगरेट कधीच खाली पडली होती .दोन्ही पाय भुसभुशीत ओल्या मातीत खोल खोल जात होते .त्याचा तोल जायला लागला . पण हात टेकले असते तर तो परत उठू शकला नसता .चिणला गेला असता .
. . भीती भीती ;मरणाची भीती , त्याच्या धमन्यांतून , नीला रोहिणी मधून विषारी नागासारखी हळू हळू पुढे सरकत होती .त्याला काबीज करीत होती . असं असतं मरण ? हळू हळू आक्रमण करणारं ,एकेका अवयवाचा , भावभावनांचा घास घेणारं , भान हरपून गिळंकृत करणारं ?मरणाचा अनुभव असा असतो ?' नाही ! मला मरायचं नाही ! मरायचं नाही !' त्याचं अबोल आक्रंदन दशदिशांना व्यापून टाकत होतं . घसा कोरडा पडला होता , शब्द फुटत नव्हता .
. .अचानक एक बळकट पकड त्याच्या दोन्ही बाहूंवर पडली .दात ओठ खात कोणीतरी त्याचा घास घेणाऱ्या त्या कराल मृत्युच्या दाढेखालून त्याला खेचून काढत होतं .त्याला काहीच समजत नव्हतं .'मला जगायचंय , मला जगायचंय !' एवढाच आक्रोश अणूरेणूतून घुमत होता . ओढत , खेचत ,थांबत , फरफटत , कोणीतरी त्याला किनाऱ्यावरच्या वाळूवर आणून फेकलं . तो कोणीतरी सुद्धा थकून भागून , धापा टाकत त्याच्या शेजारीच पसरला . दोघांचेही श्वास फुलले होते . हृदयाचे ठोके ताशासारखे वाजत होते . छाती धपापत होती .
. . भानावर आल्यावर त्याने कुशीवर वळून पाहिलं . त्याच्या शेजारी श्रमून ,गलितगात्र होऊन पडला होता ; रिसोर्टने नेमलेला दणकट जीवरक्षक ! सिगारेटच्या एका पेटत्या ठिपक्याच्या अनुरोधाने तो धावून आला होता .जीव देणं म्हणजे नक्की काय असतं हे पुरेपूर लक्षात आल्या क्षणी त्याने त्याचा प्राण वाचवला होता . एका अनाम , अनोळखी , अज्ञात व्यक्तीने त्याला आयुष्याचं दान दिलं होतं ; जे तो एका ज्ञात व्यक्ती साठी बेचिराख करणार होता ......सुरेखा मोंडकर